आचारे योग्यता : विचारे दृढता - लेखक:- संदीप तडस

 

आचारे योग्यता : विचारे दृढता

               लेखक:- संदीप तडस

सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी सातत्याने पदभ्रमण करीत. भ्रमंती दरम्यान ते शिष्यांना तसेच लोकांना मार्गदर्शन करीत असत. एकदा श्रीचक्रधर स्वामींचा मुक्काम बेलापूर या गावी होता. तेव्हा भटोबास अर्थात नागदेवाचार्य स्वामींना विचारतात, "जीजी, आचारा विचारा कैसे फळभेद असती?" अर्थात आचारा विचाराने मनुष्याला काय लाभ होतो? यावर स्वामी सूत्र रूपात म्हणाले, 'आचारे योग्यता : विचारे दृढता'. स्वामींनी सांगितलेले हे सूत्र मनुष्य जीवनाला विकार विकल्पापासून दुर नेणारे आणि जीवनाला आकार देणारे आहे. आचाराने मनुष्य जीवनाला योग्यता लाभते तर विचाराने दृढता. आचार आणि विचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नाण्याची एखादी बाजू अस्पष्ट किंवा फसवी असली तर ते नाणे बाजारात चालत नाही. त्याचप्रमाणे आचारा विचारा पैकी नुसते आचाराने किंवा फक्त विचाराने पुढे जाता येणार नाही. विचारयुक्त आचार आणि आचारयुक्त विचार हे मनुष्याच्या सुख शांतीचे आणि आनंदाचे गमक होय. हे दोन्ही सोबत असेल तर मनुष्य जीवनाचे कल्याणच होईल. आचारा शिवाय विचार निष्फळ ठरतो. तर विचाराशिवाय मनुष्य आचाराकडे वळत नाही. याकरीता मनुष्याने मनबुद्धी च्या पाटीवर विचाराचे सृजन लेखन केले की विचारांचे प्रशस्तीकरण होते. तत्ववेत्यांनी सांगितलेले विचार हे सैद्धांतिक( तत्व) असतात. एखादी व्यक्ती सुद्धा विचाराचे निर्माण करीत असते किंवा महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. विचार क्रीया प्रथमतः मानसिक पातळीवर होऊन नंतर त्याचे पृथःकरण करण्याचे काम आपली विवेकबुद्धी करीत असते. विवेकाने बुद्धी वापरली की मग खऱ्या अर्थाने विचार विवेकाचे प्रशस्तीकरण झाल्याचे दिसते किंवा अनुभवास येते. मनुष्याची विचार प्रक्रिया संस्कार ,अनुभव आणि अनुभूती व कृतिशिल उपयोजित इच्छाशक्तीच्या बळावर घडत जाते. पुढे सकारात्मक तत्वदृढता अर्थात विचार दृढता प्राप्त होते. विचार ही थेअरी अर्थात सिद्धांत आहे. शब्द, वाक्य, आकार, ऊकार, संस्कार आणि प्रतिमांचा उपयोग या विचार तत्वात केला जातो. मनुष्य जेव्हा विचाराचे सैद्धांतिकीकरण करण्याचा किंवा एखाद्या सिद्धांताचे उपयोजन स्वतःकरीता करीत असतो, तेव्हा तो अविचाराच्या अडथळ्याची शर्यत एका अर्थाने पार करीत असतो. विचाराची नीरक्षीरता केवळ विवेकानेच प्राप्त होऊ शकते. म्हणूनच सर्वज्ञ म्हणतात की, विचाराची दृढता खऱ्या अर्थाने मनुष्याला योग्य आचाराकडे घेऊन जाते आणि त्यास योग्यता लाभते. याकरीता स्वामींनी आपल्याला प्रथम विचाराची थेअरी सांगितली. नंतर आचाराचे प्रॅक्टिकल करायला सांगितले. विचाराच्या दृढ तत्त्वावरच आचाराच्या प्रॅक्टिकलची अंमलबजावणी करावयाची असते. विचार हा आचारावर कळत नकळत प्रभाव पाडीत असतो आणि आचार विचाराला अधिकाधिक दृढता प्राप्त करून देतो. म्हणूनच आचार-विचाराचा परस्पर संबंध( रेसीप्रोकल) असल्याने त्या एका नाण्याच्याच दोन बाजू आहेत. समांतरपणे एक बाजू दुसरीला घेऊन चालत असते तर दुसरी पहिलीला. मग येथे विचार श्रेष्ठ की आचार श्रेष्ठ हा मुद्दाच गौण ठरतो. कारण अंमलबजावणी करतांना दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. ज्ञानयुक्त आचार आणि निष्ठायुक्त समर्पित विचार विशिष्ठ पातळीवर वेगळे करताच येत नाही. मात्र मनुष्याच्या जीवनात नुसता विचार असेल आणि त्यानुसार आचरण नसेल तर त्याच्या विचाराचे उपयोजन अमंलबजावणीच्या पातळीवर फसलेले असते. दुसऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की, आचाराच्या प्रॅक्टीकलला विचाराच्या साधनसामुग्रीची गरज असते. आचारा विचाराची सांगड एकजिनसी असली की आचारा विचारात तफावत आढळत नाही. फारच थोडक्या विशिष्ठांच्या बाबतीत आचार-विचार या दोन्ही बाबी वेगळ्या करताच येत नाहीत. तर एकीकडे बहुतेकांच्या जीवनात आचार विचार भिन्नता आढळते. म्हणुनच आचार विचार हे व्यक्ती सापेक्ष आहेत. काहींना ते योग्य वाटतात तर काहींच्या दृष्टीने ते अयोग्य ठरतात. फारच थोडे आचार विचार पाळतात. मात्र माणसाचे आचार-विचार योग्य असेल तर त्याला उत्तम जगता येईल. उत्तम आचार विचाराने मनुष्याला आपले जीवन यथार्थपणे आनंदी करता येईल. परंतु जेव्हा आचार विचाराचा समन्वय नसतो किंवा त्यादृष्टीने मनुष्याची वाटचाल होत नाही तेव्हा त्याच्या जीवनाचे दुःखाच्या वाळवंटात रूपांतर होते. खरे तर, विचार ही आंतरक्रिया आहे जी मानसिक पटलावर कार्य करते तर बाह्य स्वरूपात ती आचाराने व्यक्त होते. म्हणजेच देहिक- मानसिक क्रियेद्वारे आचार-विचाराच्या अभिव्यक्तीचे प्रगटन होते. स्वामींनी आपल्याला आचार विचारांचे शास्त्र प्रथम ऐहीक- देहीक पातळीवर भौतिकदृष्ट्या दृष्य स्वरूपात समजावून सांगितले. आणि नंतर  पारमार्थिक अंगाने अदृष्टपर स्वरूपात स्पष्ट केले. कारण विचार ही मानसिक क्रिया तर आचार ही प्रामुख्याने देहिक अर्थात शारीरीक क्रिया आहे.  याकरिता स्वामींनी 'विकार विकल्प शून्य: स्वभावमात्रे ' हे सूत्र सांगितले. विकार हा इंद्रीयधर्म आहे जो शरीरावर असणार्‍या पंचेंद्रिया मार्फत प्रकट होतो. तर विकल्प हा मनोधर्म आहे. जो मानसिक पातळीवर अविचाराने व्यक्त होतो. म्हणून स्वामींनी प्रथम विकार- विकल्पाचे म्हणजेच शारीर- मनाचे नियमन करायला सांगितले असून देहाच्या अष्ट स्वभावाला मात्रा द्यायला सांगितली आहे. हे  स्पष्ट करतांना स्वामींनी आपल्याला प्रथम शरीरशास्त्र (फिजिओलॉजी) आणि मानसशास्त्र (सायकॉलॉजी) तसेच व्यक्तीगत व सामुहीक वर्तणुक व वागणुकीचे समाजशास्त्र( सोशोलॉजी) समजावून सांगितले.आणि नंतरच्या टप्यात आध्यात्मशास्त्राचे गमक स्पष्ट केले. कारण मन देहाच्या क्रिया तंत्रशुद्ध पद्धतीने समजून घेतल्याशिवाय पारलौकिक तत्वाकडे जाता येत नाही. कारण मनुष्य जीवाचा पारलौकिक तत्वाकडे जाण्याचा मार्ग ऐहीकाच्या खिंडीतूनच पुढे सरकतो. आणि या खिंडीतली लढाई घनघोर असते. म्हणून स्वामींनी आपल्याला या ऐहीक- देहीक पातळीवरील आचारा विचाराचे सुयोग्य नियोजन आणि नियमन करायला सांगितले. फारच अप्रतिमतेने स्वामींनी मनुष्य जीवाला व्यवहारशास्त्र आणि आध्यात्मशास्त्र समजावुन दिले. आपल्या आजच्या जगण्यातले ताणतणाव आणि संघर्षाची उत्तरे स्वामींनी तत्वज्ञानात सांगितली आहेत. उत्तरांच्या शोधात असलेल्या काहींना मुळात प्रश्नच समजलेले नाहीत किंवा बहुतांशांना समजुन घ्यायचे नाहीत. परंतु ज्यांना वास्तवाच्या जगण्या मरण्याचे आणि त्याहीपलीकडली अनाकलनीय प्रश्न सर्मपकपणे समजुन घ्यायची असतील. आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधायची असतील तर स्वामींचे तत्वज्ञान दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शन करते. म्हणूनच मग स्वामींचे आचारा विचाराचे नीतिशास्त्र मनुष्याला व्यक्ती विकासाच्या प्रगतीपथाकडुन जीव उन्नयणाच्या दिशेने झेप घ्यायला लावतं. "आचारे योग्यता: विचारे दृढता" हे स्वामींचे सुत्र हेच सुचविते की, मनुष्याने ऐहीक- भौतिक जीवनाची खिंड सुयोग्य आचार विचाराने लढविली की, परमार्गाच्या अनवट वाटेवरची त्याची विजयी वाटचाल त्याला कैवल्याच्या मोक्षधामाला घेऊन जाते.


लेखक:-  संदीप तडस शिरजगावकर

                  अमरावती

          मो. क्र.९७६३७९६४२४

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट