दत्तगड आणि बा.भो.शास्त्री - डॉ. हंसराज जाधव

अनलॉक एक : दत्तगड आणि बा.भो.शास्त्री शेंद्रा एम.आय.डी.सीतून पूढे निघत वरझडीच्या रस्त्याला लागलो की दोन्ही बाजूंनी छोटीमोठी झाडं,झुडपं डोळ्याला दिसायला लागतात.समृद्धी महामार्गाला ओलांडून जाणारा हा रस्ता दत्तगडाच्या ओढीने भरधावपणे निघतो.दत्तगड वरझडी,वडखा,पीरवाडी, गेवराई, बनगाव या पाच गावच्या पंचक्रोशीतल्या शेतकरी,कष्टकर्यांच्या विसाव्याचं हे ठिकाण. दत्तगड डोंगररांगांनी वेढलेलं सुंदर,निसर्गरम्य ठिकाण. गडाच्या पायथ्याला लागून सर्वदूर छान शेती पसरलेली.शेतात केलेली छोटीछोटी शेततळे आणि त्या पाण्यावर तरून आलेली डाळिंब,अद्रक,कापूस,तूर ही हिरवीगार पिके पहाणार्याला ओरबाडून घ्यावीसी वाटतात. बनगाव शिवारतल्या लहूकी नदीवर असणारं तळं दत्तगडावरून निश्चळ दिसते. दत्तगडावर मी पहिल्यांदा आलो ते जालन्याला असताना. आदरणीय बा.भो.शास्त्री बाबांच्या वक्तृत्वाने,कवित्वाने आणि प्रवचनाने मी विद्यार्थीदशेपासूनच प्रभावित होतो. वेगवेगळ्या संतांच्या,महापुरुषांच्या चरित्राचा,कर्तृत्वाचा, त्यांच्या लेखनाचा आपल्या निरुपणात लिलया वापक करत पंथीय श्रोत्यांना वेगळ्या विश्वात घेऊन जाण्याचा बाबांचा हातखंडा सार्यांनाच आवडतो.तो मला न आवडला तर नवलच! त्यांच्या भेटीची ओढ तर होतीच. साधारण २००८ च्या सालातली ही गोष्ट. जालन्यातल्या ‘बारवाले महाविद्यालयात’ मी पस्तीस उमेदवारातून ‘सलेक्ट’ होऊन रूजू झालो होतो.एका विलक्षण उमाळ्यातून मी त्यांना त्यावेळी एक पत्रही पाठवलं होतं.ते पत्र वाचून त्यांनी मला भेटीला बोलवलं होतं. तेव्हा पाहिलेलं आणि आज अनुभवलेलं दत्तगड यात मोठं अंतर दिसलं.जागा तीच,निसर्ग तोच आणि दत्तोबाही तोच! पण बाबांनी दत्तगड स्वकष्टाने उभा केलाय.बाबा सांगत होते, ‘खरं तर इथं काहीच नव्हतं.फक्त डोंगर होता,तोही सुळका नसलेला.वरझडीला एकदा भिक्षेला आल्यानंतर त्या डोंगरानं माझं मन वेधून घेतलं.एका भक्ताला सोबत घेऊन अक्षरश: काटेरी झुडपं वारीत वारीत मी इथे आलो.आणि इथलाच झालो!’ बाबांनी सगळा दत्तगड फिरून दाखवला.गडावरून फिरत वेगवेगळ्या जागा,फळाफुलांची झाडं,येणार्या जाणार्यासाठी बांधलेल्या खोल्या,चिंतन मनन करण्याच्या,स्मरण करण्याच्या एकांताच्या जागा हे सारं अगदी उत्साहाने दाखवत बाबा बोलत होते, ‘खरं सांगायचं तर माझा माणसांपेक्षा निसर्गावर जास्त विश्वास आहे.माणसं बेईमान झालेली मी पाहिलीत, अनुभवलीत.निसर्ग तसं करीत नाही.त्याच्या आश्रयाला जो येतो,त्याला तो कुशीत घेऊन कुरवाळतो. लळा लावतो,दु:ख विसरायला सांगतो. मला दत्तगडानं,या परिसरानं लळा लावलाय….मी प्रवचनाच्या,कार्यक्रमाच्या निमित्ताने फिरतो,माणसं अनुभवतो आणि परत आल्यावर इथल्या निसर्गाच्या सान्निध्यात त्यांना तपासून, पारखून पहातो.तेव्हा आपण सारेच लटके,खुरटे वाटायला लागतो.!’ बाबांनी दत्तगडाच्या चोहोबाजूंनी पसरलेल्या डोंगररांगाकडे बोट दाखवत सांगायला सुरूवात केली, ‘दत्तगडाचं वैशिष्टय असं की,दत्तगड केवळ एकटा उभा नाहीय,त्याच्या चारी बाजूंनी डोंगर आहेत. त्याची नावंही मोठी गमतीशीर आहेत.घारमाळ,महारमाळ, यमदरी, डूक्करदरा,गुंजदरा,लखापती,सासुसुनेची टेकडी, शिवटेकडी,गोरटेकडी,कलावंतीनीचा ओटा…हाँ! हा कलावंतीनीचा ओटा म्हणजे काय? तर जुन्या काळात इथून औरंगाबाद-नागपूर असा बैलगाडीचा रस्ता होता. त्या प्रवाशांना रिझवण्यासाठी कळवातनी याठिकाणी बसायच्या. हा ‘समृद्धी महामार्ग’ त्याच बैलगाडीच्या रस्त्यावरून जातो…ह्या टेकड्यावर आपली नजर स्थिर होते.नजरेला ह्या टेकड्या भटकू देत नाहीत,खिळवून ठेवतात….मला ह्या टेकड्या,हा निसर्ग लिहायला, वाचायला,चिंतन करायला भरीस घालतो…’ बा.भो.शास्त्री बाबा गडाविषयी,निसर्गाविषयी, चक्रधरांविषयी,पंथाविषयी भरभरून बोलत होते.बाबांनी ‘झांजर,मार्गस्थ१,२,लीळावैभव,सभाशास्त्र,आम्हीबी घडलो,तुम्हीबी घडाना,गोत्रज,झोळी’ असे एक नव्हे,दोन नव्हे तर जवळपास पस्तीस ग्रंथांचं लेखन केलंय.त्यात अभंग,स्तोत्र,भजन हे सांप्रदायीक वाङमयप्रकार तर वापरलेच परंतु कथा,कादंबरी,विडंबन,स्फुट,ललित हेही प्रकार अगदी सहजपणे लिहिण्यात वापरले.त्यांच्या ‘झांजर’ या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा वाङमय पुरस्कार मिळाला आहे. बाबांनी दत्तगडाचं,परिसराचं भरभरून वर्णंन करणारी एक दीर्घकविताही लिहिली आहे.यानिमित्ताने महानुभावांच्या स्थलवर्णनपर कवितेच्या परंपरेचा परिचयही आपल्याला होतो.बोलत बोलत बाबा ती कविता त्यांच्या नेहमीच्या शैलीत गायला लागले. “पूर्वदिशेला जलसागर तो आरसा देवाचा । अवतीभवती पहारा असतो पर्वतरांगाचा। सखे गं… सासूसुनेच्या दोन टेकड्या शेजारी दिसल्या । दत्तगडावर सासूसुनाही शेजारी हसल्या । सखे गं… जणू मुंग्यांची रांग लागली दत्तगडावरती । पांचाळेश्वरी रोज होतसे दत्ताची आरती । सखे गं…" दत्तगडावर पंथीय महंतांसोबतच साहित्यीकांची, कीर्तनकारांची ये-जा नेहमी असते. बाबा आमटे,बाबा भांड, इंद्रजीत भालेराव,सतीश बडवे,प्रल्हाद लुलेकर, सदानंद मोरे,ढोक महाराज यांचा सहवास,त्यांची प्रतिभा, मांडणी याविषयी बाबा सांगत होते. दत्तगडावर बाबांनी चिंतनी,प्रवचन या सांप्रदायिक कार्यक्रमांबरोबरच कविता,कथा लेखनाच्या कार्यशाळा, कविसंमेलन असे अनेक कार्यक्रम घेतले आहेत.सुरूवातीच्या काळात त्यांनी सुरू केलेलं ‘कीर्तन महाविद्यालय’ बंद पडल्याची खंत मात्र ते बोलून दाखवतात. बाबांनी लॉकडाऊनच्या काळात ‘स्वयंपाकघर’ हे एक वेगळं पुस्तक आणि ‘केरोनाची सस्तीपरी’ हे स्फुटकाव्य लिहिलंय.सध्या ते वैराग्यमुर्ती दत्ताबापू (हदगाव जि.नांदेड) यांच्यावरील चरित्रपर पुस्तकाचं लेखन करीत आहेत. माझे वडिलांनी शाहीर दामोदर वजीरगावकर यांनी १९९७-९८ मध्ये कै.दत्ताबापूंवर रचलेल्या पोवाड्याचा संदर्भ बाबांना या लेखनासाठी हवा होता. खरेतर या भेटीचे हे निमित्त! लॉकडाऊननं थांबवलेल्या, लांबवलेल्या भेटीगाठी आता सुलभ होताहेत.माझ्या अनलॉक ची सुरूवात दत्तगडाच्या भेटीने झाली हे विशेष!! - डॉ.हंसराज जाधव

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट