महानुभाव महिला संतांचे योगदान-प्रा . त . विद्यालक्ष्मी मेटकर.काँग्रेसनगर , अमरावती.
महानुभाव महिला संतांचे योगदान-प्रा . त . विद्यालक्ष्मी मेटकर.काँग्रेसनगर , अमरावती.
' अवघा जनु ठकला दिसे
ठक फेडिता कव्हणी नसे
तू कां ठकलासी ऐसे कव्हणी न पुसे '
ही श्रीचक्रधरस्वामींच्या श्रीमुखातून निघालेली वाक्ये श्रीचक्रधरस्वामींच्या काळी म्हणजे १२ व्या शतकातील त्रस्त आर्त जनसामान्यांच्या जीवनातील सर्वच क्षेत्रांतील परिपाक यात उतरलेला दिसतो . धर्म , जात , वंश यापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे . समाजाची रचना माणुसकीच्या तत्त्वावर झाली पाहिजे या मताचा त्यांनी पुरस्कार केला . तत्कालीन महिलांच्या सुखदुःखांचा , दुय्यम दर्जाचा प्रत्यय आल्यामुळे त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानात आणि प्रबोधनात महिलांच्या मानसिक आणि वैचारिक उत्थानासाठी पाऊल उचलले . परंपरागत चालत आलेली धार्मिक परंपरा नाकारून स्त्रीपुरुष यांच्यातील उच्चनीच , श्रेष्ठकनिष्ठांचे विचार झुगारून त्यांनी स्त्रियांचा सन्मान केला . महिलांकडे पाहण्याची त्यांची निकोप दृष्टी होती . सामाजिक समतेसोबत आध्यात्मिक समता त्यांना मिळवून दिली आणि विरोध करणाऱ्यांना ते खडा सवाल करीत , ' तुमचा काय जीव आणि त्यांचा काय जीवलीया ' , धर्माचिया चाडा स्त्रियांनी का येऊ नये ? तुमचे रक्षण करणारा देव वेगळा आणि त्यांचे रक्षण करणारा देव काय वेगळा आहे ? धार्मिक क्षेत्रात तर त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिलेच ; परंतु त्यांची मानसिक अवस्था बदलण्याचेही कार्य केले . स्त्रियांच्या बाबतीत पवित्र - अपवित्र असे काहीच नाही . ' स्वातंत्र्य हा मोक्ष , पारतंत्र्य हा बंध ' असे सांगून त्यांनी सर्व प्रकारच्या पारतंत्र्यावर घाला घातला . कुणासाठी जेवायला थांबणे हेही त्यांच्या मते पारतंत्र्यच होते . या सूत्राचा जन्म एका छोट्याशा लीळेत झाला . राणाईसा स्वातंत्री धर्मनिरूपण - लाखाईसा आणि राणाईसा या दोघींची शिदोरी एकत्र होती . लाखाईसाला आबाईसाने नातेवाइकाकडे नेले . त्या तेथेच जेवल्या . राणाईसा बिठारी राहिली . लाखाईसाची वाट पाहात बसली आणि सर्वज्ञांच्या श्रीमुखाकडे पाहू लागली . सर्वज्ञ म्हणाले , बाई जेवा ना की , ना , जी लखाईसे येती मग जेवू . तिची माझी शिदोरी एकत्र आहे . तेव्हा स्वामी म्हणाले , ' स्वातंत्र हा मोक्ष , पारतंत्र हा बंधू ' जेवायसाठी कुणावर अवलंबून राहणेही त्यांना मान्य नव्हते . हेही एकप्रकारचे पारतंत्र्यच आहे . श्रीचक्रधरस्वामींनी महिलांना दिलेल्या स्वातंत्र्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला भरपूर वाव मिळाला . त्यामुळे त्यांनी केलेले योगदान हे फक्त पंथापुरतेच मर्यादित नव्हते , तर सर्व समाजाला उपयुक्त ठरले . महानुभाव संत महिला म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यांपुढे सर्वांत प्रथम कोण उभी राहात असेल तर ती महदाईसा .
महदाईसा
*लीळाचरित्राचे जे खास जग आहे त्यातील महदाईसा ही प्रमुख विदुषी उच्च पातळीवर वावरताना दिसते . महदाईसाचा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा नकळत आपल्याला तिचा प्रश्न अपेक्षित असतो ; कारण ते प्रश्न फार महत्त्वाचे असतात . आणि श्रीचक्रधरस्वामींनी दिलेली त्यांची उत्तरे त्याहून महत्त्वाची असतात ; कारण त्या उत्तरांतूनच बरेचसे तत्त्वज्ञान उपलब्ध झालेले आहे . स्वामींच्या निरूपणामागे अखंड सावध असणारी ती एक प्रश्नाकृतीच होती . अतिशय कुशाग्र बुद्धीची जिज्ञासू होती . ' म्हातारी जिज्ञासू , म्हातारी चर्चेक येथ का ना काही पुसतची असे ' अशा प्रकारचे प्रमाणपत्र खुद्द स्वामींनीच तिला दिले . ती पुरी गावची नागदेवाचार्याची चुलतबहीण होती . तिचे मूळ नाव रूपाईसा असे होते . महदाईसा हे नाव तिला तिच्या पणजीवरून पडले . एकदा एका प्रसंगावरून महदाईसेने आपली पणजी महदाईसा हिची गोष्ट सांगितली . महदाईसाची पणजी ही मोठी विदुषी होती , तर पणजोबा वामनाचार्य हे राजपुरोहित होते . एकदा एक विद्वान पंडित महादेवराव राजाच्या दरबारात आला आणि त्याने शास्त्रचर्चेत सर्व पंडितांना निरुत्तर केले . राजाला जयपत्र मागू लागला . तेव्हा महदाईसेने शास्त्रार्थ करून त्यांना हरविले आणि उलट त्याच्याचकडून जयपत्र मिळविले . राजा खूश झाला . राजाने महदाईसेला पाच गावे इनाम दिलीत . तेव्हा स्वामी म्हणाले , त्या राजाच्या महदाईसा तुम्ही आमच्या महदाईसा . तेव्हापासून त्यांचे हे नाव प्रचलित झाले . लीळाचरित्राचे भव्य दालन उघडल्याबरोबर आपल्या चक्रधरस्वामींचे दर्शन होते आणि पहिली महिला जी भेटते ती महदाईसा .महदाईसा स्वामींच्या समोर बसली आहे . त्यांना प्रश्न विचारित आहे . लीळाचरित्राची सुरुवातच मुळी महदाईसेच्या प्रश्नाने होते . एक दिसु गोसावी आसनी उपविष्ट असती निरूपण होत असे . महदाईसे मुख्य अवघी भक्तीजने बसले असती : महदाईसे पुसिले : जी जी या मार्गासी कव्हण आदि : या उपरी सर्वज्ञ म्हणीतले : बाई या मार्गासी दत्तात्रेय प्रभु आदिकारण : त्रेतायुगात अनसूयामाता , अत्रीऋषी पिता यांच्या ठिकाणी अवतार स्वीकारला . सह्याद्री पर्वती बीजे केले . तेथे व्याघ्रवेषे चांगदेव राऊळसी दर्शन झाले . चांगदेव राऊळांनी त्यांच्यापासून ज्ञानशक्ती स्वीकारली . चांगदेव राऊळापासून श्रीप्रभूबाबापासून एथ आणि येथुनि तुम्हा अवघेसा म्हणोनी श्रीकरे दाखविले . हो का जी म्हणूनी महादाईसे श्रीचरणा लागली . महदाईसेच्या प्रश्नामुळे आपल्याला महानुभावांचे पंचकृष्ण समजले . पहिले अवतार श्रीकृष्ण , दुसरे दत्तात्रेय प्रभू यांनी स्वयं ज्ञानशक्ती स्वीकारली तर तीन अवतारांची गुरुपरंपरा आपल्याला कळली . महदाईसा लगेच दुसरा प्रश्न विचारला , जी , जी द्वारावतीकारापासून कोणीसी काय झाले . बाई पर पुरुषा विद्या झाली . सूपेनी मार्ग खराटेनी विद्या प्रगटेति . एक दिवस महदाईसा विचारते , “ जी , जी आपण अनुसरा अनुसरा म्हणता ते काई जी ? " “ एथ आधीन होईजे येथुनी म्हणीतले ते की जे ते अनुसरण ' या एकाच सूत्रानं तिच्यात परिवर्तन झाले . त्याला कारणही तसेच होते . ती अनुतापाने पोळली होती . तिने दादोस नावाच्या महात्म्याची कास धरली होती . तो मानमान्यतेसाठी हपापलेला होता . महदाईसा त्याच्या विचाराने चालत होती . त्यामुळे तिच्या जीवाचं कल्याण होणार नव्हतं . तिचा अधिकार फार मोठा होता . म्हणून स्वामी म्हणतात , ' एथ आधीन होईजे . कमजोर आश्रय करू नका . आम्ही समर्थ आहोत . आनंदमय आहोत म्हणून आत्मविश्वासाने स्वामी एथ हा शब्द वापरतात . ' पुढे ती स्वामींना अनुसरते . महदाईसा पूर्वार्ध , उत्तरार्ध आणि एकांक या तीनही कालखंडात वावरताना दिसते . एक दिवस महदाईसा विचारते , ' हा नागदेवो सकळही जाणे , आम्ही इतके दिवस आपल्या सन्नीधानात असून काहीच जाणत नाही जी . ' सर्वज्ञ म्हणतात , ' बाई जीव एकी असेती ऐसे जाणा की ? जी जी देवता एकी असती ऐसे जाणा की ? जी जी प्रपंचु एकी असे ऐसे जाणा की ? जी , जी परमेश्वर एकी असे ऐसे जाणा की ? तरी यापरते काही जाणावे असे बाई ? ' ब्रह्मानुभूती , निरयअवस्थी , कली धर्म , संन्यास इत्यादी तात्त्विक सिद्धांताचे निरूपण केले . मानवप्राणी मग तो पौर्वात्य , पाश्चिमात्य कोणत्याही देशाचा कितीही विद्वान असो , त्याला या विश्वाचे कोडे उलगडले नाही . हे जग आहे तरी काय ? याची निर्मिती कोणी केली ? जग निर्माण करण्याचा उद्देश काय ? अनादिकाळापासून हे असेच चालत आले आणि असेच चालणार का ? कधी सुख , कधी दुःख का असते ? हे कोडे उकलण्यासाठी मानवाने पराकाष्ठा केली आहे आणि करीत आहे ; परंतु अजूनपर्यंत त्याला यश आले नाही . म्हणून श्रीचक्रधरस्वामी म्हाइंभटांना पहिल्याच भेटीत म्हणतात ' अविद्यायुक्ता जीवा स्वतः ज्ञान न संभवे ' त्याला मार्गदर्शक कुणी तरी हवा आणि तो मार्गदर्शक जीवापेक्षा ज्ञानमय असावा लागतो . महदाईसाने विचारलेल्या प्रश्नामुळे विश्वाचे सर्व कोडे स्वामींनी उकलून दाखविले . महदाईसा नेहमी तात्त्विकच प्रश्न विचारीत असे , असे नाही . केव्हा केव्हा ती अगदी साधी व्यावहारातले प्रश्न विचारीत असे . एकदा ती विचारते , ' देहाला रोग का होतात ? ' वाई धातुसाम्य आती तथा रोग न बधीजी . वात , पित्त , कफ या तीन धातू ज्याच्या सारख्या प्रमाणात असतात त्याला रोग होत नाही . जी , जी कवणासी धातूसाम्य आती जी ? भक्त , योगिया , विषया या तीही धातू साध्य आती . महदाईसे पुसिले तयासी कैसे धातू साम्य जी ? विषया म्हणजे राजा त्याच्याजवळ वैद्य असतो . तो रोज हात पाहतो त्याप्रमाणे राजाला अन्न सेवन करण्यास सांगतो . तो वैद्याच्या आधीन असतो . तसाच योगिया आपल्या विद्ये अधीन असतो . योगाच्या बळावर शरीर स्वस्थ ठेवतो म्हणून त्याला रोग होत नाही . तैसाची भक्त त्याने ईश्वर आत्मा केला असे.अहर्निशी ईश्वराते अनुभवी . महदाईसा स्वामीची उत्तरापंथे निघून जाण्याची प्रवृत्ती जाणते . त्यावेळी ती विचारते , जी जी गोसावी आमते सोडूनी जावू पहाताती तरी आम्ही काई करूनी असावे जी ? सर्वज्ञे म्हणीतले ' बाई हे देखिले तैसे आठविजे . येथीचे चरित्र आठविजे . निदिध्यासन किजे . आम्हाला कुणाकडे सोपविलेत तुम्हाला नागदेवाकडे नागदेवाला प्रभुबाबांच्या सांभाळी घातले . स्वामींच्या उत्तरापंथे गमनानंतर स्वामींचा सर्व परिवार श्रीप्रभुबाबांजवळ रिद्धपूरला येऊन राहतो . बरेच दिवस गेल्यावरही महदाईसेला नागदेवाचार्य कुठे दिसत नाही . ती प्रभुबाबांना विचारते , ' स्वामी सोडून गेले आणि नागदेवाचार्यही कुठं दिसत नाही जी . ' ती दुःख करते . श्री प्रभुबाबा म्हणतात , ' आवो मेली जाए भानखेडी जाए म्हणे . ' श्रीप्रभुबाबांची आज्ञा झाल्याबरोबर त्यांच्या चरणावर डोके ठेवते आणि तशीच तडक निघते . अगदी एकटी तिला परमार्गाचा आधार शोधायचा असतो . दरे , दरकुटे , रानेवने तुडवीत भानखेडीच्या जंगलात येऊन पोहचते . तेथे गुराखी मुलांना विचारते , ' तुम्ही असा असा माणूस येथे पाहिला का ? ' ते हो म्हणतात . आम्ही त्यांना गवताचा रस पाजला . ते निर्देश करतात त्या ठिकाणी ती येऊन पोहचते . नागदेवाची अवस्था पाहिल्यावर तिला भरभरून येते . खचून न जाता मनाचा निर्धार करते . त्यांना झटकून उठून बसवते . गवताचा रस पाजते . आपले सारे बळ एकवटून त्यांना पाठीवर घेते . गावाजवळ आल्यावर त्यांना एका ठिकाणी बसवून गावात जाते . दूध आणते ,त्याना दूध पाजते . आचार्य थोडे सावध होतात . महदाईसा म्हणते , ' चल सर्वज्ञाजवळ जाऊ . ' ते विचारतात , ' कोण सर्वज्ञ ? ' ती म्हणते , ' रिद्धपूरला प्रभुबाबा नाहीत का ? ' आचार्य म्हणतात , ' नेणो मा तो तुझा देव , माझा देव तो चक्रधरू वो . ' महदाईसा मागील गोष्टीची आठवण करून देते . गोसावियांनी मला तुझ्याकडे निरोपिले आणि तुला श्रीगोविंदप्रभूजवळ निरोपिले तेव्हा कुठे ते तयार होतात . दुसऱ्या दिवसापासून थोडे , थोडे चालत , चालत रिद्धपूरला येऊन पोहचतात . प्रथम श्री प्रभुबाबा अव्हेरतात , हा नव्हे म्हणतात . त्यांना अधिकच दुःख होते . नंतर मात्र अस , अस म्हणून स्वीकारतात . नागदेवाचा जीव भांड्यात पडतो . प्रभुबाबाजवळ ते राहू लागतात .*
महदाईसेचे उपकार
महदाईसेने आचार्यांना भानखेडच्या जंगलातून आणले नसते तर ? त्यांच्या शेवटच्या अवस्थेत ती तेथे पोहचली नसती तर ? या भयानक कल्पनेने मन सुन्न होते . महदाईसेने फक्त आचार्यांनाच पाठीवर टाकून आणले नाही तर अवघा परमार्ग आपल्या पाठीवर वाहून आणला . पंथाला आद्य आचार्य दिला . महाराष्ट्रला वेधवंती आचार्य दिला . मराठी साहित्याला साडेसहा हजार ग्रंथसंपदा देणारा प्रेरणादायी मार्गदर्शक दिला . तर साहित्यिकांना गुरू दिला . आचारवंतांना आणि विचारवंतांना आधार देणारा आधारवड दिला . महानुभाव पंथावर महदाईसेचे आभाळाएवढे उपकार आहेत . तिने दाखविलेल्या तत्परतेमुळे आज महानुभाव पंथ जिवंत आहे . म्हणून बाभूळगावकर शास्त्री म्हणतात : " महदंबे तू नागदेवाची प्राणज्योत चेतना परमार्गाच्या वृद्धे तुजला कोटी , कोटी वंदना " नागदेवाचार्यही तिचे मोठेपण जाणून होते . म्हणूनच ते शपथ घेण्याचे काम पडले तर रूपेची आण असे म्हणत . महदाईसेचे योगदान येथेच संपत नाही . तर ' धवळे'ही महदंबेची स्वतंत्र कृती आहे . एक दिवस भिक्षेला जात असताना तिने मुंडावळे पाहिले . श्री प्रभूबाबांनी विव्हावो स्वीकार ही लीळा आरंभिली . ' आवो मेली जाए गाए म्हणे ' अशी आज्ञा करिताच , काय गाऊजी : कृष्णरुक्मिणी गाए म्हणे : तुरया थाट गाए म्हणे . दोऱ्यात फुलामागून फूल गुंफावे तसे महदंबेने कडव्यांमागून कडवे रचले . आणि पहिली काव्यमाळ रचिली . ' रुक्मिणी स्वयंवर ' हे महदंबेच्या भावविश्वात आधीच रुजले होते . म्हणून तिने मोठ्या कौशल्याने अखंड श्रीकृष्णचरित्रातून उचलून धवळ्याच्या रूपाने स्वयंसिद्धत्वच प्रकाशमान केले . धवळे हे कथात्मक काव्य आहे . एकाच वेळी ती जशी कथा आहे तसेच ते काव्यही आहे . धवळ्याची निर्मिती करून महदंबेने दोन कार्ये साधिली . ' रुक्मिणी स्वयंवरा'स कथेचा दर्जा दिला . दुसरे कार्य म्हणजे आद्य मराठी कवयित्रीचा मान पटकावला . काव्याच्या साहित्यिक सौंदर्याबरोबरच आंतरिक भक्तिरसाचा आस्वादपण अनुभवाला येतो . पहिल्या दिसापासून शेवटील दिसापर्यंत देवो आठविणाऱ्या महदंबेच्या अंत : करणातील भावाविष्कार धवळ्यात आढळून येतो .भिक्षेला जात असताना एका बालकाच्या तोंडून श्री चक्रधर हे नाव ऐकताच त्या लेकराला झाडूनपुसून जवळ उचलून घेणाऱ्या महदंबेचे देववेडे मन कोणत्या भावनेतून धवळे गाते याची वाचकांना जाणीव होते . आपल्या सर्वेश्वराचे चरणशिरी धरून गोविंदराव्यास तोषविण्याकरिता गाते पाविले परमगति ऐकता श्रीकृष्णचरित्र या पहिल्याच ओवीत सांगितल्याप्रमाणे धवळ्याच्या रूपाने परमगतीच पावण्याकरिता गायिलेले आहे . जेव्हा माणसाचे मन कुठेतरी झेपावते अन् तेथे जडते तेव्हा त्याच्या मनाचा हुंकार काव्यरूप घेतो . संसारातील ऐहिक भावबंधन हे मानवी मनाचे फार मोठे आकर्षण आहे . पण भावसृष्टी म्हणा किंवा निसर्गसृष्टी म्हणा , मानवाला क्षणिक सुख देणारी असली तरी अंतिम आणि शाश्वत समाधान देण्यास असमर्थ असतात . मानवी भावबंधाचा आस्वाद घेताना कधीतरी त्याचा अपुरेपणा जाणत्या कवीला जाणवतो . तो अंतर्मुख होतो . हृदय जगाच्या अंतरंगात सूत्रे फिरविणाऱ्या अगम्य शक्तीबद्दलचे गूढ त्याच्या मनी दाटते . महदाईसेचे देहावसान मनाला हरहर लावणारे आहे . निधनसमयी भटोबास म्हणतात , " रूपै देहपर्यंत उचीत स्मरणास न चुकलीसी , देवो तुवाची आठवावा आदि . " भटोबासांनी त्यांची तुलना आपल्या जन्मदात्या आईबरोबर केली ते म्हणतात , " जैसे धाकुटेपणी आबाईसे उपसाहिते तैसेची रूपैया उपसाहिले .*
बाईसा
स्वामी एकांतातून लोकांतात आल्यावर पैठण या पवित्र धर्मक्षेत्रास आले . त्यांची भेट नागांबिका नावाच्या पयोपवाशीनी पंथाच्या महंत बाईशी झाली . त्या बाईने त्यांना आपल्या घरी नेले खरे ; परंतु त्या दिव्य पुरुषाला पायपुसणे बसण्यास टाकले . ती महंतकीच्या अहंकाराने ग्रासली होती . स्वतः आपल्या उच्च आसनावर बसली आणि आपली पूजा आपल्या हासूबाई आणि पांड्या नावाच्या शिष्यांकरवी करून घेतली . स्वामींची अहंकाररहित वृत्ती असल्यामुळे त्यांनी पाय पुसण्याचे आसन ग्रहण केले . असे सतत तीन दिवस घडत राहिले . त्या तीन दिवसांत स्वामींनी तिचे तीन दोष त्या पायपुसण्याला कायमचे पुसून टाकले . तिच्या ठिकाणी मार्गश्रेष्ठत्व , वयोवृद्धत्व आणि तपोवृद्धत्व हे तीन दोष होते . तिसऱ्या दिवशी मात्र ती जेव्हा आपल्या उच्च आसनावर बसली त्या वेळी तिची आणि स्वामींची दृष्टादृष्ट झाली . तिला तिची चूक उमगली आणि धाडकन स्वामींच्या चरणाजवळ येऊन पडली . तिने त्यांना उठवून आपल्या उच्च आसनावर बसविले . तिने त्यांची पूजा केली . ती त्यांना अनुसरली . असे अवस्थांतर स्वामींच्या येण्यामुळे घडले . पुढे ही बाईसा या नावाने परिचित झाली . ती आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत स्वामींजवळ सावलीसारखी राहिली . मठातील सर्व व्यवहार तिला विचारून चालत असे . स्वामींची सर्वोपरी काळजी घेत असे . मठाची झाडझूड करणे , स्वामींचे पद्मासन , शयनासन रचणे , पूजेची तयारी करणे , हार तयार करणे ,दिवे लावणे , स्वामींच्या उपाहाराची तयारी करणे इत्यादी सर्व कामे ती जातीने स्वतः करीत असे . ती मुळात तामसी होती . नेहमीच तम तम करीत असे . रागाने बोलत असे . परंतु भक्तांसाठी राबत होती . त्यांच्यातील उणिवा शोधून काढीत होती . त्यांची विजने पडताळून पाहात होती . त्यांना मार्गदर्शन करीत होती . त्यांच्या चुकांबद्दल रागवत होती . तिचे हे स्वाभाविक कार्य सुरू असताना स्वभाव परिवर्तन होत होते . राग , द्वेषादी दोषांचे रूपांतर भावभक्तीच्या सुगंधात झाले होते . आता तिला स्वामींचा विरह थोडाही सहन होत नव्हता . एकदा ती नाथोबासोबत पैठणच्या बाजारात गेली . गंगेतून नावेतून परत येत असताना वृधा संगमाकडून काही गुंड प्रवृत्तीचे लोक विरुद्ध बाजूने येत होते . स्वामींच्या मठातून लूट करून काही वस्तू घेऊन चालले होते . त्यांनी त्या वस्तू बाईसांना दाखविल्या आणि म्हणाले , तुमच्या स्वामीचं असं असं करून आलो . तिने खरेच का म्हणून तीन वेळा विचारले . ते हो म्हणाले . ही खोटीच दुःखद वार्ता ऐकल्याबरोबर तिने गंगेत उडी घेतली . तिचा खूप शोध घेतला ; परंतु थांगपत्ता लागला नाही . अशी ही प्रेमीया भक्त ' भक्त वियोगी नुरे ' या स्वामींच्या वचनास पात्र झाली . तिचे हे योगदान विसरता येणार नाही .
साधा
एकदा साधा ही स्वामींच्या दर्शनाला आली . लोणार तीर्थावरून येत असताना दुर्गाच्या उतरणीवर तिला रिंगणीची फुले दिसतात . तिने ती फुले आणली आणि त्या फुलांनी स्वामींची पूजा केली . त्याने तो भक्तवत्सल प्रसन्न झाला . चाफे गौरमूर्ती अधिकच सुंदर दिसू लागली . रिंगणीच्या खुरट्या गंधहीन फुलांना साधेने देवाची प्राप्ती करून दिली . बाईसाला ते आवडले नाही . स्वामी म्हणाले , ' भाव सुवर्ण फुलांचा की बाई ' . साधेची आई सोबत होती . ती मुलीचे दोष सांगू लागली . स्वामी म्हणाले , ' बाई प्राणीयाचे दोष येथ सांगू नका . आम्ही ते जाणतो . जीवाला सामोपचाराने जपावे लागते . तुम्ही माये की बाई . मायेच्या ठायी का येथ सकळही सामाये की बाई . ' आपण सामान्य माणसे जुन्या रूढी , परंपरेला इतके चिकटून असतो की त्यातून बाहेर पडणे अवघड वाटते . आपले मन जुन्याला तोडायला इतके घाबरत असते की ते एकाएकी तोडू तर शकत नाहीच ; परंतु नवे घडवूही शकत नाही . जीवनभर तेच ते कसा हा जुन्याचा मोह नवे सत्य जाणून घेण्याच्या क्षमतेचा नाश करते . आपल्या संपूर्ण अस्तित्वात आपण स्वतःच आनंदाचे धनी असतो . निर्भेळ आनंद आपल्याजवळच आहे . परंतु आपण भटकत असतो . जगाच्या गर्दीत आनंद शोधत जुन्या आणि त्याच त्या विचाराने आपण आपल्या मूळ केंद्रापासून दूर गेलेलो आहोत , समाजनियमांनीच आपल्याला आपल्याजवळ असलेल्या अंतःकरणातील आवाज ऐकणे बंद केले आहे .साधेला समाजाचे ऐकायचे नव्हते . आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकला आणि रूढी परंपरेने वाळीत टाकलेली रिंगणीची फुले ईश्वरतुल्य मानली . म्हणून ती एकटीच या मार्गाने चालत गेली . जिथे गर्दी नव्हती . गर्दी संस्कार देते , अनुकरण देते , विचार देत नाही . गर्दीत माणसाला मागच्या - पुढच्याचा आधार असतो . विश्वास नसतो . साधा ह्या गर्दीच्या मानसिकतेतून बाहेर पडली . तिच्यात असलेल्या जागृत विश्वासाने तिला साथ दिली . म्हणूनच स्वामी म्हणतात , भाव सुवर्ण फुलांचा आहे बाई ! डोमेग्रामला असताना एकदा स्वामींचे निरूपण चालले असताना एक जण गाय आणि गोह्याची जोडी बळजबरीने ओढीत नेत होता . स्वामींनी साधेला ते दाखविले आणि म्हणाले , पुढे यवन येतील आणि असेच बळजबरीने लोकांना बांधून घेऊन जातील . तेव्हा साधा घाबरली व म्हणाली , ' मला हे दाखवू नकाजी . ' तेव्हा स्वामींनी साधेला अभय दिले , ना भिया साधे हो ऐथूनी तुम्हावरी वाजत वारा धरीजेल . स्वामींनी वर्तविल्याप्रमाणे त्यांची भविष्यवाणी खरी ठरली . अल्लाउद्दीन खिलजीने शके १२१६ मध्ये महाराष्ट्रावर स्वारी केली . तेव्हा खरेच त्याचे सैनिक लोकांना दोर बांधून नेऊ लागले , लुटालूट करू लागले . तेव्हा भटोबासांनी आपली आई आबैसेला बैजोबाच्या घरी ठेवून ते स्वतः आपल्या भक्त परिवारासहित परळी बैजनाथपर्यंत आले , तेव्हा त्यांना मागून शत्रू येत असल्याची चाहूल लागली . लगेच त्यांनी अरांकत भक्त आणि महिला भक्तांना परळी बैजनाथच्या मंदिरात ठेवले . स्वामींनी साधेला दिलेले अभयदान लक्षात घेऊन त्यांच्या रक्षणार्थ साधेला तेथे ठेवून स्वतः इतर भक्तांसोबत निलंग्याला निघून गेले . त्यानंतर साधेने सर्वांना मंदिरात घालून स्वतः दंडुका घेऊन दारात बसली . आक्रमक आले . साधा डगमगली नाही की घाबरली नाही . इथे कोण आहे ? असे विचारल्यावर श्रीचक्रधरस्वामींचे शिष्य आहेत , असे म्हटल्यावर त्यांचा विश्वास बसला . पुढे ते निघून गेलेत . अशा प्रकारे अलौकिक असे धर्मरक्षण साधेने केले . तिचे हे योगदान इतिहासाला विसरता येणार नाही . पुढे निरवानिरव झाल्यावर स्वामी भिंगारला असताना साधा तिची आई लाहामाईसा आणि मैत्रीण रत्नमाणिका अरण्यग्रामवरून भिंगारला स्वामींच्या दर्शनाला निघाल्या . वाटेत त्यांनी स्वामींसाठी तिघींनी तीन छोट्या गूळ भेल्या , तीन हार घेतले . तहान लागल्यामुळे एकाच्या ओसरीवर साधाने सामान ठेवले . पाणी पिऊन येत असताना एक वासरू एक भेली नेत असताना दिसले . साधा मनाशीच म्हणाली , “ आईचा खाल्ला म्हणू की बाईचा खाल्ला म्हणू , नाही माझाच खाल्ला ' मीच निदैवाची . दोघींनी पूजा केल्यावर गूळ अर्पण केला , हार घातले . साधेने फक्त हारच अर्पण केला . तेव्हा स्वामी म्हणाले , “ हे काय साधे हो , तुम्ही आम्हाला गूळ दिला नाही . " तेव्हा तिथे घडलेला वृत्तांत सांगितला . स्वामी बाईसाला म्हणाले , “ बाई आपल्याकडे गुळ आहे ? हो बाबा , आहे . मग आणा इकडे . " बाईसांनी गूळ आणला . तो स्वामींनी साधेला दिला आणि म्हणाले , " आता हा आम्हाला द्या . " तेव्हा साधा म्हणाली , " हे काय जी ? तुमचाच तुम्हाला द्यायचा ? " तेव्हा स्वामींनी फार मोठे तत्त्वज्ञान येथे सांगितले . ते म्हणाले , " बाई येथ काय कुणाचे आहे , सर्व काही देवाचे की बाई मा देव देईल ते आपले . " अशा या भोळ्याभाबड्या भक्तीने देव प्रसन्न झाले . साधे हो येथ काही तरी मागा म्हणाले . साधा म्हणाली , मला काहीच समजत नाही काय मागावे ? ते स्वामी पुनः म्हणाले , काही तरी मागाच . तेव्हा ती म्हणते मला काहीच नको जी . काही तरी मागाच , तिसऱ्यांदा म्हटल्यावर ती म्हणते , मला पुनः संबंध द्यावा जी . स्वामी म्हणतात , साधे हो अजाणतेपणी ऐसे मागितले , तर जाणतेपणी काय मागितले असते . अशा ह्या साधेच्या भोळ्याभाबड्या भावनांतूनही अर्थपूर्ण भक्तिरसाने ओथंबलेले शब्द बाहेर पडत असत . त्यातून भक्ताने देवास जे मागावे ते ती मागून गेली . त्या नेणिवेच्या ज्ञानास पाहून आपण थक्क होतो .
आऊसा
श्रीचक्रधरस्वामींजवळ एक आऊसा नावाची शिष्या राहात होती . तिच्या माध्यमातून स्वामींनी पराकोटीची अहिंसा आपल्या भक्तांना सांगितली . एके दिवशी कुत्र्याने भटोबासाची झोळी पळविली आणि दुसऱ्या दिवशी परत ते आले आणि आऊसाची झोळी पळवू लागले . तेव्हा तिने त्याला दगड मारला , ते केकाटत गेले . त्यावेळी स्वामींनी आपलेच मुकुट दोन्ही हातांनी धरून ठेवले , जणू काही त्यांनाच लागले . स्वामी तिला म्हणाले , ' त्याची काय कव्हणी माय बहीण असे , माय ते रांधून ठेविल अन् हे तेथे जाऊन खाईल . आपण आपले राखीजे परी हाणीजे ना . ' आपण आपले सुरक्षित ठेवावे परंतु हाणू नये . एकदा तिने इंगळी मारली तेव्हाही स्वामी रागावले , “ वस्त्र करूनी धरा बाहीरी टाका . " उपद्रवी प्राण्यांना तर मारू नयेच , परंतु मुंगीसुद्धा मारू नये . अशी ही लहानमोठ्या प्राण्यांना मारणारी आऊसा एकदा आपल्या स्वतःच्या जीवावरच उठते . पूर्व जीवनात तिने मंत्र , तंत्र , धागेदोरे यांचा अभ्यास केला होता . स्वामींनी तिला ते सर्व सोडून देण्यास सांगितले होते . एकाच ईश्वर नामाचा जप करीत जा ; परंतु माणसाची जुनी सवय लवकर जात नाही . मधून मधून तिचे ते चालायचेच . एक दिवस स्वामींच्या ते लक्षात आले . ते तिच्यावर उदास झाले . तिच्या ते लक्षात आले . ती कोपऱ्यात जाऊन बसली . स्वामी तिला म्हणाले , ' आऊसा तुम्ही एकट्याच अशा का बसल्या , सगळी मंडळी आपापली कामे करीत आहेत . ' तर ती म्हणते , ' स्वामी जगन्नाथ उदास तर जगून तरी काय करायचे . आम्ही अहीर देशाची माणसं जगू जाणतो मरूनही जाणतो . कडव्याच्या धांड्याचे तुकडे करतात ना तसे आम्ही आमच्या देहाचे तुकडे सहज करू शकतो . मी आत्महत्या करीन म्हणते . ' तिचे हे टोकाचे बोलणे ऐकून तो दयाळू परमेश्वर गहिवरला . तिला समजावत म्हणाला , “ आत्मघातकी या कव्हणी ठाव नाही . " ते सूत्र दयावंतांच्या श्रीमुखातून बाहेर आले.ते केवळ आऊसासाठीच नाही तर हतबल झालेल्या समाजातल्या आत्मघाताला प्रवृत्त झालेल्या अभागी जीवासाठी . देह घातकीयासी म्हणजे विनाश करणाऱ्याला कव्हणी म्हणजे संसार आणि परमार्थात ठाओ नाही , म्हणजे आश्रय नाही . मानवी जीवनच मुळात सुखदुःखाचे मिश्रण आहे . ' सुख पहाता जवाएवढे , दुःख पर्वताएवढे ' असं तुकाराम महाराज म्हणाले तर स्वामींनी संसाराला दुःखरूप म्हटले आहे . तर श्रीकृष्णाने देहालाच दुःखालयम् अशाश्वत म्हटले आहे . तर ' सब्बं दुःखमं ' बुद्धाने निर्णय दिला . तरीही कचरापट्टीत चांगल्या वस्तू शोधाव्या तसा माणूस सुख शोधीत असतो आणि जेव्हा पूर्णपणे अपयश पदरी पडते तेव्हा हताश , निराश , खचून गेलेली माणसं आत्महत्येला प्रवृत्त होतात . विश्वातील सगळ्यात वाईट घटना म्हणजे आत्महत्या , वर्तमानपत्रासारख्या प्रसार माध्यमातून ह्या घटना रोजच समजतात . बरं ही आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सर्वच क्षेत्रांत आहे . निरक्षर करतात , शिकलेलेही करतात , कायदे माहीत नसलेले करतात , कायदे माहीत असलेलेही करतात . गुन्हेगार करतात तर पोलीस खात्यातीलही करतात . गरीब करतात तर चित्रपटसृष्टीतील गडगंज पैसा कमावणारेही करतात . राजकीय क्षेत्रातील करतात , तर आध्यात्मिक क्षेत्रातलेही करतात . आत्महत्या देश , काळ , वेळ परिस्थितीवर अवलंबून नाही तर ती मानसिक संतुलनावर आधारलेली आहे . उदा . आपण आपल्या मुलाला १०० रु . नोट दिली . त्याला काही सामान सांगितले तर त्याने आणले नाही . पैसे हरविले तर त्याला आपण रागवू . कारण ते पैसे आपल्या मालकीचे असतात . तसेच हा देह परमेश्वराच्या मालकीचा आहे . तो नष्ट केला तर त्याला राग येईल . परमेश्वराची ही सुंदर कलाकृती आहे . ती मोडल्यास त्याला राग येईल . अंगणाील सुंदर रांगोळी जर कुणी मोडली तर आपल्याला राग येईल . स्वामी आऊसाला म्हणतात , ' आऊसा तू आत्महत्या करते म्हणजे काय करतेस माहीत आहे का ? आपल्या देहात पिंडात संपूर्ण ब्रह्मांड आहे . एक्क्यांशी कोटी , सव्वालक्ष दहा देवतांचे ते निवासस्थान आहे . पिंड हननाने ब्रह्मांड हनन होते . भयंकर पाप होते . एवढ्यांचा रोष पत्करावा लागतो . एका क्षणात घडणारी घटना . त्याने दुःखमुक्त होते का ? पूर्वजन्मातले कर्म दुःखरूपाने पुढे आले ते भोगायलाच पाहिजे . पलायनाचे मार्ग ते पापाचे रस्ते आहेत . आऊसा त्या रस्त्याने जाऊ पाहात होती . स्वामींनी एकच सूत्र सांगितलं . त्या सूत्रातून अमृताचा शिडकावा झाला . तिच्या जीवनाला संजीवनी मिळाली . जगण्यातला आनंद ती अनुभवू लागली . स्वतःच्या जीवावर उठलेली आऊसा दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठी मात्र धडपड करते . स्वामी खडकुलीला असताना वाडेगावचा माळी संर्पदंशाने मृत्युमुखी पडला . त्याला निंबाच्या पाल्यात गुंडाळून गुफेजवळ आणले . आऊसा बाहेर जात होती . तिला माळीण म्हणाली , ' हो आई गोसावियासी विनवा का : सर्पे खादला माळी गोसावी तो जिववावा : चोंभीया पायलीच लेकुरवे मुंगीयाच्या धनी आणी लागली : आई करीनवो आई ' असे म्हणून रडू लागली . आऊसाला अनुकंपा उपनली . गोसावीयाजवळी आली . जी जी स्वामी जगन्नाथा माळी सर्पे खादला . तो येथ आणला असे तरी तो जीवावजी . स्वामींनी चरण क्षाळण करविलं आणि ते त्याच्या अंगावर शिंपडायला सांगितले . त्याप्रमाणे केले . तो जियाला पाहो लागला परी उठीना . आऊसा लगबगीने स्वामीजवळ आली . जी जी स्वामी जगन्नाथा प्रेत जियाले जी परी उठीना तरी तेथ विजे करावेजी . स्वामी तेथे गेले आणि कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहिल्यावर तो उठून चरणी लागला . त्याच्या स्त्रीनेही दंडवत घातले . अशी ही स्वामीची मर्जी संपादन करणारी आऊसा स्वामींच्या उत्तरपंथे गमनानंतर ज्या गंगातीरावर तिला परीस गवसला होता तेच गंगातीर तांबा जळतू ऐसा दिसत असे . गंगातीर तिला ओस वाटू लागले .
धानाईसा
धानाईसा ही मराठी साहित्यातील बालकथेची उद्गाती ठरली . तिच्यासाठी सांगितली स्वामींनी चिऊ , काऊची कथा . प्रसंग असा आहे : एकदा श्रीचक्रधरस्वामी पैठणच्या सारंगपंडिताच्या आवारी गेले . त्यांना धानाईसा नावाची सुस्वरूप गोंडस पाच वर्षांची मुलगी होती . सारंगपंडितांनी स्वामींच्या पूजापुरस्काराची तयारी केली . आंघोळीसाठी चौरंगावर बसविले . त्यांच्या अंगावरील वस्त्र काढले . त्यांचे ते पिवळेधम्म हळदीसारखे गोरेगोमटे अंग पाहून धानाईसाला वाटले , स्वामींना हळद लावली . मलाही अशीच हळद लावा , मलाही सोनेरी व्हायचे आहे . म्हणून हट्ट धरला . तिचा गोंधळ पाहून आजूबाजूचे लोक तिला समजावू लागले . परंतु ती काही केल्या ऐकेना . बोलूनचालून बालहट्टच तो . स्वामींना तिचा गोंधळ बघवेना . त्यांनी तिला जवळ बोलाविले . आंजरले , गोंजरले आणि म्हणू लागले , धानाई आमची गुणाची , धानाई आमची सोन्याची हे तुम्हा कथा सांगतील कामाची चिऊची . त्यांच्या मधुर आवाजाने तिने कान टवकारले . तिच्या मनाची पावले कानाकडे वळली आणि तिने ऐकण्याचा लय साधला . स्वामींच्या गोष्टीला सुरुवात झाली . कावळा आणि चिमणी राहात होते एका स्थानी . काऊचे घर होते शेणाचे , चिऊचे घर होते मेणाचे . एक दिवस खूप पाऊस आला . काऊचे घर वाहून गेले , चिऊचे घर राहून गेले . चिऊ आपल्या घरातून कावळ्याकडे पाहू लागली आणि चिडवू लागली , ' असा कसा रे कावळा , काणा की रे तुझा डोळा ' सर्वज्ञांनी कथेचा प्रारंभ असा केला . तिचे हलकेच नाक धरले , ती खुदकन हसली . आणि मराठी साहित्यात पहिली बालकथा बागडू लागली . ही कथा बीजरूप आहे . एका बीजापोटी नंतर कथा जन्मल्या . आपण बहुविध कथा वाचतो आणि विसरतो . पण बालपणी ऐकलेली ही कथा विसरू शकत नाही . कथा ऐकून धानाईसाचे मन प्रसन्न झाले . रडणे जागीच थांबले अन् हसणे सुरू झाले .या कथेचा ओघ जर आपण आध्यात्मिकतेकडे वळवला तर आपल्याला संकेत मिळतो की , माणसाने घर पक्के बांधावे . श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे ' यदगत्वा न निवर्तन्तणे तधाम परमं मम् ' नागदेवाचार्यानंतर पंथाच्या दोन प्रमुख शाखा निर्माण झाल्या . त्यात कुठलाही मतभेद नसून पंथबांधणीची व्यवस्था होती . या दोन शाखा म्हणजे एक उपाध्ये कुळ आणि दुसरे कवीश्वर कुळ . मुख्य म्हणजे या दोनही शाखांच्या मूळ स्त्रियाच होत्या . उपाध्ये कुळाच्या प्रवर्तक कमळाऊसा उपाध्ये तर कवीश्वर कुळाच्या प्रवर्तक नागाईसा कवीश्वर . यांपैकी कमळाऊसा ही औरंगाबाद जिल्ह्यातील बळेग्राम येथील पुरुषोत्तम उपाध्ये यांची मुलगी . योग्य वयात तिचा विवाह झाला . परंतु अकाली वैधव्य आल्यामुळे तिच्या चुलत्याने जानोपाध्ये ( जानराव उपाध्ये ) यांनी तिला आपल्याजवळ आणले . ते पैठणला राहात असत . तिला धर्माचा उपदेश दिला . त्यांनी तिला भटोबासाकडे आणले आणि म्हणाले , तुम्ही कमळाऊसाला धर्मोपदेश द्या . यावर आचार्य म्हणाले , ' दादो तुम्ही काही आणिक देव सांगितला आणि मी काही आणिक देव सांगेन ' . उपाध्ये म्हणाले , ' मी सांगितला तो ममताजनित परंतु तुम्हाला स्वामींनी अधिकरण केलेले आहे . यासाठी तुम्ही सांगा . ' मग उपाध्यांच्या विनंतीवरून भटोबासांनी कमळाऊसाला शास्त्र सांगितले . तिला पंथाचा बोध झाला . आचार्यांच्या नावे तिने संन्यास दीक्षा घेतली . आठ वर्षांत शास्त्राचा अभ्यास केला . नंतर त्यांना आचार्यांचे सान्निध्य सोडावे लागले ; कारण त्यांचे चुलते जानोपाध्याय वृद्ध झाले . भ्रमंती शक्य नव्हती म्हणून आचार्यांनी त्यांना चुलत्याच्या सेवेत ठेवले . आता ही तुमची शिष्या आहे . तुम्ही संमती द्या . तेव्हा जानोपाध्यांनी संमती दिली . आचार्यांनी कमळाऊसेजवळ पाच सुपाऱ्या दिल्या , त्या उपाध्यायांना द्यायला सांगितल्या व पाच दंडवते टाकण्यास सांगितले . त्याप्रमाणे तिने केले आणि तेव्हापासून त्यांना सर्व मंडळी उपाध्ये कमळाऊसे म्हणू लागली . त्या उपाध्ये कुळाच्या प्रथम आचार्य झाल्या . आचार्यांनी गुरुशिष्यांना रावसगावाला राहायला सांगितले . त्याप्रमाणे ते राहू लागले . उपाध्ये आजारी पडले . कमळाऊसाने त्यांची शुश्रूषा केली . शेवटी जानोपाध्यांचे देहावसान झाले ( शके १२२० मध्ये ) . निमित्त गुरू गेल्यामुळे कमळाऊसाला दुःख झाले . अशातच श्री चक्रधरस्वामींची शिष्या साधाही रावसगावाला आली . तिचीही सेवा केली . अंत्यसमयी तिने आपले सर्व विशेष सामग्री तिला दिली . साधेचे देहावसान झाल्यावर कमळाऊसा पुन्हा भटोबासाजवळ येऊन राहू लागल्या . कमळाऊसाच्या ६० शिष्यांपैकी ५४ त्यांच्या काळातच मृत्यू पावले . हयात असलेल्यांपैकी हिराईसा , पोमाईसा , धानाईसा , चौडाईसा ह्या सर्व प्रज्ञावंत होत्या . पैकी हिराईसा ही अतिशय बुद्धिमान होती . त्यांना एकसंदी प्रज्ञा असल्यामुळे एक वेळा वाचलेले किंवा ऐकलेले मुखोद्गत होत असे . एकदा कवीश्वरबासांनी ग्रंथरचना केली आणि कमळाऊसेला वाचून दाखविण्यास आले . त्यांना १०० ओव्या वाचून दाखविल्या तेव्हा कमळाऊसा म्हणाल्या , माझ्या हिराईसेला हा ग्रंथ मुखोद्गत आहे . तुम्ही जो ग्रंथ रचला तो जुनाच आहे . त्यांनी हिराईसेला ओव्या म्हणायला सांगितल्या . कवीश्वरबास जेव्हा वाचत होते त्यावेळी ह्या सर्व शिष्या तेथे होत्या . त्याही ऐकत होत्या . हिराईसेने त्याच वेळी पाठ केल्या होत्या . म्हणून कमळाऊसेने म्हण म्हटल्याबरोबर तिने म्हणून दाखविल्या . त्या ऐकून कवीश्वरबासांना आश्चर्य वाटले . कमळाऊसा म्हणाल्या , ' माझ्या हिराईसेला तर पाठ आहेच ; परंतु पोमाईसा आणि धानाईसा यांनाही पाठ आहेत . ' कमळाऊसेने पोमाईसेला म्हणायला लावल्या . तिनेही म्हटल्या . ती दोनसंदी प्रज्ञावंत होती . तिने दोन वेळा ऐकले होते तसेच धानाईसेनेही म्हणून दाखविल्या . ती तीनसंदी प्रज्ञावंत होती . कवीश्वरबास अधिकच आश्चर्यचकित झाले . ग्रंथ जुनाच आहे म्हणून कमळाऊसेने विनोद केला . परंतु प्रस्तुत ग्रंथ उत्तम झाला म्हणून त्यांची प्रशंसा केली . नागदेवाचार्य , बाईदेवबास , केशिराजबास , दामोदर पंडित विद्वान मंडळी दिवंगत झाल्यावर शके १२३० मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने यादवांच्या राज्यावर स्वारी केली . यावेळी त्याने आपला सेनापती मलीक कपूरला रामदेवरायराजाने खंडणी न दिल्यामुळे पाठविले होते . त्यामुळे देशात लुटालूट व अशांतता निर्माण झाली . कवीश्वरबास , परशुरामबास मंडळी शिष्य परिवारासहित कोकणात जाण्यास निघाली . कमळाऊसा उपाध्ये पुणे प्रांतात वाल्हा येथे राहिल्या . पुढे सह्याद्रीचा घाट उतरत असताना परशुरामबास लुटारूंच्या भीतीने झोळीतील पोथ्या गवतात लपवू लागले . नेमके त्याच वेळी काही लुटारू आले आणि त्यांनी झोळी हिसकाविली . त्यात म्हाइंभटकृत लीळाचरित्राची एकमेव हस्तलिखित पोथी होती . त्या एकाच पोथीवरून सर्व शिष्यांना घोक दिल्या जात असे . शके १२३१ मध्ये सर्व पांगलेली मंडळी एकत्र आली . कवीश्वरबास , परशुरामबास यांना हिराईसेच्या एकसंदी प्रज्ञेची कल्पना होती . हिराईसेच्या एकसंदी प्रज्ञेमुळे म्हाइंभटकृत लीळाचरित्र जसेच्या तसे राहिले . ते परशुराम बासांनी लिहून काढले . कमळाऊसाच्या पश्चात उपाध्ये मंडळींनी हिराईसा हिला आचार्य गादीवर प्रतिष्ठित केले . त्या ब्रह्मविद्याशास्त्रात निष्णात असल्यामुळे अनेक गृहस्थी मंडळी त्यांचे शिष्य झाली . त्यापैकी चार शिष्य महात्मा झाले . अशा ह्या प्रज्ञावंत हिराईसेमुळे आज लीळाचरित्र अस्तित्वात आहे . असे श्रेष्ठ महत्त्वपूर्ण हिराईसेचे योगदान फक्त पंथीयांसाठी नाही तर समस्त मराठी साहित्यिकांसाठीही आहे . एका टोकाला महदाईसा आणि दुसऱ्या टोकाला हिराईसा यांनी महानुभाव पंथ उचलून धरला . मध्येही अनेक संत महानुभाव महिलांचे योगदान आहे . त्या सर्वांच्या योगदानापुढे मी नतमस्तक होते . अशीच एक महिला आज आपल्यात बसली आहे ती म्हणजे सुश्री केशरताई मेश्राम . यांनाही संत महानुभाव महिला म्हटल्यास वावगे होणार नाही . त्याही संताचेच जीवन जगत आहेत . मनुष्य तीन ऋण घेऊन जन्माला येतो . एक परमेश्वराचे , दुसरे जन्मदात्याचे आणि तिसरे समाजाचे . परमेश्वराचे ऋण आपल्याने फिटू शकत नाही . परंतु जन्मदात्याचे ऋण फेडण्याचा हाही एक मार्ग आहे हे केशरताईंनी समाजाला दाखवून दिले . त्यांचेही अनेक ठिकाणी भरभरून योगदान आहे . त्यांच्याही योगदानापुढे मी नतमस्तक होते आणि सर्वांना दंडवत करून रजा घेते .
पूर्वप्रकाशित-केशर गौरव ग्रंथ


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा