एकनाथी भागवतातील शेती - डॉ.हंसराज जाधव
एकनाथी भागवतातील शेती-डॉ.हंसराज जाधव
---------------------------------------------------------------------------------
प्रस्तावना :
संत एकनाथांची भूमिका लोकशिक्षकाची होती.लोकांना जागृत करण्यासाठी लोकांच्या भाषेबरोबरच त्यांच्या दैनदिन व्यवहारातील प्रतिमा,प्रतिकांचा वापर करणे ओघाने आलेच. नाथांच्या अवतीभवती असणारा तत्कालिन समाज अशिक्षित, अडाणी,कष्टकरी,शेतकरी होता.भागवतातील श्रीकृष्ण- उद्धव यांच्यातील तात्विक चर्चेचा थोडासा बोजड आणि क्लिष्ट वाटणारा विषय सुलभ करून सांगताना नाथांनी शेती आणि शेतीशी निगडीत असणार्या गोष्टींचा उपयोग अगदी लिलया केला आहे.
संसाररुपी शेतात ईश्वर हा शेतकरी :- ज्यापद्धतीने शेतात कोणतेही काम करताना शेतकरी हाच त्याचं संपुर्ण नियंत्रण करतो. त्याच पद्धतीनं ईश्वर हाच संसाररुपी शेतातील संपुर्ण घटनांचं नियंत्रण करित असतो.
'ब्रम्हादि शरीरधारी।तूज आधीन गा श्रीहरी।जैसे नाथिले बैल नांगरीं। कृषीवळू धरी स्वामीत्वें।। ६-१६९।।
तेथे जो राहे मागे पुढें। तोच झोडीजे असुडें। तुझे आज्ञेवरी रोकडे। वर्तती गाढे कळिकाळादिक।।६-१७०।।संसारलक्षण शेतासी।अधिकारीं जुंपोनि सर्वांसी।निजकर्मे क्षेत्रासी।तूं वाहविसी निजाज्ञा।।६-१७१।।
ज्याप्रमाणे वेसण घातलेल्या बैलांना नांगराला जुंपून शेतकरी त्यांना हवं तसं वळवून घेतो.जो बैल मागे रहातो त्यास चाबकाने झोडून हवे तसे काम करुन घेतो.त्याप्रमाणे तू (ईश्वर) संसाररुपी शेतांत सर्वांना अधिकारावर जुंपून त्यांच्याकडून हवे तसे काम करून घेतोस.
भागवत हेच मोठे शेत :-
एकनाथी भागवताच्या शेवटच्या अध्यायात (एकतिसावा) भागवतासाठी शेताचे सुंदर रुपक योजून प्रत्येक अध्यायाचा आढावा एकनाथांनी घेतला आहे.भागवतात वर्णिलेले श्रीकृष्णचरित्र एकतीस अध्यायातून वर्णन करताना कोणत्या अध्यायात काय वर्णिले हे सांगण्यासाठी शेतकर्याला ज्यापद्धतीने जमीन निवडीपासून ते धान्य घरात येऊन पडेपर्यंत, त्याचे अन्न(स्वयंपाक) होईपर्यंत जशी वेगवेगळ्या टप्प्यांवर विशेष काळजी घ्यावी लागते त्याप्रमाणे भागवतातील कथाही अध्यायगणिक विकसीत झाली आहे.जमीन निवडीपासून सुरु झालेले कृषीकर्म जमीनीतील पालव्या तोडून,काशा काढून जमीन मशागत करण्यासाठी नांगरणी करुन शेत तयार करणे, पावसाने शेत भिजून वाफ झाली की प्रत्यक्ष पेरणी करणे,पिकावर येणार्या चुकार गुराढोरांची आणि भोरड्या,पाखरांची काळजी घेणे, टोळधाड,चोरांपासून पिकाला सांभाळणे, पिकाची कापणी करून धान्य घरी आणणे आणि शेवटी त्या धान्यापासून रुचकर भोजन बनवणे झाल्यानंतरच खर्या अर्थाने पुर्ण होते. भागवतातल्या अध्यायातून आलेल्या विषयाचे वर्णन नाथांनी याच टप्प्यातून पुढीलप्रमाणे केले आहे.
'प्रथमाध्यायीं वैराग्य पूर्ण।मुख्य अधिकाराचें लक्षण। नारदवसुदेवसंवाद जाण। भूमिशोधन साधका।।३९०।।इत्यादि विदेहाचे नव प्रश्न।नवांचीं नवही उत्तरें पूर्ण।तेचि नव नांगरण।क्षेत्रकर्षण अतिशुद्ध।।३९२।। हें उद्धवें जाणोनि आपण।निर्वेद केला जो संपूर्ण।तेचि कल्पनाकाशाचें निर्दळण।पालव्या छेदन विकल्पांच्या।।३९४।।कामलोभांचे गुप्त खुंट।आडवू लागले उद्धट।ते समुळ केले सपाट।अतितिखट अनुतापें।।३९५।।क्रोधाचिया अतिजाडी । समूळ उपडिल्या महापेडी। शांती निवडक चोखडी। समुळ उपडी मूळेंसीं।।३९६।। उद्धवचातक आर्तीहरण। वोळला श्रीकृष्ण कृपाघन।क्षेत्र वोल्हावलें सबाह्य पूर्ण। लागली संपूर्ण निजबोधवाफ ।।३९७।।
तेथें पुर्णब्रह्म निजबीज।चाडें तंतु सर्व परित्यज्य।श्रवणनळें अधोक्षज।पेरिलेंचि सहज स्वयें पेरी ।।३९८।। यदुअवधूतसंवादस्थिती। चोविसां गुरुंची उपपत्ती। आगडु खणविला क्षेत्राप्रती। वोढाळ पुढती रिघों न शके।।९९।। चिकभरित जाहल्या पिकातें।भोरड्या ओरबडिती तेथें। ते दशमाध्यायीं श्रीअनंते। उडविलीं मतें भजनगोफणा।।४००।। अकरावे अध्यायी जाणा।हुरडा ओंब्या आणि घोळाणा। निळगुळेंसीं चाखविले सुजाणां।मक्तलक्षणांचे हाते।।४०१।।
एवं तेराव्या अध्यायाप्रती। जाहली पिकाची पूर्ण निष्पत्ती। तेचि हंसगीतउपपत्ती। समाधि श्रीपती सांगोनि गेला।।४०४।।
पीक चढतचढतां हातीं। माझारी रिद्धीसिद्धी झडपोनि नेतीं। ते सिध्दीत्यागाची उपपत्ती।पंधराव्याप्रती दाविली।।६।।
क्षेत्र अधिकारी एथें जाण।चारी आश्रम चारी वर्ण। सतरावा अठरावा निरुपण।वांटे संपूर्ण विभागिले।।८।। एकुणिसाव्या अध्यायीं जाण।करुनि पिकाची सवंगण। जेणें कोंडेनि वाढले कण।तो कोंडा सांडूनि जाण कण घ्यावे।।०९।।
जे भागा आले शुद्ध कण। ते राखावे आपले आपण। गुणदोषांचे चोरटे जाण। खळें फोडून कण नेती।।११।। चोर कोण मार्गे येती। पिकलें पीक ज्या वाटां नेती।तो मार्ग बुजावया निश्चितीं। तत्वसंख्याउपपत्ती बाविसावा।।४१९।। मुख्य चोरांचे चोरटेपण।मनापाशीं असे जाण। ते मनोजयाचे लक्षण। भिक्षुगीतनिरुपण तेविसावा।।२१।। मोकळे पीक असतां शेतीं। पशु पक्षी चोर रिघों न शकती। ते सहज संरक्षणउपपत्ती।निर्गुणोक्ती पंचविसावा।।२४।। स्त्री कामाची धाडी जाण। सकळ पिकासी नागवण।पुरुरवा नागवला आपण। इतरांचा कोण पडिपाडू।।२५।। निकोप पिक लागल्या हातीं।त्याची करावया निष्पत्ती।क्रियायोगाची निजस्थिती। सत्ताविसाव्याप्रती प्रकाशिली।।२७।।
सकळ भोजनां मंडण।तांबूल आणि चंदन।तो तिसावा एकतिसावा जाण। श्रीकृष्णनिर्याण निजबोधु ।।४३९।।
शेत पिकवण्याची जबाबदारी कोणावर?
शेताचा मालक हा मुख्य शेतकरी असला तरी शेत पिकवण्यात अनेकांनी भूमिका बजावलेली असते.कष्ट केलेले असतात. भागवतरुपी शेत पिकवण्यात अनेकांनी भूमिका निभावली त्यांचा उल्लेखही एकनाथांनी केला आहे.
'श्रीभागवत महाक्षेत्र।तेथें ब्रम्हा मुख्य बीजधर।नारद तेथे मिरासीकर।पेरणी विचित्र तेणें केली।।४४२।।
तेथें श्रीव्यासें अतिशुद्ध।बांधारे घातले दशविध। पीक पिकले अगाध। स्वानंदबोध निडारे।।४३।।
तेथें शुक बैसला सोंकारा।तेणें फोडिला हरिकथापागोरा। पापपक्ष्यांचा थारा।उडविला पुरा नि:शेष।।४४।।
त्याची एकादशीं जाण।उद्धवें केली सवंगण।काढिले निडाराचे कण।अतिसघन कृष्णोक्ती।।४४५।।'
भागवतरुपी शेत पिकवण्यात ब्रम्हा हा मुख्य बीजधर म्हणजे पेरणी करणारा असला तरी त्यात नारद हा वतनदार असून त्यानेही विलक्षण पेरणी केली.त्यांत व्यासाने दहा प्रकारचे शुद्ध बांधारे घातल्यामुळे पीक चांगले पिकले. शुकाने राखणदाराची भूमिका स्विकारत पिकांवर येणार्या भोरड्यांना गोफणीने परतवून लावले.शेवटी उद्धवाने एकादशस्कंधामध्ये पिकाची कापणी करून कृष्णोक्तीचे पाखडलेले भरीव दाणे गोळा केले.
शेतीचे प्रकार :-
संत एकनाथांनी विवेचनाच्या ओघात शेतीचे प्रकार सांगितले आहेत.
'कोणे एके पृथ्वीतळीं मेघ न वर्षता जळीं।पेरिलीं धान्यें सदा निळीं।वसुधा जिव्हाळी ते म्हणती।।२१-८१।।
तेंचि पाहतां पृथ्वीवरी।एके भागीं गा उखरी।मेघ वर्षतां शरधारीं।अंकुरेना डिरी उखरत्वें।।२१-८२।।'
'पानथळ' जमीन पाऊस न पडताही पिकते आणि 'खडकाळ' जमीन कितीही पाऊस पडून पिकत नाही. 'जैसे खळाळ कल्लोळ चंचळ।भासे परी तें केवळ जळ।काळी भरडी पांढरी चोळ।परी ते केवळ वसुधाचि।।४-२६०।।'
जमिनीच्या काळी,पांढरी,भरडी या प्रकारच्या मातीवरून पडणार्या जमीनीच्या प्रतवारीचा उल्लेख नाथांनी केला आहे.
मोटंवरची शेती आणि पाटावरची शेती :-
परमेश्वर प्राप्तीसाठी ज्ञानमार्ग, भक्तीमार्ग यांचे विवेचन संत साहित्यातून अनेकदा आलेले आहे. ज्ञानमार्ग सोपा की भक्तिमार्ग सोपा? ज्ञानमार्ग उत्तम की भक्तिमार्ग उत्तम? अशाप्रकारचे वाद-प्रतिवादही झालेले आढळतात.ज्ञानमार्गापेक्षा भक्तिमार्ग कसा सोपा आहे हे स्पष्ट करताना एकनाथांनी 'मोटंवरची शेती' आणि 'पाटावरची शेती' यांचे सुंदर रूपक योजिले आहे.
'मळा शिंपावयालागुनी। मोट पाट उपाय दोन्ही। मोटां काढिजे विहीरवणी।बहुत कष्टोनी अतिअल्प।।११-१५३१।।
मोट नाडा बैलजोडी। अखंड झोडितां असुडीं। येतां जातां वोढावोढी। भोय भिजे थोडी भाग एक।।१५३२।।
तेथही मोट फुटे कां नाडा तुटे। वोडव पडे बैल अवचटे।तरी हातां येतां पीक आटे। वोल तुटे तत्काळ।।१५३३।। तैसा नव्हे सरितेचा पाट। एक वेळ केल्या वाट।अहर्निशीं घडघडाट।चालती लोट जीवनाचे।।१५३४।।
मोटेचें पाणी तैसैं ज्ञान। करूनी वेदशास्त्रपठण। नित्यानित्य विवेकासी जाण।पंडित विचक्षण बैसती।।१५३५।।'
पाटाची शेती सोपी.तिचे पाणी सदा खळखळ वाहणारे.कमी कष्टात मिळणारे.तसा भक्तीमार्ग सोपा.परंतु शेतीला मोटंचं पाणी मिळवण्यासाठी अनंत अडचणी येतात आणि त्यातही जमीन थोडीच भिजते.ज्ञानमार्गही तसाच अवघड आहे.
दैनंदिन कृषीकर्माचे सुक्ष्म निरीक्षण :-
शेतकर्यावरील अस्मानी सुलतानी संकट,बाजारपेठ, मालाला मिळणारा कमीभाव,व्यापार्यांची दलाली ह्या मोठ्या संकटांची जंत्री मोठी असली तरी दररोजच्या शेतीकर्मातही शेतकर्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मोटंच्या पाण्यावर शेती करताना मोट,नाडा, बैलजोडी ह्या गोष्टी लागतात.त्यात ओढाओढ करून बैलांना आसूडाने झोडावे लागते.तेवढे करूनही थोडीसीच जमीन भिजते. त्यात मोट फुटली,नाडा तुटला,बैल आजारी पडला किंवा मेला तर पाणी मिळत नाही .परिणामी जमीनीची ओल संपते आणि हाता तोंडाला आलेलं पीक करपून जातं.एकनाथांनी या ओव्यांतून मोट हाकणार्या आणि त्यातील अडचणीने वैतागून गेलेल्या शेतकर्याचं हुबेहूब चित्रच जणू वाचकांच्या डोळ्यापूढे उभं केलं आहे. शेतीकर्मातील नाथांचे सुक्ष्म निरीक्षण यातून पहावयास मिळते.
उत्तम शेती आपोआप पिकते :-
जी जमीन उत्तम प्रतीची असते ती फार काही कष्ट न करता,न मशागत करताही चांगली पिकते हा शेतीतला अनुभव एकनाथांनी ईश्वरकृपादृष्टीने सृष्टी कशी भरून येते हे सांगण्यासाठी वापरला आहे.
'वैराग्यराबें शुद्ध केली। पृथ्वी निजवोला वोळली।कठीणत्वेंवीण मार्दवा आली। नाही अंकुरली बहूबीजें।।११-९।।
अखंड वर्षतां जळमेळीं।वासनेची।ढेपें विरालीं।सद्भावाची वोल जाहली। वाफ लागली बोधाची।।११-१०।।
तेथें न पेरितांचि जाण।सहज निजबीजें परिपूर्ण।अंकुरलीं आपणिया आपण। सिद्ध संपूर्ण स्वभावें।।११-११।।' वैराग्याच्या राबाने शुद्ध केलेली जमीन ईश्वरकृपेचा एक शिडकावा पडला की वासनेची डिखळें विरून जातात आत्मबीज न पेरताच परिपूर्ण अंकूर फुटून शेती जोमाने पिकते.
ब्राह्मणाला उत्तम शेतीची उपमा :-
'पात्र पाहून दान करावे' हा सिद्धांत सांगताना एकनाथांनी ब्राह्मण मुखाला उत्तम शेतीची उपमा दिली आहे.ज्याप्रमाणे शेतकरी उत्तम शेतीत परोपरीची पेरणी करून पीके घेतो, त्यांची काळजी घेतो त्याप्रमाणे ब्राह्मण मुख हे सर्वोत्तम असल्यामुळे तिथेच दान केले पाहिजे. ही गोष्ट स्पष्ट करताना एकनाथांनी
'श्रद्धेचेनि नेटेंपाटें।पाहूनि दानपात्रें चोखटें। दान द्यावे गोमटें। भूमी वोलटे जेवीं बीज।।६-३०४।।
ब्राम्हणाचें मुख तें क्षेत्र। पालवियेपेढीवीण पवित्र।ऐसें पाहूनि सुक्षेत्र। दानें विचित्र पेरावीं।।६-३०५।।
विनीततेची सेल वोल। श्रद्धेचें चाडें निर्मळ । शमदमादि बैल सबळ। ते तात्काळ जुंपोनी।६-३०६।।
ऐशिया वोजा परी। बीज पेरिलिया क्षेत्रीं। पीक पिकेल घुमरीं। पुरुषार्थ चारी लगटोनी।।६-३०७।।'
असे वर्णन केले आहे.
जमिनीचे(पृथ्वीचे)उपकार :-
जमिनीचे (पृथ्वीचे)माणसांवर अनंत उपकार आहेत.जमिनीत नांगर घालून पेरणी करणारा मनुष्य एकप्रकारे तिचे ह्रदयच फाडत असतो.म्हणजे तो पृथ्वीला त्रासच देत असतो.परंतु जमीन मात्र या अपकारकर्त्यावर रोष न धरता उलट उपकारच करित असते.ही गोष्ट सुंदरपणे एकनाथांनी वर्णिली आहे.
'पृथ्वी दु:खी करिती नांगरी।ते पिकोनि त्यांते सुखी करी।तेवीं अपकार्यां जो उपकारी। तो मोक्षाच्या शिरीं मुगुटु।।४-१४१।।'
शेती - बी यांच्यातील अद्वैत :-
काम आणि क्रोध ऐकमेकांच्या संयोगानेच वाढतात ही बाब स्पष्ट करण्यासाठी एकनाथांनी शेती आणि बी यांच्यातील अद्वैत सांगितले आहे.
'जरी बीज जाहलें गोमटें। तरी भूमीविण अंकुर न फुटे। तैसें कामावांचूनि कोठे। क्रोध उद्धट न वाढे।।१७-२४६।।' बी कितीही उच्च प्रतिचे असले तरी जमीनीशिवाय त्याचा काहूच उपयोग नाही.
जसे बी तसे फळ :-
कर्माप्रमाणे सुखदु:ख भोगावे लागतात हे तत्व स्पष्ट करण्यासाठी एकनाथांनी
'मेघ वर्षे निर्मळ जळ। परी जैसें बीज तैसें फळ। एका भांगी पिके सबळ।एका प्रबळ साळी केळे।।२१-४०।।' मेघवृष्टी सारखीच होऊन सुद्धा एका शेतात भांग पिकते तर दुसर्या ठिकाणी साळी केळी चांगली पिकते कारण जसे बीज तसे फळ येते.
जास्त बी पेरल्याने शेतकरी खुष :-
उद्धवाला भक्तीचा महिमा सांगताना श्रीकृष्णाने शेतकर्याच्या खुषीचे रहस्य एका ओवीत सांगितले आहे. 'बीज अधिकाधिक पेरितां।उल्हास कृषीवळाचे चित्ता। तेवी सर्वस्व मज अर्पितां। तैशी उल्हासता जै होये।।१४-२४७।।'
शेतात अधिकाधिक बी पेरले असता शेतकर्याला जसा उल्हास येतो तसा उल्हास मला(ईश्वराला) सर्वस्व अर्पण करताना ज्याला होतो त्याचेच नाव खरे भक्ती होय.
पेरणीसाठी अस्सल शेतकरी आवश्यक :-
दहाव्या अध्यायात एकनाथांनी आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी माणसाला सद्गुरुची आवश्यकता आहे हे तत्व प्रतिपादन करताना पेरणीसाठी अस्सल,तज्ञ शेतकरीच उपयोगी असतो असा दाखला दिला आहे. 'पर्जन्यें भूमी मार्दवा आली। बीजें कणिंग असे भरली। परि ज्ञातेन पेरणी नाहीं केली। तंव पिकाची बोली पोंचट।।१०-११०।।'
खेड्यात घरातील बहुतेकांचा मुख्य व्यवसाय शेतीत काम करणे हाच असला तरी 'पेरणी' सारखे कौशल्याचे काम करणारा घरात एखादाच असायचा.कदाचित गावातून चारदोन शेतकरीच पेरणी करण्यात पटाईत असायचे.त्यांच्या हातून पेरणी करण्यात अनेकजण धन्यता मानत.एकनाथांनी पेरणीचे नेमके मर्म मांडले आहे.
पेरणीसाठी तीन गोष्टींची आवश्यकता :
उपरोक्त ओवीत नाथांनी पेरणीसाठी आवश्यक असणार्या किमान तीन गोष्टींची आवश्यकता स्पष्ट केली आहे. 'पाऊस,चांगले बी आणि पेरणारा तज्ञ शेतकरी ह्या तीन गोष्टींच्या संयोगातूनच शेती चांगली पिकते.
पेरणीतले कौशल्य :-
डांगोरा न पिटता दान केले , अभिमान न बाळगता दान दिले तरच त्याचा फायदा होतो.दान दिल्याची कधीही वाच्यता करू नये हे तत्व समजून सांगताना एकनाथांनी पेरणी करतानाचे शेतकर्याचे कौशल्य विदित केले आहे.पेरणी केल्यानंतर ते बी शेतकरी मातीखाली झाकून टाकतो.
'कृषीवळू पेरूनियां धान्य। सवेंचि आच्छादी आपण। तैं पीक लगडूनि ये जाण। तैसे सफळ दान न बोलतां।।११-१३०७।।'
बी मातीखाली झाकून टाकल्यानेच पीक जोमाने येते.त्याप्रमाणे दान हे न बोलले तरच फलदायी ठरते.
पिकांचा तात्पुरता फायदा घेऊ नये :-
स्वकर्माने अनेक फळे प्राप्त होतात. परंतु स्वर्गादिकासारख्या छोट्या फळाच्या नादी लागणारा माझ्या(ईश्वराच्या) फळाला मुकतो.हा सिद्धांत स्पष्ट करताना एकनाथांनी चणा,जोंधळा आणि गहू या पिकाचे उदाहरण दिले आहे.
'कष्टोनि शेतीं पेरिले चणे।त्यांची उपडोनि भाजी करणें।तो लाभ कीं तेणे नाडणें। तैसे फळ भोगणें सकामीं।।२१-२६७।।
वोलीं जोंधळियाचीं करबाडें। खातां अत्यंत लागती गोडें। त्यालागीं शेत जैं उपडे।तै लाभु कीं नाडे निजस्वार्था।।२१-२६८।।'
गव्हांचा जो प्रथम मोड।तोंडीं घालितां लागे गोड। परी जो जाणे पिकाचा निवाड। तो मोड जाण उपडीना।।२१-३४५।।'
शेतात चांगला पिकलेला चणा केवळ भाजी करता उपटून खाणे, जोंधळ्याची कोवळी करबाडे गोड लागतात म्हणून सगळी उपटून खाणे किंवा गव्हाचा कोवळा कोंब गोड लागतो म्हणून उपडून खाणे मुर्खपणाचे ठरेल. शेतातल्या पिकांचा तात्पुरता फायदा न घेता शेतकर्याने त्यापासून मिळणार्या मुख्य फायद्याचा लाभ घेतला पाहिजे. हा लाभ नसून खर्या लाभाला नाडणेच होय.
'खळं' आणि खळ्यातील धान्य चोरीचा उल्लेख :-
माणसाच्या अंगी येणारे गुणदोष,विषयव्यवस्था हे त्याच्या ठिकाणचा चांगुलपणा घालवतात हा मुद्दा स्पष्ट करताना एकनाथांनी शेतातील पिकाचं 'खळं' आणि खळ्यातील धान्याची होणारी चोरी याचा उल्लेख केला आहे.
'एकूणिसाव्या अध्यायीं जाण। करुनी पिकाची सवंगण। जेणें कोंडेनि वाढले कण। तो कोंडा सांडूनि जाण कण घ्यावे।।३१-४०९।।
ऐसे निवडीले जे शुद्ध कण। तेथें प्राप्ताप्राप्तीचें लक्षण। त्रिविधविभागनिरुपण। विसावा जाण निरुपिला।।४१०।। जे भागा आले शुद्ध कण। ते राखावे आपले आपण। गुणदोषांचे चोरटे जाण। खळें फोडून कण नेती।।३१-४११।।'
जुन्या काळात शेतातील पिकाची,धान्याची चोरी होण्याचे प्रकार व्हायचे.उभ्या पिकाचे कणसं कापून नेणे,खळ्यातले धान्य भरून नेणे,कापूस वेचून नेणे अशा चोरीच्या घटना घडायच्या. त्याचा योग्य संदर्भ नाथांनी दिला आहे.
शेतसारा आणि ग्रामकंटक :
मध्ययुगीन काळात शेतकर्यांनाआपण शेतात पिकवलेल्या धान्यातून काही ठराविक हिस्सा द्रव्यरुपाने शासनकर्त्या राजाला द्यावा लागायचा.त्यालाच शेतसारा म्हटल्या जायचे. त्याबदल्यात शेतकर्यांच्या संरक्षणाची जबाबदारी त्या राजावर असायची.हा शेतसारा एकदा का दिला की मग शेतकर्यांना गावगुंडांना (ग्रामकंटक) घाबरायची गरज नसायची.याचा अर्थ असा की गावगुंडांचा त्रास शेतकर्यांना नेहमी असायचा. राजाचा मात्र त्यांना आधार मिळायचा पण तोही शेतसार्याच्या बदल्यात.
'कृषीवळु करी शेतासी। यथार्थ द्रव्य दे राजयासी। तो न भी ग्रामकंटकांसी। तेवीं कृष्णार्पणेंसीं होतसे ।।९६।।' आपले कर्म कृष्णाला अर्पण केले की मग गावकुटाळांना घाबरायचं कारण नाही हे तत्व एकनाथांनी यातून सांगितले आहे.
समारोप : -
संत एकनाथांनी भागवतातील एकादशस्कंदात वर्णीलेला विषय त्यांच्या भागवतात आणला आहे. श्रीकृष्णाने उद्धवला दिलेले ज्ञान ही एक गीताच आहे. सामान्यासाठी थोडासा रुक्ष असणारा हा विषय प्रासादिक भाषेत स्पष्ट करून सांगताना एकनाथांनी मोठा आधार घेतला तो शेतीचा! शेती हा नाथांच्या पुढे असणार्या सामान्यांचा मुख्य व्यवसाय.त्याच व्यवयातील रुपकांचा योग्य वापर निरुपणासाठी केला तर वर्ण्य विषय आणखी सोपा होईल हे सुत्र ओळखून नाथांनी शेतीतील पिके,पाणी,बीज,पेरणी,शेतीवरील संकटे ह्या सगळ्या बाबी उपयोगात आणल्या.एकनाथी भागवतामुळे शेती,शेतकरी आणि शेतीकर्म याचे चित्र वाचकांपूढे उभे राहते हे निश्चित!
डॉ.हंसराज जाधव
सहाय्यक प्राध्यापक
प्रतिष्ठान महाविद्यालय,पैठण
जि.औरंगाबाद -४३११०७
मो.७५८८४२९२२८
(महाराष्ट्र साहित्य पत्रिका , जानेवारी ते मार्च २०२१ मधून साभार)



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा