मराठी भाषा अत: ते इति - भारतभूषण शास्त्री

 मराठी भाषा अत: ते इति

 भारतभूषण शास्त्री


भाषा ही एक समाजिक संस्था आहे.ती कोणा एकाची नसते. समाजातील प्रत्येक घटकाचा भाषेशी जवळचा संबंध असतो. भाषा शिकत असताना ती स्वप्रयत्नातून समाजाकडून अर्जित करावी लागते परंतु त्यासाठी म्हणावे तितके  कष्ट घ्यावे लागत नाही.लोक भाषेबद्दल संवेदनशील असतात. कारण त्यामध्ये त्यांची ओळख, अस्मिता आणि संस्कृती असते. भारत भाषा विज्ञानाचे जन्मस्थान आहे. म्हणून भारताला भाषांचे मुसीएम आहे. राज्यभाषा आणि आंग्ल भाषा यांच्यावर सत्ता मिळवण्यासाठी आणि भाषा तिथपर्यंत पोहचण्यासाठी  विदेशी भाषांवर प्रभुत्व असणारे विद्वान घडणे खूप महत्वाचे आहे.


मराठीची ओळख

मराठी ही भारतातील प्रमुख 22 भाषांपैकी एक मानली जाते. आज मराठी भाषेत बोलणाऱ्यांची संख्या 15 कोटी वर पोहचली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्याची अधिकृत राजभाषा असणाऱ्या या मायबोलीचा मोह इंग्लंड, रशिया या देशानाही आवरला नाही, म्हणून तेथे मराठी विभागाची निर्मिती तेथील विद्यापीठाने केली आहे. शिवाय ऑस्ट्रेलिया सारख्या देशातही मराठी मंडळे पोहचली आहे. मराठी भाषेचे आजवर चार विश्व साहित्य संमेलने पार पडली आहे.आणि 91 मराठी साहित्य संमेलने आजवर पार पडली आहे. शीवाय छोटीमोठी अशी 500 साहित्य संमेलन दरवर्षी पार पाडत असतात. मराठी भाषा इतकी समृद्ध झाली असतानाही या भाषेला अभिजात दर्जा नाही.ही बाब विचारात घेणे महत्वाचे ठरते.

           मुळात भाषेला महत्व देत असताना किंवा महत्व कमी करत असताना याला जबाबदार आहे तो इथला मराठी माणूस आणि इथली प्रशासन प्रणाली. बालकांनी रडायचं आणि आईने पाजायचं नाही अशी अवस्था आज इथल्या मराठी माणसाची आणि मराठीची  झाली आहे. आज मराठीचे महाराष्ट्रात विद्यापीठच नाही, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नाही, मराठी भाषेचे धोरण फक्त कागदापुरते अशा कितीतरी आव्हाने आज मराठी भाषेसमोर आहेत.

      केंद्र सरकारकडे मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्ह्णून साहित्य अकादमी कडे प्रस्ताव प्रलंबित आहे. पण आणखीनही कार्यवाहिला मुहूर्त मिळेना. मुळात हे काम शासनाचे आहे. शासन या संदर्भात या विषयी इतके उदासीन का आहे? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्ह्णून सामान्य माणसाला आंदोलन करावे लागते. ही किती लाजिरवाणी बाब आहे.या संदर्भात दक्षिणेकडील कर्नाटक,केरळ,तामिळनाडू ही राज्य स्वतःची भाषा टिकवण्यात अग्रेसर आहे. मराठी भाषेचा इतिहास पाहता अभिजातत्व केव्हांचेच सिद्ध झाले आहे.

                

मराठी भाषा २००० वर्षांपूर्वीची

          मराठी ही महाराष्ट्राची मुख्य भाषा असून ती वेदपूर्वकळपासून चालत आलेल्या लोकभाषांपैकी एक आहे.मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा २२२० वर्षांपूर्वीचा आहे.जुन्नरच्या नानेघाटातील ब्राम्ही लिपीतील असणाऱ्या या शिलालेखात महारठिनो असा उल्लेख आला आहे.याकाळी मराठी भाषा ही महाराष्ट्री या नावाने ओळखली जात होती. मराठीतला पहिला ग्रंथ हाल सातवाहनांचा गाथा सप्तशती हा आहे. परंतु त्यातील स्वरूप आणि भाषा यांचा विचार केला असता, तो मान खऱ्या अर्थाने लीळाचरित्राला दिला गेला आहे.

उद्योतनसूरी ह्या आठव्या शतकातल्या ग्रंथकाराच्या ‘कुवलयमाला’ ह्या ग्रंथात मराठे आणि मराठी ह्यांचा स्पष्ट

उल्लेख केलेला आढळतो.


दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीले य

दिण्णले गहिल्ले उल्लेविरे तत्थ मरहट्टे


त्यात धिप्पाड, सावळ्या, काटक,

काहीशा अहंकारी अशा मराठ्यांचा (मरहट्टे) उल्लेख

येतो तसेच ते ‘दिले, घेतले असं बोलतात’ (दिण्णले

गहिल्ले) असे म्हणताना त्यांच्या भाषेचाही उल्लेख

येतो. इ.स. ८५९ मधल्या धर्मोपदेशमालेतही मरहट्ट

असं भाषेचं नाव आलं आहे. इ.स. १०६० मधल्या दिवे आगरच्या ताम्रपट मराठीचं अस्तित्व ओळखता येईल इतपत महत्त्वाचे उल्लेख आढळतात.

                 इ.स.९८३ मध्ये सापडलेल्या श्रवनबेळगोळ येथील शिलालेखाने ती एक हजार जुनी असल्याचे समजते. देवनागरी लिपीतीला पहिला शिलालेख हा रायगड जवळील अक्षी अलिबाग येथील असून तो इ.स.१०१२ मध्ये लिहिला गेला आहे. देवनागरी लिपीला ब्राम्ही, प्रकोष्टी या लिप्यांमधून प्रवास करावा लागला आहे. महारठी-मरहठी-मऱ्हाटी-मराठी असा प्रवास या भाषेला करावा लागला आहे.संस्कृतला संस्कृत हे नाव मिळण्याच्या आधी महाराष्ट्री ही भाषा अस्तित्वात होती.असे या ठिकाणी म्हणता येईल.याचाच अर्थ ही भाषा संस्कृतची मुलगी नसून ती मावशी असल्याचे स्पष्ट होते.

पुढे अकराव्या शतकात चक्रधर स्वामींच्या रूपाने मराठीला एक प्रचंड ताकद मिळाली.


सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे मराठी भाषा प्रेम

भाषेचा प्रचंड अभिमान बाळगत सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामीनी मराठी भाषेला धर्मभाषेचे स्थान देऊन आपल्या प्रत्येक शिष्याला त्यांनी मराठीतूनच ग्रंथरचना करण्याचा आदेश दिला होता.त्यातूनच लीळा चरित्र या मराठीच्या आद्य ग्रंथाची  निर्मिती झाली आहे.

       एवढेच नव्हे एके दिवशी केशीराज व्यास नागदेव आचार्यांना म्हणाले "मी स्वामींच्या लीळा संस्कृतात बांधू" तेव्हा आचार्य नागदेव त्यांना ठणकावून सांगतात  "तुमचा अस्मात कस्मात मी नेणगा, मज श्रीचक्रधरे निरुपीली मऱ्हाटी तियाचि पुसा" असं म्हणून स्वामींच्या शिष्यानेही मराठी भाषेचा पुरस्कार केला.मुकुंदराज याने लिहिलेला विवेकसिंधु ग्रंथानेही मराठी भाषा नावारूपास आणली आहे. पुढे संत ज्ञानेश्वरांनी अमृतातेही पैजा जिंके म्हणत ज्ञानेश्वरी सारखा महान तत्वज्ञानपर ग्रंथ या भाषेला दिला. महदंबा, मुक्ताई, जनाई या स्त्रियांचाही वाट भाषेला समृद्ध करणारा ठरला. महानुभावांचे साती ग्रंथातही चक्रधरकालीन मराठी भाषेचे उत्कृष्ट नमुने पाहायला मिळतात. संत नामदेवाने ती पंजाबात पोहचवली. संत एकनाथांनी भारुडाच्या माध्यमातून सर्वसामान्यापर्यंत तीचे मराठी रुप समाजाला दाखवले आहे. शाहिरी परंपरेने या भाषेला सांस्कृतिक वातावरण निर्माण करून मोठे केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ती दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहचली आहे. दलित साहित्याने आपल्या संघर्षाचा इतिहास सादर करत तीला अस्सल बोलीभाषेच रूप दिल आहे. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांच्या किर्तनाने ती समाज प्रबोधनाच्या रूपाने समजाला कळाली. पुढे राजवाडे लिहितात 'मी मराठीतच लिहीन, ज्यांना माझे साहित्य वाचायचे असेल त्यांनी मराठी शिकावी. हाच  मराठी भाषे विषयीचा अभिमान आजच्या स्थितीला महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीमध्ये का दिसत नाही? हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाला पफल्यशिवाय राहणार नाही.

      तसं पाहिलं गेलं तर  आज संस्कृत, तमिळ, तेलुगू, ओडिया, कन्‍नड, मल्याळम या भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता आहे. फक्त मराठी भाषा त्यात समाविष्ट झाली नाही. भाषा अभिजात ठरण्यापूर्वी ती किमान १५०० ते २००० वर्षे इतकी जुनी असावी लागते. ही बाबही मराठी भाषेने सिद्ध केली आहे. मराठी भाषा ही इसवी सनापूर्वी २०७ या वर्षी ब्राह्मी लिपीत लिहिली जात असे सर्व ठोस पुरावे हे रंगनाथ पठारे   (भाषा समितीने) आणि समन्वयक डॉ.हरी नरके यांनी  दिलेले आहे. असे असूनही तिला अभिजात भाषेचा दर्जा नाही. ही बाब केंद्र शासनाने लक्षात घ्यावी व क्षीरनिराप्रमाणे न्यावं द्यावा. मराठीला आज अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला तरच ती सर्व भारतभर आपला ठसा उमटू शकेल.अभिजात दर्जामुळे तिला पुन्हा एकदा सन्मानाचे दिवस येतील.


मराठी भाषा विद्यापीठ

भाषिक उपक्रम राबवताना मराठी भाषा दिवस आणि मराठी भाषा पंधरवडा हे दोन महत्वाचे उपक्रम महाराष्ट्र् शासनाने आज राबवले आहे.हा भाषेचा गाजावाजा जरी ठीक असला तरी आज महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष दिले जात ही पण महत्वाची बाब आहे.आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून बरेच प्रयत्न केले गेले आहे.परंतु त्याला यश आले नाही.मुखत्वे आपलं शासन ज्या हातच्या गोष्टी आहे ते लवकर करत नाही.मग अभिजात भाषेचा प्रश्न तर केंद्र सरकारचा विषय आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून द्यायचा असेल तर सर्वप्रथम मराठीच विद्यापीठ महाराष्ट्रात असायला हवं.ही गोष्ट आज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. आज रामटेक येथे संस्कृत विद्यापीठ आहे तर वर्धा येथे हिंदीचे केंद्रीय विद्यापीठ आहे.कर्नाटकात कन्नड भाषेचे विद्यापीठ आहे मग मराठीचे विद्यापीठ का असू नये हा साधा आणी सोपा प्रश्न आम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही.यासंबंधी विद्यापीठ आराखडा समितीने तसा सरकारला आराखडा सादर केला. एकदा विधानसभेत बच्चू कडू यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान यांच्याकडे मराठी विद्यापीठ हे रुद्धपुर येथे व्हावं अशी मागणी केली होती.परंतु ठोस पाऊले उचलली गेली नाही. या संदर्भांत  समाज,साहित्यिक,लेखक,संघटना यांनीही प्रत्यक्ष पाठिंबा द्यायला हवा .यासंबंधी काही लेखकानी तो प्रयत्नही केला आहे महानुभाव साहित्याचे गाढे अभ्यासक वि.भी.कोलते, राम शेवाळकर, दत्तो वामन पोतदार ही जुनी मंडळी होती आज त्यात नागनाथ कोतापल्ले,श्रीपाल सबनीस,सदानंद मोरे,श्रीपाद जोशी, बा.भो.शास्त्री आदींचा समावेश आहे.जर मराठी विद्यापीठ आज असेल तरच आपण मराठीला अभिजात दर्जा द्या असं म्हणू शकतो . नाही तर केंद्र सरकार आपल्याच राज्यावरती बोट ठेवण्याचा प्रयत्न करते. यासाठी पहिले मराठीचे विद्यापीठ स्थापन व्हायलाच हवी.

                                   या विद्यापीठामुळे मराठी भाषेत सर्व स्तरावरील कला, ज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान, हे मराठीत येऊन भाषा समृद्ध बनेल. विद्यापीठामुळे महत्वाचे दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथ, पुस्तक अनुवाद, भाषा विकास आदी कामे मार्गी लागतील.मराठीला समृद्ध करणारी दोन ग्रंथालये आज महाराष्ट्रात आहे ते म्हणजे मराठवाडा विद्यापीठातील हस्तलिखित विभाग आणि रुद्धपुर येथील गोपीराज ग्रंथालय ! या ग्रंथालयात आज दुर्मिळ हस्तलिखिते आहेत पण योग्य सोयीसुविधा नसल्याने संशोधकांची गैरसोय होते त्यामुळे विद्यापीठ स्थापन झाले तरच हे संग्रह सुरक्षित राहील. मराठी विद्यापीठाची स्थापना सर्वप्रथम संकल्पना ही नागपूर येथील 1933 मध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनात समोर आली नंतर भानुकवी मराठी साहित्य संमेल,  महानुभाव मंडळ, महानुभाव साहित्य संमेलन यामध्ये ही मागणी नेहमी झाली आहे. 91 व्या  मराठी साहित्य समेलनात याला पूर्णरीतीने होकार मिळाला आहे.  पहिल्या मागणीला आजपर्यंत 80 वर्ष उलटून गेली तरी हे विद्यापीठ स्थापन झाले नाही .नंतर लीळाचरित्र लिखाण भूमी रुद्धपुर येथूनही  बऱ्याचवेळा यासंदर्भात शासनाला पाठपुरावा करण्यात आला पण अजून हा प्रश्न सुटलेला नाही.नुकतेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे चक्रधर स्वामींच्या नावे रुद्धपुर जि. अमरावती येथे विचाराधीन आहे असे वक्तव्य केले  आहे.

     आज इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या आहेत .शासनाने त्यांना वाटेल तितक्या मान्यता दिल्या आहेत. अशावेळेस मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.जागतिकीकरणात इंग्रजी विरुद्ध मराठी भाषा अशी परिस्थिती तयार झाली आहे. ज्याप्रमाने जागतिकीकरणात इंग्रजी भाषेचा पुरस्कार सर्वांनी केला परंतु जर्मन, फ्रेंच, जपानी यांनी आपली मूळ भाषा ठेवून इंग्रजीचा अंगीकार केला आहे.ही गोष्ट भारतीय भाषेबाबत दिसत नाही.प्रत्येक वेळी भाषा वाचावी म्हणून रस्त्यावर उतरण्यापेक्षा मराठी शाळा मजबूत कशा होतील हा प्रश्न सोडवायला कुणीही तयार होत नाही.

शिक्षणात महाराष्ट्र प्रगत झाल्याचा दावा करणाऱ्या राज्य सरकारने ‘कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असलेल्या’ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल तेराशे शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे.  या शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नजीकच्या अन्य सरकारी वा खासगी शाळेत सामावून घेण्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. राज्य सरकारचा हा निर्णय शिक्षण हक्क कायद्याचा थेट भंग करणारा असल्याचे मत शिक्षणक्षेत्रातून व्यक्त होत असताना शासन या संदर्भात गंभीर नाही. मराठी भाषा संचलनालयाने या संदर्भात कोणतेही मत व्यक्त केले नाही.म्हणजे मराठी भाषेविषयी कोणताही निर्णय हा शासनाने घ्यायचा आणि इथल्या मराठी माणसाने फक्त बघ्याची भूमिका घ्यायची का हा प्रश्न यथे उपस्थित होतो.

मराठी शाळांची गुणवत्ता आज कमी झाली अस म्हणून शासनाने आपली बाजू मांडली आहे.परंतु गुणवत्तेचा जेव्हा प्रश्न जेव्हा येतो त्यावेळी असे नाही की इंग्रजी माध्यमाची गुणवत्ता वाढलेली आहे. परिस्थिती तीच आहे.दोन्हीही शाळांची अवस्था तीच आहे.इंग्रजी माध्यमाच्या मुलांनाही आज मराठी, हिंदी, संस्कृत हे भाषा विषय इंग्रजीच्या अतिवापरामुळे अवघड जात आहे. इंग्रजी माध्यमाची ही अवस्था असेल तर कुठे राहीली गुणवत्ता ? मुळात कोणत्याही भाषेचा अवडंबरपणा ना करता विद्यार्थ्यांनी आपापल्या मातृभेषेतून घेतलेले शिक्षण कायमस्वरूपी लक्षात राहते हीच बाजू कटाक्षाने पाळून मातृभाषेचा गौरव वाढवावा.

       मराठी माध्यमांच्या मुलांना लहानपनापासून मराठी अनिवार्य आहे परंतु हे स्वरूप अकरावी आणि बारावीच्या विदर्थ्यांना लागू नाही. तिथे द्वितीय भाषा म्हणून हिंदी,संस्कृत आणि माहिती तंत्रज्ञान अशी पर्यायी अवस्था दिली आहे. ही सूट बंद करून मराठी अनिवार्य करणे आवश्यक आहे. तसेच  राज्यातील इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड अशा सर्व माध्यमांच्या शाळांमधून दहावी परीक्षेपर्यंतही मराठी भाषा अनिवार्य असणे आवश्यक आहे.

आज तंत्रज्ञानाच्या युगात मराठीची स्थिती थोडी विदारक आहे.मराठी फक्त साहित्यभाषा, काव्यभाषा, धर्मभाषा यामध्येच अडकून ना राहत ती सर्वांची ज्ञानभाषा व्हावी.आणि तंत्रज्ञानाच्या  भाषेचं स्वरूप त्याला यावं. त्याशिवाय मराठीसमोरील आव्हाने संपणार नाहीत. इंग्रजी व मराठी भाषेचा समन्वय साधताना संगणकात  लिपीचा गोंधळ  बऱ्याच वेळा उडालेला आहे.   कधीकधी या फॉन्टमध्ये जोडाक्षरे सापडत नाही.मराठी की फळक आणि संगणक यांचा ताळमेळ घालताना या समस्या येत राहतात परंतु यावर सी-डॅक ने उपाय शोधून काढले आहे.टंकलिखित केलेला नमुना कधीकधी दुसऱ्याच्या संगणकात दिसत नाही. मूळ युनिकोड जर अस्तित्वात नसेल तर ही समस्या नियमित जाणवते. वसु धैव कुटुंबकम ते वसुधैव मार्केटम हे सूत्र वापरात आणायला हवे. मराठी फक्त साहित्यभाषा, काव्यभाषा, धर्मभाषा यामध्येच अडकून ना राहत ती सर्वांची ज्ञानभाषा व्हावी. त्याशिवाय मराठीसमोरील आव्हाने संपणार नाहीत

       आशा विळख्यात सर्वज्ञ श्रीचक्रधरानी जिचा धर्मभाषा म्हणून गौरव केला आहे,छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मे बोलीला राजभाषेचा दर्जा दिला आहे. ज्ञानोबा-तुकारामाने अभंग व भारुडाच्या रूपाने ती जनसामान्यांपर्यंत पोहचवली आहे,शाहिरी परंपरेने तीला सांस्कृतिक जोड दिली आहे, दलित साहित्याने संघर्षाची धग देत वास्तववादी संघर्ष भाषेला दिला आहे, इथल्या हाडाच्या मराठी शिक्षकाने मायबोली म्हणून आपल्या अंतःकरणात  ती साठवून ठेवली आहे. अशी मराठी भाषा आज  टिकेल का हा यक्षप्रश्न आहे.


                  प्रा.भारतभूषणशास्त्री भानुकवी

  मराठी विभाग,श्री स्वामि नारायण गुरकुल,नागपूर

मो.9405269822


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट