महानुभावांच्या सांकेतिक लिप्या आणि आजची स्थिती-भारतभूषण शास्त्री
महानुभावांच्या सांकेतिक लिप्या आणि आजची स्थिती
भारत पांडुरंग मिसाळ (एम.ए.बी.एड मराठी, संस्कृत)
उर्फ भारतभूषण शास्त्री 9405269822
सांकेतिक लिपि :
प्राचीन काळापासून भारतात सर्व साहित्य निर्मिती ही हस्त लिखिताद्वारे होत होती. त्याकाळचे विविध संवाद, विविध ग्रंथ आणि वाङ्मय हे हस्तलिखित स्वरूपात होती. भारतात सुरुवातीच्या काळात ब्राम्ही,खरोष्टी आणि देवनागरी या तीन मुख्य लिप्या होत्या.त्यापैकी त्यापैकी सर्वात जुनी म्हटलं तर सिंधू संस्कृतील लिपी आतित्वात होती यानंतर ब्राम्ही आणि खरोष्टी यांचा काळाला प्रारंभ होतो.पुढे देवनागरी लिपीचा प्रारंभ होतो.त्याकाळी महारठी भाषा ब्राम्ही लिपितून लिहीली जात होती.पूर्वी ब्राम्ही लिपी कोणाला वाचता येत नव्हती. परंतु दोनशे वर्षांपूर्वी म्हणजेच १८३३ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कलकत्ता ऑफिसनाधील द्रव्य परीक्षक जेम्स प्रिन्सेप याने ग्रीक आणि ब्राम्ही लिपीचा अभ्यास करून ब्राम्ही लिपीच्या वाचनाचा श्रीगणेशा केला. ही लिपी सामान्यतः डावीकडुन उजवीकडे लिहिली आणि वाचली जात होती परंतु खरोष्टी ही लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जायची. यापुढे सरकलो तर देवनागरी लिपीचा उगम होतो. देवनागरी लिपी साधारणपणे हरी नरके यांच्या मतानुसार अकराशे वर्ष जुनी असल्याचे स्पष्ट होते.
सकळ लिपी
महाराष्ट्राचा विचार केला असता मोडी आणि सकळ या दोन लिप्या मराठी भाषेच्या उपलिप्या संबोधल्या जातात.
यापैकी मोडी लिपी ही हेमाडपंत या यादवांच्या प्रधानाने शोधली असं एक मत आहे. तर काहींच्या मते मोडी हे देवनागरीचं शीघ्र लेखनासाठी वापरायचं रूप आहे. मोडीचा वापर मुख्यत्वे प्रशासकीय व्यवहारात होत
असलेला दिसतो. परंतु ह्या लिपीचा वापर प्रत्यक्ष सामान्य जीवनात कधीही झाला नाही. पुढे मराठी भाषेच्या सुवर्णकाळात सकळ लिपीचा उगम झाला. सकळ लिपी कर्ता म्हणजे सह्याद्रीवर्णन ग्रंथाचे कर्ते रवलोबास होय.
ते महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील पाथरी या गावचे. रवळोबास हे हिराईसा यांचे शिष्य होते. त्यांनी तयार केलेल्या सकळ लिपीला नागरी लिपी म्हणून सुरुवातीला संबोधले जायचे परंतु सकळ आणि सकळीत हीच नावे पुढे प्रामुख्याने दृढ झाली. हरिबास आणि सोंगोबास यांच्या अन्वस्थळामध्ये ‘मग हिराइसाचिया रवळोबासाची नागरलिपी लिहून दोन प्रती केलिया’ असा उल्लेख आलेला आहे. तर कृष्णमुनींच्या अन्वस्थळामध्ये ‘लिपकृत्य त्याचेः नागरिक’ अशी नोंद आढळून येते. तिसरा अर्थ सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या सर्व अनुयायांना ही सकळ लिपी मान्य असून हे सर्व शास्त्र संकलनाचे काम या लिपितून होत होत आहे. म्हणून सकळ लिपी असे म्हटले गेले आहे. असा उल्लेख सह्याद्रीवर्णन नावाच्या ग्रंथात वि.भी.कोलते यांनी प्रस्तावनेत केला आहे.
सुरुवातीला या संप्रदायामध्ये ही एकच लिपी अस्तित्वात होती. परंतु महानुभाव वर्ग हा बुद्धिजीवी लोकांचा वर्ग होता. त्यांच्या आचरणाची आणि विचारांची बाजू ही फार कुशलतेची होती. म्हणून पुढे अनेक विद्वानांनी स्वतःची स्वतंत्र लिपी बनविण्याची प्रवृत्ती दृढ होत गेली.त्यामुळे सकळीलिपीप्रमाणे आणखी काही लिप्या याच एकमेव संप्रदायात निर्माण झाल्या. सुंदरी लिपी, पारमांडल्य लिपी, अंकलिपी, शून्यलिपी, सुभद्रालि
मनोहरालिपी, कवीशेरी लिपी इत्यादी लिप्या निर्माण झाल्या परंतु बरेच ग्रंथ प्रारंभीच्या सकळी लिपीतच बांधेले गेले आहे. अर्थात सकळी लिपीचा संकेतच पंथात विशेष रूढ आहे. क्वचित बाइंदेशकर किंवा तळेगावकर यांसारख्या परंपरांनी अनुक्रमे सुंदरी लिपी व अंकलिपी वापरल्या आहेत.
अंकलिपि :
पत्रव्यवहार,वृत्तांत, साहित्य
अक्षरांना जसे अंकांचे मूल्य दिले जात होते त्याचप्रमाणे अक्षरांच्या ऐवजी अंक लिहणे आणि अंकांच्या माध्यमातून शब्द लिहिण्याची परंपरा पुढे चालू राहिली.अंकांच्या या सांकेतिक लिपीला ‘अंकपल्ल्वी लिपी’ असेही म्हणतात. परभणीजवळ असलेल्या खानापूर गावातील एका महानुभाव मठात डॉ. प्रभाकर मांडे यांना अंकपल्ल्वी लिपीत लिहिलेले संपूर्ण पत्र उपलब्ध झाले आहे. यामध्ये या लिपीचा उल्लेख ‘अंकपल्ल्वी लिपी असा आला आहे. या लिपीत शीर्षकासोबत सांकेतिक लिपीतील बाळबोध वर्ण आणि अंकलिपी दिली आहे.
लिपीची आवश्यकता
महानुभावांचे प्रारंभीचे ग्रंथ नेहमीच्या रूढ बालबोध लिपीतच लिहिले गेले आहे. परंतु नंतर ही ग्रंथ संपदा सांकेतिक लिपीत लिहिली जाऊ लागली. या पंथाचा उदय झाल्यानंतर ७५ वर्षांनी या सांकेतिक लिपीची का आवश्यकता भासली ? हा एक ग्रहन प्रश्न आहे.याचे उत्तर आजच्या बऱ्याच संशोधकांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. बा. अ. भिडे, वि. ल. भावे, वि. भि. कोलते, ह. ना. नेने यांनी आपापले स्पष्टीकरण दिले आहेत. परंतु याच्या मुळाशी आपण गेलो तर सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या एका वचनात याचे उत्तर स्पष्टपणे सापडते. ते असे आहे की, ‘हें तुचें रहस्य कीं : मा आपुलें रहस्य तें आणिकाप्रती प्रकटीजे ना कीं’, म्हणजे हा ज्ञानाचा ठेवा कुणालाही न सांगता अधिकारी जीवाला सांगावा असे प्रयोजन सांगितले आहे. याचा अर्थ शास्त्ररक्षणाच्या दृष्टीने ही झालेली किमया मराठी सारस्वतताला एक वेगळी देणगी या सकळ लिपीने दिली. दुसरा मुद्दा असा की त्याकाळी मुस्लिम साम्राज्याचे अतिक्रमण वाढल्यामुळे साहजिकच मुस्लिम सत्तेकडून होणाऱ्या छळापासून संरक्षण व्हावे आणि आपल्या धर्मग्रंथाचे रक्षण व्हावे हा स्वछ हेतू लिपी निर्माण करण्याचा होता अस म्हणायला हरकत नाही.
सकळ लिपी निर्माण होण्यामागचा हेतू
जेव्हा रवळोबासांनीही तयार केलेली ‘नागरी’ किंवा ‘सकळी’ कोणत्या उद्देशाने निर्माण झाली? या मागचा उद्देश आणि प्रेरणेना कोणती असा जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो तेव्हा त्याची उत्तरे अन्वय स्थळामधमध्ये सापडते. त्याची आख्यायिका अशी आहे.
तो प्रसंग पुढीलप्रमाणे: ‘एक दीस रवळोबासी अटणवीशेषें मालोबासासि भेटावया पाटकुलेयासि गेले : तेथ धर्मगोष्टी करितां मालोबासीं म्हणीतलें : हे बाळबोध खरडे इतराचां हातीं पडतील : शास्त्र भ्रंसैल : आन रहस्य जाइल : तरी बरवी एक लीप करूनि लिहावी : मग रवळोबासीं लीप केली : तयाचे खरडे घेउनि आपलेया लिपीवरी लिहिले :’ याचा अर्थ असा, की सांकेतिक लिपीचा उद्गम स्वसंरक्षणाच्या बुद्घीतून झाला. ही सत्यता नाकारता येत नाही. यामुळे एक फायदा खूप महत्वाचा की हे साहित्य जसेच्या तसे मूळ स्वरूपात उपलब्ध होऊ शकले, त्यामुळे हे सांकेतिक लिप्यांचे प्रयोजन खूप महत्वाचे ठरले. या संबंधित ज्यांना कल्पना सुचली ते ते सकळ लिपीचे जनक रवळोबास आणि त्यांना प्रेरणा देणारे मालोबास या उभयतांकडे या लिप्याचे मुख्य श्रेय जाते.
सांकेतिक लिपीचे महत्व
१ रवलोव्यासाने लिपी तयार केली नसती तर ज्याला त्याला आपापल्या पद्धतीप्रमाणे या ठिकाणी बदल घडवून आणला असता.ज्याप्रमाने संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत बवण्याचा प्रयत्न केला आणि मूळ ज्ञानेश्वरी मध्ये तफावत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळेच ही लिपी अनभिज्ञ असल्या कारणाने येथे कुणालाही ढवळाढवळ करण्याचा योग आला नाही.
२ आपल्या साहित्यात ढवळाढवळ करण्याची संधी न दिल्यामुळे ते साहित्य सुरक्षित राहिले आणि त्यामुळेच ग्रंथाची भाषा, शब्दांची रूपे लिपीचा साज शृंगार करण्यास उपयुक ठरले.
३.सकळ लिपीच्या शिरोभागावर जर शिरो रेषा नसेल तरच तीला सकळ लिपी म्हणता येईल.
सांकेतिक लिप्यांच अज्ञात दालन
महानुभावांची संपूर्ण साहित्य निर्मिती ही सकळ लिपी मध्ये असल्याकारणाने सर्वांना या पोथ्या वाचणे शक्य नव्हते. शिवाय इतरांना या लिपीची ओळखही नव्हती त्यामुळे हे साहित्य मराठीत केव्हा येईल हा एक प्रश्नच होता, या पोथ्यांना बाहेर काढण्याचा पहिला प्रयत्न हा विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झाला. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी सांकेतिक लिपीची उकल करून दिली. १९०५ साली ग्रंथमाला नावाच्या मासिकात त्यांचा एक लेख प्रकाशित झाला. या लेखांमधून त्यांनी महानुभाव पंथाच्या काही ग्रंथांची ओळख मराठी भाषिकांना करून दिली. त्यांनी पाकिस्तानातील पेशावर मधील काही महंतांच्या मदतीने गद्यराज,आत्मतीर्थप्रकाश,ऋद्धि पुरमहात्म्य इत्यादी ग्रंथांचा परिचय त्यांनी त्यावेळी करून दिला होता. नंतरच्या काळात राजवाडे यांनी एकवेळे स खुद्द भारत इतिहास संशोधक मंडळाच्या १९१० व १९१३ च्या इतिवृत्तांतात सांकेतिक लिपी स्वतंत्रपणे उलगडून पोथी लावण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या लिपीच्या चौसष्ट वैशिष्ट्यपूर्ण रूपांची एक यादी तयार केली होती. पुढे हाच प्रयत्न१९२२ मध्ये वि. ल. भावे यांनी केला. एकवेळेस त्यांच्याकडे दत्तलक्षराज व गोपीराज हे दोन महानुभाव महंत पोथीसंग्रह घेऊन त्यांच्याकडे वास्तव्यास होते. त्यावेळी त्यांनी काही महिने तेथे मुक्काम केला. भावे यांनी त्यांच्याकडून त्यांच्या सांकेतिक लिपीचा उलगडा मोठ्या युक्तीने करवून घेतला. त्यांना या संबंधी पूर्ण ज्ञान झाल्यानंतर महाराष्ट्र सारस्वताच्या तृतीय आवृत्तीत भावेंनी ‘महाराष्ट्र भाषा सरस्वतीच्या महालातील एक अज्ञात दालन’ या शीर्षकाखाली एका निबंधात सांकेतिक लिपीचा उलगडा केला तसेच वछाहरण आणि शिशुपालवध हे प्रारंभीचे दोन महानुभावीय काव्यग्रंथही त्यांनी छापून प्रसिद्घ केले. अशा रीतीने या क्षेत्रातील अभ्यासाचा पाया रचला गेला. त्यानंतर य. खु. देशपांडे, ह. ना. नेने,वि. भि. कोलते प्रभृतींनी त्यात मोलाची भर घातली आणि मराठी साहित्याचे हे अज्ञात दालन खुले केले.
सांकेतिक लिप्यांचे पाश्चात्य अभ्यासक
सांकेतिक लिप्यांचे पाश्चात्त्य अभ्यासक या शिर्षकाखाली डॉ. यु.म.पठाण यांचा याबाबद्दल एक लेख प्रसिद्ध झाला आहे.मराठवाडा विद्यापीठात असताना डॉ. यु.म.पठाण आणि कबले महानुभाव यांनी त्याकाळी महानुभावांच्या विविध मठात हस्तलिखिते गोळा करण्याचे महत्वाचे काम केले त्यामुळेच या विद्यापिठाला आज साडे तीन हजार पोथ्या मिळाल्या आहेत.
१ औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात खूप काही हस्तलिखिते उपलब्ध होती. याच
कुतुहलतेने रशियातील डॉ. कुझनेतसोव्ह हे महानुभाव वाङ्मयाचे संशोधक एक वेळी येथे आले. या पोथ्यांना पाहून त्यांनी याच प्रकल्पावर संशोधन करण्याचे ठरवले. आणि त्यामध्ये ते कमालीचे यशस्वी ठरले.नंतर रशियन सरकारने त्यांना या प्रकल्पासाठी पुरस्कृत करून औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात संशोधनकार्यासाठी पाठवल होत.महानुभावांचे हे साहित्य सकळ-सुंदर-पारिमांडल्य-हंस इ. सांकेतिक लिप्यांत लिहिलेलं असल्यानं मुळातच लिप्यंतर करून साहित्य उपलब्ध करून घेणं, ही अत्यंत परिश्रमाची बाब होती,परंतु त्यांच्या जिज्ञासेपोटी हे सर्व शक्य होऊ शकले. त्यांची ही शोध प्रवृत्ती पाहून मराठी विभागातील प्राध्यापक मंडळीना तर धक्काच बसला.
२ महानुभाव वाङ्मयाचे दुसरे पाश्चात्य संशोधक म्हणजे लंडन विद्यापीठाच्या प्राच्यविद्या विभागाचे मराठीचे प्राध्यापक डॉ. इआन रेसाइड होय. त्यांनी महानुभाव ग्रंथकार हयग्रीवाचार्य यांच्या ‘गद्यराज’ या ग्रंथाचं संशोधन करून संपादन केलं कहे. त्यांनी लंडन विद्यापीठाच्या जर्नलमध्ये संपूर्ण महानुभाव वाङ्मयाची सूची प्रसिद्ध केली. आजही ही सूची या अध्ययन क्षेत्रातील प्रमाण संदर्भसूची मानली जाते.
३ अमेरिकेतील अॅरिझोना विद्यापीठाच्या अॅन फेल्ड हौस याही महानुभाव संशोधन क्षेत्रातल्या नावाजलेल्या विदुषी आहेत. त्यांची अनेकवेळा डॉ. यु.म.पठाण यांच्यासमवेत जागतिक भक्ती साहित्याच्यावेळी त्यांची नेहमी गाठ-भेट होत असे. त्या अनेकवेळा महाराष्ट्रात आल्या आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागातील पोथी शाळेतील महानुभावांच्या ‘सिद्धांत सूत्रपाठ’ या महत्त्वाच्या चौदाव्या शतकातील सांकेतिक लिपीतील हस्तलिखितांचे संपादन त्यांनी आपल्या विद्यापीठाच्या वतीने प्रकाशित केलं होतं. तसेच डॉ. शं. गो. तुळपुळे यांच्याबरोबर त्यांनी मध्ययुगीन मराठी भाषेचा शब्दकोशही संपादित केला आहे.
वरील तिन्ही संशोधकांना सकळ लिपीचे पाश्चात्य अभ्यासक म्हणून ओळखले जाते.या कामी त्यांना औरंगाबाद येथील महानुभाव आश्रमातील पूर्वीचे कै. नागराज बाबा यांचे खूप सहकार्य लाभले. विविध लिप्यांचा अभ्यास त्यांनी याच आश्रमात केला आहे. आणि आपले संशोधनकार्य यांच्या माध्यमातून पूर्ण केले.
सकळ लिपी आणि आजची स्थिती
सांकेतिक लिप्यांची आजची स्थिती
१२ व्या शतकात इतक्या मोठ्या लिप्यांची निर्मिती झाली. हा एक कुतूहलाचा विषय ठरला आहे. आजही महानुभावांच्या आश्रमात ही लिपी शिकवली जात आहे. नव्हे त्यामधूनच शास्त्र अध्ययन होत आहे, परंतु खेदाची गोष्ट ही आहे की शासन आणि विद्यापीठाने याविषयी उदासीन धोरण स्वीकारले आहे. याचा प्रसंग मला खुद्द आला. औरंगाबाद विद्यापिठात असताना मी आणि माझे मित्र मोहन बाभूळगावकर एक दिवस विद्यापीठातील पोथी शाळा विभागात गेलो तेथील पोथ्या आम्ही बऱ्याच दिवसापासून पाहत होतो. त्याच वेळी आम्ही दोघे जण मोडिलिपीच्या कोर्सला ऍडमिशन घेण्याचं ठरवलं होतं. त्या पोथ्यांना पाहून आम्हाला कल्पना सुचली जर मोडी लिपीचा अभ्यासक्रम चालू होऊ शकतो तर सकळ लिपी सातशे वर्ष जुनी आहे हे काम सहज होऊ शकते हा प्रस्ताव आम्ही मराठी विभागाचे डॉ. सतीश बडवे यांच्या कानावर घातला त्यांनी लागलीच या प्रस्तावाचा विचार करून विद्यापीठ मंडळा कडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला. परंतु विद्यापीठाचे उदासीन धोरणामुळे ही गोष्ट पूर्ण होऊ शकली नाही. सकळ लिपी शिकण्याचा कोर्स विद्यापिठीय स्तरावर चालू झाल्यास अधिक चांगल्या पद्धतीने या हस्तलिखितावर संशोधन होऊन हस्तलिखितांचे हे कार्य सदोदितपणे एक नवी दिशा देणारे ठरेल.
संदर्भ : १कुलकर्णी, श्री.रं. प्राचीन मराठी गद्य
२.महानुभाव पंथ आणि त्यांचे वाङ्मय, पुणे १९७६
३. स्मरणिका, आत्मतीर्थ, महानुभावीय हस्तलिखित लिपी विज्ञान: एक आकलन
३.डॉ. महंत सोनपेठकर, सकळ लिपी, महानुभाव साहित्य प्रकाशन २००५
४.डॉ. यु.म.पठाण
महानुभाव सांकेतिक लिप्या



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा