माणसातला 'देवमाणूस' : वैराग्यमूर्ती दत्ताबापू ! -डॉ. हंसराज जाधव
माणसातला 'देवमाणूस' : वैराग्यमूर्ती दत्ताबापू !
महानुभाव पंथातील महंतांना,आचार्यांना,संन्यासी साधूंना भारतीय समाजव्यवस्थेत रूढ असलेली 'संत' ही उपाधी लावण्याची पद्धत नाही.ते स्वत: म्हणवत नाहीत किंवा इतरांनीही त्यांना 'संत' म्हणून संबोधण्याचा अट्टहास केला नाही. आपल्या शिकवणूकीतून,आचरणातून समाजाला सन्मार्गाची दिशा देणारा आणि समाजहितासाठी स्वत: कार्यप्रवृत्त होणारा खर्याअर्थाने 'संत'. हदगाव (जि.नांदेड) येथील वैराग्यमूर्ती दत्ताबापू महानुभाव हे याअर्थाने संतच. केवळ महानुभाव पंथीयच नव्हे तर मराठवाडा आणि विदर्भातील सामान्य,गरीब श्रद्धाळू लोकांचे श्रद्धास्थान असलेले ते एक आधुनिक काळातील संतच होते.
श्रीगोविंदप्रभूंचे वारसदार : दत्ताबापू हे खर्या अर्थाने गोविंदप्रभूंचे वारसदार होते. रुद्धपुरच्या परिसरात गोरगरीब,सामान्य लोकांच्या अडीअडचणीला धावून जात कुठल्याच भेदभावाला थारा न देता आपलं जीवन व्यतीत करणारे श्रीगोविंदप्रभू सर्वांचे 'राऊळ माय,राऊळ बाप' होऊन गेले होते. स्वत:चा वेडापिसा अवतार करून ते समाजाला शहाणे करण्यास सज्ज झाले होते.
दत्ताबापूंनी श्रीगोविंदप्रभूंना आपल्या आत अंतर्बाह्य उतरविले होते असेच म्हणावे लागेल.दाढी-डोई चे केस आणि हातापायाची नखेही तसीच वाढलेली.बर्याचदा झाडलोट करण्याने नखांतून मळ झालेला. पदर,शर्ट आणि खांद्यावर उपरणं हा त्यांचा पोशाख.पंथीय खूण म्हणून नाही म्हणायला कपड्यांचा रंग गुलाबी होता.परंतू त्यांनी महानुभाव साधू सारखी डोक्यावर विशिष्ट आकाराची टोपी घातल्याचे किंवा महंतासारखा फेटा बांधल्याचे कधी कुणाच्या पहाण्यात आले नाही. त्यांच्या दिसण्या-वागण्याचे आणि सामान्यांसाठी झपाटून काम करण्याचे ‘वेडेपण’ दोन्ही थेट श्रीगोविंदप्रभूंसारखेच.
दर्शनाला येणार्या प्रत्येकाला मग तो कुणी नेता असो अथवा सामान्य धरणकरू,महंत असो वा शेतकरी गृहस्थ सर्वांना दत्ताबापू 'माय-बापू' म्हणूनच बोलायचे.स्त्री असेल तर 'माय' आणि पुरूष असेल तर 'बापू'. प्रत्येकाची जिव्हाळ्याने,प्रेमाने विचारपूस करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते सर्वांमध्ये 'बापू' म्हणूनच सुपरिचित झाले.
सकाळी भल्यापहाटं ऊठणं,शेतावर जाऊन चक्कर मारणं,गोठ्यातली झाडलोट करणं,गुरांना चारावैरण करणं,पिकाची पहाणी करणं आणि सर्व करून गड्यांना दैनंदिन कामाचं नियोजन सांगणं हे बापू न चुकता करायचे.त्यांच्या 'उखळाई' संस्थानला असलेल्या या जमिनीच्या आणि देवस्थानाच्या उत्पन्नातून बापूंनी हदगाव शहरात भक्त निवास,मंगल कार्यालय उभी केली आहेत. केवळ लाईटबील भागवण्यापुरते नाममात्र शुल्क घेऊन आजही ते मंगलकार्यालय सर्वांना उपलब्ध करून दिले जाते. आलेल्या 'धरणकरू' भक्तांसाठी,शहरातील अनाथांसाठी बापूंनी 'निवार्याची' सोय केली आहे.
माहूरच्या दत्ताचं आणि दत्ताबापूचं अभेद्य नातं :
हदगावचे देवस्थान ‘उखळाई’ या नावाने प्रसिद्ध आहे. खरं तर तो माहूरच्या दत्ताचा ‘विशेष’. परिसरातील भक्तांमध्ये उखळाईविषयी जेवढी श्रद्धा तेवढीच उखळाईची निस्सीम भक्ती करणार्या ‘बापूं’ विषयीही. उखळाईवर आणि पर्यायाने दत्तावर बापूंची अपार श्रद्धा असल्यामुळे देव उखळाई ‘बापू’ म्हणेल ते ऐकते असा समज भक्तांमध्ये पसरलेला.त्या समजापोटी अनेकजण बापूंच्या दर्शनाला यायचे.आपले सांसारिक गार्हाणे त्यांच्यापूढे मांडत ते निवारण्याचे साकडे घालण्याची विनंती बापूकडे करत. पहाटे चार वाजता ऊठून तासभर उखळाईची सेवा करणं हा त्यांचा नित्यनेम.आलेल्या पिडीताच्या समोर आसनावरील उखळाईचा विशेष उचलून त्याची पिडा दूर करण्याचे साकडे घालताना बापूंनी थेट दत्तांसी साधलेला संवाद मोठा औत्सुक्याचा आणि आनंदाचा असायचा. त्यांच्या या वेगळ्या कौशल्यामुळेच भक्तांमध्ये ‘बापू थेट दत्ताला बोलतात’ असा समज निर्माण होऊन आपली पीडा दूर होण्याचा एकप्रकारचा आत्मविश्वास निर्माण होई.यात थोडा श्रद्धेचा अतिरेक गृहित धरला तरी ‘पोळलेला जीवाला आधार’ देण्याचे काम बापू निश्चीतपणे करीत. तोही कसल्याच प्रकारचा मोबदला न घेता किंवा बूवाबाजी न करता हे नोंद घेण्यासारखे आहे.
सारे बडेजाव नाकारून : दत्ताबापूंच्या या लोकाभिमुख संतवृत्तीमुळे त्यांचे सर्व स्तरातून भक्त निर्माण झाले.राजकारणी,व्यापारी,श्रीमंत,महंत सारेच दर्शनासाठी आणि बापूंची कृपा प्राप्त करण्यासाठी धडपड करायचे.या सर्व गोष्टीमुळे उखळाई देवस्थानला अनेक गोष्टी मिळायला लागल्या.परंतु बापू मात्र आपल्या वैराग्यत्वाचा,संन्यसत्वाचा कोणताही बडेजाव करत नसत.सभासमारंभातून लोक त्यांच्यासाठी पायघड्या अंथरून असायचे. परंतू बापू मात्र ते सर्व नाकारत कुठेही,कसेही बसणार.ना गादी ना पटकर.भक्तांच्या आग्रहाखातर कुठपर्यंतही जायची तयारी असणार्या बापूंनी स्वत:साठी मात्र गाडी घेतली नाही.अनेक भक्तांनी देऊ केलेल्या गाड्याघोड्या नाकारत बापू फिरत राहीले.वाढत्या आजारपणामुळे अलिकडे अनेकांनी केलेल्या विनंत्यावरून बापू गाडी वापरत तेही नाखुशीने.
पंथीय चाकोरी नाकारून : दत्ताबापू महानुभाव पंथीय संन्यासी असूनही बर्याचदा ते पंथीय चाकोरी नाकारून आचरण करीत.अर्थात त्यामुळे काहीवेळेला पंथीय विद्वानांकडून,महंताकडून त्यांच्या ‘महानुभावत्वा’ विषयी प्रश्नचिन्हही निर्माण केले गेले. त्यांचा पोशाख, देवतेच्या ठिकाणी किंवा देवतेच्या मंदिरात केलेला प्रवेश,पंथीय परंपरेत नसलेल्या काही गोष्टी पाळणे यामुळे बापू बर्याचदा पंथीय महंतांच्या चर्चेचा विषय ठरायचे. परंतु पंथीय भावनेपेक्षा लोकभावनेला महत्त्व देत बापू आपले कार्य सुरू ठेवायचे.त्यांच्या या चाकोरीबाह्य कार्यामुळेच ते पंथीयत्तरांमध्येही तेवढेच श्रद्धास्थान बनले.
पंथाची सामाजिकता बांधीलकी अधोरेखीत करणारा चेहरा : आजच्या महानुभाव पंथाच्या वाटचालीवरून साधारणत: या पंथाने आपली सामाजिक बांधीलकी विसरून गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.पंथीय मेळावे, सभा-संमेलने, मंदीर निर्माण, संन्यासदिक्षा विधी सोहळे, तीर्थयात्रा,पदयात्रा,पंचावतार उपहार,महंती प्रतिष्ठा अशा गोष्टींना आवश्यकतेपेक्षा अधिक महत्त्व देऊन त्याच फेर्यात पंथ अडकून पडतो की काय अशी स्थिती निर्माण झालेल्या काळात दत्ताबापूसारखा साधी रहाणी अंगीकारून आचरण करणारा महात्मा महानुभाव पंथाची सामाजिक बांधीलकी अधोरेखीत करतो. वृद्धाश्रम,अनाथाश्रम,अन्नछत्र,गरिबांना निवारा निर्माण करून पूर्वजांनी दिलेला सामाजिक बांधीलकीचा वारसा चालवतो ही गोष्ट आजच्या काळात महत्त्वाची आहे.
महानुभाव पंथाने दत्ताबापूंचा हा वारसा पूढे नेण्याची खरी गरज आज निर्माण झाली आहे!
वैराग्यमूर्ती दत्ताबापूंच्या निधनामुळे दु:खीतांचा,पीडितांचा आधार हरपला आहे.बापूंच्या चरणी विनम्र अभिवादन…!
- प्रा.डॉ.हंसराज जाधव.
मो.७५८८४२९२२८



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा