शेताच्या लीळा-प्रा.इंद्रजित भालेराव

शेताच्या लीळा - प्रा.इन्द्रजित भालेराव ,परभणी


           लीळाचरित्र हा मराठी भाषेतला पहिला ग्रंथ आहे . तो ग्रंथ ज्ञानेश्वरीच्याही आधी बारा वर्षे लिहिला गेलेला आहे हे आता निर्विवादपणे सिद्ध झालेले आहे . चक्रधरस्वामींच्या परलोक गमनानंतर उदास झालेला शिष्यपरिवार चक्रधरांच्या आठवणीवरच जगत होता . त्या सगळ्या आठवणी संकलित करून त्यांचा एक ग्रंथ तयार करावा म्हणजे नंतरच्या अनेक पिढ्यांना तो उपयोगी होईल असा विचार पुढे आला . या सगळ्या आठवणी संकलित करण्याचे काम म्हाइंभटांवर सोपविण्यात आले . हा सगळा शिष्यपरिवार चक्रधरांना ईश्वरी अवतार , पाचवा श्रीकृष्णच समजत असल्यामुळे या त्यांच्या सगळ्या आठवणी म्हणजे ईश्वरी लीळाच . म्हणून त्याना नाव देण्यात आले - लीळाचरित्र . म्हाइंभटांनी महाराष्ट्रभर फिरून , चक्रधरांशी संबंधित सर्व स्थळांना भेटी देऊन , लोकांच्या आठवणी जाग्या करून या सगळ्या लीळा संकलित केल्या . त्यातूनच हा मराठीतला अजोड आणि अद्वितीय ग्रंथ तयार झाला . चक्रधर महाराष्ट्रभर भ्रमण करत होते . त्यामुळे प्रवासाच्या सोईसुविधा नसलेला तो काळ अशा कामासाठी मोठा कठीण होता ; शिवाय ज्यांच्याकडे आठवणी आहेत त्यांना त्यांचे महत्त्व असेलच असे नाही . या अनास्थेला सामोरे जात अत्यंत कष्ट , मेहनत घेऊन आणि संयमाने हे काम करावे लागणार होते . तसे ते म्हाइंभटांनी केले . चक्रधरांनी केलेला संचार हा अत्यंत लहान गावातून शेतीमातीतून केलेला होता . त्यामुळे या ग्रंथाची निर्मितीच मुळात नांगरामागे झालेली आहे . म्हाइंमभट चक्रधरांच्या आठवणी विचारायला जात तेव्हा त्या सांगणारा माणूस रिकामा थोडाच होता . त्याचं शेतातलं काम पडलेलं असायचं . चक्रधरांच्या आठवणी सांगण्यापेक्षा त्याला ते काम जास्त महत्त्वाचं वाटायचं . तो म्हणायचा , मला वेळ नाही . माझा सोन्याचा देहाडा वाया चाललाय . म्हाइंभट म्हणायचे , ठिक आहे तू तुझं काम कर . ते करताना तुला जे आठवेल ते सांग . मी ते लिहून ठेवील . अशा अवघड परिस्थितीत म्हाइंभटांनी हे वाङ्मयीन काम करून ठेवलेलं आहे . मराठी भाषेवर त्याच हे मोठ ऋण आहे . मी जेव्हा लीळाचरित्रातले शेतीचे संदर्भ शोधू लागलो तेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली की या ग्रंथाचे लेखन जरी म्हाइंभटांनी केलेले असले तरी मुळात त्या आठवणी आहेत शेतीमातीतल्या माणसांच्या . त्यामुळे तिथे शेतीचे संदर्भ सतत येतात . एक लीळा तर अशी आहे की , ती वाचताना कृषिकर्माचा अभिमान असणाऱ्या माणसाच्या अंगावर मूठभर मांस चढत . आपल्या शिष्यपरिवारासह प्रवास करताना चक्रधर एकदा एका शेताजवळ थांबले . तिथला शेतकरी नांगर उभा करून जेवत होता . आपल्या एका शिष्याला त्यांनी विचारलं , ' पांडेजी तुम्हाला नांगर हाकता येतो काय ? ' पांडेजी म्हणाले , ' नांगर हाकायला काय ब्रह्मविद्या लागते ? त्यात न येण्यासारखं काय आहे ? ' चक्रधर म्हणाले , ' मग दाखवा बरं आम्हाला नांगर हाकून ! ' पांडेजींनी ठिकय म्हणून आसूड हातात घेतला . बैलांचा कासरा आखडला , रुमणं हातात घेतलं आणि बैलांना चुचकारलं . एक बैल इकडं ओढतोय तर एक तिकडं . नांगर एकदा इकडं पडतोय तर एकदा तिकडं . पितळ उघडं पडू लागलं तेव्हा पांडेजींनी तो नाद सोडून दिला . मग चक्रधरांनी नागदेवाचार्यांना विचारलं , हे तुम्हाला जमेल ? ' नागदेवाचार्य म्हणाले , ' सहज जमेल , कारण तुमच्याकडं येण्यापूर्वी मी हेच काम करायचो . ' चक्रधरस्वामी म्हणाले , ' मग मला एकदा हा नांगर चालवून दाखवा . ' नागदेवाचार्यांनी दोनचार मुरडनं सहज घेऊन दाखवली . चक्रधरस्वामी म्हणाले , ' तुम्ही नांगर ठीक चालवला तरीही तुमचं एक चुकलंय . ' नागदेवाचार्यांनी विचारलं , ' काय चुकलं ? ' ' तुम्हाला वरंबा फोडता आला नाही . मग चक्रधरस्वामींनी डोक्याला उपरणं गुंडाळलं . धोतर कमरेला खोवलं . आंगड्याच्या बाह्या सारल्या . आसूड हातात घेतला . रुमण्याजवळ कासरा आखडून धरला आणि बैल हाकारले . वरंबा फोडत त्यांनी एका दोरीत तास काढून दाखवले . चक्रधरांचं हे नेटकं नांगर हाकणं पाहून तो शेतकरी म्हणाला , ' तू तर आमचाही बाप निघालास की . या नांगराशी झोंबत आमचा जन्म गेला पण आम्हाला कधी असा नांगर हाकता आला नाही . धन्य आहे तुझी . ' आश्चर्यचकित झालेल्या आपल्या शिष्यांना आणि त्या शेतकऱ्याला चक्रधरांनी एक दृष्टांत सांगितला तो असा : एक जण तलवारीच्या पात्यावरून चालण्याचा खेळ खेळत असे . अंग चोरून आणि बुद्धीचे कौशल्य वापरून तो हा जीवघेणा खेळ खेळत असे . ज्याच्याजवळ ही अंग चोरण्याची कला नाही आणि बुद्धीचे कौशल्य नाही तो नक्कीच चिरला जाईल . नांगर हाकणं ही अशी तलवारीच्या धारेवरून चालण्याची कला आहे .बरेच जण शेती करणं हे अगड - बगड काम समजतात . त्यासाठी कौशल्याची गरज नाही असं त्यांना वाटतं . त्यांच्यासाठी पांडेजींच्या रूपानं चक्रधरांनी त्यांच्यासमोर एक धडाच ठेवलेला आहे . नांगर हाकायला काय ब्रह्मविद्या लागते काय असा तुच्छतावादी प्रश्न विचारणाऱ्या पांडेजींना चक्रधरांनी हे दाखवून दिलं की नांगर हाकायलादेखील एक विद्या लागते आणि ती विद्या ब्रह्मविद्येइतकीच महत्त्वाची आहे . शेतकामाला ब्रह्मविद्येच्या बरोबरीला बसवणाऱ्या चक्रधरांच्या मनात कृषिकर्म करणाऱ्याविषयी काय भाव होता हे सहज लक्षात येते . या कामासाठी चक्रधरांनी दिलेला तलवारीच्या धारेवरून चालण्याचा दृष्टांत आजही किती समर्पक वाटतो ते आजच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिल्या की आपल्या लक्षात येते . शेती करणं हेदेखील एक असीधाराव्रतच आहे हे इथे चक्रधरांना आवर्जून सांगायचे आहे . शेती हे संयमाची अपेक्षा करणारे , खूप कौशल्याचे आणि अत्यंत महत्त्वाचे काम आहे हे इथे चक्रधरांनी आपल्या मनावर बिंबवले आहे . शेतीविषयी इतकी आत्मीयता आध्यात्मिक पुरुषांमध्ये क्वचितच पाहावयाला मिळते . लीळाचरित्रातल्या अनेक लीळांमधून चक्रधर कृषिकर्माशी एकरूप झाल्याचे आपणाला दिसून येते . अगदी सुरुवातीच्या काळात नांदेड परिसरात घडलेल्या काही लीळांतून चक्रधर गुराख्यांशी एकरूप होऊन खेळ खेळल्याच्या आठवणी आहेत . लिंबगाव येथील गोपाळवाडीतल्या या आठवणी मोठ्या रम्य आहेत . ते गुराख्यांशी खेळलेले आहेत . त्यांच्यासोबत जेवलेले आहेत आणि त्यांना पोहण्यातून त्यांनी योगविद्याही शिकवलेली आहे . नांदेडला तर त्यांनी अनेक महिने एका ब्राह्मणाकडं गुरं राखण्याचं कामही केलेलं आहे . चक्रधर भिक्षा मागायला गेले तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला की , इतका हट्टाकट्टा आहेस तर भीक का मागतोस , माझी गुरं राख . मी तुला कायमचा जेवू घालीन . चक्रधरांनी लगेच त्याची गुरं राखायला सुरुवात केली . अनेक दिवस गुरं राखल्यावर जेव्हा त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं की हा भिकारी नसून हा तर एक दैवी पुरुष आहे . तेव्हा चक्रधरांनी आणखी काही लचांड पाठीमागं लागू नये म्हणून तेथून पळ काढला . एकदा तर ते उकिरड्यातच झोपले आणि सकाळी बायांनी अंधारात राख आणून त्यांच्या अंगावर टाकली . तेव्हा त्या गरम राखेनं आणखीच उबदार वाटून ते गाढ झोपले आणि घोरू लागले . बाया म्हणाल्या , उकिरडा घोरतो आहे . नंतर चक्रधर उठून चालायला लागले तर बाया म्हणाल्या उकिरडा व्याला . चक्रधरांची भ्रमंती प्रामुख्याने रानावनातूनच होत असल्यामुळे त्यांचा सतत गुराख्यांशी संबंध येत असे . एकदा त्यांना रोज भेटणारा आणि त्यांचा खूप लळा लागलेला गुराखी आजारी पडतो . त्याला खूप ताप येतो . त्याला आई आणि आईला ते एकुलते एक असतात . त्यामुळं त्याची आई घाबरून जाते . त्याच्यासाठी काही तरी करण्याची चक्रधरांना विनंती करते . चक्रधर त्यांच्या पांघरुणात जातात . त्याचा ताप आपल्या अंगावर घेतात . त्याला पूर्ण बरा करतात . त्याच्या आईची चिंता दूर करतात . ज्याला आपला लळा लागलेला आहे त्याचे दुःखही चक्रधर पूर्णपणे आपलेसे करतात . गुराख्याविषयी त्यांना वाटणारी आत्मीयता प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करतात . एकदा ते गुराख्यांशी कापडविक्रीचा खेळ खेळतात . गुराखी म्हणतात , आमच्याजवळ पैसे नाहीत तेव्हा आम्ही तुमचे ग्राहक कसे व्हावे ? चक्रधर म्हणतात , तुम्ही धामोके आणि चिंचोक्याचे पैसे करा . चक्रधर त्यांच्याजवळच्या कापडाच्या चिंध्या करून त्याच्या घड्या करतात . आणि तो खेळ खेळतात . पुन्हा धामोके - चिंचोके परत करून त्यांच्याकडून चिंच्या परत घेतात . एकेका चिंधीत गोफणसारखं ढेकूळ घालून फिरवतात आणि ' झा भोरड्या ' म्हणून पाखरं हाकरतात . आणखी एकदा चांदण्या रात्री चक्रधरांना हा ' झा भोरड्यां'चा खेळ खेळल्याचा उल्लेख एका लीळेत येतो . एका लीळेत चक्रधर बाईसांना गुराख्याच्या जेवणाची म्हणजे गोपाळभोजनाची नक्कल करून दाखवतात . तो कसा चवड्यावर बसून , हातात भाकरी घेऊन , अवतीभोवतीच्या आपल्या गुराख्याकडं पाहात जेवतो . ते सोंग हुबेहूब करून दाखवतात . एकेकाळी त्यांनी स्वतः गुरं राखली होती म्हणून आणि त्यांनी फार जवळून आत्मीयतेनं गुराख्याचं निरीक्षण केलं होतं म्हणून त्यांना ही गोष्ट जमून गेली . त्यांच्या मनावर गुराख्यांचे प्रतिबिंब पक्के ठसलेले होते असाही त्याचा अर्थ आपणाला घेता येईल . एकदा बाईसाला गुराख्याचं महत्त्व सांगताना चक्रधर सांगतात गुराखी बिचारा सकाळीच उठून गुरांसोबत शेतात जातो . दिवसभर त्यांच्यामागं धावाधाव करतो . थकतो , श्रमतो . संध्याकाळी घरी आला की जेवतो आणि गाढ झोपी जातो . शेतात जातो . सतत निरागस निसर्गाच्या सान्निध्यात राहतो . त्यामुळे तो निरागस निष्पाप राहतो . गावातल्या बारा भानगडींशी त्याचा संबंध येत नाही . म्हणून चक्रधरांना गुराखी फार आवडतात . चक्रधरांनी सांताबाईसांना बोरी - बाभळीला पाणी घालायला लावून त्यांच्या पापाचे परिमार्जन केले . ते म्हणाले , ' बाई तुम्ही हे बोरी बाबळी शिंपा : मा तुमचीया साता जनमाचेया कर्माचे एथौनी हस्तउदक घेई जैल . एका लीळेत चक्रधरांनी धांदूल मोक्षाची कथा मोठी रंजक करून सांगितलेली आहे . एका शेतकऱ्याच्या शेतात रोज एक जनावर चरून जात असे . त्यामुळं त्याचं अतोनात नुकसान होऊ लागलं . पण ते जनावर सापडत नव्हतं . म्हणून त्यांनी रात्री पाळत ठेवून त्याला पकडलं . तो शेपटीला धरून त्याला काठीनं मारू लागला . तेवढ्यात विमानासारखं ते जनावर उडालं आणि स्वर्गात गेलं . तो इंद्राचा ऐरावत होता . पण शेतकऱ्याला त्याच्याशी काय देणं - घेणं . त्यानं इंद्राला जाब विचारला , हे तुझं म्हसरू कित्येक दिवसांपासून माझं पीक खातंय ते पुन्हा सकाळी उठून पहाटेच नुकसान कोण भरून देणार ? इंद्र त्याला अमाप संपत्ती देतो . तो खाली आल्यावर त्याची श्रीमंती पाहून लोक त्याला विचारतात . तर तो त्या म्हसराची गोष्ट सांगतो . लोक त्याच्या मागं लागून म्हसराचं शेपूट धरून वर जाण्यासाठी रांगा लावतात . उत्सुकतेनं लोक विचारतात , किती सोनं मिळेल आम्हाला . तो धांदूल नावाचा शेतकरी शेपटीचा हात सोडून सोन्याचा आकार सांगतो आणि सगळीच्या सगळी रांग जमिनीवर येते . ही कथा अर्थातच कल्पित आहे . दृष्टांत म्हणून ती सांगितली आहे . पण तरीही श्रीमंताचं असलं तरी ते गुरच आहे आणि माझं नुकसान करतंय ही शेतकऱ्याची भावना वास्तव आहे . एका लीळेत चक्रधरांनी असंही निरीक्षण नोंदविलं आहे की , शेतकरी सुखी झाला , श्रीमंत झाला तर तो आळशी होतो . चक्रधर म्हणतात , ' तो तुभातें जेऊ लागला : तांबोळे घेऊ लागला : शेताकडे जाईना : ' शेतातल्या भाऊबंदकीच्या भांडणाला कंटाळलेल्या एका शेतकऱ्याची साधी इच्छा आहे की , म्हातारपणी मी गोठ्याच्या कोपऱ्यात पडून राहील . माझ्या सुनांनी मला घोटभर आंबील द्यावी . एका मुलीला सासरी नेऊन सोडण्याच्या वेळी तिचे नातेवाईक म्हणतात , ' जाल कैसी : आमची वाफधाईल : गहूवाची पेरणी : आम्ही आराओ ना : पेरणीचे दिवस निघून गेले आणि पीक नाही आलं तर पुढे जगावं कसं हा प्रश्नच असतो . त्यामुळे पेरणीला शेतकरी घातवेळ म्हणतो . ती टळली तर सोन्याचा देहाडा वाया जाणार म्हणून अशा वेळी शेतकरी कठोर होत असतो हे आपणा सर्वांनाच माहीत आहे . म्हणूनच ज्ञानेश्वरांनीदेखील ऐशी कुणबीयाची स्थिती , मढे झाकीती पेरणीशी ' असे लिहून ठेवलेले आहे . लीळेतील वरील शेतकऱ्याच्या उद्गारातही हाच अर्थ दडलेला आहे . शेतीच्या संदर्भात आलेले लीळाचरित्रातले अनेक शब्द मराठवाड्यात त्याच रूपात अजूनही पाहायला मिळतात . वरील उद्गारात आलेला ' वाफधावन ' हा शब्द आजही इकडे जसाच्या तसा पाहायला मिळतो . पेरणी संपल्यानंतर शेवटच्या तासाला तिफण उभी करून तिफणीची , पाच ढेकळांची पूजा केली जाते . तिफण भरणाऱ्या सुताराला , तिफणीसाठी नाडा देणाऱ्या मांगाला अहेर दिला जातो त्यावेळी पेरणीला उपयोगी पडणाऱ्या सर्वांना जेवण दिलं जातं . त्यात प्रामुख्यानं भरडलेल्या दाण्याच्या कण्या आणि फोडणीचं वरण असतं . आजही या सर्व विधीला इकडे वाफधावन असेच म्हणतात . महानुभावांचा आचारधर्म तसा फार कडक अहिंसावादी आहे . अगदी जैन धर्मासारखा . त्यांच्या आचारधर्मात शेती करणे बसत नाही ; कारण चक्रधरस्वामी म्हणतात , ' तुमचेनी मुंगीही रांड न होआवी : ' चालताना तुमच्या पायाखाली नर मेला तर त्यामुळे मादीमुंगी विधवा होईल . तेव्हा प्रत्येक पाऊल जपून टाका . गवताचं पातंही चिरडू देऊ नका . कोणतंही झाड उपडू नका . त्यामुळेही जीवहत्या होत असते . अशा परिस्थितीत शेती करणे कसे शक्य आहे ? परंतु हा सगळा आचारधर्म संन्यासाश्रमासाठी आहे . गृहस्थाश्रमासाठी नाही . म्हणून तर चक्रधरांनी कृषिधर्म तुच्छ मानले नाही . त्याचा गौरव केला . कृषिविद्या ही ब्रह्मविद्येइतकीच महत्त्वाची मानली . तमीळ संतकवी तिरूवल्लूवर यांनी म्हटल्याप्रमाणे सर्वस्वाचा परित्याग करून ईश्वरापाठी लागलेल्या साधकाला खायला मिळाले नाही तर त्याला आधी बळीराजाच आठवेल . हे तत्त्व चक्रधरस्वामी यांनाही मान्य होते , हे आपणाला मान्य करावेच लागेल . एका लीळेत द्राक्षाच्या शेताचा उल्लेख आलेला आहे . कन्नडला एका ब्राह्मणाच्या शेतात द्राक्षाचे घोस पाहून चक्रधर त्याला हात लावून पाहतात . तेव्हा तो ब्राह्मण त्यांना द्राक्ष काढून त्यात साखर टाकून खायला देतो . यावरून तेव्हाही द्राक्ष होते आणि ते साखर टाकून खात असत म्हणजे ते आंबट असावेत असे आपल्या लक्षात येते . एका लीळेत उंबराच्या फळांचा उल्लेख सापडतो . एका गावाहून दुसऱ्या गावाला जाताना उंबराच्या झाडाखाली फळांचा सडा पडलेला असतो . सर्वांना भुकाही लागलेल्या असतात . तेव्हा ती उंबराची गोड फळं सर्वजण मिळून पोटभर खातात . चक्रधरांचा भाईदेव नावाचा लहानगा भक्त शबरीसारखी उष्टी केलेली गोड आहेत की नाही ते पाहण्यासाठी खाऊन पाहिलेली बोरं घेऊन येतो आणि चक्रधरांना अर्पण करतो . तेव्हा बाईसा त्याला रागावते . परंतु हे सगळं कळण्याचं त्याचं वय नाही असं सांगून त्यानं आणलेल्या उष्ट्या बोरांची चक्रधर बाईसाला भाजी करायला सांगतात . तेव्हा बोरांचीही भाजी करीत असावेत अशी नवीच माहिती या लीळेतून आपल्यापुढे येते . बांभूळशेंगा जेवल्याचादेखील एक नवखाच उल्लेख एका लीळेत येतो ; कारण अलीकडे आपण कधी बाभूळशेंगा खात नाही . कदाचित ते एखाद्या पदार्थाचेही नाव असेल . आंब्याचे उल्लेखही अनेक ठिकाणी पाहायला मिळतात . एकदा चक्रधर एका आंब्याच्या झाडाखाली झोपले असताना त्यांच्या तोंडापर्यंत आंबे लोंबलेले होते . चक्रधरांनी त्यांचे तसेच सेवनही केलेले आहे . आंबा हे सर्वश्रेष्ठ फळ आहे याचे निरूपणही चक्रधर एका लीळेत करतात . चक्रधरांना आंबा खूप आवडत असावा ; कारण त्यांनी आनंदानं आंबे खाल्ल्याचा उल्लेख अनेक लीळांमधून येतो . संसारमोचक नावाच्या एका विचित्र आंब्याची माहितीदेखील एका लीळेत येते . आपल्याकडे शेतातल्या प्रत्येक आंब्याची चव , आकार , रंग वेगळाले असतात . त्यावरून त्याला आपण वेगळाली नावेही देतो ; पण हा संसारमोचक आंबा मात्र वेगळाच आहे . सगळ्या झाडांचे आंबे उतरूनही मालक त्या झाडाला हात लावत नाही . पाखरंही त्या झाडाकडं फिरकत नाहीत . म्हणून बाईसा शेतमालकाला विचारते तेव्हा चक्रधरच तिला माहिती सांगतात की , हा आंबा खाल्ली की आपली आपोआपच संसारातून मुक्ती होते . बाईसाला आश्चर्य वाटते . हा आंबा खाल्ला की माणूस मरतो . म्हणून तर पाखरंही त्याला तोंड लावत नाहीत ? बाईसा विचारतात मग या आंब्याचं काय करतात ? हे झाड तोडून का टाकत नाहीत ? त्याला वर्षभर मिठात ठेवलं तर त्याचं छान लोणचं होतं , अशी माहितीदेखील चक्रधर स्वतःच पुरवतात . हरभऱ्याच्या भाजीचे आणि भाताचे अनेक प्रकार लीळाचरित्रात पाहायला मिळतात . पाणीभात , साखरभात , दहीभात , बोणेभात आणि अगदी गोंड आदिवासींनी पोकळ बांबूत वाफाळलेला भातही इथे पहायला मिळतो . हरभऱ्याची भाजी तर कितीतरी प्रकारे करता येते . लीळाचरित्रात सांगितलेले हरभऱ्याच्या भाजीचे हे सर्व प्रकार अगदी त्याच नावाने मराठवाड्यात अजूनही पाहावयास मिळतात . आंबेवर आलेल्या कोवळ्या हरभऱ्यांच्या पानांची भाजी चक्रधरांना फार आवडत असावे ; कारण तीन लीळांत तिचे तीन प्रकार पाहायला मिळतात . एका लीळेत कच्ची भाजी , अद्रक , मिरी , मीठ , मिरची एकत्र करून तयार केलेला घोळाणा येतो . एका लीळेत याच भाजीचं पिठलं केल्याचा उल्लेख येतो . तर तिसऱ्या लीळेत हीच भाजी फोडणी देऊन खाल्ल्याचा उल्लेख येतो . तीनही ठिकाणी चक्रधरांनी मिटक्या मारत जेवण केल्याचा उल्लेख आहे . पक्व झालेल्या हरभऱ्याचा हिरवा टाहाळही चक्रधर आवडीने खात . वाळलेल्या हरभऱ्याचा कडप भाजून हुळा खाल्ल्याचा उल्लेखही एका ठिकाणी येतो ; शिवाय चण्याची भाजी , हरभऱ्याचं वरण आणि पुरण असे कितीतरी पदार्थ एका हरभऱ्याचे लीळाचरित्रात येतात . जमा केलेला हरभऱ्याचा हुळा भाजण्यासाठी भटोबास बाईसाला विस्तव मागतात . ती नाही म्हणते . म्हणून दूरच्या मंदिरातल्या पणतीचा विस्तव आणून हुळा भाजला जातो . सर्वजण खातात पण नागदेव बाईसाला देत नाहीत . बाईसा मागते तेव्हा नागदेव म्हणतात , माती खा ! बाईसा चक्रधराकडे तक्रार करते तेव्हा चक्रधर म्हणतात , तो तुला थोडी माती खायला सांगतो का ? बाईसा म्हणते , मग काय तुम्ही मला जास्त माती खायला सांगणार आहात काय ? हुळा खाताना सगळेजण एकेक हरभरा तोंडात टाकतात . नागदेव मात्र ओंजळीत हुळा चोळून मूठभर दाणे एकदाच तोंडात टाकतात तेव्हा चक्रधर विनोदाने म्हणतात , भटोबासांचे जाते मोठे आणि बाकीच्यांचे लहान आहे काय ? सर्व लीळांतून चक्रधर यांचा हा विनोदी स्वभाव सतत डोकावत राहतो . रात्रीच्या वेळी ओंब्या भाजून खाल्ल्याचाही उल्लेख आलेला आहे . एकदा चक्रधराला धरून वेठबिगार म्हणून शेतातल्या कामाला घेऊन जातात . नंतर सोडून देतात . एकदा चक्रधर त्र्यंबकेश्वरला असताना गौतमत्रषींची शेती आपल्या भक्तांना दाखवतात . एकूणच लीळाचरित्रातल्या चक्रधरांना शेतशिवाराचा फार फार लळा आहे हेच खरे .


पूर्वप्रकाशीत

केशर गौरवग्रंथ 

अक्षराधारा मासिक


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट