बाइ : तुम्ही राजकुमरें कीं ! - डॉ . हंसराज जाधव



बाइ : तुम्ही राजकुमरें कीं !

डॉ . हंसराज जाधव

मराठी विभाग , प्रतिष्ठान महाविद्यालय , पैठण.


                 सर्वज्ञ श्रीचक्रधरांनी महत्त्वाचे तीन बंड केले . पहिले धर्मसत्तेविरुद्धचे बंड , दुसरे स्त्री स्वातंत्र्याचे बंड आणि तिसरे भाषेचे बंड . धर्मसत्तेने लादलेल्या देवी - देवता आणि त्यांची पूजाअर्चा , व्रतवैकल्ये याविरुद्ध आवाज उठविला . उच्चवर्णीयांची मक्तेदारी मोडीत काढत सर्वांनाच मोक्षाचा म्हणजेच स्वातंत्र्याचा अधिकार असल्याची दवंडी पिटवली . आपण स्वतःच ईश्वर असल्याचे निर्भीडपणे सांगितले हे धर्मसत्तेविरुद्धचे बंड . लोकांच्या तोंडी असलेली भाषा हीच निरूपणाची भाषा ठरवून प्राकृतला - मराठीला ' देववाणी'चा दर्जा मिळवून दिला . संस्कृतला नाकारून लोकभाषेचा - मराठीचा आग्रह धरला आणि त्याची अंमलबजावणीही केली हे भाषेचे बंड ! या दोन्हींबरोबरच ( किंवा यापेक्षाही ) मला त्यांचे सर्वांत मोठे बंड वाटते ते स्त्रीस्वातंत्र्याचे . कारण श्रीचक्रधरांना आयुष्यात जी काही किंमत मोजावी लागली , त्यांच्यावर जे जीवघेणे हल्ले झाले , ज्या शिक्षा सुनावल्या गेल्या त्या सर्वांच्या पाठीमागे स्त्रियांना वेधणे ' हा मुख्य आरोप होता . श्रीचक्रधरांनी आयुष्यभर जो स्त्रीमुक्तीचा विचार पेरला त्याचा तो परिणाम होता . त्यांच्या जीवनकार्याचा एकूणच रोख लक्षात घेता स्त्रियांच्या मुक्तीचा विचार हा त्यांच्या जीवनाचा प्रधान हेतू दिसतो.त्यांच्या ' एकांता'चा शेवट होऊन ' लोकांता'ची सुरुवात झाली तीच मुळात ' बाइसा ' नामक एका स्त्रीच्या भेटीने ! जी बाइसा पुढे श्रीचक्रधरांच्या मार्गाची ' कारभारी ' झाली . श्रीचक्रधरांच्या परिवारात पुढे पुरुषांच्या बरोबरीने अनेक स्त्रिया सामील झाल्या . आबाइसा , महदाइसा , एकाइसा , उमाइसा , आउसा यासारख्या होरपळलेल्या , घटस्फोटित , विधवा , टाकलेल्या , पिचलेल्या परंतु विद्वान , कर्तव्यदक्ष अशा अनेक स्त्रियांची दुःखे , परंपरेतील त्यांचे स्थान हे सर्व पाहून ' स्त्री ' हा श्रीचक्रधरांच्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाल्यास त्यात नवल ते कसले ?


स्त्रिया दर्शनासाठी अधीर

         पदोपदी समाजाकडून अवहेलना सहन कराव्या लागलेल्या स्त्रियांना श्रीचक्रधरांचा आधार वाटणं , त्यांच्या सहवासात राहावं वाटणं किंवा दर्शनाला यावं वाटणं यापाठीमागे स्वामींनी स्त्रियांचा केलेला सन्मान ही गोष्ट महत्त्वाची होती . जिथे ' माणूस ' म्हणूनच जगण्याचे अधिकार नाकारले जातात तिथे कोणाकडून गौरव होतोय म्हटल्यावर ती गोष्ट स्त्रियांना हवीहवीशी वाटणे साहजिक आहे . अशा अनेक स्त्रिया स्वामींच्या दर्शनासाठी यायच्या . स्वामींच्या दर्शनाची त्यांना जणू ओढ असायची . या संदर्भातला एक प्रसंग सांगता येईल . पैठण येथे असताना सारंग पंडित रोज स्वामींच्या दर्शनाला येत असत . स्वामींवर त्याची बुद्धी होती , पण ती अर्धवट . एकदा त्याने चक्रधरांना जेवण्यासाठी घरी बोलावले , पण जेवायला वाढण्यासाठी पत्नी उमाइसेला मात्र पुढे आणले नाही . या निमित्ताने तरी स्वामींचे दर्शन होईल अशी मनीषा बाळगून असणारी उमाइसा काहीशी निराश होते . परंतु , पतीचे बंधन नाकारून ती तूपसाखरभात वाढण्याचे निमित्त करून पुढे येते आणि स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेते . ' राजघराण्यातील राजा रामदेवरायाची पत्नी कामाइसा आणि हेमाद्री पंडिताची पत्नी याच अभिलाषेने स्वामींच्या दर्शनाला यायच्या . स्वामींच्या परिवारात पूर्णवेळ असलेल्या जशा अनेक स्त्रिया होत्या तशा दर्शनासाठी आतुर असणाऱ्या , दर्शनासाठी तळमळणाऱ्याही अनेक सांसारिक स्त्रिया होत्या . स्वामींच्या दर्शनाने सर्व दुःख , ताप हरतील हा त्यांचा समज खरा ठरण्यास अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या .


स्त्रियांचा सन्मान

        श्रीचक्रधर स्त्रियांचा सन्मान करायचे . तो गौरवच त्यांना आत्मबल देणारा ठरायचा . स्वामींच्या दर्शनासाठी येणारे इंद्रभट्ट पत्नी गौराईला मात्र बिढार राखायला ठेवायचे . एकदा गौराई पतीला न सांगता एकटीच स्वामींच्या दर्शनाला येते तेव्हा स्वामी तिचा ' पंच राणेयाचा मुक्ष ( मुख्य ) नायकु ' अशा शब्दांत गौरव करतात . ' शिमग्याच्या दिवशी विचित्र , मळक्या कपड्यात असणारी , दात वेंगाडीत स्वार्मीसोबत शिमगा खेळणारी कामाइसा ( राणाइसाची बहीण ) , स्वामी तिचा अवतार बघून तिची टिंगल न करता तिचा ' इतुकेयांमध्ये सोवासिनी बाई मिरवे गा : ' म्हणत गौरव करतात . देडगावच्या ब्राह्मणाच्या पाच मुली विधवा होऊन घरीच बसलेल्या असल्याकारणाने लोक त्याची ' पांच रांडा आला , पांच रांडा गेला ' अशा शब्दात टिंगल करतात.त्याची हेटाळणी करतात.त्याचे त्याला दुःख होते . तो दर्शनाला आल्यावर स्वामी मात्र त्याची पंचगंगा निकेनि असति ? ' अशा भाषेत विचारपूस करतात . विधवा मुलींचा ' पंचगंगा ' म्हणून गौरव करण्याने तो ब्राह्मण जी जी : निवाला जी : ऐसे मातें कव्हणी न म्हणे जी : ' म्हणत समाधान व्यक्त करतो . ' स्त्रियांच्या स्नेहल स्वभावाचं वर्णन करताना एके ठिकाणी स्वामी ' पुरुखापसि स्त्रिया स्नेहाळूवा ' असं म्हणतात ,

महदाइसेचा ' राजकुमरे ' या शब्दात गौरव

        एकदा महदाइसा भिक्षेला जाते . तिथे तिला गावातील मुले स्नान वगैरे उरकून नटूनथटून खेळत असलेले , लोक झोपाळ्यावर बसून आनंदाने गप्पा मारत बसलेले दिसतात . भिक्षेवरून परतल्यावर ती स्वामींजवळ त्यांच्याविषयी कीव व्यक्त करते आणि आपण यांच्यापेक्षा वर आहोत असे सांगते , तेव्हा स्वामी तिचा ' बाइ : तुम्ही राजकुमरे की ' अशा शब्दांत गौरव करतात .


स्त्रियांच्या मनातला स्त्रीत्वाचा न्यूनगंड कमी केला

            समाजात होणारी सततची उपेक्षा , लोकांच्या बोलण्याने , वागणुकीने स्त्रीत्वाला दोष देत जगण्याची मनोभूमिका असणाऱ्या स्त्रियांचे प्रातिनिधिक रूपही ' लीळाचरित्रा'तून आले आहे . स्त्रीत्वाच्या संदर्भातला हा अपराधीभाव , न्यूनगंड मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न श्रीचक्रधरांनी केला . एकदा भूतानंदी नावाची स्त्री सासूरवास वगैरे सांगून ' स्त्रीत्व वोखटे जी ' म्हणत दुःख करू लागली . तेव्हा स्वामी तिला या जन्मामुळे ' गंधर्व लोकीची राणी व्हाल आणि ऐश्वर्य भोगाल ' असा दाखला देत तिच्या दुःखावर फुकर घालतात , स्त्रीत्वाचे जोखड हलके करतात . ' पिंपळगावची देमाइसा गुरू करण्यासाठी म्हणून श्रीचक्रधरांकडे येते ; परंतु तत्कालीन समाजनियमाप्रमाणे पाठीमागे बसते . स्वामी तिला ' सन्मुख बसा ' असे सांगतात . सामाजिक दडपणामुळे स्वतःच्या अंगी आलेला अपराधीभाव कमी करण्यास स्वामी सुचवतात आणि तशी काळजी घेतात .


स्त्रीला कमी लेखणाऱ्यांची कानउघाडणी आणि शिक्षा

           स्त्रियांच्या संदर्भात उदात्त भूमिका घेऊन तिला सर्वाधिकार देणाऱ्या श्रीचक्रधरांच्या परिवारातील काही शिष्यांच्या अंगी असलेली पुरुषी मानसिकता मात्र प्रसंगानुरूप उफाळून यायची . परिवारातील स्त्रियांचा मुक्त वावर , चर्चेतला त्यांचा सहभाग , एकूणच त्यांना स्वामींनी दिलेले स्वातंत्र्य ह्या गोष्टी काहींना खटकायच्या . आपला पुरुषी अहंकार सांभाळत ते त्यांच्याशी तसा व्यवहार करायचे . परंतु , स्वामींच्या निदर्शनास ती बाब आल्यानंतर मात्र स्वामी त्यांची कानउघाडणी करायचे आणि प्रसंगी त्यांना शिक्षाही करायचे . तिन्ही वेळी स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या गौराइला एक दिवस निरूपण ऐकता ऐकता झोप लागली . बाकीचे सगळे बिढारासी जातात , पण गौराइला उशीर होतो . त्यामुळे तिचा नवरा इंद्रभट तिला रागे भरतो . दुसऱ्या दिवशी दर्शनाला आलेल्या गौराइचा कोमेजलेला चेहरा पाहून इंद्रभटाची ' हां गा इंद्रेया : भक्तीची चाड आणि खुंटदावे सांभाळणे ' अशा शब्दांत कानउघाडणी करतात . स्त्रीला बंधनात ठेवू पाहणा - या पुरुषी मानसिकतेचीच ही एक प्रकारे कानउघाडणी होती . " या संदर्भातली आणखी एक लीळा लक्षणीय आहे . डोमेग्रामी छिन्नस्थळीवर स्वामी निरूपण करीत होते . भोवताली बसलेल्या सिया निरूपण ऐकत होत्या . दर्शनाला आलेल्या सारंग पंडितास ते खटकले . ' स्वामींच्या भोवती बसून कशा गुलुगुलु गप्पा मारताहेत . यांना तेलंगदेशाला पाठवून भात कांडायला लावला पाहिजे आणि मग आपणास मोकळेपणाने स्वामींच्या संन्निधानी राहता येईल ' , अशी मनात अटकळ बांधत स्वामींकडे येणाऱ्या सारंग पंडिताला स्वामी पाण्यात बसण्याची शिक्षा सुनावतात . शिक्षा भोगल्यावर बाइसाच्या विनंतीवरून शिक्षेत थोडीशी सूट देत स्वामी त्यास बोलावतात आणि ' हां गा : तुमचे जीव : मग यांचीया काइ जीवलीया : तुमते आणिक देवो उद्धरिता : आणि काइ याते आणिकू देवो उद्धरिता रक्षेता ? ऐसें न म्हणीजे की : ' अशा शब्दांत त्यास समज देतात . ' स्त्री - पुरुषांच्या बाबतीत समदृष्टी असणारे श्रीचक्रधर आपल्या अनुयायांनी तसे आचरण केले नाही तर उदास व्हायचे , प्रसंगी रागवायचे आणि शिक्षाही करायचे .


आउसेला पुरुषाची जबाबदारी आणि तिला नायकत्व बहाल

          स्वामींच्या परिवारात असणारी आउसा नामक शिष्या पुरुषी प्रवृत्तीची होती . निर्भीड असणारी आउसा कोणत्याही प्रसंगात धाडशीपणाने समोर होऊन काम करण्यास तयार असायची . सामान्यतः सियांच्या ठिकाणी असणारा हळवेपणा , नाजूकता तिच्याठायी नव्हती . याचा स्पष्ट उल्लेख श्रीचक्रधरांनीच केला आहे . एके रात्री विझणाऱ्या दिव्याची वात पुढे सरकवून दिवा प्रज्वलित करण्यास सांगितल्यानंतर आउसा हात पोळून घेते . बाईपणाचं हे साधं कामही तिला करता येत नाही . यावर जवळ असणाऱ्या भटोबासाला स्वामी म्हणतात , ' देखिले गा वानरेया : पोरी आउवेसि मी स्त्री ऐसी बुधीही नाही : पुरुषू ऐसीची बुधि : स्त्रीत्व हे उछेदौनि गेले : आउसेच्या ठिकाणी असलेल्या या पुरुषत्वाच्या गुणधर्मामुळे स्वामी तिला ' नाएक ' म्हणून संबोधतात.एखाद्या स्त्रीला ' नाएक ' म्हणणं आणि तिच्यातलं धाडशीपण ओळखून तिला ' पुरुषी ' कामाची जबाबदारी देणं यातून श्रीचक्रधरांना स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा कोणत्याही कामात कमी नाहीत , हे दाखवून द्यायचे होते , हे स्पष्ट आहे . या भूमिकेतून स्वामींनी तिला एक दिवस बिढार राखण्याचे काम दिले . श्रीचक्रधरांचा परिवार मुक्कामासाठी गावाच्या बाहेर राहायचा . रात्रीच्या वेळी घरटी करण्याची ( राखणदारी ) पाळी प्रत्येकाची असायची . ह्या कामातसुद्धा स्वामी श्रीचक्रधर स्त्रीपुरुष असा भेद करत नसत हे विशेष ! सावखेडा ( जि.औरंगाबाद ) येथे असताना एके रात्री घरटी करावयाची पाळी आउसेवर आली . आउसा दारावर अंथरूण घालून राखणदारीसाठी तयार झाली . परंतु , गावातील चाटेयाचे पोरं मुक्कामी असणाऱ्या या परिवाराला घाबरवण्यासाठी हाती विस्तवाचे इंगळ खापरात घेऊन येतात . ' रानी रहाती : चंदा खाती : चाला रे : जाऊ भेडउ : ' अशा मानसिकतेने आलेल्या या पोरांना सगळे जण झोपलेले असताना आउसा एकटी पळवून लावते.श्रीचक्रधरांचा परिवारच पेटवून द्यावा या उद्देशाने आलेली ही पोरं विस्तवाचे मातीचे भांडे वस्तीवर रिचवितात त्याने आउसा जागी होते . या हल्ल्याला घाबरून न जाता ती साउले फेडीली म्हणजे आपल्या अंगावरील शालू काढून टाकले आणि  त्यांच्याकडे येत ' खाईन रे खाईन रे ' म्हणत त्यांना भेडवते . आउसेचा रुद्रावतार पाहून हल्लेखोर स्वतःच घाबरतात आणि पळून जातात . पळता भुई थोडी होऊन कुणी पडतात , कुणाचे गुडघे फुटतात , कुणाचे दात पडतात , कुणाला जर येतो. रात्रपाळीसारखे अवघड काम देताना स्त्री - पुरुष असा भेद न करणारे श्रीचक्रधर आपल्या शिष्यांच्या ठिकाणी असलेल्या सामर्थ्याची जाणीव असणारे होते.म्हणूनच स्वामींनी आउसेला दिलेले ' नायकत्व ' सार्थ ठरते .


आउसेचा विटाळ मानणाऱ्या दाइंबाला फटकारले

           श्रीचक्रधरांच्या परिवारात स्त्रियांविषयी कलुषित , पारंपरिक भूमिका ठेवून वर्तन करणारे काही भक्त होते . स्वामींच्या संन्निधानी राहूनही स्वत : चा पुरुषी अहंकार सोडण्यास ते तयार नसत . याच मानसिकतेतून वावरणाऱ्या दाइंबाच्या मनात आउसाविषयी भाव नाही ही गोष्ट जेव्हा स्वामींच्या लक्षात येते तेव्हा स्वामी त्याला ' गंगा कवणे आणिली गा ? ' असा प्रश्न विचारतात . महादेवाच्या मुगुटातून निघालेली गंगा , तिचे पाणी तर केव्हाच निगौनि गेले पण त्या मार्गाने येणारे पाणी पवित्र मानून ते पाणी पापा पुरश्चरण करते असे मानतो की नाही ? ' तरी इतुलेयाही संबंधापुरती आउ नव्हे : इचा तुम्ही वीटाळु माना : " अशा शब्दांत त्याला फटकारतात .


स्त्रियांना समाजात उजळ माथ्याने फिरता यावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न

           स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणून पुरुषांच्या बरोबरीने , सन्मानाने , उजळ माथ्याने फिरता यावे यासाठी स्वामी वेगवेगळ्या क्लृप्त्या योजून जाणीवपूर्वक प्रयत्न करीत . एकदा साधा नामक शिष्येला स्वत : च्या श्रीकंठीचा गळदंडा दिला आणि तो गळ्यात घालून सगळ्या बाजारहाटात फिरावयास सांगितले . स्वामींच्या परिवारातील दादोससारख्यांनी स्वामींच्या या कृतीला ' रांडा बाइलांसि माळ देताति ' म्हणून नाव ठेविले , नाक मुरडले . अशा विरोधाला न जुमानता श्रीचक्रधर स्त्रियांना उजळ माथ्याने समाजात फिरता यावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे .


स्त्रियांना प्रश्न विचारण्याची संधी , प्रश्नकर्त्या महदाइसेची प्रशंसा

         श्रीचक्रधरांच्या परिवारात स्त्री शिष्यांची संख्या लक्षणीय होती . त्यात विधवा , परित्यक्ता , अगतिक , असहाय म्रिया जशा होत्या तशाच अनेक स्तरांतील अधिकारी स्त्रियांही होत्या .श्रीचक्रधरांनी अशा सर्वच स्तरांतील स्त्रियांना आपल्या परिवारात सन्मानाने स्थान दिले , प्रतिष्ठा दिली . संन्यासधर्म त्यांच्याकरिता खुला केला . श्रीचक्रधरांच्या संन्निधानातील अनेक स्त्रिया आध्यात्मिक क्षेत्रात ज्ञानार्जन करण्यास उत्सुक होत्या . स्वामींकडे अनेक वेधवंत , बोधवंत आणि दर्शनीय स्त्रिया येत असत . पूर्वसंस्काराच्या परिपाकातून निर्माण झालेल्या त्यांच्या धारणांना श्रीचक्रधरांच्या निरूपणाने तडा जायचा . अशा वेळी त्या खिया पूर्वकल्पनांविषयी , निर्माण होणाऱ्या अनेक शंकाकुशंकांविषयी स्वार्मीजवळ प्रश्न विचारायच्या . दर्शनाला आल्यानंतर व्यावहारिक , आध्यात्मिक वर्तनाविषयी प्रश्न विचारायच्या . व्यवस्थेने ज्यांना कधी धड ऐकूही दिलं नव्हतं त्यांना बोलण्याची , प्रश्न विचारण्याची संधी श्रीचक्रधरांनी दिली . ऐकलेलं खरं - खोटं ठरवण्याचा , पडताळून पाहण्याचा अधिकारही दिला . स्वामींनी दिलेल्या या स्वातंत्र्यामुळेच अनेक स्त्रिया बोलत्या झाल्या , प्रश्नकर्त्या झाल्या , महदाइसा हे त्यातलं उत्तम उदाहरण ! स्वामींनी दिलेल्या संधीचा सर्वाधिक फायदा घेतला तो महदाइसेने . नगरातून पुराण ऐकून आल्यावर महदाइसा स्वामींशी ' जी जी : पुराणी ऐकले ते साच जी : ' असा प्रश्न करी आणि पुराणातल्या गोष्टी पडताळून पाही . तिच्याठायी असलेल्या या वृत्तीमुळेच श्रीचक्रधरांना सर्वाधिक बोलतं करण्याचा काम महदाइसेनं केलं . श्रीचक्रधरांनी स्त्रियांना बोलतं केलं , महादाइसेनं चक्रधरांना बोलतं केलं . श्रीचक्रधरांनी आयुष्याच्या उत्तरार्धात केलेलं सर्वाधिक निरोपण हे महदाइसेला निमित्त करून केलेलं आहे . ती काही तरी विचारायची आणि स्वामी त्यावर व्यक्त व्हायचे , भाष्य करायचे . यातूनच अनेक सूत्रे जन्मास आली . दृष्टांत हाती लागले . तिच्या या प्रश्न विचारण्याच्या आणि ज्ञान मिळवण्याच्या भूमिकेमुळेच स्वामी तिची ' म्हातारी चर्चक : जिज्ञासक : एथ काही पुसतची असे : ' या शब्दांत प्रशंसा करतात . श्रीचक्रधरांनी स्त्रियांना प्रश्न विचारण्याची , चर्चा करण्याची संधी दिल्यामुळेच परिवारातील महदाइसेसारख्या अनेक स्त्रिया व्युत्पन्न पंडित बनल्या आणि आध्यात्मिक वादविवादात भाग घेऊन पुढच्याला नामोहरम करण्याच्या पात्रतेच्या बनल्या .


व्युत्पन्न पंडितांशी चर्चेसाठी अनुत्सुक , परंतु सामान्य स्त्रियांसोबत चर्चेसे तयार

           श्री चक्रधरांच्या तेजःपुंज मूर्तीची , त्यांच्या ज्ञानाची , वाणीची चर्चा परिसरात व्हायची . ती चर्चा ऐकून इतर सांप्रदायिक पंडित , गुरू श्रीचक्रधरांशी चर्चा करण्याच्या , स्वामींना अजमावण्याच्या धोरणाने , वादविवाद करण्याच्या ईयेने आवर्जून यायचे ; पण श्रीचक्रधर स्वामी अशा विद्वानांना , वितंडवाद्यांना टाळायचे . परिवारातील काही विद्वान शिष्यही नेहमीच चर्चेवर , वादविवादावर भर द्यायचे . अशा पंडितांना ' चर्चेपेक्षा झोप बरी ' म्हणत अतिचर्चेपासून दूर राहण्यास सांगायचे . म्हणजे विद्वानांशी चर्चा करण्यास फारसे उत्सुक नसणारे आणि विद्वान शिष्यांना चर्चेस नकार देणारे श्रीचक्रधर स्त्रियांना मात्र वेळोवेळी प्रश्न विचारण्याची , चर्चा करण्याची संधी देतात . चर्चा करण्याच्या गुणाची प्रशंसाही करतात , हे विशेष आहे !


नवऱ्याने सोडलेल्या बाईचं बाळतपण

         सर्व प्राणिमात्रांशी कळवळा असणारे श्रीचक्रधर स्त्रियांच्या बाबतीत आणखीनच हळवे होते . स्त्रियांचे दुःख पाहून ते अस्वस्थ होऊन जायचे . स्त्रियांच्या उद्धारासाठी श्रीचक्रधरांनी प्रत्यक्ष कृती केल्याचा दाखला ' लीळाचरित्रा'त येतो . डोमेग्राम येथे असतानाची एक लीळा या चर्चेसंदर्भाने महत्त्वाची आहे . नवऱ्याने सोडलेल्या एका बाईचे बाळंतपण खुद्द श्रीचक्रधरांनी केले . ती लीळा मुळातून वाचली पाहिजे , " एकु दिसु वोळगीया एकाची स्त्री : ते गरोदर : ते मढासी आली : गोसावियांते विनविले : “ जी जी : वोळगियां सांडूनि गेला : मज कोण्ही नाही : सर्वतें म्हणीतलें : बाइ गडबडा ना : यथ असा : मग बाइसातें म्हणीतले : बाइ हे असो देया : मग दारवंठा बिढार दीधले : मग ते मढू झाडी : बाइसें तियेसि जेउं सूति : रेइनाएकाचीये घरिचें म्हणीयें करी : तिये जेउं घालीति : मग तीयेसी नववा मासु रिगाला : मग गोसावी तियेसि झाडूं नेदिती : बाइ यासी झाडू नको देओं : ते करुं रीगे परि बाइसें तियेसि झाडूं नेदीती : एक दिसु उदेयाचां पुजावसर जालेंयानंतरे गोसावी विहरणा बीजें केलें : माघौते मढासी बीजें केले : तव दारवठां मठाचिये पटिसाळेवरि प्रसुती जाली असे : पुढां लेकरूं : गोसावियांतें देखिलें : आणि दुख करूं लागली : जी जी : माए नाही : बहीण नाही : कोण्ही नाहीं जी : मग गोसावी संभाषिली : बाइ : हे सांभाळु करिल : गजबजा ना : दुख न करा : हे असे नव्हे : ' मग गोसावी नाथोबासि म्हणितले : ' मंडळिका : तुम्ही यांचे सुयर करा : जे लागेल तें बाइसांते मागा : हो कां जी : मग नाथोबायें बाज घालौनि तयांते धोउनि बरवा सेकु सगडी : पिंपळीया , चीकसा , न्हाण ऐंसे बारा दिस तयांचे सुयर केले : उदेयाचां पूजावसर जालेंयानंतरे गोसावी तेथ पडिताळावेया बीजें करीति : दारवठां उभे राहुनि पुसेति : काइ बाइ : सुश्रुषा चालति असे : बाळांतीणि बाइ काइ करीतिये ? जी जी : सुखें असें : मग खांडवोसरीचिवरुनि हात जोडी : .... गरोदरपणात एकाकी पडलेल्या बाईची व्यवस्था लावून तिचे ' सुयर ' केवळ परस्पर करवून न घेता तिला काम करू न देणारे , विहरणासी जाता - येता तिची स्वतः विचारपूस करून तिला धीर देणारे श्रीचक्रधर थोरच म्हणावे लागतील . ' पशुपक्ष्याला जर जीव लावला तर ते समोर येतं , मान वर करतं ; पण जर आपण त्याचा धिक्कार करीत त्याला दूर लोटलं तर तेही निघून जातं . हा तर मनुष्यदेह आहे ' असं सूत्र सांगत माणसाला जवळ करण्याचा जणू संदेशच ते या लीळेतून देतात .


स्त्रियांना विटाळ धर्म न पाळण्याची शिकवण

            स्त्रियांच्या शरीरधर्माचं नीट आकलन न करता स्त्रियांचा विटाळ मानणं , तिला दूर बसवणं , घरातल्या दैनंदिन कामातून दूर ठेवणं ह्या गोष्टी आजही सुरू आहेत . याविषयीची अंमलबजावणी बाराव्या शतकात किती कडक असेल , याची कल्पना करवत नाही . पुरुषसत्ताक व्यवस्थेने लादलेल्या गुलामगिरीला निमूटपणे सहन करण्याशिवाय कोणताही पर्याय तत्कालीन लियांकडे नव्हता . श्रीचक्रधरांनी या विषयाला हळुवारपणे हात घातला . श्रीचक्रधरांनी खियांच्या विटाळ धर्माचे अत्यंत सोप्या शब्दांत विश्लेषण केले आहे . ' लीळाचरित्राच्या उत्तरार्धात ' उमाइ नमस्कारे अंगुठा लावणे ' या शीर्षकाखाली आलेली लीळा मुळातून वाचण्यासारखी आहे . " एकू दिसू गोसावियांसी उदियाचा पुजा अवसर जाला : मग गोसावी वीहरणासि बीजें करिताति : तवं उमाइसे दक्षीणीली दारवठां पसीमीलीकडे बैसली असति : तीये अस्परीसे होतो : आळगौनिचि गोसावीयांचेया श्रीचरणा लागली : गोसावी चरण साउमा केला : श्रीचरणीचा आंगुठा तयाचा नीडळी लावीला : आणि तीये संकली : सर्वतें म्हणीतले : हे काइ बाइ : येथचेया आंगुठेया वीटाळु केला : ना जी : मीया तरि नाही केला : गोसावीची श्रीचरणु वरुता केला : सर्वज्ञ म्हणीतलें : वानरेया : एथचेया आंगुठेया वीटाळु जाला गा : केदारा नेयावा लागैल गासलीनाथा नेयावा लागैल गा : तेही म्हणीतलें : पापीणी : गोसावीयांचेया आंगुठेयासि वीटाळु जाला : सर्वज्ञे म्हणीतलें : ' तैसे नाही बाइ : नव नाडी : बाहात्री कोठे : नव्हा नाडीमंदी हे एकी नाडी : बाइ : एकी नाडी कृष्णा : एकी नाडी सुक्ला : कृष्णा नाडी वीटाळु होआवा आणि सुक्ले का न व्हावा : एकी वाहे उर्धे : एकी वाहे अधे : नव द्वारे आहाति : मल : मुत्र : सेंबुड : डोळे हागती : तैसे हे एकी धातु सवे : नीवर्ते : याचा वीटाळु धरु नेये : जरी धरीजे तरि प्रतदेह होये : ' ' तरि आजी लागौनि न धरी जी : एकी वासना : हे लीळा देउळांतु रीगता पुर्वीले द्वारी आसन होउनि जाली : या लीळेतून श्रीचक्रधर ' मासिक पाळी'सारख्या नैसर्गिक प्रक्रियेचं अगदी सोपं विश्लेषण करतात . शरीराच्या नवद्वारातून ज्या पद्धतीनं मलमूत्र , शेंबूड , मळ , चिपड बाहेर येतो त्याच पद्धतीनं कृष्णा नाडीतून एक धातू सवतो . त्याचा का विटाळ मानावा ? इतर नाड्यांतील धातूचा विटाळ आपण मानत नाही . अगदी त्याचसारखा हा धातू आहे . श्रीचक्रधरांच्या या निरूपणाने उमाइसा ' तरि आजी लागौनि न धरी जी : ' अशी ग्वाही देते . एखाद्या प्रसंगी पुढ्यात आलेल्या गंभीर विषयावर सर्वसामान्य भक्तांना , सियांना कळेल अशा भाषेत विश्लेषण करताना विनोद करण्याची , गंमत करण्याची त्यांची हातोटी श्रोत्यांना भावते आणि ते तत्काळ चूकदुरुस्तीला तयार होतात . विटाळशी झाले म्हणून दुरून नमस्कार करणाऱ्या उमाइसेच्या कपाळाला स्वामी जाणीवपूर्वक अंगठा लावतात आणि ' आता अंगठ्याला विटाळ झाला . त्याचा विटाळ काढायला मल्लिनाथाला , केदारनाथाला न्यावं लागेल ' म्हणत उपरोधातून त्यातला फोलपणा दाखवतात . अशा सोप्या विश्लेषणाने प्रभावित होऊन एका क्षणात उमाइसा पिढ्यान्पिढ्यांचं जोखड फेकून देत ' तरि आजी लागौनि न धरी जी ' म्हणत बदलाची , विटाळधर्म न पाळण्याची ग्वाही देते . स्वामींच्या विश्लेषणाच्या सोप्या पद्धतीचा हा परिणाम म्हटला पाहिजे .


स्त्रियांच्या सामर्थ्याची जाणीव , परंतु स्त्री - पुरुष एकच अशी गफलत केली नाही

           स्त्रियांच्या ठायी असलेली क्षमता लक्षात घेऊन स्वामींनी मार्गाचा कारभार बाइसाकडे दिला . स्त्रियांना प्रश्न विचारण्याचा , धर्मचर्चेत सहभाग घेण्याचा , मोक्ष मिळविण्याचा अधिकार असल्याचे ठणकावून सांगत स्त्रीस्वातंत्र्याचा पुरस्कार केला . त्यासाठी समाजाचा रोष पत्करला . तरी स्त्री - पुरुष अशा नैसर्गिक भेदाचे मात्र त्यांना आकलन नव्हते , असे कसे म्हणता येईल ? काही नैसर्गिक मर्यादा जशा स्त्रीला आहेत तशाच त्या पुरुषांनाही आहेत . स्त्रियांच्या नैसर्गिक मर्यादांची जाणीव चक्रधरांना होतीच . आउसेला ' नायकू ' म्हणत रात्रपाळीसारख्या ' पुरुषी ' कामाची जबाबदारी तिच्यावर सोपवतात . ती घाबरत नाही . हल्ला करावयास आलेल्या चाटेयाच्या पोरांना पळवून लावते.आउसेच्या या धाडसामुळे आणि एकूणच तिच्या वर्तनामुळे स्वामी तिच्याविषयी बोलताना ' आउवे ठायी स्त्री ऐसी बुधी नाही : ' असे उद्गार काढतात . असे असले तरी स्त्री - पुरुष एकच अशी गफलत मात्र ते करीत नाहीत . दोहोंच्या पृथक जबाबदारीचे भानही नेमकेपणे ते सांभाळतात . या संदर्भातली एक लीळा उत्तरार्धात ' आउवेचा नागदेव करणे ' या शीर्षकाखाली आली आहे . " भट गोसावीयांचे सेवादास्य करीति : ते आउसे देखती : मग एक दिसु लघुपरिश्रया बीजें केलें : भट सागळ सांघाते घेऊनि नीगाले : तवं आउसा ऐसे जालें : ' आहा मी पुरुखु होतीये का : तरि मीही गोसावीयांचे सेवा दास्य करीतीये : ' गोसावी लघुपश्रयो सारुनी बीजें केलें : गोसावी आसनी उपवीष्ट जालें : तव आउसी म्हणीतलें : ' जी : स्वामी जगन्नाथा आउवेचा नागदेवो कीजो आणि नागदेयाची आउ कीजो जी : ' सर्वज्ञे म्हणीतलें : ' ऐसे न कीजे नायका : आउवेचा नागदेवो न कीजे : आउ ते आउ : नागदेवो तो नागदेवो नायकाः "


स्त्रीवादी संकल्पनेचं देशीवादी रूप

          उपरोक्त लीळेतली स्वामींची भूमिका देशीवादी म्हटली पाहिजे . पाश्चात्त्य स्त्रीवादी चळवळीचा परिणाम म्हणून तीच स्त्रीवादी भूमिका घेणाऱ्या चळवळीची आणि स्त्रीवादी साहित्याची सुरुवात भारतातही झाली . स्त्री पुरुषांपेक्षा कुठेच कमी नाही म्हणत स्त्रीला ' पुरुष ' करणं हा एकमेव अजेंडा या चळवळींनी राबवलेला दिसतो . परंतु , स्त्रीतल्या नैसर्गिक वेगळेपणाला आणि वेगळेपणातल्या सामर्थ्याला नजरेआड केलेले दिसते . या चळवळींना श्रीचक्रधरांच्या उपरोक्त विधानाचं नीट आकलन झालेलं दिसत नाही . ' आउ ते आउ : नागदेवो तो नागदेवो ' . स्वामी स्त्री - पुरुष , आउ - नागदेव एकच अशी गफलत करीत नाहीत . स्त्रियांच्या ठिकाणी काही सामर्थ्य आहेत तशाच काही मर्यादाही आहेत . हाच नियम पुरुषांनाही लागू होतो . स्त्रियांना पुरुषाच्या आणि पुरुषांना स्त्रियांच्या भूमिकेत पाहणं आणि त्यासारखा व्यवहार करणं ना उचित आहे ना व्यवहार्य !


स्त्रियांना लज्जारूप धर्म सांभाळण्याचा सल्ला

          स्त्रियांनी विटाळ धर्म पाळू नये . ती एक नैसर्गिक क्रिया आहे . यासंबंधीचा आदेश देणारे श्रीचक्रधर स्त्रियांना लज्जारूप धर्म सांभाळण्याचा सल्ला मात्र जाणीवपूर्वक देतात . लज्जारूप धर्म सांभाळण्यानेच स्वतःचे रक्षण होते अशा अर्थाचे निरोपण नेवासा परिसरात असताना द्रळसबाइसा या शिष्येला निमित्त करून स्वामींनी केले . ती लीळा ' द्रळसबाइसी सीक्षापण ' या शीर्षकाखाली आली आहे . ' गोसावीयांसि सोंडीयेवरि आसन असे : तवं द्रळसबाइ तयाचे अंग घामैले : तेही म्हणीतले : ' घामैजेले आंगेसी गोसावीयांचीया दरीसना कैसे जावो ? ' म्हणौन वाहाळेसी आंग धो बैसली : तेथ हात पाये धुताति : तवं बाइसी म्हणीतले : देखिले बाबा : काइ जाले या रांडासि ? अवघिया काखा : बाहीया उघडीया घालुनि हात पाये धुताये : अवघा लोकु देखताये : ' तवं तीया आलीया : गोसावीयांसी दंडवते घातली : श्रीचरणा लागली : मग सर्वज्ञे म्हणीतले : हे काइ बाइ : हे देखताये : हा अवघा लोकु देखताये : ऐसे न कीजे की : लज्जारूप धर्म स्त्रीयांसि रक्षेणु : आपली मांडी पर पुरुषासि देखो ने दीजे की : ऐसे गोसावी सीक्षापण कले : सार्वजनिक ठिकाणी पुरुषाला दिसेल अशा पद्धतीने काखा , बाह्या उघड्या करून हात पाय धुणाऱ्या द्रळसबाइसेला फटकारणाऱ्या श्रीचक्रधर स्वामींचे हे विचार आजच्या काळात पडताळून पाहयला हवेत . श्रीचक्रधरांच्या अशा काही सूत्रांना स्त्रीस्वातंत्र्यविरोधी ठरविण्याचा धोका निर्माण होऊ शकतो ; परंतु साधेला श्रीकंठीचा गळदंडा देऊन तो गळदंडा गळ्यात घालून गावभर मिरवायला सांगणारे श्रीचक्रधर सार्वजनिक ठिकाणी मात्र अशा पद्धतीने हातपाय धुण्याला विरोध करतात.समाजाची लाज बाळगण्याचे आवाहन करतात . यातली त्यांची भूमिका आपण नीटपणे समजून घेतली पाहिजे .


स्त्रीच्या संरक्षणाची काळजी

          लज्जारूप धर्म पाळण्याच्या सूचनेमागे स्वामींची मूळ मनोभूमिका , तळमळ ही स्त्री संरक्षणाची होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे . सर्व समाजाचा रोष पत्करून , निंदानालस्ती , टोमणे - बोलणे सहन करून स्त्रीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या श्रीचक्रधरांना स्त्रियांच्या संरक्षणाची काळजी वाटणे स्वाभाविक आहे . त्याविषयी भीती वाटणे साहजिक आहे . म्हणून अशा हल्लेखोर समाजाविषयी जागरूक राहण्याचे सूतोवाच ते करतात . स्त्रियांना वेधून घेतो ' अशी हाकाटी उठवत श्रीचक्रधरांची बदनामी करण्याचे एक षड्यंत्र तत्कालीन विरोधकांनी आरंभिले होते . त्याच विरोधी भूमिकेतून स्वामींना , त्यांच्या परिवारातील भक्तांना , स्त्री शिष्यांना त्रास देणे सुरूच होते . भीती डोळ्यांसमोर ठेवून स्वामी स्त्रियांना जागृत करतात .साधेला संन्यास दिल्यानंतर अटनविजनाचा नियम समजावून सांगताना स्वामी ' मागी'ची एकली स्त्री एका गावाहून दुसऱ्या गावी जाताना ' पाहाताचि उठिजे : मार्गी उभीया राहिजे : सांगात पाहीजे : मागीले म्हणति पुढिलाची : पुढील म्हणति मागिलाची ' असे चालावे . स्त्रियांनी एकट्याने प्रवास करू नये , असे सुचवताना दोन्हीकडूनही सुरक्षित अंतराने चालावे अस सागतात . रात्रपाळीला बिढार राखण्याचे जोखमीचे काम पुरुषांच्या बरोबरीने आउसेसारख्या धाडसी स्त्रीला देणारे श्रीचक्रधर स्त्रीच्या संरक्षणाच्या बाबतीत निष्काळजी होते , असे नाही . स्त्री पुरुषांइतकीच सामर्थ्यशाली आहे , हे सांगणारे श्रीचक्रधर स्त्रीच्या संरक्षणाची काळजी घेण्याची सूचना परिवारातील पुरुष भक्तांनाही देतात . या संदर्भातील एक लीळा उत्तरार्धात आली आहे . संध्याकाळी बिढारावर नवऱ्याला तहान लागल्याचे पाहून राणाइसा त्याच रात्री गळ घेऊन पाणी आणायला विहिरीवर जाते ; परंतु विहिरीत उतरावयाचा रस्ता न दिसल्यामुळे ती विहिरीभोवती फिरत राहते . नाथोबाकडून हा वृत्तांत स्वामींना कळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वामी दर्शनाला आलेल्या दादोसला ( राणाइसेचा पती ) ' माहात्मे हो : एकली स्त्री एवढेया वेळा तैसेया स्थाना न धाडीजे की : ' असे खडे बोल सुनावतात . बायकांना काम सांगून निवांत लोळणाऱ्या नवऱ्यांनाही स्वामींनी एक प्रकारे फटकारले आहे .


स्त्रियांची श्रमनिवृत्ती आणि स्वतः जेवू घालणे

           श्रीचक्रधरांचा ' मार्ग ' म्हणजे थकल्या - भागल्या जीवांचे आश्रयस्थान . शिणलेल्या , पोळलेल्या स्त्रियांना आधार वाटणारं ठिकाण . थकून आलेल्या महिलांची सेवा करण्याची सूचना स्वामी मार्गातल्या इतरांना करायचे . या संदर्भातली एक लीळा उत्तरार्धात आली आहे . अटनविजन करून आलेल्या देमाइसा , एकाइसा या दोन शिष्या स्वामी प्रतिष्ठानी ( पैठण ) असताना भेटीला येतात ; परंतु पायी प्रवास करून थकून गेल्याचे कारण सांगत एकाइसा अगोदर सारंग पंडिताच्या घरी जाऊन शिणभाग फेडून ( विश्रांती घेऊन ) मग स्वामींच्या दर्शनाला जाऊ , असा विचार मांडते . त्याउलट देमाइसा मात्र आले तसे थेट स्वामींच्या दर्शनाला जाऊ , असा हट्ट धरते आणि एकाइसेला सोडून थेट स्वामींच्या दर्शनाला येते . थेट भेटीला आलेल्या देमाइसेची स्वामी बाइसेला सांगून श्रमनिवृत्ती करवतात . बाइसा तिचे पाय धुते , विचारपूस करते .परिवारातील स्त्रियांच्या जेवणाकडे स्वामी जातीने लक्ष देत . त्यांना आग्रहपूर्वक जेवू घालत . एकदा साधेला आग्रहपूर्वक दूधभाताचे जेवण स्वत : वाढल्याचा प्रसंग ' लीळाचरित्रात आला आहे .


कलावंतीण स्त्रीची प्रशंसा

         श्रीचक्रधरांनी स्त्रियांचा गौरव व्हावा , त्यांना प्रतिष्ठा मिळावी यासाठी स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला . त्यांच्याठायी असलेल्या गुणसामर्थ्याला ओळखून त्यास उत्तेजन देण्याची भूमिका घेतली . तत्कालीन समाजाने कोणत्या न कोणत्या नावाखाली स्त्रीला तुच्छ लेखण्याचा , दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला होता . बालविधवा , टाकलेल्या , परित्यक्ता यांच्याबरोबरच तत्कालीन काळातील आणखी एक उपेक्षित स्त्रीघटक म्हणजे कलावंतीण . आपली कला नाचगाण्याच्या माध्यमातून प्रदर्शित करून स्वत : चा उदरनिर्वाह चालविणाऱ्या नर्तकीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन कलुषितच होता . श्रीचक्रधरांनी एका प्रसंगी अशा नर्तकीचं नृत्य पाहून तिच्या कलेची कदर करत तिची प्रशंसा केली आहे . स्वामी स्वत : कलेचे रसिक आणि उत्तम जाणकार असल्यामुळे त्या नर्तकीला कित्येक दिवसांनंतर एक जाणकार रसिक भेटल्याचे समाधान वाटले . ती नर्तकी समाधान व्यक्त करताना , ' जी जी : जाणेवीण कळा मावळीया जी : जाणेवीण कला पोरटीया जालीया जी : आजि कलेचे माहेर भेटले : गोसावी सकळ विद्येचे माहेर :असे उद्गार काढत समाधान व्यक्त करत . नर्तकीचा ताल चुकला की स्वामी खदाखदा हसत आणि तिला तिच्या चुकांची जाणीव करून देत . त्यांच्या मर्मज्ञतेवर आनंदित झालेल्या नर्तिकेने ' गोस्फुरण ' हा नृत्यातला अवघड प्रकार करून दाखवला आणि श्रीचक्रधरांनी तिची प्रशंसा केली . हीन समजल्या गेलेल्या कलावंत स्त्रीकडे पाहण्याचा श्रीचक्रधरांचा उदात्त दृष्टिकोन आणि कलेविषयीची त्यांची उत्तम जाण या दोन्ही गोष्टींचा प्रत्यय आपणास या लीळेतून येतो .


समारोप

         स्त्रियांना आत्मसन्मान देत त्यांच्यातल्या सामर्थ्यांना ओळखून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न श्रीचक्रधरांनी केला . धर्मचर्चेत सहभाग देऊन त्यांच्या मताचा आदर केला . पुरुषांच्या बरोबरीने त्याही मोक्षाच्या अधिकारी आहेत ही गोष्ट वारंवार सांगितली . हे सर्व करताना त्यांना समाजाकडून अतोनात छळ सहन करावा लागलेला , प्रसंगी जीवघेणे सहन करावे लागले . अशा पार्श्वभूमीवर श्रीचक्रधरांनी केलेल्या या अजोड कार्याचे आपण कधीही विस्मरण करू शकणार नाही .


पूर्वप्रकाशित शोधनिबंध

१) अक्षरगाथा ऑक्टो-नोव्हे २०२०

२) केशर गौरवग्रंथ

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट