झांजर एक आकलन- डॉ.राष्ट्रपाल मेश्राम
झांजर एक आकलन-डॉ.राष्ट्रपाल मेश्राम
मराठी विभाग प्रमुख , समाजकार्य महाविद्यालय , कामठी , जि . नागपूर
' झांजर ' ही परमआदरणीय महानुभाव साहित्याचार्य , आचार्यप्रवर श्री . बाभूळगावकर शास्त्री यांची पहिली तत्त्वज्ञानात्मक कादंबरी आहे . एकूण २१४ पानांची ही कादंबरी ऑक्टोबर २०१५ मध्ये चिंतनी प्रकाशन , करमाड या संस्थेने प्रकाशित केली . या कादंबरीचे ' मुखपृष्ठ आणि ' अर्पणपत्रिका ' वाचल्यानंतर ही कादंबरी कोणत्या आशयद्रव्यास व्यक्त करणारी आहे , याचा अदमास वाचकाला प्रारंभीच येतो . लौकिक पातळीवर अलौकिकाचे प्रत्यंतर घडविणारी ही कलाकृती आहे . महावाक्यासारखा गहन विषय सर्वसामान्यांना सोप्यात सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी आणि महानुभाव पंथाला विधायक आयाम प्राप्त करून देण्यासाठी या सैद्धान्तिक कादंबरीची निर्मिती झालेली दिसते . ही कादंबरी महानुभाव साहित्यातील अक्षर कलाकृती आहे . मानवी जीवनाच्या कोणत्याही पातळीवरील जीवनानुभवाला जेव्हा प्रतिभावंत आपल्या लेखणीतून रेखाटतो , तेव्हाच अशा अक्षर कलाकृतीचा जन्म होत असतो . बाबांनी महावाक्यासारख्या तत्त्वप्रधान विषयाला कादंबरीच्या आकृतिबंधात बांधून तो विषय जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा केलेला प्रयोग अत्यंत पृथगात्म आणि लक्षणीय असा आहे . महावाक्यासारख्या गहन आणि महान विषयाला स्पर्श करू शकतील अशी मोजकीच मंडळी पंथात आहेत . त्यातही हा विषय आबालवृद्धांना सहज कळेल अशा शब्दांत महावाक्याचे निरूपण करणारी व्यक्ती अभावानेच आढळेल . अशा व्यक्तींमध्ये बाबांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल . ब्रह्मविद्येशी एकजीव होऊन बाबांनी हा विषय कादंबरीतून साकारला आहे . या विषयाबरोबर पंथीय समाजात रुजलेले समज - अपसमजाचे धुके बाजूला सारून विधायक समाजबदलासाठीही त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत . अशा धर्मोपयोगी आणि समाजोपयोगी नानाविध आयामांनी युक्त असलेल्या ' झांजर ' कादंबरीला २०१६ साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून ह . ना . आपटे पुरस्कार प्राप्त झाला .
बा . भो . शास्त्री याचे लौकिक व वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व
बाबांचे व्यक्तित्व विलक्षण आहे . ज्या वयात त्यांनी शाळेकडे वळावे , त्या वयात त्यांनी गुरे वळविली . वयाच्या सतराव्या वर्षी त्यांना अक्षरांची ओळख झाली . शालेय शिक्षण घेतलेल्या बाबांनी नागपूर विद्यापीठातून ' संस्कृत ' विषयात ' शास्त्री ' ही पदवी प्राप्त केली . बालवयातच आईच्या प्रेमाला पोरके झालेले , वडिलांची ओळख नसलेले बाबांचे लौकिक जीवन सामान्यांच्या अंगावर शहारे आणणारे आहे . अनेक वर्षे गुरे राखलेल्या बाबांनी आपल्या लेखणीतून आजवर सुमारे ३० पुस्तकांची निर्मिती केली , ही गोष्ट चमत्कारिक वाटते . प्रतिभावंत आपल्या अंगच्या कलागुणांनी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःचे असामान्यत्व सिद्ध करीत असतो . कुठलीही गोष्ट त्याच्या सर्जनशील प्रतिभेवर मर्यादा घालू शकत नाही . कदाचित म्हणूनच बाबांच्या हातून एवढी मोठी साहित्यनिर्मिती शकली . महानुभाव साहित्याच्या इतिहासात इतकी ग्रंथनिर्मिती करणारे लेखक बा , भो . शास्त्री यांच्या रूपाने मिळाले . बाबांनी आपल्या लेखणीतून महानुभाव साहित्याचे दालन समृद्ध केले . त्यांच्या अफाट प्रतिभेमुळे साहित्यसोनीयाची वैभवशाली प्राचीन परंपरा असलेल्या पंथाला पुनश्च एकदा वैभव प्राप्त झाले . ' झांजर ' कादंबरीतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू हिऱ्यासारखे झळकतात . मुळात ते एक प्रतिभावंत सर्जनशील लेखक आहेत . ब्रह्मविद्येचे प्रकांड पंडित आहेत . धर्मशास्त्र , दर्शनशास्त्र , वेद - पुराणांचे सखोल अभ्यासक आहेत . संस्कृत आणि संस्कृत साहित्याचे जाणकार आहेत . प्राचीन आणि अर्वाचीन मराठी वाङ्मयाचे ते वाकबगार आहेत . आपल्या वाणीतून जनमानसात बदल घडवून आणणारे श्रेष्ठ प्रबोधनकार आहेत . आपल्या वक्तृत्वशैलीतून कोणत्याही विषयावर सूत्रबद्ध विवेचन करणारे ख्यातकीर्त भाष्यकार आहेत . विशेष म्हणजे सर्व साहित्यप्रकारांत लीलया संचार करणारे सव्यसाची लेखक आहेत . म्हणून बाबांच्या सर्व वाङ्मयकृतींत त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते . ' झांजर ' कादंबरीतही त्यांच्या अलौकिक आणि वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचे एकात्मीकरण आढळून येते . त्यामुळेच ही असामान्य कलाकृती निर्माण झाली आहे . या कादंबरीत त्यांनी आध्यात्मिक अनुभूतीला केंद्रस्थानी ठेवून मानवी जीवनातील उन्नत अवस्थेचा प्रत्यंतर दिला . नवनव्या सत्याचा शोध घेतला . प्रपंच आणि परमार्थाच्या संघर्षातून साकार झालेली ही कादंबरी मानवी जीवनातील उन्नत विचार वाचकांपुढे ठेवते . लेखकाला शब्दांची वानवा नाही . शब्द त्यांच्या मुखातून दुथडी भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे प्रसृत होतात . उठता , बसता , एकांतात , समूहात , प्रवासात कुठेही बाबांच्या प्रतिभेला अगदी सहज नवनवे विचार सुचतात . मग ते सर्व विचार लेखणीतून कलाकृतीच्या रूपाने जन्माला येतात . त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तित्वाचा लौकिक व्यक्तित्वाशी असलेला संबंध हा सहकार्याचा आहे जिव्हाळ्याचा आहे . ' झांजर ' या कादंबरीतील कथाविषयातून बाबांनी लौकिक व्यक्तिमत्त्वाचे आणि वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचे उच्च पातळीवरील एकात्मीकरण येथे साधलेले दिसते . त्यामुळे ही महान कलाकृती त्यांच्या हातून निर्माण होऊ शकली . या कादंबरीत आध्यात्मिक अनुभूती केंद्रस्थानी असून तिच्याभोवती संपूर्ण कथानक गुंतलेले आहे . परमेश्वरप्राप्ती हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असून परमेश्वराच्या नामस्मरणातच मोक्षाचा खरा मार्ग आहे ही भूमिका कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे . महावाक्यसारखा विषय सर्वसामान्य जनतेला सहज सोप्या , प्रासादिक शब्दांत , विविध व्यावहारिक उदाहरणे देऊन समजून सांगण्यापुरता मर्यादित नाही , तर मानवी जीवनातील चिरंतन सत्याने भरलेल्या विविध भावानुभूतीचा शोध घेणारी ही कादंबरी आहे . ही कादंबरी परमार्थाबरोबर संसाराचेही उदात्तीकरण करते . प्रत्येक मानवी आत्म्याला जशी परमेश्वराची ओढ लागलेली आहे , तशीच त्याला संसाराचीही ओढ आहे . परमार्थाइतकाच संसारही महत्त्वाचा आहे , हा जीवनवादी विचार मांडणारी ही कादंबरी महानुभाव साहित्याला एका वेगळ्या उंचीवर पोहचवते . या कादंबरीमध्ये एका महान तत्त्ववेत्त्याची झेप आपणाला पाहावयाला मिळते . त्याबरोबरच एका महाकवीच्या प्रतिभेची झेपही या ठिकाणी दिसते . एका द्रष्ट्या विचारवंताचे साक्षात्कारित्व इथे घडते .
' झांजर'ची कथावस्तू
' झांजर ' ही महावाक्याची चिंतनी आहे . यात महानुभावपंथीय संस्कारित तरुण मनांची करुण कहाणी आहे . अध्यात्म आणि संसार या दोन्ही पातळ्यांवरील साक्षात्कारित्व घडताना होणारा मानसिक आणि तात्त्विक संघर्ष , या संघटनांशी संलग्न दुःख या कादंबरीतून अभिव्यक्त झाले आहे . सागर आणि आरती हे दोन तरुण कादंबरीचे नायक आहेत . त्यांच्या सहवासातून सभाषणातून कादंबरीतील मुख्य विषय साकारत जातो . यासोबतच अण्णा , आई , संदीप , सरला , वैरागीबाबा , माणिक मावशी , समीर , प्रतीक , नीरज आदी गौण पात्रे आहेत . आरती आई - वडिलांसोबत तीर्थयात्रेच्या निमित्ताने रामटेक येथे देवदर्शनाला जाते . तिथे तिला सागर भेटतो . दोघेही समवयस्क आणि समविचारी असल्यामुळे काही क्षणांतच त्यांच्यात घट्ट मैत्री होते . दोघेही अध्यात्माचे उपासक असल्याने त्यांच्या मनांच्या तारा जुळतात . दोघेही धर्मचर्चेत रंगून जातात . सागर आरतीला ब्रह्मविद्येच्या जन्माचे रहस्य सांगतो . ससिक रक्षणाच्या लीळेतील त्याची चिंतनशील चर्चा , या लीळेवरील त्याने केलेले भाष्य आरतीच्या मनावर सागरचे नाव कोरून जाते . पारध्यांनी स्वामींचे १२ वर्षांचे मौन तोडले . या आदिवासींमुळेच ब्रह्मविद्येचे उद्घाटन झाले . अशा प्रकारचा अध्यात्माबरोबर समाजहिताचा अनोखा अर्थ सागर तिला समजावून सांगतो . सागरच्या या अलौकिक प्रतिभेने आरती भारावून जाते . सागरच्या विचारसौंदर्याने ती पहिल्याच भेटीत त्याच्या प्रेमात पडते . काही क्षणांच्या या भेटीत तिच्या अनंत जन्मांचा सोबती असलेला सागर तिला भेटलेला असतो . पण हा योग लवकरच वियोगात रूपांतरित होतो . आरती तेथून पुढच्या प्रवासाला निघते ; परंतु निघताना ती सागरला सात दिवस होणाऱ्या महावाक्याच्या कार्यक्रमाविषयी माहिती देते . सागरला त्या सातदिवसीय महावाक्याच्या पोथीत अगत्याने येण्याचे सांगून त्याचा निरोप घेते . पुढे आरती आपल्या कुटुंबीयांसह सात दिवस चालणाऱ्या महावाक्याच्या कार्यक्रमाला जाते . ' महावाक्य ' हा कार्यक्रम म्हणजे ४० दिवस चालणाऱ्या पोथीऐवजी सात दिवसांची चिंतनी असते . महानुभाव पंथातील हा अभिनव उपक्रम असतो . हल्लीच्या धावपळीच्या काळात लोकांजवळ ४० दिवसांचा वेळ असणे शक्य नाही . अशा काळात सात दिवसांत लोकांना महावाक्याविषयी उद्बोधन करून त्यांच्या धर्मज्ञानाची तहान भागविण्याचा हा स्तुत्य उपक्रम असतो . आरती पोथीच्या आदल्या दिवशीच कार्यक्रमस्थळी पोहचते . तिथल्या व्यवस्थेने तिचे डोळे दिपून जातात . कार्यक्रमाचा दिवस उगवतो . पोथीला प्रारंभ होतो . आरतीने सागरला रामटेक येथे पोथीच्या कार्यक्रमाविषयीची कल्पना दिलेली असते . सागर पोथीला नक्कीच येईल असे तिचे मन तिला ग्वाही देत असते . सागरशी मनोमन प्रेम करायला लागलेल्या आरतीचे डोळे पोथीच्या त्या भव्य गर्दीत सागरचा शोध घेतात . शेवटी आरती आणि सागरची भेट होते . पोथीच्या अवसराच्या पहिल्या दिवशीचे प्रवाचक आचार्य श्री दामोदरदादा वाघोदेकर प्रवचनाला प्रारंभ करतात . आरंभी आपल्या मधुर वाणीतून आचार्य श्रीचक्रधरस्वामींचे अलौकिक शब्दचित्र साकार करून प्रकरणवश ' सांगायला सुरुवात करतात . स्वामींच्या तत्त्वज्ञानाची उकल करताना आचार्य तपशीलवार अर्थांचे अनेक पदर उलगडून दाखवितात . पोथीच्या शेवटी पाठांगण अनंतव्यास बाबा दंडवत घालतात आणि पोथीचा अवसर संपतो . पोथी संपल्याबरोबर आरती सागरला जाऊन भेटते.पोथीतील निरूपण सागरकडून समजून घेण्यासाठी धर्मजिज्ञासू आरती पोथीतील चिंतन सागरने आपल्या भाषेत समजावून सांगावे , अशी त्याला विनंती करते . परंतु पोथीसारख्या गहन विषयावर भाष्य करण्याचे आपण अधिकारी नाही ; मी उपदेश घेतला नाही ; माझे कोणी गुरू नाहीत ; त्यामुळे मी त्यावर चिंतन करणार नाही असे सागर आरतीला सांगतो . शेवटी आरतीच्या आग्रहास्तव सागर पोथीतील चिंतनावर विवेचन करतो . मुळात महाज्ञानी असलेला सागर पोथीतील एकेका शब्दाच्या अर्थाची उकल करून , तिथल्या प्रत्येक वाक्याचा गूढार्थ अत्यंत विस्ताराने सांगतो . हे सांगत असताना महावाक्याच्या सखोल अभ्यासामुळे आणि असामान्य आकलनशक्तीमुळे महावाक्यातील शब्दांचे अत्यंत विस्ताराने स्पष्टीकरण करीत एकेका वाक्याचे अतिशय व्यापक अर्थ तो सांगत जातो . निर्वेद , सिद्धान्त , परम सिद्धान्त अशा अनेक शब्दांचे स्पष्टीकरण करून महावाक्य म्हणजे काय ते गद्य आणि पद्यातून विस्तारपूर्वक सांगतो . सागर आरतीच्या जिज्ञासेची , ज्ञानाची भूक भागवीत जातो . सागर केवळ महावाक्याचा जाणकार नाही , तर तो सर्व वेदशास्त्रांचा जाणकार ज्ञानी पंडित आहे . याबरोबरच भाषाशास्त्र , साहित्यशास्त्र , काव्यशास्त्र , प्राचीन - अर्वाचीन वाङ्मयाचा तो सर्वज्ञानी आहे . प्रवचनातून तो महावाक्यासारखा गहन आणि अनाकलनीय विषय सोप्यात सोपा करून सांगतो . सर्वसामान्यांना ब्रह्मविद्येचे सहज आकलन व्हावे यासाठी तो अनेक व्यावहारिक दृष्टान्त देतो . जीव , देवता , प्रपंच आणि परमेश्वर या चारही पदार्थांचे ज्ञान करून देताना सागर सूक्ष्मातिसूक्ष्म पातळीवर चिंतन मांडतो . ' जीव ' हा पदार्थ सीमाबद्ध , निरानंद , अल्पज्ञ , एकदेशी , विषम , अशुद्ध , बद्धमुक्त आहे . ' परमेश्वर ' हा असीम , आनंदमय , सर्वज्ञ , सर्वदेशी , शुद्ध , नित्यमुक्त आहे . ' देवता ' ह्या पंचप्रकार आणि गुणत्रयाने श्रीमंत आहेत . त्यांच्याजवळ ज्ञान , सुख , सामर्थ्य , ऐश्वर्य व प्रकाश आहे . परंतु देवतेजवळ असणारे ज्ञान हे परमेश्वराजवळ असणाऱ्या अखंड ज्ञानासारखे नाही . देवतेजवळ केवळ विशेषज्ञान आहे . ' प्रपंच ' म्हणजे पंचमहाभूतांचे वैभव आहे . भूमी , आप , वायू , आकाश या पंचमहाभूतांपासून प्रपंच बनलेला आहे . परमेश्वर हा असीम आनंददायी , सर्वज्ञ , सर्वदेशी , शुद्ध , नित्यमुक्त आहे . तो सगळ्यांत श्रीमंत आहे . विश्वातील सगळे सौंदर्य , ऐश्वर्य , दयामाया , कृपा , करुणा , शक्ती ही परमेश्वराचीच संपत्ती आहे . तो आनंदाचा स्वामी आहे . जो सुखदुःख भोगतो त्याला ' जीव ' म्हणतात . तो ज्याच्यात सुखदुःख भोगतो त्याला ' प्रपंच ' म्हणतात . जीवाला ज्या सुखदुःख भोगवतात त्यांना ' देवता ' म्हणतात व जो जीवाला सुखदुःखातून मुक्त करतो त्याला ' परमेश्वर ' म्हणतात . अशा साध्या सुलभ भाषेत सागर आरती व तिच्या कुटुंबाला चारी पदार्थांचे ज्ञान करून देतो . महावाक्याच्या आशयाची सर्व वलये कळण्यासाठी सागर प्रपंच म्हणजे ' कारागृह ' , जीव म्हणजे ' कैदी ' आणि परमेश्वर म्हणजे ' जेलर ' असे रूपक योजतो . परमेश्वर ज्ञान देऊन जीवांचा उद्धार करतो . प्रेम व ज्ञान हे दोन अद्भुत शस्त्र आहेत . ज्ञानाने अविद्या नासते . सागर हे सर्व ज्ञान एखाद्या विरक्त महायोग्यासारखा निरूपण करीत असतो . कुणाकडूनही उपदेश न घेतलेल्या सागरचे प्रवचन असामान्य असते . सागर फार मोठा महानुभाव भाष्यकार असतो . असा ज्ञानी पुरुष आपल्या संसारात आला तर आपला संसार सोन्यासारखा होईल अशी भावना आरतीच्या मनात उत्पन्न होते . आरती चेहऱ्यावरचा आनंद लपवू शकत नाही . परंतु सागरने संसाराविषयी केलेले भाष्य मात्र तिला पटत नाही . संसार हे अज्ञानाचे अपत्य आहे असे सागर सांगतो ; तर आरतीला संसार ही ज्ञानाची जननी वाटते . आरती सतत संवादातून सागरला संसाराकडे खुणावते . तिच्या कुटुंबीयांना उपदेशी मुलगा हवा असतो . सागरने उपदेश घेतला की मला त्याच्याशी लग्न करता येईल , तो माझ्या जीवनाचा सहप्रवासी होईल , असे स्वप्न ती रंगवीत असते . संसाराकडे वळविण्याकरिता ती सागरला पुराणकथांतील विश्वामित्र , वेदव्यास , पाराशर , शृंगऋषी यांची उदाहरणे देते . पंथातील छर्दोबाविषयी सांगते . ' उद्धवगीता , ज्ञानप्रबोधन , मूर्तिप्रकाश हे ग्रंथ बाजूला करून रुक्मिणीस्वयंवराचे पारायण करण्याचा मोह उपदेशांना आवरत नाही आणि हा वेडा स्थितप्रज्ञासारखा का वागतो ? ' हा विचार तिला सतावत असतो . आरती सागरच्या प्रेमात आकंठ बुडालेली असते . कादंबरीच्या पाचव्या प्रकरणात सरला नावाच्या साध्वीचे पात्र येते . सरला आणि आरतीचा पूर्वपरिचय असतो . रूढी व कर्मकांडांच्या परिघाबाहेर जाऊन चिलम करणारी सरत्या आरतीला मनापासून आवडते . आरती आणि सरला समवयस्क असल्याने दोघांचेही चांगले जमते . आरती सागरच्या प्रेमात बुडाली हे सरला ओळखते . आरती सागरची फार स्तुती करते . आरतीकडून सरलाने ऐकलेले पक्षाचे स्पष्टीकरण तिला खूप पटते . अशा सादरीकरणाने लोकांच्या मनातील महावाक्याविषयीची भीती पूर्ण निघून जाईल . महावाल्यासारखा विषय सात दिवसांतच जिज्ञासूंच्या पदरी पडेल आणि खर्चातही बचत होईल , असे सरलाल वारले . पण सागरचा हा नवा उपक्रम परंपरावादी महानुभाव स्वीकारतील का ? उपदेश नसणा - या माणसाला पंथात ज्ञान सांगण्याचा अधिकार नाही . परंतु सागरची बौद्धिक उंची हिमाल्यासारखी होती . त्याचे ज्ञान आणि स्वभाव पाहून सरलालाही त्याच्याविषयी सहानुभूतो निर्माण झाली . सागर ब्रह्मविद्येचा अर्थ अनेक व्यावहारिक उदाहरणांनी अगदी बारीकसारीक उदाहरण देऊन सोप्या शब्दांत स्पष्ट करून सांगत असतो . आरती त्याला संसाराकडे खुणावते ; पण से तारुण्यात त्याला विरक्ती आलेली असते . सागर पोधी संपल्यावर आरती , सरला , संदीप , अण्णा यांना पोथीवरील चिंतन निरूपित करतो . चिंतन संपल्यावर सागर पोधीच्या ठिकाणी लांबवर एका झाडाखाली बसलेल्या वैरागीबाबांजवळ जाऊन बसतो . ज्ञान , भक्ती आणि वैराग्याचे यथोचित मिश्रण त्याला वैरागीबाबात पाहायला मिळते . वैरागीबाबांच्या पायावर त्याची निष्ठा स्थिर झालेली असते.याचे आरतीलाही समाधान वाटते . किमान बैरागीकबामुळे तरी सागर उपदेश घेईल . आपल्या घरच्यांना उपदेशी मुलगा पाहिजे . माझेलम सागरशी होऊ शकेल , असा विचार तिच्या मनात घोळत राहतो . सागरच्या सखोल अभ्यासाने त्याला प्रपंचापासून परावृत्त केले आहे . सागरला प्रपंचात रस वाटत नाही . प्रपंचाविषयी तो फार उदासीन असतो . प्रपंच हे सत्य नसून असे त्याला वाटते . पण दुसरीकडे आरतीच्या घागरीत सागरशिवाय दुसरा कोणी दिसत नाही . सागरने वैरागीबाबांना गुरू म्हणून स्वीकारले होते . वैरागीबाबापुढे बजासनात बसून त्यांचे निरूपण सागर मनोमन ऐकत होता . वैरागीबाबांकडूनच सागरने महावाक्याचे धडे घेतले होते . दररोज पोथीचा अवसर संपल्यावर सागरची चिंतनी सुरू होते . या चितनीत आरती , तिचे कुटंक आणि सरला सहभागी होते . सागरसारख्या गृहस्थाने चिंतनी करू नये अशी दमदाटी त्याला तिथल्या लोकांकडून मिळाली होती . पोथीतील अर्थ सांगण्याचा अधिकार गृहस्थांना नाही , असे त्याला बजावून सांगण्यात आले होते . परंतु सागरजवळ ज्ञानाचे भांडार असल्याने ज्ञानपिपासू आरतीबरोबर सरलालाही सागरच्या मुखातून महावाक्याचे निरूपण ऐकावेसे वाटत होतं . म्हणून सरला गावातील एका ओळखीच्या घरी सागरला घेऊन जाते . तिथे त्याची चिंतनी सुरू होते . सागर प्रवचनातून सगुणनिर्गुणाच्या पलीकडे असलेल्या परमेश्वराच्या विविध रूपांचे दर्शन घडवितो . सागर दैनंदिन व्यवहारातील साधीसाधी उदाहरणे देऊन आपला विषय सांगतो . सागरचे प्रवचन ऐकून सरलाही थक्क होते . सागर हा आगळावेगळा महानुभाव होता . संन्याशाची वस्त्रे परिधान करण्याच्या आधीच तो संन्याशी झाला होता . गुरुमंत्र घेण्यापूर्वी तो गुरू झाला . सरला सागरचे खूप कौतुक करते ; त्यामुळे आरतीला अधिकच आनंद होतो . आरती सागरला संसाराकडे वळविण्यासाठी परमार्थ श्रेष्ठ आहेच ; पण संसारही वाईट नाही हा विचार अनेक उदाहरणांसह पटवून सांगते . यासाठी ती छर्दोबा , विठ्ठलपंत कुलकर्णी यांची उदाहरणे देते . विठ्ठलपंत आणि रुक्मिणी कुलकर्णी यांनी संन्यासाची वस्त्र उतरवून संसार केला आणि निवृत्तिनाथ , ज्ञानदेव , सोपान , मुक्ताईला जन्म दिला . आदर्श बापाची भूमिका विठ्ठलपंतांनी पार पाडली . मग संसार मिथ्या कसा ? देहातीत होण्यासाठी देहाचीच गरज आहे . कर्मयोगाचा टप्पा पूर्ण झाल्याशिवाय घेतलेला संन्यास दुःखद आहे . देवाला योगयुक्त संन्यास अभिप्रेत आहे , बालदीक्षा नाही असे सांगून आरती सागरला कैचीत पकडते . सागर हा परमार्थाचा वाटसरू असतो . आपण संसार करावा हा विचार त्याच्या मनाला शिवलेला नसतो . परंतु आरतीला मात्र सागरबरोबर संसार करायचा असल्यामुळे ती सारखी सागरला संसाराचे महत्त्व पटवून सांगते . संसाराशिवाय परमार्थाला अर्थ नाही . ज्याप्रमाणे चिखलाशिवाय कमळाचे सौंदर्य दिसत नाही , त्याप्रमाणे संसाराशिवाय परमार्थात आनंद नाही . परमेश्वर संसारी लोकांना सौख्यपद बहाल करतो . मोक्षाचा पायाच देवाने संसारात घातलेला आहे , असा आरतीचा पक्ष असतो . सागरच्या मनातही आरतीविषयी ओढ असते . एक दिवस आरती सागरच्या चिंतनीला उपस्थित राहू शकत नाही . त्या दिवशी सागर अस्वस्थ होतो . सागरने वैरागीबाबांकडून लवकर उपदेश घ्यावा याकरिता आरती वैरागीबाबांना भेटायला गेलेली असते . सागरनेही संसार करावा याविषयी वैरागीबाबा अनुकूल असतात . वयाच्या ५६ वर्षांनंतर संन्यासदीक्षा घेतली तरी हरकत नाही . संन्यास तारेवरची कसरत आहे . तारुण्यात विकाराचे उठाव असतात . धार्मिक संसार करावा . वासनेला उपासनेकडे न्यावे असे वैरागीबाबाचे मत असते . एके दिवशी सागर गुरुवर्य वैरागीबाबांकडून उपदेश घेण्याचा निश्चय करतो . ब्रह्मविद्येचा अभ्यास करायचा असेल तर तो गुरुमुखाने करायला हवा , पुस्तकाने अभ्यासाची तोंडओळख होईल ; पण ब्रह्मविद्या मंदिराच्या गाभाऱ्यात फिरता येणार नाही . त्यासाठी परंपरेचा घोक घ्यावाच लागेल , असे सागरचे म्हणणे असते . शेवटी सागर वैरागीबाबांकडून उपदेश घेतो . आरतीच्या आनंदाला सीमा राहत नाही . आदर्श गृहस्थाश्रम हेच तिचे स्वप्न असते.आपला विजय झाला असे आरतीला वाटते . सागरला उपदेश देऊन वैरागीबाबा परमेश्वरप्राप्तीसाठी देह क्षेपायाला ढोऱ्या डोंगरात निघून जातात . कधी परत न येण्यासाठी . त्यांच्या वियोगाने सागर अत्यंत दुःखी होतो . त्यालाही परमेश्वरप्राप्तीची अनिवार ओढ लागलेली असते . म्हणून पोथीच्या समारोपाच्या सोहळ्यात तो दीक्षा घेण्याचा निर्णय घेतो . सागरने कालच बैरागीबाबांकडून उपदेश घेतलेला असतो आणि आज संन्यासदीक्षा घेण्याचा तो निर्णय करतो . सागरने अचानक घेतलेल्या निर्णयाने आरतीला प्रचंड धक्का बसतो . आरतीचे सागरसोबत संसार करण्याचे स्वप्न उद्ध्वस्त होते . आजवर ज्याची उपदेश घ्यायची तयारी नव्हती तो एकदम दीक्षा घ्यायला लागल्यामुळे सागरची ही भूमिका सरलालासुद्धा आवडत नाही . सात दिवस चाललेल्या पोथीच्या समारोप सोहळ्यात सागर वैरागीबाबांना निमित्त करून संन्यासदीक्षा स्वीकारण्यासाठी पोथीच्या मंचावर आलेला सागर पाहून आरतीच्या कोमल हृदयावर दुःखाचे पहाड कोसळतात . आरती दीक्ष विरोध करते . आचार्यांनी सागरला दीक्षा देऊ नये यासाठी ती तार्किक विचार सभेपुढे मांडून सागरच्या दीक्षेचा विचारपूर्वक निर्णय घ्यावा अशी ज्ञानपीठाला विनंती करते . सागरच्या दीक्षेत अवरोध निर्माण करणाऱ्या आरतीला तुमचे आणि सागरचे काय नाते आहे ? असा प्रश्न महंत आरतीला विचारतात . ' बुडत्याला वाचवण्यासाठी नातं लागतं का ? ' असा तार्किक प्रतिप्रश्न ती मंचावर उपस्थित आचार्यांना करते . शेवटी सागर आणि माझं नातं गुरु शिष्याचं नातं आहे , सागर हा माझा गुरू आहे , मार्गदर्शक आहे , त्याने मला महावाक्य निरूपित केले असे ती सांगते . गुरु - शिष्याचे नाते सांगून आरती स्वतः अडचणीत येते . गुरु शिष्य सोबत संसार करू शकत नाही . समाज अशा लग्नाला मान्यता देऊ शकत नाही . शेवटी आरती अत्यंत जड अंत : करणाने सागरच्या दीक्षेला अनुमती देते . अत्यंत दुःखमय अशा वातावरणामध्ये सागरचा दीक्षाविधी होतो . दीक्षेनंतर एके दिवशी सागरसुद्धा परमेश्वरप्राप्तीच्या ओढीने ढोऱ्या डोंगरात जातो . आरती कुटुंबासोबत स्वगृही परत येते . तिचे वडील एक सुसंस्कृत स्थळ पाहून आरतीचे लग्न करून देतात . वारकरी कुटुंबातील समीरशी आरतीचे लग्न होते . आरतीही देहाने आणि मनाने समीरला स्वीकारते . आरतीचे सासर हे वारकरी कुटुंब असते . आरती मात्र त्या ठिकाणी आपला महानुभाव धर्म निष्ठेने आचरते . आरती पूजा - अर्चा , पारायण , सूत्रपाठ , लीळाचरित्र , गीतापाठ वाचन इत्यादी सर्व मोठ्या भक्तिभावाने करते . आरतीच्या सासऱ्यांना महानुभावांचा अत्यंत तिरस्कार असतो ; परंतु आरतीने त्यांच्या घरात आणलेला महानुभावांचा आचार , विचार , भक्ती आणि उपासना पाहून त्यांना महानुभाव पंथाविषयी आस्था वाटू लागते . हळूहळू तिचे पती समीर देवपूजा करायला लागतात . एकाच घरात एकीकडे सासरेबुवांचे हरिपाठ तर दुसरीकडे आरतीचे पूजावासाराचे पारायण सुरू असते . आरती संसाराला भोगाकडे न नेता योगाकडे घेऊन जाते . आरतीच्या संसारवेलीवर दोन सुंदर फुले उमलतात . प्रतीक व नीरज ही आरतीची दोन मुले आईच्या संस्कारात चांगलेच परिष्कृत होतात . आरती आपल्या अंतःकरणातील प्रेमाचे शिंपण करून गृहस्थाश्रमात आनंद ओतते . अवघा ससार सुखाचा करते . ' ज्ञानापसी प्रेम उत्तम ' हे सिद्ध करून दाखवते . संसार आणि परमार्थ समांतर रेषेत सुरक्षित ठेवून आरती चालली होती . एकदा आरती आपल्या पती आणि दोन मुलांसोबत जाळीच्या देवाच्या दर्शनाला जाते . त्या ठिकाणी महावाक्यात भेटलेली तिची सरला नावाची जिवाभावाची मैत्रीण भेटते . दोघीही एकमेकींची आस्थेने विचारपूस करतात . सागरचाही विषय निघतो . सागर सध्या कुठे आहे , हे कुणालाच ठाऊक नसते . परंतु वैरागीबाबांनी मात्र ढोऱ्या डोंगरात देह विसर्जित केला ही बातमी सरला आरतीला सांगते . आरती सरलाला आपल्या घरी येण्याचे निमंत्रण देते . एकदा सरला आरतीच्या घरी जाते . आरतीचा सुखी संसार पाहून सरलाला धन्य वाटते . आरतीने मोठ्या श्रद्धेने आणि उपासनेने संसार आणि परमार्थ दोन्ही गोष्टी उत्तमरीत्या सार्थ करून दाखवल्या , याचा सरलाला फार आनंद वाटतो . परमेश्वरप्राप्तीसाठी स्वतःला समर्पित करणाऱ्या महानुभावांची तपोभूमी म्हणजे ढोऱ्या डोंगर आरतीला बघायचा असतो . सरलाच्या नेतृत्वात पती व दोन मुलांसोबत आरती ढोऱ्या डोंगराच्या प्रवासाला निघते . महानुभाव पंथाचे प्रथम आचार्य नागदेव यांचे पुत्र वैराग्यदेव , पंथाचे तृतीय आचार्य परशराम व्यास , अचलमुरारी व्यास , वैद्यदत्तोव्यास या आचार्यश्रेष्ठांसह अनेक महानुभावांनी या डोंगरात परमेश्वरप्राप्तीसाठी स्वतःचा देह क्षेपला होता . अशा मोक्षदायी तपोभूमीचे आरती दर्शन घेते . वैरागीबाबांनीही याच ठिकाणी देह ठेवलेला होता . सागरही मोक्षप्राप्तीसाठी त्याच मार्गावर तर गेला नाही ना ? आरतीचे अव्यक्त मन या डोंगरात सागरचा शोध घेते . डोंगरातील एका कपारीत दगडाखाली एका जागी सर्व ऋतूंत अखंड नामस्मरण करणारा ऋषी सागर तिथे आरतीला दिसतो . अत्यंत कृश शरीर , वाढलेल्या दाढ्यामिशा , डोळे खोल गेलेले होते , हाडांच्या काड्या झालेल्या . सागर मरणाच्या दारात शेवटचे श्वास मोजत होता . सागरला अशा अवस्थेत पाहून आरती व सरला अत्यंत दुःखी होतात . सागर मात्र स्थितप्रज्ञ अवस्थेत ' श्री चांगदेव राऊळ ' या महावाक्याचा जप करीत ध्यानात लीन झालेला असतो . त्याची ध्यानसाधना भंग पावू नये म्हणून सर्वजण अंतरात ' श्री चांगदेव राऊळ ' नामाचे स्मरण करीत सागरपुढे शांत बसतात . काही वेळेनंतर सागरचे डोळे उघडतात . समोर आरती , सरला आणि सर्व कुटुंब दिसते . सागर स्मित करून आरती , सरलाची आस्थेने विचारपूस करतो . आरती जमिनीवर माथा टेकते . सद्गदित होऊन कातर स्वरात सागरला म्हणते , ' सागर ! जिंकलास तू , पण मी हरले नाही . माझ्या विजयात तू सांगितलेल्या ज्ञानाचा सिंहाचा वाटा आहे . आपल्या कुटुंबाचा परिचय ती सागरला करून देते . माझे पती देवमाणूस आहेत . ही माझी दोन मुले आहेत . श्री चांगदेव राऊळ यांच्या ध्वनिस्मरणाने मी यांचा पाळणा हलविला . आरती मुलगा प्रतीकला जवळ बोलावून वैरागीबाबांना ( सागरला ) दंडवत करायला सांगते . तो सागरला दंडवत करतो . आरती सागरला म्हणते , " तू माझं ऐकून उपदेश घेतला , पुन्हा एकवेळ ऐक , प्रतीकला उपदेश दे . " सागर प्रतीकला उपदेश देतो . आरती सागरपुढे हात जोडून प्रायश्चित्त करते . अखंड ब्रह्मचर्य पालन करणाऱ्या महापुरुषाला संसारात ओढण्याचा प्रयत्न केला , त्याबद्दल ती सागरची क्षमा मागते आणि ढसाढसा रडू लागते . सागर म्हणतो , " आरती तू पवित्र आहेस . संसार मोठा आहे . माझ्यासारखे हजारो वैरागी तोच निर्माण करतो . " सागर आरतीला इथून निघून जाण्याची विनंती करतो . “ वीराला वीरमरण हवंसं असतं व वैराग्याला एकांतात मृत्यू हवा असतो . मला करू दे प्रभूचं नामस्मरण . " असे बोलून सागर डोळे मिटतो . ' श्री चांगदेव राऊळ ' नामाचा स्वर त्याच्या रोमारोमांतून घुमू लागतो . आरती , सरला , समीर , प्रतीक सर्वच जड अंत : करणाने सागरचा निरोप घेतात . त्या करुण वातावरणात ' श्री चांगदेव राऊळ ' नामाचा ध्वनी सर्वत्र गुंजत राहतो . अशा अत्यंत दुःखमय वातावरणात कादंबरीचा शेवट होतो .
दुःखाची प्रबळ जाणीव
या कादंबरीत महावाक्यासारखा महान विषय सर्वसामान्य वाचकांच्या ओंजळीमध्ये पडण्याचा आनंद आहे तर दुसरीकडे सागर आणि आरतीच्या वियोगाचे प्रचंड मोठे दुःख आहे . कादंबरीचा शेवट ईश्वरप्राप्तीसाठी हाडाची काडे करणाऱ्या सागरच्या त्यागाची प्रेरणा देणारी असायला हवी होती ; परंतु आरती - सागरच्या नात्यातील दुःखच वाचकाचे डोळे पाणावून सोडतात . कोणताही वाचक जेव्हा या कादंबरीला स्पर्श करतो तेव्हा कादंबरी संपल्यावर त्या कादंबरीच्या आशयद्रव्याशी एकरूप होतो आणि बराच वेळपर्यंत अश्रू ढाळत राहतो . त्याला त्याचे स्वतंत्र अस्तित्व उरत नाही . परमेश्वर हे साध्य प्राप्त करीत असताना साधकाला आपल्या शरीराशी बंड करावे लागते तर ' अवघाची संसार करीन सुखाचा ' या ध्येयप्राप्तीसाठी आरतीला प्रेम आणि भक्ती जवळ करावी लागते . मग अप्राप्त सर्वकाही तिला प्राप्त होत जातात . तिच्या साधनेतील शारीरिक आणि मानसिक अवस्था मानवी शक्तीच्या पलीकडची वाटू लागते . तिच्या एका प्रगल्भ स्वरूपाचे दर्शन घडते . हीच या कादंबरीची फलश्रुती आहे . निरनिराळ्या उदाहरणांनी , कथांनी , उपकथानी पद्याच्या विविध प्रयोगांनी प्रभावी ठरलेली ही महावाक्यात्मक कादंबरी शोकान्त ठरते . लेखकाने अत्यंत अंतर्मुख होऊन जीवनातील नव्यानव्या सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न येथे केला आहे . तत्त्वज्ञान मानवासाठी आहे की मानव तत्त्वज्ञानासाठी , हा परिवर्तनशील विचार लेखक मांडतात . देवाविषयी त्यांच्या मनात अपार श्रद्धा आहे . या श्रद्धेच्या परिघाबाहेर पडण्यासाठी त्यांचे मन धडपडताना दिसते . पाप - पुण्याच्या जाणिवेने धुके बाजुला सारले जातात . जीवनातले वैफल्य कोणते याचा शोध घेतात . विजय काय ? पराभव काय ? हे प्रश्न निर्माण होतात . कोण जिंकला ? सागर की आरती ? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो . सागर जिवाला दुःख देऊन परमपदाच्या मार्गी लागतो तर आरती जीवांना सुख देऊन परमपदाचे बळ प्राप्त करून घेते . जे साधनेने वैराग्याला प्राप्त होते तेच सदाचाराने गृहस्थाला प्राप्त होते . परमार्थ असो वा संसार तेथे नीतीचे पद ढळत नाही तेथेच खऱ्या अर्थाने धर्म स्थिर होतो . आरतीने ते सिद्ध करून दाखविले असते . त्यामुळे ती नव्या पिढीसाठी पथप्रदर्शक ठरते . सागर - आरतीसारखे संस्कारित महानुभाव एक होऊ शकले नाही . त्यांच्यातील वियोगाचे दुःख अधिक प्रबळ वाटते .
सागर ही व्यक्तिरेखा
सागर विश्वनाथ पाटील हा या कादंबरीचा नायक आहे . अंदाजे वीस - बावीस वर्षे वयाचा तरुण . देखणा , वर्णाने गोरा असलेला सागर हा ज्या महास्थानी महावाक्याचा प्रथम उद्गार स्वामींच्या श्रीमुखातून बाहेर पडला , त्या सालबर्डी या गावचा महानुभाव कुटुंबातील सात्त्विक मुलगा . तो शांत , संयमी , विनयशील , धार्मिक , हळवा , संवेदनशील स्वभावाचा आहे . उन्मादाच्या वयात त्याच्या हृदयात भक्तीचा स्फोट झाला आहे . लेखकाने सागर या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून संपूर्ण चिंतनीचा पट उभा केला आहे . सागरच्या रूपाने लेखक महावाक्याचे निरूपण करताना दिसतात . सागरचे चिंतनीतील वाक्य न वाक्य लेखकाचे चिंतन आहे . लेखकाने प्रस्तुत कादंबरीत अत्यंत प्रभावीपणे ही व्यक्तिरेखा उभी केली आहे . ब्रह्मविद्येचा प्रकांड पंडित म्हणून , महाज्ञानी , तत्त्वज्ञानी म्हणून सागर या व्यक्तिरेखेत प्रचंड प्राण ओतले आहे . मोक्षमार्गाचा प्रवासी म्हणून सागर वाचकांसाठी अत्यंत आदरणीय ठरतो . प्रेम आणि परमार्थाच्या बांधावर उभा असलेला सागर परमार्थाच्या बाबतीत विलक्षण उंची गाठतो ; परंतु प्रेमाच्या बाबतीत मात्र सागरचे अंतरंग उपेक्षित राहिले . तरुण वयाच्या आणि तरुण मनाच्या सागरच्या अंतःकरणातील प्रेमभावनेला अभिव्यक्त करण्यात लेखक अपशयी ठरले . प्रेम ही निसर्गाने मानवाला बहाल केलेली अद्भुत सनद आहे . ऋषिमुनींपासून परमेश्वरापर्यंत कुणालाही प्रेमापासून अलिप्त राहणे शक्य झाले नाही . मग सागर इतके दिवस आरतीच्या सहवासात राहतो , तिचा कोणताही शब्द खाली पडू देत नाही . तिच्या प्रत्येक शब्दाला होकार देऊन महावाक्याच्या प्रवचनाला येतो . पोथीतील चिंतन सांगतो . एकदा ती आरती चिंतनीला अनुपस्थित असते तेव्हा त्याच्या मनाची अवस्था पाहण्यासारखी असते . हे सागरचे आरतीवरील अबोल प्रेम नाही काय ? खरं म्हणजे आरती आणि सागर यांच्यातील प्रेम हे शारीरिक आकर्षणातील प्रेम नव्हते तर ते भावनिक पातळीवरील प्रेम होते . भावनिक पातळीवर सागर आणि आरती दोन्ही एकरूप झालेले होते . आरतीच्या मनातील सागरविषयीच्या प्रेमभावना लेखकाने मोठ्या खुबीने व्यक्त केल्या . परंतु सागरच्या मनातील आरतीविषयीच्या प्रेमभावना या ठिकाणी व्यक्त झाल्या नाहीत . सागरला संसार आणि परमार्थाच्या सीमेवरचे जगणे जगता आले असते तर या कादंबरीचा शेवट सुखात्मक झाला असता . जीवाच्या त्यागापेक्षा प्रेमाचा त्याग फार कठीण आहे . सागर प्रेमाच्या अवस्थेतून गेला असता तर प्रपंच आणि परमार्थाची खरी कसोटी लागली असती . सागरने आपल्या शरीराला दिलेल्या वेदना , त्याने घेतलेली संन्यासदीक्षा , आरतीसारख्या सात्त्विक मुलीला सागरचे न मिळालेले प्रेम , सागरचे ढोऱ्या डोंगरातील देहविघटन या घटना वाचकांच्या मनाला चटका लावून जातात . कादंबरी वाचल्यानंतर वाचक बराच वेळपर्यंत अश्रू ढळत राहतो . इतके प्रचंड सामर्थ्य या कादंबरीत आहे . यामुळेच या कादंबरीने एक विलक्षण उंची गाठली आहे .
आरती
आरती ही या कादंबरीतील अत्यंत प्रभावी व्यक्तिरेखा आहे . अठरा -वीस वर्षे वयाची डोळस आणि धर्मनिष्ठ तरुणी . महानुभाव पंथावर तिची अगाध निष्ठा आहे . औरंगाबाद येथील अत्यंत धर्मनिष्ठ महानुभाव कुटुंबातील आरतीने अनुग्रह घेतलेला आहे . महानुभाव पंथातील शास्त्र जाण्याची ज्ञानलालसा बाळगणारी आरती चर्चक , जिज्ञासक , चिकित्सक , धर्मचिंतक , तत्त्वज्ञ , विवेकी आणि सद्गुणांची लावण्यमूर्ती आहे . सागर - आरती या दोन्ही मुख्य पात्रांच्या माध्यमातून कादंबरीचा गर्भित विषय साकार होत जातो . लेखकाने या दोन पात्रांच्या भोवती संपूर्ण कथानक गुंफले आहे . आरतीच्या निसर्गदत्त प्रेमभावना सहज मोकळ्या झाल्या आहेत ; परंतु लेखकाने या प्रेमभावनांना कुठेही प्रणयाचा वा भोगाचा रंग दिला नाही . त्यामुळे आरतीचे प्रेम विलक्षण उंची गाठते . प्रेमवैफल्यानंतरही सुखाचा संसार करणारी आरती ही व्यक्तिरेखा वाचकांच्या अंतःकरणात कायमची घर करून राहते . लेखकाने या व्यक्तिरेखेतून संसाराचे केलेले उदात्तीकरण विलक्षण आहे . धर्म हा केवळ मोक्षप्राप्तीचा मार्ग नसून मानवी जीवन संस्कारित करणारा समृद्धिमार्ग आहे ही जाणीव आरती या व्यक्तिरेखेतून प्रकट होते . संसार म्हणजे मोह नाही , भोग नाही तर त्याग आहे , साधना आहे , हा विचार लेखक वाचकांपुढे मांडतात . आरतीच्या व्यक्तिरेखेतून लेखकाने संसाराचे केलेले उदात्तीकरण अत्यंत मार्मिक आणि मूलभूत स्वरूपाचे आहे . संसार हा पापमूलक नसून पुण्यकर्म आहे ही आरतीची विचारसरणी सागरच्या तत्त्वज्ञानापेक्षाही मोठी वाटते .*
वैरागीबाबा
लेखकाने वैरागीबाबा ही व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारलेली आहे . या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून या कादंबरीचा परीघ अधिक विस्तारत जातो . वैरागीबाबा हे पूर्वाश्रमीचे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असतात . प्राचार्य म्हणून ते नामांकित महाविद्यालयातून निवृत्त झालेले असतात . सागर हा त्यांच्याच महाविद्यालयातील विद्यार्थी असतो . त्यांनी सागरला तत्त्वज्ञानाचे आणि महावाक्याचे धडे दिलेले असतात . अतिशय प्रेमळ , समजदार , आचारनिष्ठ , निर्मोही , संन्यासोत्तर संन्यासी . निवृत्तीनंतर त्यांनी दीक्षा घेतली . परमेश्वरप्राप्तीसाठी अखंड नामस्मरण करीत ढोऱ्या डोंगरामध्ये आपला देह विसर्जित केला . प्रचंड ज्ञान असूनही कुठल्याही सन्मानाची , धनाची अपेक्षा न करणारे , आपल्याजवळ असणारे ज्ञान दुसऱ्यांना सहज देणारे , महानुभावांच्या कर्मकांडात न अडकणारे वैरागीबाबा एक आगळेवेगळे संन्यासी असतात . परमार्थाला आदर्शभूत ठरावी अशी ही व्यक्तिरेखा आहे .*
' झांजर'चे मुख्य प्रयोजन
सकलजीवांसाठी महावाक्याचे निर्वचन हे ' झांजर'चे मुख्य प्रयोजन आहे . महानुभाव पंथामध्ये महावाक्याला सर्वोच्च स्थान आहे . ४० दिवसांचा होणारा हा महावाक्याचा सोहळा म्हणजे महानुभाव पंथीयांसाठी ज्ञान आणि भक्तीची पर्वणीच असते . आचार्यांनी सांगावे आणि जनसामान्यांनी ऐकावे अशी महावाक्याची परंपरा आहे . या महावाक्याचा ध्वनी कानावर पडण्यासाठी अनेक पंथीय मंडळी दूरदुरून महावाक्य सोहळ्यात सामील होतात . हा भव्यदिव्य समारोह असतो . भव्य सभामंडप , सुंदर सजावट , विद्युत दिव्यांची रोशनाई , शोभिवंत फुलझाडांनी नटलेला परिसर , त्यात पाण्याच्या कारंजाची आणखी भर असे हे डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य तेथे असते . हा सोहळा म्हणजे महानुभाव आचार्य , महंत , साधुसंत , वासनिकांसाठी एकप्रकारचा दिवाळी - दसराच . सव्वा महिन्याच्या या समारोहामध्ये पैशाचा आणि वेळेचा बराच व्यय होतो ; शिवाय सर्व व्यवहार सोडून सव्वा महिना पोथीच्या ठिकाणी राहून महावाक्य ऐकणे गृहस्थाश्रमीयांसाठी तारेवरची कसरत असते . ४० दिवसांचा महावाक्याचा कार्यक्रम सात दिवसांमध्ये बसवून संपूर्ण महावाक्य सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हावे , या उद्देशाने कादंबरीचे लेखक बाभूळगावकरबाबा यांनी ' चिंतनी ' नावाचा सात दिवसांचा नवीन उपक्रम राबवलेला आहे.पंथीय परंपरेला फाटा फोडणारा हा उपक्रम वाटेल ; पण पंथाच्या अस्मितेला धक्का न लागू देता जनतेचा विचार करून राबविलेला हा स्तुत्य उपक्रम आहे . पंथात आतापर्यंत कोणीही अशा प्रकारचे धाडस केले नाही . सात दिवसांत महावाक्यातील प्रत्येक तत्त्वाचे निरूपण करून सर्वहारा जनतेच्या ओंजळीत महावाक्याचे ज्ञानामृत देणारा हा नवीन उपक्रम म्हणजे चिंतनी होय . ' झांजर ' ही चिंतनी आहे . “ लोकांच्या मनात महावाक्याची जी भीती आहे ती अशा सादरीकरणाने पूर्ण निघून जाईल . कदाचित शेवटच्या टप्प्यापर्यंत हा विषय पोहचणार नाही पण मधल्या वर्गाला नक्कीच कळेल . ४० दिवसांचा वेळ वाचेल . फक्त सातच दिवसांत तो विषय जिज्ञासूंच्या पदरी पडेल . खर्चातही बचत होईल . " हा उद्देश बाबांनी कादंबरीत स्पष्ट केला आहे .
शतकांच्या महानुभाव परंपरेला बसलेली झांजर
कादंबरीतील नायक सागर हा उपदेश न घेतलेला मुलगा महावाक्यावर यथासांग बोलतो . ही महानुभाव पंथातील क्रांतिकारी घटना आहे . महावाक्यावर बोलणे सोडा ; पण महावाक्याचा एखादा शब्द जरी कानावर पाडून घ्यायचा असेल , तर आधी उपदेश घेतला पाहिजे असे सांगणारी महंत मंडळी आणि या कादंबरीतील नायक यामध्ये अफाट अंतर आहे .आजवर लिपीच्या कुलपात बंद करून ठेवलेले शास्त्र महानुभावीय पूर्वज कोणाच्या हाती त्याची परीक्षा घेतल्याशिवाय देत नव्हते . परंतु सागर हा उपदेश न घेतलेला एक मुलगा संपूर्ण महावाक्य सांगतो ही महानुभाव परंपरेला फार मोठी लागलेली झांजर आहे . आचार्यप्रवर महंतांनी महावाक्याचे निरूपण करायचे आणि भाविकांनी ते ऐकायचे असाच सोहळा गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आला आहे ; परंतु चिंतनीच्या ज्ञानपीठावर मात्र माणिक मावशी नावाची साध्वी महावाक्याचे निरूपण करते . जुन्या पठडीतील महानुभाव महंतांना न पटणारी बाब या ठिकाणी घडते . ही महानुभाव पंथातील एक क्रांतिकारी घटना आहे . स्वामींनी महिलांना समान अधिकार दिला ; परंतु महंतांनी मात्र त्यांना उपेक्षितच ठेवले , असा आरोप करून मार्गातील विदारक वास्तव लेखकाने वाचकांपुढे मांडले . महानुभाव पंथात रूढिप्रिय लोकांच्या दहशतीखाली साध्वी जगतात . महंतीपासून त्यांना लांब ठेवले जाते . स्वामींनी दिलेले स्वातंत्र्याचे हक्क महंतांनी आपल्या फेट्यात गुंडाळून ठेवले . चिंतनीमध्ये प्रवाचक निवडताना फक्त त्यांच्यातील गुणवत्तेचा विचार केला जातो . त्यांचे वय , पैसा या बाबी बाजूला सारून फक्त त्यांना विद्वत्तेच्या कसोटीवर त्यांना निवडले जाते .अशा प्रकारे विद्वत्तेची पूजा बांधणारा चिंतनी हा महानुभाव पंथातील उपक्रम आहे हा विचारही पंथातील पितळ उघडे करणारा आहे . कादंबरीची नायिका आरती उपदेशी नसलेल्या सागराला गुरू करते . खरे म्हणजे महानुभाव आश्रमामध्ये गृहस्थ मुले शिष्य म्हणून आणली जातात . मात्र आरतीने एका गृहस्थ मुलाला चक्क गुरू करून घेतले ही पंथातील परंपरेला धक्का देणारी घटना . विभूतिपूजेला नाकारून परमेश्वर भक्तीसाठी बाह्य गोष्टींपेक्षा मनाच्या शुद्धतेवर भर दिलेला आहे . धर्मातील चालीरीती मोडण्यासाठी त्यांनी धर्मात राहूनच बंड केले . ज्यांची जमिनीवर बसण्याची तयारी नाही व खुर्चीवर बसायची लायकी नाही , अशा लोकांचा विचार करायचा नसतो , असे लेखक ठणकावून सांगतात . कोण जवळचा आहे , कोण कामाचा आहे , गरिबांना टाळणे , धनिकांना सांभाळणे असा भेदभाव पाळू नये अशी समज दिली आहे .या कादंबरीतून लेखक बालदीक्षेला विरोध करतात . काही दडपणामुळे , काही उपकारामुळे , काही भावनेच्या आहारी गेलेली मुले दीक्षा घेण्यास तयार असतात . अशांना दीक्षा न देता वय , शिक्षण , संस्काराचे निकष लावूनच दीक्षेचे नियम तयार करायला हवेत . पंथीय विद्वानांनी एकत्र बसून गांभीर्याने यासंदर्भात विचार करायला हवा . हा मार्मिक व मूलभूत विचार लेखक मांडतात . उपदेश घेण्याच्या संदर्भातही लेखकांनी टीका केलेली आहे . कोणीही कोणत्याही संन्याशाकडून नुसता कानमंत्र घेतल्याने उपदेशी होत नाही . उपदेशी व्हायचा असेल तर तो अंत : करणातून झाला पाहिजे . वस्त्राकडे पाहून उपदेश घेण्यापेक्षा ज्ञान , योग्यता पाहून उपदेश घेतला पाहिजे हा विचार ते ठामपणे माडतात . ' झांजर ' कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने महानुभाव परंपरेला प्रचंड हादरे दिलेले आहेत . धर्म हा माणसासाठी असावा की माणूस हा धर्मासाठी असावा याविषयीचे महत्त्वपूर्ण चिंतन त्यांनी प्रकट केले आहे . ' गुरू सांगतात तेच ऐकायचे त्याचे चिंतन करायचे इथे लेखणीला प्रवेश नाही ' या पारंपरिक पंथीय विचाराला लेखकाने तिलांजली दिली . संन्याशी समाजाला त्यागाचा विचार सांगतात आणि स्वतः भौतिक सुखाच्या आहारी गेलेले असतात . संतांनी आपल्या सोयीसाठी तत्त्वज्ञानाला वेगळे आणि व्यवहाराला वेगळे करून ठेवले . पाप पुण्याच्या दडपणामुळे वासनिक वर्ग साधुसंतांवर टीका करत नाहीत . हा विषय अधोरेखित करून लेखकाने पंथातील भीषण विदारक सत्य समाजापुढे उजागर केले आहे .महानुभाव पंथामध्ये उपदेश नसलेल्यांना स्वीकारत नाही . त्यांचा तिरस्कार करतात . त्यांना समजून घेतले जात नाही . स्वामींच्या काळात मात्र असे नव्हते . नरेंद्राने उपदेश घेण्यापूर्वी रुक्मिणी स्वयंवर ' रचले आणि महानुभावांनी मोठ्या भक्तिभावाने तो ग्रंथ स्वीकारला . परंतु कोणी अन्य माणूस जर पंथामध्ये ज्ञान घेण्याचा विचार करीत असेल तर आधी उपदेश घेण्याचे दडपण त्याच्यावर लादले जाते . अन्यथा त्याचा तिरस्कार केला जातो . डॉ . वि भि . कोलते यांनी उपदेश नसतानासुद्धा लीळाचरित्र , गोविंदप्रभूचरित्र याबरोबरच अनेक महानुभाव ग्रंथ संपादित केले . तेव्हा नुसता कानमंत्र घेणे म्हणजे पंथीय असणे का ? हा प्रश्न लेखकाने उपस्थित केला . लेखकाने केलेली ही टीका परंपरावाद्यांच्या जिव्हारी लागणारी आहे . उपदेश नसलेल्या माणसांना धर्म सांगण्याचा , ज्ञान देण्याचा अधिकार नाही हा विचार अविवेकी वाटतो . महानुभाव आचार्यांनी महानुभावांचे साहित्यशास्त्र लिपीच्या कुलपात बंद करून ठेवले ; परंतु गृहस्थ विद्वानांनी ते जनतेपुढे आणले . महानुभाव महंतांनी स्वामींचे तत्त्वज्ञान समाजातील सर्व थरांत पोहचवले नाही . पंथीय परिघातच हे तत्त्वज्ञान हस्तांतरित होत गेले . महंत परिघाच्या बाहेर ज्ञान जाऊ देत नाही , कुणाला पोथी कळू देत नाही असा आरोप या ठिकाणी केला . ' ब्रह्मविद्येचा अधिकार फक्त संन्याशालाच आहे ' , लेखक या विचारांशी सहमत नाहीत . म्हणूनच त्यांनी बाळकृष्ण मस्केभाऊ हे गृहस्थ पाच हजार लोकांना ब्रह्मविद्या शिकवितात . रत्नाकर कुलकर्णी हे गृहस्थ महावाक्य प्रवचन करतात . सागरसारखा उपदेश न घेतलेला महाज्ञानी महावाक्यावर भाष्य करतो . महानुभाव तत्त्वज्ञान लिपीत कोंडले , फेट्यात बांधले त्यामुळेच समाज चांगल्या विचारांना मुकला अशी टीका त्यांनी केली आहे . आजच्या काळात जे ओझे संन्याशाला पेलत नाही ते ओझे उपदेशावर लादले जात आहे . आश्रम , मंदिरात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून घेतल्या जात आहेत . फिल्टरमधून पाणी प्यायले जात आहे . महंत १२०० रुपयांच्या मोबाईलवरून वीस हजार रुपयांच्या मोबाईलपर्यंत पोहचले आहेत . मोटारसायकल वापरणाऱ्या यजमानांच्या घरी महंत चारचाकी वाहनाने भिक्षा मागायला जातात . लग्नात हजर राहून महंत वधूवरांना आशीर्वाद देतात . निषिद्ध असलेल्या तोरणमंडळाचे घर महंत रुक्मिणीस्वयंवराचे पारायण करून पवित्र करतात . हे वास्तव कादंबरी वाचणाऱ्याला अंतर्मुख करून सोडते . लेखकाने वारकरी व महानुभाव एकाच घरात सुखाने नांदताना दाखवलेले आहे ; हा एक अनोखा प्रयोग परंपरेला धक्का देणारा आहे .
चिंतनी व महावाक्याविषयी लेखकाचे चिंतन
' झांजर ' कादंबरीचे लेखक बा.भो. शास्त्री हे महानुभाव चिंतनीचे उद्गाते आहेत . शास्त्री यांनी झांजर कादंबरीमध्ये चिंतनी म्हणजे काय याविषयी प्रतिपादन केलेले आहे . महानुभाव पंथीयांच्या हृदयस्थानी असलेल्या संपूर्ण महावाक्याची सात दिवसांत उपलब्धी म्हणजे चिंतनी होय , असे लेखक सांगतात . चिंतनीचा अर्थ विस्तारपूर्वक सांगताना चिंतनी म्हणजे ग्रहण केलेल्या विचारांचा रवंथ होय . चिंतनी म्हणजे सदाचार आणि सद्विचाराचे आवर्तन . चिंतामुक्त होण्याचा मार्ग होय , असेही त्यांनी सांगितले आहे . चिंतन हे वैयक्तिक असते ; परंतु चिंतनी सामूहिक असते असे त्यांनी म्हटले आहे . महावाक्यासारखा परमपवित्र अमृतमय विषय महानुभाव पंथीयांच्या पदरात टाकण्यासाठी ४० दिवसांची महावाक्याची पोथी आयोजित केली जाते . बऱ्याच महानुभावांना ४० दिवस सहभाग घेऊन महावाक्य ऐकून घेणे शक्य नसते . वर्तमान धकाधकीच्या जीवनात माणूस अत्यंत व्यस्त झालेला आहे संसार आणि रोजगार सांभाळत त्याला धर्माचरण करावे लागते . अशा परिस्थितीत पोथीच्या समारोहात सव्वा महिना उपस्थित राहून महावाक्याचा लाभ घेणे बहुतेकांना शक्य होत नाही . लेखकाने सात दिवसांत महावाक्याचा हा कार्यक्रम बसवून महानुभावासमोर ठेवला . सव्वा महिन्याऐवजी सात दिवसांत होणाऱ्या या महावाक्याच्या उपक्रमाचे लोकांनी मोठ्या आनंदाने स्वागत केले . सात दिवसांत संपूर्ण महावाक्याची उपलब्धी म्हणजे चिंतनी होय . महावाक्य म्हणजे काय हे लेखकाने फार सुंदर सांगितले आहे . प्रत्येक वेदाचे एक एक वाक्य आहे . चार वेदांची चार वाक्ये आहेत . तसा ब्रह्मविद्येचा हे एक महत्त्वाचे वाक्य आहे . त्याला महावाक्य म्हणतात असे बाबांनी सांगितलेले आहे . या वाक्यात सूर्याची ऊर्जा आहे असे ते म्हणतात . महावाक्यातून गीतेचे रहस्य त्यांनी उलगडून दाखविले आहे . सर्वज्ञनिरूपित ब्रह्मविद्याशास्त्र हा महावाक्याचा मूलाधार आहे . यालाच पंथात पोथीचा कार्यक्रम म्हणतात . पोथी ही अधिकरणाची आणि चिंतनी ही विद्यार्थ्यांची अशी नम्रता बाबांनी स्वीकारलेली आहे . " जेथे चारही पदार्थ यथासांग वाखाणिती महावाक्य नाव त्याचे तत्त्ववेत्ते ही म्हणती " अविद्येला छेद देणारी तलवार म्हणजे महावाक्य . महंत दोषाचा नाश आणि महंतगुणांचा विकास म्हणजे महावाक्य होय . लेखकाने काव्यातूनही महावाक्याचा महिमा गायिला आहे . चिंतनी आणि महावाक्यावरील त्यांनी प्रकट केलेले विवेचन सामान्य जनांसाठी प्रेरक असून महावाक्याविषयीची भीती दूर करणारे आहे .
गृहस्थाश्रमाचे उदात्तीकरण
लेखक बा . भो . शास्त्री यांनी ' झांजर ' या कादंबरीच्या माध्यमातून गृहस्थाश्रमाचे उदात्तीकरण केले आहे . महानुभाव पंथामध्ये गृहस्थाश्रमला गौण स्थान आहे . संन्यासाश्रमाला फार वरचे स्थान आहे . अनेक महानुभाव आचार्य महंत आपल्या प्रवचनातून , मार्गदर्शनातून गृहस्थाश्रमाविषयी विखारी टीका करतात . संसाराविषयी बोलताना ते कधीही अनुकूल नसतात . संसार म्हणजे मोहाचे मडके असेच त्यांना वाटते . जे काही वाईट घडते ते सगळे संसारातच घडते असे ते मोठ्या पोटतिडकीने सांगतात . " संसारी लोकांना संसारातून बाहेर काढण्याचा व संन्यासाकडे नेण्याचा मार्ग आम्ही सांगतो , आम्हाला संसाराबाबत विचारू नका " असे मोठ्या अभिमानाने सांगतात , परंतु संन्यास आश्रमासाठी संसाराची गरज पडते हे ते सोयीस्करपणे विसरतात . कुठल्याही महंताने संसाराचे उदात्तीकरण केलेले माझ्या ऐकण्यात , वाचण्यात आलेले नाही . परंतु ' झांजर ' या कादंबरीमध्ये मात्र आरती या पात्राच्या माध्यमातून बाबांनी संसारविषयक मांडलेले विचार संसाराचे , मानवी जीवनाचे उदात्तीकरण करून संसाराला विधायक वळण देणारे आहेत . माणसाच्या मनातील पाप - पुण्याच्या कल्पनांना पुसून काढणारे आहेत . लेखक पुरुषार्थाला ऊर्जास्थान , बलस्थान म्हणतात . गृहस्थाश्रम हा ब्रह्मचर्याश्रम , वानप्रस्थाश्रम , संन्यासाश्रम या सर्व आश्रमांचा आधार आहे . म्हणून संसार हा धर्माचा पाया असून या सोपानावरच संन्यासाच्या कळसाची उभारणी झाली आहे , असे त्यांचे मत आहे . जर संसार नसता तर श्रीचक्रधरस्वामी , तसेच पंथाची निर्मिती झाली नसती . माणसे कारखान्यात तयार होत नाही . सगळ्यांचा जन्म संसारातच होतो . परमेश्वरालाही गर्भ , पतित , दवडणे हे अवतार संसारामुळेच शक्य झाले आहे . महावाक्यसुद्धा संसारामुळे शक्य झाले . संसारात राहून धर्माचरण करता येते हे या कादंबरीची नायिका आरतीने आपल्या कर्तृत्वातून व आचरणातून सिद्ध करून दाखविले . परमार्थ श्रेष्ठ आहे परंतु प्रपंचही वाईट नाही . आरती संसारात राहून परमार्थ सांभाळते तर सागर शरीराला कष्ट देऊन परमेश्वरप्राप्तीसाठी अजूनही धडपडत आहे . कादंबरीकडे धर्मश्रद्धेने न पाहता एक कलाकृती म्हणून पाहिले तर कादंबरीच्या आशयाची खोली वाचकांच्या नजरेस पडते . बडेग्रामच्या महाजनांना निरूपण केलेला गृहस्थाश्रम आत्यंतिक निवृत्तिवाद्यांनी मुद्दाम घाट केलेला आहे असा आक्षेप आहे . सर्वज्ञ नसते तर महावाक्य नसते . याची संपूर्ण शृंखलाच संसार आहे , हा अत्यंत तार्किक विचार लेखकाने आरतीच्या माध्यमातून मांडला आहे . संसारात राहून उत्तम धर्माचरण करता येते हे आरतीच्या रूपाने सिद्ध केलेले आहे . संसार फाटका होऊ शकतो परंतु बाटका असू शकत नाही . कर्मयोगाचा टप्पा पूर्ण केल्याशिवाय घेतलेला संन्यास दुःखदायक आहे म्हणून देवाला योगयुक्त संन्यास अभिप्रेत आहे ; बालदीक्षा नाही , असे लेखक सांगतात . त्यांचे हे विचार समाजहितासाठी अत्यंत उपकारक आहेत . संसारात राहूनही परमपद प्राप्त करता येते या निष्कर्षापर्यंत नेणारे त्यांचे विचार सर्वसामान्य जनतेला फार पटतात . त्यामुळे ही कादंबरी सर्वसामान्यांना आपली वाटते .
वाङ्मयीन मूल्यमापन
महानुभाव तत्त्वज्ञानावरील अक्षर कलाकृती म्हणून ' झांजर ' या कादंबरीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे . अक्षर कलाकृतीला धर्म , पंथ , प्रदेश , प्रांत अशी कशाचीही बंधने नसतात . मानवी जीवनाच्या कोणत्याही पातळीवरील जीवनानुभवाला अभिव्यक्त करण्याचे सामर्थ्य अशा कलाकृतीमध्ये असते . मानवी जीवनातील चिरंतर सत्याचा शोध घेऊन त्या चिरंतन सत्याला प्रतिभेचा स्पर्श होतो तेव्हा अशा अक्षर कलाकृतीचा जन्म होत असतो . लेखकाच्या विलक्षण प्रतिभेने ब्रह्मविद्येच्या अंतराळात शिरून ' झांजर'ची निर्मिती केली . महानुभावांना शिरोधार्य असलेले महावाक्याचे तत्त्वज्ञान त्यांनी सर्वसामान्यांच्या हाती सहज दिले . या कादंबरीला सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञानातून कादंबरीचे स्थान प्राप्त होते . अत्यंत गूढ , अनाकलनीय सामान्यांच्या बुद्धीला न झेपणारा तत्त्वज्ञानाचा विषय कादंबरीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याचे हे असाधारण कार्य बाबांच्या प्रतिभेने सहज शक्य केले आहे . महावाक्यावर एखादी साहित्यकृती जन्माला येऊ शकते , हा विचार कल्पनातीत आहे . परंतु आचार्यप्रवर बा . भो . शास्त्री यांनी महावाक्याशी समरस होऊन , एकजीव होऊन ' झांजर'च्या रूपाने सर्वसामान्य लोकांना ब्रह्मविद्येच्या ज्ञानाची कवाडे उघडी करून दिली . बाबांची अद्भूत बुद्धिमत्ता आणि प्रतिभेमुळेच हे शक्य झाले . बाबा हे महानुभाव तत्त्वज्ञानात्मक कादंबरीचे जनक ठरतात . ही तत्त्वज्ञानात्मक कादंबरी महावाक्याची गुरुकिल्लीच आहे . या कादंबरीतील ब्रह्मविद्येचे निरूपण अद्भूत आहे . या कादंबरीत जीव , देवता , प्रपंच , परमेश्वर या चार पदार्थात सखोल विश्लेषण आहे . लेखकाने अनेक व्यावहारिक उदाहरणे देऊन या चारही पदार्थांचे स्वरूप समजावून सांगितले . याशिवाय प्रकरणवश , प्रकरणसाठ , वचनबंध , लक्षण , सामान्यज्ञान , खंडज्ञान , विशेषज्ञान , टीका , टीकाकार , पक्ष , पक्षकार , टीकाप्रकार , प्रवक्ते , प्रवाचक , भाष्य , महाभाष्य , विद्या , अविद्या , संसार , आनंद , स्वोक्ती , लोकोक्ती , शास्त्रोक्ती , अंतर्योग , बहियोग , पिंडस्थान , विज्ञान ( विपरीत ज्ञान ) , परा - अपरा विद्या , व्यावृत्ती , समवाय , उपादान , विरुद्धभाव . विरुद्धधर्म , संन्यास , दीक्षा , अनुसरण इत्यादीविषयी लेखकाने केलेली चिकित्सा असाधारण आणि अनुपम प्रकाशाची पायवाट दाखविणारी आहे . तत्त्वज्ञ गहन विषय कादंबरीच्या आकृतीबंधात बसविण्यासाठी कादंबरीकाराच्या कल्पकतेची आणि प्रतिभेची जी कसोटी लागते त्या सर्वोच्च पातळीवरील कसोटीचे दर्शन इथे घडते . लेखकाने आध्यात्मिकतेचे श्रेष्ठत्व जपत तत्त्वज्ञानाला सामाजिकतेकडे वळविले आहे . हा एक अनोखा प्रयोग आहे . जीवनाशी सुसंगत आशयसूत्र घट्ट धरून या कादंबरीने नवा अवतार धारण केला आहे . यावरून लेखकाची जीवनदृष्टी स्पष्ट झाली आहे . ही जीवनदृष्टी महानुभाव पंथाला खचितच प्रेरणादायी ठरेल याविषयी दुमत नाही .
भाषाशैली
प्रस्तुत कादंबरीतील भाषा या कादंबरीचे खरे सामर्थ्य आहे.अगदी साध्या , सोप्या , सरळ शब्दांमध्ये महावाक्यासारखा अत्यंत गहन आणि अनाकलनीय विषय लेखकाने वाचकांना समजावून सांगितलेला आहे . कुठल्याही अलंकाराचा हव्यास न बाळगता किंवा कुठल्याही पांडित्याचे प्रदर्शन न करता अत्यंत सहज व्यावहारिक उदाहरणे देऊन , विविध व्यावहारिक रूपके योजून कमीतकमी शब्दांत व वाचकांना सहज कळेल अशा भाषेत विषय विवेचन केले आहेत . कादंबरीतील पानापानांवर अनेक सुविचार आणि सुभाषिते वाचकाला आढळतात . कादंबरीतील प्रत्येक पानातून एक सुविचार , सूत्र बाहेर काढून तो प्रत्येक मनात रुजवावा , आचरणात आणावा , भाषेत वापरावा अशी सूत्रे या कादंबरीमध्ये पदोपदी आहेत . मठामध्ये , मंदिरांमध्ये , शाळेमध्ये , महाविद्यालयामध्ये लिहून ठेवण्याजोगी ही सूत्रे आहेत . नेमक्या शब्दांत जीवनातील तत्त्वज्ञान सांगणारे हे सुविचार पृथगात्म आहेत . भाषाशास्त्र आणि साहित्यशास्त्र या शास्त्रांचा असलेला लेखकाचा सखोल अभ्यास वाचकांच्या लक्षात येतो . शब्द , वाक्य , ध्वनी , मूलध्वनी , शब्दचिकित्सा , अर्थनिर्णय , शब्दांच्या शक्ती , त्यांची योजना या कादंबरीला सुशोभित करते . लेखकाची भाषा जणूकाही मंत्रसिद्धी आहे असे वाटायला लागते . या शब्दमंत्रांनी संपूर्ण कादंबरीचे तंत्र सांभाळून घेतले आहे
उपसंहार
' झांजर ' ही कादंबरी जीवनप्रवाहाबरोबर मार्गक्रमण करणारी आहे . या कादंबरीतील कथानक घडविण्यामागे लेखकाचे अनेक हेतू दिसतात . कादंबरीच्या माध्यमातून महावाक्यासारखा विषय जनसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा लेखकाने प्रयत्न केलेला आहे . कादंबरीत व्यक्त झालेले महावाक्याचे निरूपण लेखकाच्या कल्पकतेची , प्रतिभेची , ज्ञानाची , विचारविवेकाची उच्च पातळीची साक्ष देते . कादंबरीच्या अगदी पहिल्या प्रकरणापासून तर शेवटपर्यंत घडणाऱ्या प्रत्येक घटनेतून समाजाला सुसंगत असा आशय मांडत , अनुरूप अशी भाषा वापरत संपूर्ण निवेदन गतिमान केले आहे . कादंबरीतील प्रारंभ , मध्य आणि अंत या घटकांनी कादंबरीतील उत्कंठा , हुरहुर आणि फलश्रुती व्यक्त करते . लेखकाची जीवनदृष्टी अत्यंत व्यापक आहे . धर्म हा केवळ मोक्षप्राप्तीचा मार्ग नसून मनुष्याच्या संस्काराचा , मानवी जीवन सुखी , समृद्ध करणारा , उन्नत करणारा तो खरा जीवनमार्ग आहे हे त्यांना या कादंबरीच्या माध्यमातून सांगायचे आहे . धर्माच्या नावावर चालणारे पाखंड , कर्मकांड नाकारून धर्माचा परिप्रेक्ष परिष्कृत करण्याचे महत्कार्य त्यांनी केले . यासाठी त्यांनी मोठी जोखीम पत्करली . स्वतः धर्मपरंपरेतील असूनही धर्माकडे त्रयस्थ नजरेने पाहून धर्मातील अशिष्ट गोष्टी वाचकांपुढे विनासंकोच ठेवल्या . धर्माला कर्मकांडातून मुक्त करू पाहणारी मूल्यप्रणाली भक्कमपणे मांडली आहे . कथानकाच्या माध्यमातून परिवर्तनशील विचार मांडणारे परिणामकारक दृश्य वाचकांना पथप्रदर्शित करणारे आहेत . या संपूर्ण कादंबरीला नैतिकतेचा आधार आहे . या कादंबरीतील धर्म आपला वाटतो . या नव्या जाणिवेमुळे वाचक प्रगल्भ होत जातो . धर्ममूल्यतत्त्वांची सामाजिक संदर्भात सांगड घालून स्वतःच्या अनुभवाला व्यापक परिमाण प्राप्त करून दिले आहत . प्रस्तुत कादंबरी परिवर्तनाच्या दिशेने प्रवास करणारी आहे . लेखक पूर्णतः परंपरावादी नाहीत तसेच पूर्णतः परिवर्तनवादीही नाहीत . धर्मात राहून धर्मातील साचलेपण प्रवाही करण्याचे कार्य त्यांनी केले . धर्मकारण आणि समाजकारणाची सांधेजोड त्यांनी केली . संसाराला परमार्थाचा दर्जा दिला . त्यांच्या या विचाराला महानुभाव पंथात तोड नाही.
पूर्व प्रकाशित
तिफन-बा.भो.शास्त्री विशेषांक
केशर गौरवग्रंथ



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा