सुखसाधनें देवो न पवीजे नाएका लेखक:- संदीप तडस शिरजगावकर
सुखसाधनें देवो न पवीजे नाएका
लेखक:- संदीप तडस शिरजगावकर
एकदा सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा मुक्काम डोमेग्रामला होता. प्रल्हादबाईसा नावाच्या स्त्री त्यांच्या दर्शनाला आल्या. क्षेमकुशल विचारणा झाल्यावर सर्वज्ञांना वाटले की काही निरूपण करावे. म्हणून सर्वज्ञ प्रश्नांर्थकतेने प्रल्हादबाईसांना म्हणतात, "बाई, तुम्ही देवो जाणा" अर्थात तुम्ही परमेश्वराच्या विषयी काही जाणता काय? यावर प्रल्हादबाईसा म्हणाल्या, "जी जी, मी देवो नेणे" अर्थात देवाविषयी मला काही माहिती नाही. यावर सर्वज्ञ परमेश्वराचे विशेष स्वरूप लक्षण प्रल्हादबाईसांना निरूपण करतांना म्हणतात, "बाई ,देव काष्टाचा नव्हे, पाषाणाचा नव्हे ,लोखंडाचा नव्हे, पट्टीचा (कापडाचा) नव्हे, मातीचा नव्हे. देवो, तो अच्छेद्यं :अभेद्यं कीं " पुढे सर्वज्ञ अधिक स्पष्टीकरण करतांना म्हणतात, "बाई, काष्टाचा देव तो जळेल, पाषाणाचा देव तो फुटेल, लोखंडाचा तो झिजेल, पट्टीचा तो फाटेल आणि मातीचा तो विरेल. बाई, देव अच्छेद्यं, अभेद्यं असतो. देवाचा छेद होऊ शकत नाही म्हणून तो अच्छेद्यं आहे आणि देवाला कोणी भेदु शकत नाही म्हणून तो अभेद्यं आहे. छेदा- भेदाच्या पलीकडे देव आहे.सर्वज्ञांनी येथे परमेश्वराचे स्वरुप लक्षण अप्रतिम शब्दात स्पष्ट केले. हे निरुपण शब्दात आणि शब्दातीत असे आहे.परमेश्वर प्रतीकं आणि प्रतिमांच्या पलीकडे असून तो सर्वव्यापक, सर्वशक्तिमान, परम ऐश्वर्याने संपन्न आहे. सर्वव्यापक असूनही परमेश्वराला वस्तुत शोधल्या जाऊ शकत नाही. प्रतीकं आणि प्रतिमामध्ये बसविता येत नाही. कर्मकांडांच्या विधीने त्याला पावन करता येत नाही. स्थावर-जंगम मालमत्ता परमेश्वराचा कृपाप्रसाद प्राप्त करून देऊ शकत नाही. भौतिक सुखसाधनाने परमेश्वराची प्राप्ती करता येत नाही. कारण दिखाऊ बडेजावी वृत्तीने परमेश्वरां जवळ पोहोचण्याचा कोणताच मार्ग उपलब्ध नाही. म्हणूनच तर सर्वज्ञ एकदा त्यांच्या शिष्या आऊसा अर्थात नाएकांना त्यांच्या प्रासंगिक दिखाऊवृत्ती विषयी म्हणाले होते की, " सुखसाधनें देवो न पविजे नाएका "कारण परमेश्वराची प्राप्ती ही दृश्य स्वरूपात असणाऱ्या सुख साधनाद्वारे मिळत नसते. या अन्य साधना व्यतिरिक्त असणाऱ्या आचार-विचार युक्त अश्या परमेश्वर नामस्मरणाच्या राजमार्गा व्दारेच परमेश्वराला मिळविणे शक्य आहे, असेच सर्वज्ञांना सांगायचे होते.
या संदर्भात आद्य मराठी ग्रंथ 'लिळाचरित्र' यातील पुढील लीळा फारच उद्धबोधक आहे. एकदा सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामीं आणि त्यांचे शिष्य भटोबास यांच्यात धर्मचर्चा सुरू होती. भटोबासांना परमेश्वराचे भजन- पूजन करण्याची इच्छा झाली. ज्याव्दारे त्यांना परमेश्वराची प्रसन्नता प्राप्त होऊ शकेल असे त्यांना वाटत होते. तेव्हा भटोबास स्वामींना खिन्नतेने म्हणतात, "जी जी, देव भजावया पूजावया माते काही नसे" अर्थात परमेश्वराचे भजन पूजन करण्याकरिता माझ्याजवळ काहीच द्रव्य संपत्ती नाही? भटोबासांना पडलेल्या या प्रश्नावर स्वामी त्यांना प्रश्नांर्थकतेनेच म्हणतात, "हां, गां ! देव भजावया पूजावया काही अन्यसामुग्री लागतु असे, "देव तो आंतरगाम्य कीं, गां!" अर्थात परमेश्वराचे भजन पूजन करण्याकरिता काही दृश्य सामग्रीची, फळा-फुलांची, द्रव्य संपत्तीची काही आवश्यकता नसून परमेश्वराचे आचार विचारादि दैनंदिनीने स्मरण, चिंतन, मनन अंतकरणापासुन केल्यानेच परमेश्वराचे भजन पूजन होत असते, असे स्वामींनी स्पष्टपणे सांगितले. मनामध्ये परमेश्वराची वस्ती झाली की, परमेश्वर हृदयगाम्य होतो. नामस्मरणामध्ये अपूर्व शक्ती आहे. नामस्मरण कर्त्याचा परमेश्वर सुद्धा अभिमान बाळगतात. निरंतर नामस्मरण पुढे परमेश्वरी आनंदापर्यंत घेऊन जाते. स्वामींनी ईश्वराकरिता आनंद हा समानार्थी शब्द वापरला आहे. ईश्वराचे स्वरूप आनंदमय असून हा आनंद जो प्राप्त करतो तो ईश्वराला प्राप्त करीत असतो.आनंद आणि ईश्वर या दोन्ही बाबी एकच आहे. त्या वेगवेगळ्या करता येणे शक्य नाही कारण त्यामध्ये गुणातीत अशी समरूप एकरूपता आहे. मात्र
ईश्वराची प्राप्ती म्हणजे जीवाने काही ईश्वर होणे नाही. कारण जीव आणि ईश्वर हे दोन भिन्न पदार्थ आहेत. जीवेश्वर भेद जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे दोन्ही पदार्थ मूलतः कधीच एकत्र किंवा समकक्ष होऊ शकत नाही. मात्र, जीव त्याच्या योग्य आचार विचाराने परमेश्वराच्या ठायीचा आनंद प्राप्त करू शकतो. तोच कैवल्यानंद आहे.
या आनंदाच्या प्राप्तीकरिता " ऐसे होए, ऐसे म्हणिजे हो" हे स्वामींचे सूत्र प्रमाण आहे.
सर्वज्ञांचे चांगदेव भट हे बालवयाचे शिष्य. सर्वज्ञांच्या सहवासात त्यांचे बालमन संस्कारित झालेले. एकदा सर्वज्ञांचा मुक्काम इतर शिष्य मंडळीसह एका नदी काठच्या गावी पडला. तेव्हा सर्वज्ञ चांगदेवांना म्हणाले, "जा चांगदेवो, तुम्ही खेळून या" म्हणून त्यांना खेळायला पाठविले. इकडे चांगदेव वेळकाळ आणि देहभान विसरून नदीच्या वाळूत खेळायला लागले. बराच उशीर झाला तरी चांगदेव अद्याप परत आला नाही म्हणून सर्वज्ञांच्या शिष्या बाईसा चिंतेत पडल्या. ही चिंता त्यांनी सर्वज्ञांच्या कानी घातली आणि सर्वज्ञ चांगदेवांना शोधण्यास नदीकडे निघाले. सर्वज्ञ पाहतात तर काय? चांगदेव वाळुत एकाग्रतेने खोपा करीत आणि सातत्याने म्हणत होते की," ही चांगदेव राऊळांची गुंफा (झोपडी); ही श्रीप्रभूंची गुंफा" असे म्हणत म्हणत चांगदेव परमेश्वराच्या नामस्मरणात अगदी तल्लीन झालेले. सर्वज्ञ आल्याचे आणि ते आपणास अवलोकीत असल्याचे चांगदेवाच्या लक्ष्यातही आले नाही. बालवयाच्या चांगदेवाची परमेश्वराच्या नामस्मरणातील तल्लीनता पाहून सर्वज्ञ प्रसन्न झाले आणि चांगदेवाला म्हणाले, "बटीका, खेळू खेळीजैल तरी ऐसा; याते आठवीत असा.याते नीत आठवावे ;ऐसे होए, ऐसे म्हणिजे हो " अर्थात चांगदेव तुम्ही खेळ सुद्धा परमेश्वराच्याच नामस्मरणाचा खेळत आहात. अशीच नित्यनेमाने, निरंतर परमेश्वराची आठवण करीत जा असे त्यास सुचविले. सर्वज्ञांनी आपल्याला याठिकाणी चांगदेवासारखे एकाग्रतेने परमेश्वराच्या नामस्मरणात तल्लीन व्हायला सांगितले आहे. ईश्वरी आनंदाची प्राप्ती आणि अनुभूती कुठल्याच बाह्य भौतिक सुख साधनाने मिळणार नसून आंतरगाम्यतेने केलेल्या नामस्मरणाने ईश्वराची प्राप्ती होईल असे सर्वज्ञ म्हणतात. म्हणून तर सर्वज्ञ एके ठिकाणी महदाइसाला म्हणाले," बाई, जीवाची सकळ संपत्ती ती असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती" अर्थात मनुष्य जीवाकडे असणारी सगळी भौतिक, ऐहिक संपत्ती ही असंपत्ती आहे. या फसव्या संपत्तीत जी खरेतरं असंपत्ती आहे त्यात जीव रमतो, अडकतो;आणि परमेश्वराच्या खऱ्या संपत्तीला मात्र मुकतो. मुळात जीवाकडे असणारी त्याच्या मालकीची भौतिक, दृष्य संपत्ती असून नसल्यासारखीच असते. ती क्षणभंगुर आणि नाशिवंत आहे. परंतु मनुष्य जीवाची खरी संपत्ती तर परमेश्वर आहे. ती अक्षय, अमर्याद, ऐश्वर्यसंपन्न आनंददायी आहे. अशी धनसंपत्ती आपण मिळवावी असे सर्वज्ञांनी आपल्याला महदाइसा, आऊसा आणि चांगदेवाच्या निमित्ताने सुचविले आहे.
लेखक:- संदीप तडस शिरजगावकर
अमरावती
मो. क्र.९७६३७९६४२४



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा