जनसामान्यांच्या कल्याणासाठी प्रबोधन करणारा महानुभाव संप्रदाय- साहित्याचार्य संतोषमुनी शास्त्री कपाटे,औरंगाबाद.

 




जनसामान्यांच्या कल्याणासाठी प्रबोधन करणारा महानुभाव संप्रदाय- साहित्याचार्य संतोषमुनी शास्त्री कपाटे,औरंगाबाद.


प्रस्तावना

      तेराव्या शतकात महाराष्ट्रामध्ये जे विविध संप्रदाय निर्माण झाले त्यांपैकी ' महानुभाव ' संप्रदाय हा एक होय . जैन , लिंगायत , नाथ , महानुभाव व वारकरी या संप्रदायांनी स्वतःच्या भावविश्वानुरूप तत्कालीन समाजजीवनाचे चिंतन केले व आपल्या तत्त्वज्ञानाच्या बळावर विश्वाच्या कल्याणासाठी समृद्ध विचारांची पेरणी केली . अज्ञान आणि अंधकारात चाचपडत असलेल्या समाजाला नवी प्रकाशमान वाट दिली , माणसाच्या जीवनात क्रांती घडवून आणली . ' महानुभाव संप्रदाय ' हा त्यातील एक असा संप्रदाय आहे की , ज्या पंथाने आपल्या तत्त्वज्ञानाच्या साहाय्याने नवे विचार मांडून ' नैतिकमूल्यांची प्रतिष्ठापना केली व अनेक माणसे एकत्र करून नव्या युगाची सुरुवात केली . या संप्रदायाचे मूळ श्रीदत्तात्रेयप्रभू आणि प्रणेते हे ' श्रीचक्रधरस्वामी ' होत . सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंचे गुरू श्रीगोविंदप्रभू आणि सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींनी तत्कालीन समाजाला जो उपदेश केला , त्यावरून असे लक्षात येते की , महानुभाव संप्रदाय हा सामान्यजनांच्या कल्याणासाठी प्रबोधन करणारा संप्रदाय आहे .

महानुभाव संप्रदाय आणि तत्कालीन महाराष्ट्र

        ज्या काळात या संप्रदायाची निर्मिती झाली तो काळ लक्षात घेतला की , संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या काही काळ अगोदर या संप्रदायाची निर्मिती झालेली दिसून येते . तो काळ हा खूप वाईट होता . ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , शूद्र अशी जातीयतेची उतरंड होती . त्यामुळे शिक्षणाचा अधिकार हा केवळ ब्राह्मणांनाच होता . इतर वर्गातील लोकांना तो अधिकार नव्हता . त्यामुळे बहुजन समाजातील सामान्य माणसे ही विविध गोष्टींनी भरडली जात होती . देवगिरीच्या यादवांची कारकीर्द असल्याने सर्वत्र धर्मश्रद्धेचे वातावरण होते . यज्ञयाग , कर्मकांड ,व्रतवैकल्ये , उपासना इत्यादी स्तोम माजले . यामुळे देवताशक्तीचे प्रमाण अधिक वाढल्याने धार्मिक अंधश्रद्धा वाढली होती . जादूटोणा , भुते - खेते , चेटकी इत्यादी गोष्टींवर लोकांचा विश्वास होता . या सर्व घटनांमुळे सर्वत्र नवस , सायास , उपवास , प्राण्यांचा बळी देणे या गोष्टी वाढू लागल्या . त्यामुळे सामाजिक जीवन हे प्रदूषित झाले होते . अशा छिन्नविछिन्न झालेल्या काळात महानुभाव संप्रदायाने जे कार्य केले ते महान स्वरूपाचे होते . महाराष्ट्रामध्ये महानुभाव पंथीयांनी आपला आचारधर्म आणि तत्त्वज्ञानाद्वारे जी क्रांती केली ती सामान्य माणसांच्या जीवनामध्ये सुधारणा व परिवर्तन घडवून आणणारी होती . ज्या काळात हेमाडपंडित ' याचा ' चतुर्वर्गचिंतामणी ' हा ग्रंथ तीर्थ देवतापूजन , श्राद्धविधी , मुहूर्त निर्णय , दानधर्म , व्रतवैकल्य याबद्दल सविस्तर माहिती देऊन दरदिवसाला , दरतिथीला कोणती व्रते करायची हे सांगत असे व दोन हजार व्रतवैकल्ये कशा पद्धतीने करायची याची माहिती देत होता . त्या काळात महानुभावीय मंडळींनी ' एकेश्वरवाद ' निर्माण करणे म्हणजे प्रस्थापित समाजव्यवस्थेला आव्हान देण्यासारखे होते . ज्या संस्कृतीमध्ये हजारो देवतांची संख्या आहे , अशा वेळी देवतांचे स्तोम कमी करून , भोंदूगिरी , बुवाबाजी इत्यादी गोष्टींना विरोध केला व दांभिक भक्तीपेक्षा ज्ञानयुक्त भक्तीचे महत्त्व जनसामान्यांना पटवून दिले व नव्या जीवन मार्गाचा संदेश दिला .

महानुभाव पंथ

       तेराव्या शतकात निर्माण झालेल्या महानुभाव संप्रदायाने जे लोकोद्धाराचे कार्य केले ते उल्लेखनीय स्वरूपाचे आहे . श्रीगोविंदप्रभू आणि श्रीचक्रधरस्वामी यांनी सांगितलेल्या लीळांच्या आधारे महानुभावीय साहित्याची निर्मिती झाली . ' गद्य ' आणि ' पद्य ' अशा दोन्ही साहित्यप्रकारांमध्ये लेखन करून महानुभावीय कवी - लेखकांनी तेराव्या शतकात मराठी भाषेत ग्रंथरचना करण्यास सुरुवात केली . गद्यलेखनात ' लीळाचरित्र ' , ' श्रीगोविंदप्रभू चरित्र ' , ' स्मृतिस्थळ ' , ' सिद्धान्तसूत्रपाठ ' ' दृष्टान्तपाठ ' , ' पूजावसर ' आणि पद्यलेखनामध्ये ' सातीकाव्यग्रंथ ' , महदंबेचे ' धवळे ' व ' मूर्तिप्रकाश ' इत्यादी वाङ्मयलेखन करून संस्कृत भाषेच्या वर्चस्वाच्या काळात ' मराठी ' भाषेत रचना केली . ज्या काळात बहुजन लोकांना ज्ञानाची कवाडे बंद होती , अशा लोकांना संस्कृत भाषेत असलेले ज्ञान आकलनाच्या पलीकडचे होते . अशा जनांसाठी त्यांनी मराठी मायभाषेचा स्वीकार करून त्यांच्याच बोलीमध्ये भक्ती व ज्ञान देण्याचे काम महानुभाव संप्रदायाने केलेले आढळते . या संप्रदायाचे विशेष सांगताना हा पंथ द्वैती विचाराला प्राधान्य देणारा आहे . जीव , देवता , प्रपंच आणि परमेश्वर या नित्य वस्तू आहेत . त्या स्वतंत्र , नित्य , अनादी व अनंत आहेत . महानुभाव पंथातील तत्त्वज्ञानानुसार या संप्रदायातील लोकांनी ईश्वराचे पाच अवतार मानले . त्रेतायुगात श्रीदत्तात्रेय , द्वापरयुगात श्रीकृष्णावतार आणि कलियुगात श्रीगोविंदप्रभू ,संन्यस्त श्रीचांगदेवराऊळ उपाख्य श्रीचक्रपाणी आणि श्रीचक्रधरप्रभू . या पाच अवतारांनाच परमेश्वर मानून त्यांची उपासना केली जाते . ' संन्यस्त ' व ' गृहस्त ' असे शिष्यांचे दोन वर्ग असून शिष्याने सतत भ्रमण व भिक्षाभोजन घेऊन एकांतवास पत्करून , ईश्वराचे नामस्मरण करावे व पंथाचा प्रचार व प्रसार करावा . हा पंथ साधकांचा असून कडक आचारधर्माद्वारे त्यांनी आपल्या पंथाचे वेगळे तत्त्वज्ञान लोकांसमोर मांडले . तेराव्या शतकामध्ये या संप्रदायाने जी शिकवण दिली ती मानवतावादी वृत्तीची व सर्व स्तरातील लोकांना समजून घेऊन एकत्र आणणारी होती .*

महानुभाव संप्रदायाने केलेले प्रबोधन

         महानुभाव संप्रदायाचे कार्य लक्षात घेत असताना त्यांनी केलेले प्रबोधन हे तत्कालीन समाजातील लोकांना दिशा देणारे होते . यादवकालीन समाजजीवनाचे सामाजिक , धार्मिक , सांस्कृतिक व राजकीय जीवनाचे चित्रण करून परंपरेने चालत आलेल्या भक्तिमार्गी , वेद आणि उपनिषदांचे अंधानुकरण त्यांनी केले नाही तर आपल्या साहित्याद्वारे जो विचार मांडला , तो नवी वाट निर्माण करणारा होता . समाजातील तळागाळातील लोकांसाठी ' ज्ञानाचे दान ' करणारा हा संप्रदाय भक्तीच्या माध्यमातून समाज परिवर्तन व जागृती करून सामान्यजनांचे प्रबोधन करणारा होता आणि आहे , राहीलही .

जनसामान्यांसाठी मराठी बोलीभाषेचा वापर

          ज्या काळात महानुभाव साहित्याची निर्मिती झाली तो काळ धार्मिक पंडितांच्या ' संस्कृत ' भाषेचा होता . वेद , उपनिषदे , मंत्रोच्चार यामधून संस्कृत भाषेत ज्ञान सांगणारे पंडित त्या काळात होते . ' चतुर्वर्गचिंतामणी ' हा हेमाडपंडित याचा ग्रंथ त्याचा नमुना होय ; परंतु महानुभावीय कवी - लेखकांनी आपल्या साहित्याची निर्मिती सामान्य लोकांना समजेल या भावनेतून लोकांच्या दैनंदिन बोली मराठी भाषेतून केली . मराठी भाषेला धर्मभाषेचे स्थान या मंडळींनी प्राप्त करून दिले . संस्कृत भाषेचा विरोध किंवा समर्थन न करता मराठी भाषेचा स्वीकार करणे व आपल्या वाणी व लेखनीद्वारे जनजागृती करणे हे महान कार्य त्यांनी केले ; कारण त्या काळात ' मराठी ' भाषेचा वापर करणारे बहुसंख्य लोक होते . त्यांना संस्कृत भाषा व त्यातून येणारे तत्त्वज्ञान यांची उकल होत नव्हती . अशा लोकांसाठी मराठी भाषा ही ' ज्ञानभाषा ' होती . त्या लोकांसाठी या संप्रदायाने मराठी भाषा महत्त्वाची मानली . श्रीचक्रधरस्वामी यांनी निरूपण केलेल्या मराठी भाषेचा वापर सर्वांनी केला पाहिजे असे नागदेवाचार्य यांचा दंडक होता . धर्मवार्ता व धर्मचर्चा करणाऱ्या दामोदर पंडित आणि केशिराजव्यासांना मराठी भाषेचे महत्त्व सांगताना ते म्हणतात , " तुमचा अस्मात कस्मात मी नेणे गा : मज श्रीचक्रधरे निरूपिली म - हाटी तियाची पुसा " यावरून मराठी भाषेचा वापर करण्यासाठी श्रीचक्रधरस्वामींचा आपल्या अनुयायांना किती आग्रह होता हे लक्षात येते . याचे मूळ कारण असे होते की , या भाषेच्या वापरामुळे समाजातील तळस्तरातील माणसांना ' भक्ती ' व ज्ञानाची गोडी लागेल व विद्येचे महत्त्व कळून त्यांचे जीवनमान उंचावेल ही धारणा होती . या संदर्भाने मत नोंदवताना डॉ . वि . भि . कोलते असे लिहितात , ' संस्कृत ही धर्मभाषा असताना श्रीचक्रधरांनी मराठी भाषेला त्या सिंहासनावर नेऊन बसवावे , ही खरे तर बंडखोरीच म्हणावी लागेल . ' ' अध्यात्म ' आणि ' धर्म ' या विषयावर केवळ संस्कृतमधून चर्चा होऊ शकते . या पारंपरिक वृत्तीला शह देऊन ही चर्चा मराठी भाषेतूनही होऊ शकते . हे त्यांनी सिद्ध केलेले दिसून येते . यावरून असे लक्षात येते की श्रीचक्रधरांनी तत्कालीन समाजातील लोकभावना महत्त्वाची मानून मराठी भाषेचा जो स्वीकार केला तो प्रबोधनाच्या हेतूने महत्त्वाचा होता .*

दीनदलितोद्धारासाठी कार्य

        यादवकालीन सामाजिक व धार्मिक जीवनाचा अभ्यास करताना या काळात प्रचंड जातीयता अस्तित्वात होती हे दिसून येते . ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , शूद्र यानुसार व्यक्तीव्यक्तींमध्ये उच्च - नीचपणा , श्रेष्ठ - कनिष्ठत्व ठरले जात होते . दलितांना धार्मिक स्थळामध्ये प्रवेश नव्हता . ' माणूस ' म्हणून त्याचे अस्तित्व धोक्यात आले होते . अशा काळात जीवेश्वर भेद , भक्तियोग , संन्यास व अहिंसा या चार प्रमुख तत्त्वांच्या आधारावर महानुभाव पंथाने जे तत्त्वज्ञान सांगितले ते माणसामाणसांत निर्माण होणारी द्वेषभावना व सामाजिक विषमता दूर करणारे होते . श्रीचक्रधरस्वामी यांनी चांभार समाजातील एका पुरुषाला स्थिती ' देऊन परमोच्च ईश्वरसुखाची सुखानुभूती प्रदान केली . तर गोविंदप्रभू यांचे रिद्धपूर येथील उपेक्षित , रंजल्या गांजल्यावर विलक्षण प्रेम होते . सामान्य लोकांवर अपार माया होती . " राऊळ माए : राऊळ बापु : " अशी धारणा त्यांच्या संदर्भात तेथील लोकांची होती . दीनदलित , शूद्र जातीतील लोक महानुभाव संप्रदायाचे अनुयायी बनले होते . याचे कारण असे दिसते की , यादवकालीन समाजात वर्णव्यवस्था एवढी भयंकर होती , या सर्व बुरसटलेल्या विचारांना पायदळी तुडवून दलितोद्धाराच्या कार्यासाठी श्रीगोविंदप्रभू व श्रीचक्रधरस्वामी यांनी समाजक्रांतिकारक कार्य केले . एकदा गोविंदप्रभू तेलिणीच्या घरी गेल्यावर तिच्या मुलाच्या हातातील लाखाची भाकरी खातात . त्यावर ती तेलीण श्रीप्रभूना म्हणते की सामाजिक बहिष्काराला बळी पडावे लागेल . श्रीप्रभू म्हणतात , बाई ही भाकरी तेल्याची नव्हे , ही लाखाची भाकरी . एवढी सहिष्णुता श्रीप्रभूचे ठायी पाहावयास मिळते . त्या काळी ब्राह्मणांनी तेल्याच्या घरातील अन्न सेवन करणे निषिद्ध मानले जात होते . श्रीगोविंदप्रभू हे दलितांसाठी केवळ वाणीने बोलणारे नव्हते तर कृतीने कार्य करणारे समाजसुधारक होते . मातंगाच्या , अस्पृश्यांच्या , दलित अशा सर्व समाजाच्या घरी जाणे , त्यांच्या दुःखात सहभागी होणे , त्यांचे दुःख निवारण करणे याकडे श्रीगोविंदप्रभू यांचा कल होता . म्हणून महानुभाव संप्रदायाची शिकवण देणारे हे महापुरुष ( परमेश्वरावतार ) मानवतावादी मूल्यांची जपणूक करणारे होते व दलितोद्धारासाठी कार्य करणारे होते .

स्त्री जागृती

        महानुभाव संप्रदाय समकालीन समाजजीवनामध्ये स्त्रीविषयक जागृती नव्हती . अनेक सामाजिक बंधनांमध्ये तिचे अस्तित्व जखडून टाकले होते ; परंतु श्री गोविदप्रभू आणि श्री चक्रधरस्वामी यांनी या संप्रदायामध्ये स्त्रियांना स्थान दिले व संन्यासदीक्षेचा अधिकार प्राप्त करून दिला . ज्या काळात स्त्रीकडे एक भोगवादी वस्तू म्हणून पाहिले जात होते त्या काळात स्त्रियांना उंबरठ्याच्या बाहेरच्या जगाची दृष्टी महानुभाव संप्रदायाने निर्माण करून दिली . ' महदाईसा'सारखी जिज्ञासू शिष्या त्याचे उत्तम उदाहरण आहे . ज्या महदंबेनी ' धवळे ' व ' मातृकीरुक्मिणीस्वयंवर ' ही काव्ये लिहिली . श्री चक्रधरस्वामी व नागदेवाचार्यांवर ओव्या लिहिल्या यावरून महानुभावीयांनी स्त्रीविषयक समतेचा जो दृष्टांत स्पष्ट केला होता तो स्त्रियांना ' स्वातंत्र्य बहाल करणारा होता . ' महदंबा ' या कवयित्रीबद्दल स्तुती करताना श्री चक्रधरस्वामी म्हणतात , ' म्हातारी जिज्ञासक , म्हातारी चर्चक , एथ काहीतरी पूसतीच असे ' आणि आचार्य नागदेवही तिचे गुणवर्णन सांगताना म्हातारी धर्मरक्षक , प्रीतिरक्षक , सुहृदत्वे धर्म सांभाळणारी अशी तिच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतात . महदंबा ही एक बालविधवा आहे . त्या काळी वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रियांना आयुष्यभर केशवपन करून पांढऱ्या वस्त्रात ठेवले जात होते ; परंतु महदंबेला या संप्रदायात मानसन्मान दिला होता . त्यामुळे अधिकारवाणीने ती सर्वांशी वागे . ज्या स्त्रीला समाजाने नाकारले होते त्या स्त्रीला मराठीतील आद्यकवयित्रीचा मान पंथाने मिळवून दिला . त्यामुळे महदंबेसारख्या असंख्य स्त्रियांना या संप्रदायात समानतेने वागणूक मिळत होती . ' स्त्री ' आहे म्हणून तिचा दुजाभाव करणे हे महानुभावीय तत्त्वज्ञानात बसत नव्हते . म्हणून स्त्रियांना स्वातंत्र्य देणारे श्रीगोविंदप्रभू व श्रीचक्रधरस्वामी हे स्त्री सुधारणेचे आद्यप्रवर्तक होत . महानुभाव पंथातील स्त्रियांचा उल्लेख करावयाचा झाल्यास महदाईसा , हिराईसा , पोमाईसा , आबाईसा , नागुबाईसा , धानाईसा , चोंडाईसा , नातीनागाईसा , सुंदरबोल्हाईसा इत्यादी अत्यंत प्रतिभावान व बुद्धिमान स्त्रिया पुढे आलेल्या दिसून येतात . या सर्व स्त्रिया सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या तत्त्वज्ञानावर आकर्षित होऊन त्यांच्यासमवेत व नागदेवाचार्यांसमवेत राहिल्या . महानुभाव संप्रदायात स्त्रियांना ' गुरुमाउली'ची उपमा आहे . म्हणजे अनादी काळापासून चालत आलेली ' मातृदेव भव ' ही संकल्पना या संप्रदायात अस्तित्वात आहे हे जाणवते . या पंथाने आपल्या तत्त्वज्ञानात ' चित्रातील स्त्री संन्यासी मुमुक्षूनी वर्ण्य मानावी ' असे जरी म्हटले असले तरी स्त्रीस्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे असे दिसते . यावरून हे स्पष्ट होते की , त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समानतेचा व स्वातंत्र्याचा आहे .

निसर्ग व पशुपक्षीविषयक प्रेमभाव

         ' लीळाचरित्र ' व ' श्रीगोविंदप्रभूचरित्र ' यातील लीळांचा अभ्यास करताना निसर्ग व पशुपक्षीविषयक प्रेमभाव व्यक्त झालेला दिसतो . ' तुमचेनी मुंगी रांड न होआवी ' किंवा ' आऊसा श्वान हननी शिक्षापण ' यावरून पशु - पक्षी - प्राणी याबद्दल भूतदया स्पष्ट होते . ' जीवेश्वर भेद ' या संकल्पनेतून आपल्याकडून कोणत्याही मानव , पशुपक्षी , प्राणी , वनस्पती यांची हिंसा घडू नये हे सांगितले . ' ससिक रक्षण ' या लीळेतून पारध्याच्या भयाने व्याकूळ झालेला ससा जेव्हा श्रीचक्रधरांच्या मांडीखाली दडून बसतो त्या सशाचे ते रक्षण करतात व पारध्यांना उपदेश करतात , ' तुम्ही याला का मारता ? ' असा प्रश्न केला आणि त्यांच्यातील संवेदनेला जागवले . सर्वज्ञांनी नांदेडला गाई चारल्या . श्रीगोविंदप्रभूनी उपटून टाकलेली वेल पुन्हा लावून तिला हिरवाई करून दिली . यावरून त्यांचे प्रत्येक सजीवात प्रेम होते हे लक्षात येते . यावरून हे स्पष्ट होते की , महानुभाव संप्रदायाने निसर्ग व पशुपक्षीविषयक प्रेमभावना जागृत होण्यासाठी प्रबोधन केले आहे .

नैतिक मूल्यांची जोपासना

           महानुभाव संप्रदायानी जे तत्त्वज्ञान सांगितले त्यामधून समता , मानवता , प्रेमभाव , सदाचार , वैराग्य , भक्ती , ज्ञान , परोपकार , सद्भावना , ईश्वरीजाणीव , शिष्टाचार , आदरातिथ्य , अहिंसा , कारुणभावना इत्यादी नैतिक मूल्यांची जडणघडण केली . त्यामुळे मूल्यहीन व विकलांग झालेल्या समाजाला नव्या विचारांची व नैतिक मूल्यांची देणगी बहाल केलेली दिसते . त्यांनी सांगितलेला भक्तिमार्ग हा मानवाला नवी दृष्टी प्रदान करणारा आहे ; पण केवळ भक्ती व ज्ञान असून चालत नाही तर ' आचरे तयाचा धर्म ' हे ब्रीदवाक्य समजावून देऊन सेवा ही मुक्तिदायिनी आहे हे सांगितले आहे . सर्वांप्रती प्रेम करावे , माणसामाणसांत भेद न मानता माणसाची सेवा ही ईश्वरसेवा हे तत्त्व समजावून दिले व नव्या विचारांच्या आधारे या पंथाची विचारधारा समाजामध्ये प्रवाहित केली .

निष्कर्ष

         यावरून असे लक्षात येते की , महानुभाव संप्रदायाने केलेले कार्य साहित्यिक व सामाजिक दृष्टीने केले आहे , असे नसून तत्कालीन समाजाचे प्रबोधन व्हावे हा हेतू त्यातून जाणवतो . ज्याप्रमाणे मराठी भाषेचा स्वीकार केला त्याप्रमाणे दलितोद्धाराचे कार्य , स्त्री जागृती , निसर्ग व पशुपक्ष्यांवरील प्रेम , नैतिक मूल्यांची पेरणी या पंथाने केली . संपूर्ण मानवजात ही एक असून कोणीही श्रेष्ठ - कनिष्ठ , उच्च - नीच असा नाही . आपण सर्व एक आहोत हा विचार समजावून दिला व चहुबाजूंनी ढासळत चाललेल्या समाजामध्ये सामान्यजनांच्या सुधारणेसाठी प्रबोधन करण्याचे समाजसुधारकी व क्रांतिकारी कार्य केले .

पुर्वप्रकाशित केशर गौरव ग्रंथ



टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट