श्री चक्रधरस्वामी प्रणीत महानुभाव पंथ डॉ . संगीता चव्हाण पवनी , जि. भंडारा .

श्री चक्रधरस्वामी प्रणीत महानुभाव पंथ डॉ . संगीता चव्हाण पवनी , जि. भंडारा . महाराष्ट्रात प्रामुख्याने पाच भक्तिसंप्रदाय आहेत . नाथ , महानुभाव , वारकरी , दत्त आणि समर्थ . हे संप्रदाय भक्तीचे तत्त्व निरूपण करण्यासाठी निर्माण झाले आहेत . यांची विशिष्ट तत्त्वप्रणाली व आचारसंहिता आहे . त्याकरिता त्यांनी विविध ग्रंथरचनाही केल्या . सगळा समाज भक्तिप्रवण करण्याचा उद्देश या संप्रदाय प्रवर्तकांच्या मनीमानसी होता . बाराव्या शतकाच्या उत्तरर्धात उदयास आलेला महानुभव संप्रदाय अधिक प्रभावशाली होता . आजही या संप्रदायाचे अनुयायी संपूर्ण महाराष्ट्रभर श्रीप्रभूची मूर्ती आठवताना दिसतात . वंशप्रवर्तक चक्रधरस्वामी मराठी भाषेचा कैवार घेणारे होते . सामान्य माणसाला जी भाषा अवगत आहे , त्याच भाषेतून संवाद केल्यास अधिक योग्य ठरते . त्यामुळे चक्रधरस्वामींनी ' महाराष्ट्रीय असावे ' या उद्देशाने मराठी भाषा हेच संवाद माध्यम ठरविले . पुढे नागदेवाचार्यांनीही हाच वारसा चालविला . केशिराजव्यासांना त्यांनी स्पष्ट सांगितले की , " नको गा केशवदेवा : ऐणे माझिया म्हातारिया नागवतील " हा अभिमान मराठी भाषेचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारा निश्चितच आहे . महानुभवा पंथ पूर्णतः द्वैती संप्रदाय आहे . तत्त्वज्ञानात्मक विचार केल्यास असे म्हणता येईल की , जीव , जगत , देवता आणि परमेश्वर या चार वस्तू महानुभावीय मानत असतात . त्यात कुठलीही एकवाक्यता नाही . प्रत्येक वस्तू परस्पर भिन्न आहे . जीवांनी कितीही परमेश्वराची आराधना केली तरी तो परमेश्वर बनू शकत नाही . जीव हा जीवच व परमेश्वर हा परमेश्वरच आहे . जीव बद्धमुक्त आहे . तो कशात बद्ध आहे ? तर अविद्या आणि अज्ञान यामध्ये आहे ; पण तो जीव मुक्त होऊ शकतो . परमेश्वराचे ज्ञान प्राप्त करुन जीव मुक्त होऊ शकतो . जगत ( प्रपंच ) जड आहे . सृष्टिरचनेचे कार्य प्रपंचाच्या मदतीने म्हणजे सत्त्व , रज , तम यांनी मिळून झालेली अष्टधा प्रकृती होय . देवता या अनेक आहेत . त्या नित्य व अनंत आहेत . देवता या नित्यबद्ध आहेत . त्यामुळे मानवाला मोक्षप्राप्तीकरिता त्या असमर्थ आहेत . त्यामुळे सामान्य माणसाने देवतेच्या नादी न लागता परमेश्वराच्या ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करावे ; कारण परमेश्वर सर्वगुणसंपन्न नित्यमुक्त आहे . तोच परमेश्वर हा अनादी नित्य पदार्थ आहे . परमेश्वराचे स्वरूप अनादी , नित्य , अव्यक्त , स्वयंप्रकाशी , सर्वव्यापक , सर्वात्मक असे आहे . या परमेश्वराचे ज्ञान प्राप्त करणे हेच मानवी जीवाचे कर्तव्य आहे.परमेश्वर मानवी जीवांच्या उद्घाराकरिता अवतार धारण करीत असतो . जीवाचे उद्धार करण्याचे व्यसन परमेश्वर आहे . भगवद्गीतेत म्हटले आहे की , “ जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्म बळवला जातो . तेव्हा सज्जनांच्या रक्षणाकरिता व दुर्जनांच्या विनाशाकरिता सर्व अवतार धारण करीत असतो . ' महानुभाव पंथीय चार युगांचे चार अवतार झाले असे मानतात . परमेश्वराने कृतयुगात हंसावतार , त्रेतायुगात दत्तावतार , द्वापारयुगात कृष्णावतार आणि कलियुगात चक्रधरावतार धारण केलेला आहे . महानुभाव पंथाने ' अवतारवाद ' ही संकल्पना स्वीकारली आहे . त्यानुसार परमेश्वराचे पाच प्रमुख अवतार आहेत . १. श्रीकृष्ण चक्रवर्ती , २. दत्तात्रेयप्रभू , ३. श्रीचांगदेवराऊळ , ४ . श्रीगुंडम राऊळ ( श्रीगोविंदप्रभू ) , ५. श्रीचक्रधरस्वामी या पाच प्रमुख अवतारांना ' पंचकृष्ण ' असे म्हणतात . अवतार स्वीकारण्याच्याही तीन पद्धती आहेत . १. गर्भिता अवतार ( श्रीकृष्णावतार ) , २ . दवडण्याचा अवतार ( श्रीगोविंदप्रभू ) , ३. पतित्राचा अवतार ( श्रीचक्रधरस्वामी ) . महानुभाव पंथ मूर्तिपूजक आहे . पण फक्त परमेश्वराच्या स्पर्शाने पावन झालेल्या पाषाणांचीच पूजा केली जाते . त्या पाषाणांना ' विशेष ' म्हटले जाते . महानुभावांचा दत्त व श्रीकृष्ण हे ब्रह्मा , विष्णू , महेश या देवतांचे अवतार नसून प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार आहेत . महानुभावांचा दत्त एकमुख आहे आणि तो पूर्णावतार आहे . या पंथाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की , हा संन्यासमार्गाचाच उपदेशक आहे . हा आचार सगळ्यांनाच शक्य होईलअसे नाही . चित्रीची स्त्रीसुद्धा न पाहावी असा कटाक्ष आहे . महनुभाव पंथाला वेदांबद्दल आदर आहे . पण ते वेदांना प्रमाण मानत नाही . या अर्थाने महानुभाव पंथाला अवैदिक समजले जाते . फक्त श्रीकृष्णाची भगवद्गीता आणि श्रीचक्रधरांची वचने तेवढीच प्रमाण मानतात . या मार्गासी दत्तात्रेयप्रभू आदिकारण , अशी रूढ धारणा आहे . हा परमार्ग म्हणजे परमेश्वराचा मार्ग आहे . चांगदेव राऊळांना वाघाच्या वेशात माहूर या ठिकाणी दत्तात्रेयप्रभूनी दर्शन दिले व अनुग्रह दिला . पुढे चांगदेव राऊळांनी गोविंदप्रभूला व पुढे गोविंदप्रभुंनी चक्रधरस्वामींना अनुग्रह दिला . श्री चांगदेव राऊळांनी आपला विसर्जित करून गुजरात प्रांतात विशालदेव या प्रधानाचा पुत्र हरपाळदेवाच्या मृत शरीरात प्रवेश केला . मृत शरीर सजीव करून नवीन अवतार स्वीकारला . हा नवीन अवतार म्हणजेच पंथप्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी होत . चक्रधरस्वामींचे प्रयाण झाल्यावर पाळली , पोसली भक्तिप्रवण माणसे निराधार झालीत . त्यांना पोरके वाटायला लागले . यावेळी श्रीचक्रधर स्वामींच्या जीवनातील संपूर्ण लीळा संकलित करण्याचे कार्य म्हाइंभट यांनी केले . त्या लीळांची साहयता नागदेवाचार्य यांच्याकडून पडताळून पाहिली . त्या साह्यत्वाचा अंश असलेल्या लीळाच फक्त संग्राह्य मानल्या . ' लीळाचरित्र ' हा ग्रंथ स्मरणभक्तीचा उत्कृष्ट नमुना आहे . ' लीळाचरित्र ' हा ग्रंथ बीजभूत ग्रंथ आहे . महानुभाव पंथाच्या वाङ्मयाचा व तत्त्वज्ञानाचा मूळ ग्रंथ मानला जातो . पुढील सर्व महानुभावीय वाङ्मय या ग्रंथातूनच साकारले आहे . सूत्रपाठ , दृष्टांतपाठ , रत्नमाला स्तोत्र इत्यादी ग्रंथ यातून निर्माण झाले . रूढ अर्थाने हे त्वरित नाही तर त्या लीळा किंवा आठवणी आहेत . म्हणूनच डॉ . वि . भि . कोलते हे लीळाचरित्राला चक्रधरांची दैनंदिनी म्हणतात . चालत्याबोलत्या देवाचे दर्शन या ग्रंथात निश्चितच घडते . म्हाइंभटाने आणखी एका अपूर्व ग्रंथाची निर्मिती केली . त्या ग्रंथाचे नाव ' रिद्धपूर लीळा ' अथवा ' गोविंदप्रभुचरित्र ' होय . गोविंदप्रभू हे महानुभाव पंथातील चौथे परमेश्वरावतार आहे . ' राऊळ वेडे ' राऊळ पिसे परंतु राऊळ माय , राऊळ बाप अशी समाजात धारणा होती . त्यांच्या सर्व चमत्कार कथा , त्यांच्या जीवनातील घटना , त्रिकालज्ञान , संजीवनी विद्या , पंचमहाभूतांवर नियंत्रण , विष निर्जिक करणे , भूमिगत द्रव्य शोधणे , मुक्याला वाचा देणे , अंतरिक्षातून वस्तू आणणे इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण अवतारित्वाच्या साक्ष देणाऱ्या घटना दिसतात . तत्कालीन वहाडी भाषेचे स्वरूप , लोकांचे आचारविचार , सणसमारंभ , व्रतवैकल्ये , स्पृश्यास्पृशय भाव कळून येते . याही ग्रथांची भाषा साधी व सरळ आहे . या गद्यग्रंथाशिवाय काही पद्यग्रंथांनाही महत्त्वपूर्ण स्थान महानुभाव पंथात आहे . ' दृष्टांतपाठ , सूत्रपाठ , मूर्तिप्रकाश , स्थानपोथी , स्मृतिस्थळ , महदंबेचे धवळे ' मातृकी रुक्मिणी स्वयंवर या काव्यरूप ग्रंथांनी महानुभाव पंथाचे समग्र पंथीय विचारच सातीग्रंथ असे म्हटले जाते . भास्करभट्ट बोरीकर यांचा शिशुपालवध हा ग्रंथ , कवीवर यांचा एकाद्यस्कंध , दामोदर पंडित यांचा वच्छाहरण , नरेंद्राचा रुक्मिणी स्वयंवर , विश्वनाथ बाळापूरकर यांचा ज्ञानबोध , खळोव्यास यांचा सह्याद्रिवर्णन , नारोण्यास ऊर्फ नारायण पंडित यांचा रिद्धपूरवर्णन या ग्रंथांचा समावेश हातो . महानुभाव पंथ प्रामुख्याने भक्तिमार्गी पंथ आहे . पंचकृष्णांपुढे शरणागतीचा मंत्र प्रार्थनेच्या वेळी पंथीय लोक म्हणत असतात . सगुण साकार परमेश्वराची उपासना सर्वश्रेष्ठ आहे . त्याच्याशी संबंधित सर्व वस्तू पवित्र व वंदनीय ठरतात . त्यामुळे परमेश्वराच्या मूर्तीचे ज्ञान व ध्यान करणे महत्त्वाचे ठरते . परमेश्वराच्या नामस्मरणाने परमेश्वरप्राप्ती होऊ शकते . सगुण , निर्गुण असा परमेश्वर असल्यामुळे नामस्मरणात मूर्तिस्मरणही आहे ही पंथीय धारणा आहे .तुम्हांपासि असे : माते तुम्ही आठवा तेव्हेळी हे , धर्मवार्ताप्रसंगी सर्वत्र अवस्थान ( लीळा उत्तरार्ध -४३८ ) . या चक्रधरांच्या वाणीने भक्तगण सुखावतात . परमेश्वर वचनरूप आहे असे समजून चक्रधरोक्त वचने आठवत असतात . या अर्थाने पंथप्रर्वतक श्रीचक्रधरस्वामी सतत भक्तांच्या सान्निध्यात असतात . परमेश्वरी ज्ञान चक्रधरस्वामींनी जनसामान्यपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले . स्त्री- पुरुष , आबालवृद्ध यांच्याबद्दल कळवळा व त्यांचा उद्धार हे आपल्या जीविताचे कार्य ठरविले . अशा वचनरूप परमेश्वराचे स्मरण हेच भक्तिमार्गातील महत्त्वाचे पाऊल आहे .* पूर्व प्रकाशित-केशर गौरव ग्रंथ

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट