झांजर ' : एक नित्य नूतन नवनीत -. श्री.आनंदराव गजभिये ,म्हाळगीनगर , नागपूर

झांजर ' : एक नित्य नूतन नवनीत मा. श्री.आनंदराव गजभिये ,म्हाळगीनगर , नागपूर* *परमश्रद्धेय आचार्यश्री बाबा आपण या संवत्सराच्या जेष्ठारंभी आपली अप्रतिम ' झांजर ' ही तात्त्वज्ञानिक परिप्रेक्ष्यातून साकारलेली दुर्लभ कृती मजसम पामरास आशीर्वचनपर भेट दिली आणि त्यावर लिहिण्याची आज्ञा केली . परंतु मार्गशीर्षाचा उत्तम महिना उजाडला पण मी धाडस करू शकलो नाही . क्षुद्र काजव्याने सूर्यावर लिहावे हे कसे शक्य आहे ? परंतु आपली अवज्ञा करणेही खचितच रास्त नव्हे , यास्तव हा दुर्बल क्षीण प्रयत्न ! ब्रह्मचर्याश्रमता विद्यार्जन आणि विद्यावर्धन करून गुरुऋण फेडावयाचे , युवावस्थेत भक्तिपूरित अंतःकरणाने नेटका प्रपंच करून भगवद्भक्ती व अतिथी विभूती सत्कारासारख्या रीतींनी मनुष्यऋण फेडावयाचे आणि पुढे प्रपंचातून ऋणमुक्त होऊन कामना कमी - कमी करावयाच्या व पूर्णतः निष्काम झाल्यावर संन्यासाश्रम पत्करून परमात्म्याच्या प्राप्तीसाठी निःसंग , निःशुद्ध , एकांतिक विहरणाद्वारे परमेश्वरात रममाण व्हायचे , अशी प्राचीन पण आधुनिकतेशी जुळणारी सहज साध्य उपासनेची रीत अधिक श्रेयस व प्रायोगिक असल्याचा मध्यवर्ती विचार आपण ' झांजर'मध्ये रेखाटलेला सकृद्दर्शनी भासतो . ' उप - नि - सद् ' अशी फोड असलेल्या उपनिषदात ' सद् ' म्हणजे गे ' , म्हणजे ' गुरूंच्या जवळ निष्ठापूर्व बसणे ' , ' एकांतात बसणे ' असा अर्थ अनस्यूत असल्याने व ज्ञान गूढ असल्याने त्याची चारचौघात जाहीर चर्चा करावयाची नाही . तर सर्वपरी योग्य जिज्ञासू शिष्याला खासगी रीतीने गुरूने ज्ञान द्यावयाचे , अभिप्रायातून ' रहस्य ' म्हटलेले आहे . सर्वज्ञांचीसुद्धा ' हे तुमचे रहस्य की मा : हे अनेकाप्रति न प्रकटिजे : ' अशी आज्ञा आहे . परंतु आर्तवंत , जिज्ञासू , चर्यावंत अशा पात्रांना ज्ञान देण्यास कुठेही मज्जाव नाही . हा धागा पकडून , आपण कालोचित पर्याय निवडून आपण ' झांजर'मधून जी महत्त्वाची यथार्थ जाण मुमुक्षूना देण्याचा जो प्रयत्न केला आहे , तो अपूर्ण , अप्रतिम , डोळस पण यथार्थमय असाच आहे . निःसंदेहपणे त्यात सखोल आध्यात्मिक अनुभवाचे व्यवस्थित शास्त्रशद्ध तार्किक विश्लेषण रास्त समर्पक रूपकांद्वारे मांडले आहे . तरीही आपल्या अभिव्यक्तीचा उगम व विस्तार सपूर्णतया श्रीस्वामींच्या तत्त्वज्ञानातच आहे . शाण्डिल्याने भक्तीची व्याख्या परानुरक्तिरीश्वरे अशी करून भक्ती म्हणजे ईश्वरविषयीचे पराकाष्ठेचे प्रेम , भक्ती म्हणजे उपास्याची मनःपूर्वक सेवा अथवा सेव्य व सेवक यांच्यातील हार्दिक संबंध , असे सुतोवाच भक्तिसूत्रात केलेले आहे . आपल्याद्वारा ' हृदा तनसा तष्टः ' या न्यायाने सर्वशक्तिमंत परमेश्वरास आपण अर्पिलेले झांजररूपी स्तुतिस्तोत्र म्हणजे एक अद्भुत कृती आहे . लालित्य , माधुर्य व उत्कट रसाविष्काराने विनटलेले ते साक्षात महत्त्वाचे सुलभ , सुगम व यथार्थमय प्रकटन आहे . त्या ईश्वररूपी रममाण होण्याची उत्कट याचना पण आहे . ' क ईशानं न याचिष् ? ' या ऋग्वेदातील ऋचेनुरूप ' समर्थापाशी भिक्षा मागणार नाही असा कोण आहे ? ' पण एवढेच प्रर्याप्त नाही तर भक्तिसुखाचा सोहळा हेच ' झांजर'चे परमसाध्य आहे . अर्थात भक्तिरसात अवगाहन करीत राहणे हेच जीवनातील परमश्रेष्ठ मूल्य दर्शविणारी निरपेक्ष भक्ती त्यात आहे . जी पूर्णतया वेदात व उपनिषदातसुद्धा नाही ; कारण तिथे अनन्याश्रय आहे , अनन्यता नाही . ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील ' नासदातीत् ' अशी सुरुवात असलेल्या १२ ९ व्या ' नासदीय सूक्तातील तिसऱ्या ऋचेतील तत् एकम्'मध्ये आदिकारण व सृष्टी यातील संबंधाचा पुरस्कार अनुस्यूत आहे . त्या अर्थाने ' तत् एकम् ' ' तत्वमसि ' ही वेदप्रणीत महावाक्ये ठरतात . प्रसिद्ध पुरुषसूक्तातील अनंत मस्तके , अनंत डोळे आणि अनंत पाय यांनी युक्त असलेला एकच पुरुष सर्व जगाला व्यापून त्याच्या पलीकडे दहा अंगुळे उरलेला आहे , असे सांगून ईश्वराचे सर्वव्यापीत्व , सर्वज्ञत्व , सर्वसाक्षीत्म वाखाणलेले आहेच . ब्रह्म म्हणजे विश्वाचे आद्यकारण ' , ' परतत्त्व ' , ' क्षरविश्वाच्या विविधतेच्या उगमस्थानी असणारे अक्षरतत्त्व ' अशा प्रकारचा करण्यात येतो . अशा ' ब्रह्माचे ज्ञान ' म्हणजेच ' ब्रह्मविद्या ' असे स्थूलमानाने मानता येईल . ' बृह ' या धातूपासून ' ब्रह्म ' शब्दाची व्युत्पत्ती देण्यात येते . जे सतत वाढतच राहते , ज्याला मर्यादा नाही , जे ' भूमा ' आहे असे अत्यंत व्यापक ते ' ब्रह्म ' आनंदच ब्रह्म आहे . अद्वैत वेदांत मतातील ' तत्वमसि ' हे त्यांच्या चार महावाक्यापैकीचे एक महावाक्य आहे . ' सर्वं खलु इदं ब्रह्म ' , ' अयम आत्मा ब्रह्म ' ' अहंब्रह्म अस्मि ' ही तीन महावाक्येच आहेत . ' तमेव भान्तमनुभातिसर्व तस्य भासा सर्वामिदं विभाति ' ' त्याने प्रकाशित केल्यावर त्याच्या आधाराने सर्व प्रकाशाने , हे सर्व त्याच्या प्रभेचा विलास आहे . ' अर्थात हे सर्व विश्व प्रज्ञानावर प्रतिष्ठित आहे . ' प्रज्ञानं ब्रह्म ' हेही एक महावाक्य आहे . ब्रह्माची असीमता त्याच्या धात्वर्थातच आहे . ब्रह्माचे ' अनंतत्व ' लक्षात घेऊन त्याची ' सत्यं , ज्ञानम् अनन्तं ब्रह्म ' अशीही व्याख्या केलेली आहे . त्यालाच प्रपच्चोपशम , ' अमृत ' निष्प्रपंच निर्गुण म्हणूनही सांगितलेले आहे . अशा अविकारी , भेदरहित निर्गुण ब्रह्मस्वरूपाच्या गुणधर्मादी ऐश्वर्याची आपण प्रतिपादलेली महती स्वामींच्या सूत्रास अनुसरून केलेली आहे . अन्य ग्रंथातील प्रमाणे आपण विस्तारासाठी वापरून हा क्लिस्ट विषय सोपा केलेला आहे . आपण योजिलेली रूपके , उदाहरणे अत्यंत समर्थक व मनाचा ठाव घेणारी आहेत . उपाध्यायकुलाचार्य प.म.श्री . बीडकरबाबांनी गुणाभिव्यक्तीबाबत परमोच्च बिंदू गाठल्याचे जे निरीक्षण नोंदविलेले आहे , तीच तर आपली खरी ' प्रशस्ती ' आहे . आपण पूर्ण शक्तिमंत परमेश्वराच्या धर्माची केलेली प्रशंसा , उकल म्हणजे अशा परमोच्चतेचा परमोच्च कळस होय ; असेच म्हणणे क्रमप्राप्त आहे . ' फुकट काही मिळत नाही हे आपण पुरस्कारलेले व्यावहारिक महावाक्यही लौकिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे . ज्यात लौकिक तथा पारलौकिकदृष्ट्या प्रायोगिक मूल्य आहेच . आपली भाष्यशैली व निरीक्षणे विलक्षण आहेत . ' कर्मणवैवहि संसिद्धिं आस्थिता जनकादयः । ' कर्मनिवृत्ती व कर्मसंन्यास गीतेलाही अभिप्रेत नाही . त्यातील सारतत्त्व घेण्यासाठी गीतेने कामनापूर्तीसाठी करावयाच्या कर्माचा त्याग म्हणजे संन्यास , अशी नवीन व्याख्या केली . संन्यास संकल्पनेमागील उदात्तता घेऊन पलायनवाद दुर्लक्षिण्याच्या योजनेतून आपण केलेली संन्यासाची व्याख्या , विस्तार अप्रतिम , हृदयाचा ठाव घेणारा झालेला आहे . ' उत्कट भगवद्प्रेम , तेजस्वी ज्ञान व विरागाचं भान म्हणजे संन्यास ' हे आपलं निरीक्षण सार्वत्रिक सर्वस्पर्शी ठरण्याच्या योग्यतेचे व त्यातील विकासक्रमाची योजकता अप्रतिम झालेली आहे . श्रद्धेय बाबा , आपण ' झांजर ' साकारताना विषयप्रवेशात आरती व सागरची भेट , त्यांच्या संवादातून काव्यांची व्यवच्छेदक लक्षणे , काव्यप्रकार , जडचेतनाशी शब्दसंवाद रेखाटून काव्याचे विविध आयाम , कवी व महाकवीतील रचनाभेद अत्यंत समर्पकपणे मांडून स्वामींच्या सूत्रविचारांची सुद्धबद्ध गुंफण करण्यासाठी पर्याप्त पार्श्वभूमी तयार केली . त्यातून जीवनाचे विविधांगी कंगोरे उलगडण्याबरोबरच सर्वज्ञांचा ब्रह्मविद्या रहस्योद्घाटनाचा अपूर्व प्रसंग व त्याची पूर्वापार पूर्वपीठिका मांडली . उभयतांच्या प्रथम भेटीतच महावाक्य श्रवणाचे सुतोवाच करत तारुण्यसुलभ प्रणयभावनेची मानसशास्त्रीय शुद्ध सात्त्विक सहजप्रवृत्तीही आविष्कारली . हे आपल्या लेखनीचे एक अद्भुत सामर्थ्य सुचिता वर्णनातीत आहे . अशा दुर्गम प्रणय प्रांतातून आपण सर्वज्ञांचा परमसिद्धांतही अधोरेखित केला , हे केवढे धारिष्ट्य ! आपण एक विलक्षण प्रज्ञापुरुष तर आहातच ; पण आपण असाधारण शब्दप्रभूही आहात , हेच खरे . ' शब्दी सामर्थ्य आतिः ' हे सर्वज्ञ म्हणतात ते उगीच नव्हे ! चिंतनीचा प्रारंभ , महावाक्य निरूपणाचा प्रसंग , परमसिद्धांत , आत्मज्ञान , आलोपास्ती , प्रकरणसाठ , वचनसंबंध , वचनसाठ , हेतू , हेतुस्थळादींची पर्याप्त चर्चा आपण द्वितीय प्रकरणात साकारून तृतीयाध्यायात टीका , आशंका , टीकाप्रकार , भाष्यप्रकार , सूत्रविस्तार , अर्थ अर्थांतर लक्षण , ज्ञानप्रकार जीवेश्वर अभेदविचार , देवता , ज्ञान - विज्ञान , प्रपंच , परमेश्वरी ऐश्वर्य , चहुपदार्थाची कारण स्वरूप लक्षणाबरोबर निर्गुणाबरोबर ' सगुण परमात्मा ' असा रोचक , वेधक व बोधक रीतीने रेखाटला की ते सर्व अभ्यासल्यावर आपणास मनोमन वंदन करणार नाही असा सुज्ञ विरळाच असे म्हणणे भाग पडते . उद्धरणविचार , ज्ञान , अज्ञान , अन्यथाज्ञानादी विचार , पक्ष , पक्षकार , पक्षविवेचन , मायेची व्यावृत्ती असे असे रहस्यमय पैलू आपण लीलया उलगडून वाचकास खिळवून ठेवलेले आहे व चिंतन - मननास , आत्मनिरीक्षणास मोकळी वाट चौथ्या प्रकरणात उपलब्ध करून दिलेली आहे . पाचव्या प्रकरणात तर आपल्या लेखनीस अधिक बहर येऊन त्या ज्ञान , भक्ती , वैराग्य या त्रयीचे सोदाहरणासह मार्मिक विवेचन आलेले आहे . प्रतितिविचार , सृष्टी , शब्दसृष्टी , देवता विवेचन व अनादी पदार्थाची क्रमावस्था यावर तत्त्वप्रचुर संश्लेषणात्मक विश्लेषण आपण केलेले आहे . त्यातील दार्शनिक उपपत्ती व योजकतेने महावाक्याचे मंदिरात आपण सगुण ईश्वराची प्रतिष्ठा केलेली आहे . विवर्त , परिणाम , आरंभादी दार्शनिक विचारद्रुम्याबाबतचे आपले साक्षेपी निरीक्षण इतके मर्मग्राही झालेले आहे की ,* *आरम्भवादः कणभक्षपक्षः संद्यातवादस्तु भदन्तपक्षः ।* *सांख्यादिपक्षः परिणामवादो , वेदान्तपक्षस्तु विवर्तवादः ।।* *या संक्षेप - शारीरिक ' ग्रंथातील चतुर्मतसंग्रह दर्शविणाऱ्या श्लोकाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही . सहाव्या प्रकरणामध्ये सूत्रनिहाय अर्थविचार , शक्तिविचार , ज्ञान - प्रेम व प्रपंचाचे कंगोरे आपण आशयघन शब्दांत मांडलेले व सातव्या अध्यायात गृहस्थाश्रम , संन्यास , सच्चिदानंद स्वरूपाचा अर्थविस्तार , ब्रह्मस्वरूप आदींच्या सूक्ष्म निरीक्षणासह व ब्रह्मविद्याशास्त्रातील बारकाव्यांसह केलेले विवेचन वाचकास अंतर्मुख होण्यास भाग पाडते . तर आठव्या - नवव्या प्रकरणातील ईश्वरी धर्माची विलक्षण महती , महता , व्याप्ती समप्रमाण मांडून आपण गुण , शक्तिमाहात्म्य , व्यक्त - अव्यक्त विचार मांडून संसार , संन्यास , त्याची प्रासंगिकता , अनिवार्यता , मदत होते . मोक्षप्रद उपयोगिता समर्पक सोदाहरणासह चर्चिलेली असल्याने वाचकाचे संदेह फिटण्यास दहाव्या प्रकरणातील आचारविषयक निरूपण , कृष्णमाहात्म्य , परमेश्वराच्या धर्माचे मूलगामी , निगूढ विवेचन वाचकास खिळवून ठेवते , तर अकराव्या प्रकरणात वैरागी बाबाच्या माध्यमातून प्रसवलेले वैराग्य , संन्यास , संसार , परमेश्वरप्राप्तीबद्दलचे गहन तत्त्वचिंतन महानुभावीय दर्शनमुद्राची व्यापकता , उत्कटता व सर्वस्पर्शीत्व दर्शक वाचकास एक आगळी तत्त्वदृष्टी देते . बाराव्या प्रकरणातील चर्चिलेले अटन , विजन , एकांकी स्मरणादी प्रसंग व सागरची दीक्षा मनास चटका लावून जाते . तत्प्रसंगीचा आरतीचा सप्रमाण व्यत्यय भल्याभल्यांना निरुत्तर व अंतर्मुख करणार आहे . उपसंहारात्मक तेराव्या प्रकरणातील महावाक्य निरूपणावर सखोल चिंतन , आरतीचा विवाह , भक्तिपूरित अंतःकरणाने भगवद्भक्तीच्या साक्षीने संसार , पुढे सरलाची भेट , तत्त्वचर्चा यातील विविधांगी पैलू अंतरावा व प्रसंगी भावनेचा ठाव घेणारी आहेत . महावाक्याचा चिरंतन परिणाम म्हणून सागर सर्वसंगपरित्याग करून पुण्यपावन ढोऱ्या डोंगरात अस्तीपरी आवरून , सर्वज्ञांच्या भेटीच्या व्याकुळतेत रत दाखवून अखंड नामस्मरणाने सांगता करून पूज्य बाबांनी एक अद्भुत विलक्षण तत्त्वविचार अनुपमेय अधिकाराने मांडलेला आहे . पूज्य बाबा , अनादिसिद्ध जीवस्वरूपास चिकटलेल्या अविद्येस ब्रह्मज्ञानाने ' झांजर ' बसते व जीव ईश्वरस्वरूपाच्या आनंदात रत होतो , हीच जीवाची परमोच्च अवस्था व त्या ईश्वररत स्थितिप्रत पोचण्यासाठी जीवास ज्ञान व प्रेम हे दोन स्तोपान ; त्यातही प्रेम श्रेष्ठ हे दुर्लभ महदत्व ' महावाक्य ' आपण आपल्या लालित्यपूर्ण , प्रासादिक , आशयघन अशा प्रतिभासंपन्न लेखनीतून साकारून मराठी सारस्वतात एक मोलाची चिरंतन अशी भर घातली आहे . साहित्य संस्कृती मंडळाने आपणास प्रतिष्ठित असा ' ह.ना. आपटे ' पुरस्कार देऊन पुरस्काराची उंचीच वाढविलेली आहे . आपल्या ' झांजर'मध्ये ज्ञानपीठप्राप्तीचे सामर्थ्य आहे . कित्येक आचार्यादी पदव्या आपल्या प्रतिभेवरून ओवाळून टाकाव्यात इतके शुद्ध , सात्त्विक तेजोवलय आपल्या लेखनीत आहे . चिरंतन स्मरणात राहील असा अपूर्व मानाचा मुकुट आपण त्यानिमित्ताने महानुभावीयांच्या शिरपेचात रोवला आहे . माझी आपणास शुभेच्छा देण्याची योग्यता नाही , हे मान्य करूनही आपल्या लेखनीचे शीतल , वेधक सौंदर्य , कीर्तीची साद वृद्धीत चंद्रकोरीप्रमाणे भारतवर्षात आसमंतात निनादो अशी जगन्नियंत्या अनंतशक्तिमंत सर्वज्ञास नम्र प्रार्थनेसह आपले अभीष्टचिंतन ! बाबा , आपण आचार्य परंपरेला धक्का दिला असे मात्र म्हणणे धाडसाचे ठरेल . सर्वज्ञांच्या विचारद्रुमतातच आपल्या लेखनीचे व विस्तारही सामावलेला आहे . पंथीय अतिरंजकतेबाबतचे आपले रास्त विचार प्रस्थापितांना असह्य ठरण्यापेक्षा ते सुसह्य ठरतील असाच आपला लेखनप्रवास राहणे पंथीय स्वास्थ्य व प्रचाराच्या दृष्टीने उपकारक असेल . कारण आपले सामर्थ्य व इतिकर्तव्यताही येथेच आहे . आपण परंपरा व परिवर्तन ह्यांचा सुरेख सुवर्णमध्य साधलेला आहे .* *दंडवत प्रणाम..!* तिफन-बा.भो.शास्त्री विशेषांक केशर गौरव ग्रंथ

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट