मनुष्यमात्र होऊनी असावे '-कृष्णाजी खोब्रागडे
' मनुष्यमात्र होऊनी असावे '
श्री कृष्णाजी खोब्रागडे से.नि. कार्यक्रम अधिकारी,आकाशवाणी नागपूर.
कासे पीतांबरू कंठी कुंदमाळा :
कांतु शोभे सावळा : रुक्मिणीचा :
खांदावरी कावडी : पडिभारे चालतू :
तो खेळे वनांतू : दत्त सए :
गावो द्वारावती : गोमतीए प्रांती :
गोदरीये क्रिडती : चक्रपाणी
घावो देऊनी अविद्ये घाली निजपदी
खेळे कृपानिधी : रिद्धपूरी
चांपेगौर कांती चांपयाच्या दृति
धांपोली साजणी : चक्रपाणी
महानुभाव संप्रदायाच्या पंचकृष्ण अवतारांची अवतार विशेषता , महदाईसेने गायिलेल्या धवळ्यातून दिसून येते . या पंचकृष्णांच्या सामाजिक कार्याची वैशिष्ट्ये या आद्य मराठी धवल गीतांमधून महदाईसा या कवयित्रीने सांगितलेले आहेत .
श्रीचक्रधरस्वामी महानुभाव संप्रदायाचे संस्थापक ।
पंचकृष्ण अवतार परंपरेतील शेवटचे अवतारी पुरुष ।।
आधुनिक काळातील स्वच्छता अभियान आणि ग्रामसेवेचा कार्यारंभ प्रत्यक्ष कृतीतून जनसामान्यांपर्यंत पोहचविणारे संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा गौरव शासनाने केला . परंतु या दोन्ही कार्यांचा प्रारंभ हा जवळ जवळ ८५० वर्षांपूर्वी श्री चांगदेव राऊळ श्री चक्रपाणी या अवतारी पुरुषाने श्री क्षेत्र ' द्वारावती ' येथे केला होता . एकंदरीत स्वच्छता अभियान आणि समाज प्रबोधनाबरोबरच आध्यात्मिक उन्नयनाचे कार्य त्यांनी केले . महाराष्ट्रातील फलटण येथील श्री चक्रपाणी - चांगदेव राऊळ हे संसाराचा त्याग करून ( येथे आले . इथे श्रीदत्तात्रेयप्रभूसोबत सहा महिने राहिले आणि समाजकार्याची , ज्ञानदानाची आणि स्वच्छता अभियानाची प्रेरणा घेऊन श्रीक्षेत्र द्वारावती येथे गेले . श्री क्षेत्र द्वारका येथील रस्त्यांची झाडलोट ते करायचे , यात्रेनिमित्त तिथे आलेल्या लोकांनी केलेली घाण ते सुपात भरायचे आणि गावाबाहेर गोमतीच्या किनारी नेऊन विसर्जित करायचे . आणि हे स्वच्छता अभियानाचे कार्य ते दररोज साडेसात तास म्हणजे तीन प्रहरापर्यंत करायचे . वयाच्या ६७ वर्षापर्यंत त्यांचं हे अभियान अव्याहत सुरू होतं . हे स्वच्छता अभियानाचं कार्य करतानाच चारी धाम यात्रेच्या निमित्तानं आलेल्या योग्य जीवांना त्यांच्या त्यांच्या पात्रतेप्रमाणे आध्यात्मिक अनुभूतीच्या विद्यादान तसेच समाजोन्नतीचे भानही ते देत असत . त्यांनी त्यांच्या काळात एकंदर बावन्न पात्र असलेल्या योग्यांना विद्यादान करून , त्यांना आध्यात्मिक कार्याची प्रेरणा दिली . सद्यःस्थितीत महाराष्ट्र , गुजरात , तेलंगाणा , आंध्रप्रदेश , कर्नाटक या भागात मराठी भाषा बोलली जाते . मराठी साहित्य तसेच महानुभावीय आध्यात्मिक चळवळ या प्रदेशात पक्की रुजलेली आहे . हासुद्धा मराठी भाषेचा विजयच आहे ! १४ व्या / १५ व्या शतकात श्रीचक्रधरस्वामींच्या ' मनुष्यमात्र होऊनी असावे ' या मानव धर्मतत्त्वाचा प्रसार उत्तर हिंदुस्थानात झाला . राजस्थान , मध्यप्रदेश , दिल्ली , हरियाणा , पंजाब , हिमाचलप्रदेश या प्रदेशांमध्ये श्रीचक्रधरस्वामींचा ' मानवतावाद ' आणि त्यासोबतच मराठी भाषाही प्रचलित झाली . तसेच ही भाषा आणि हा स्वामींचा विचार त्या काळात पूर्वीच्या पकिस्तानात पंजाब , लाहोर , हरीपूर , हजारा , कराची आणि काबूल प्रदेशापर्यंत पोहचला होता . संप्रदायाची मराठीतील वाङ्मय संपदा पाकिस्तानातच उपलब्ध होती . या पार्श्वभूमीवर स्वामींचा मनुष्यमात्राविषयींचा विचार प्रवाह कसा आहे याविषयी आणून घेऊया
११ व्या आणि १२ व्या शतकात महाराष्ट्रात चातुर्वर्णावर आधारित समाजव्यवस्था अस्तित्वात होती . त्यामुळे विषमता आणि भेदाभेद यांची कडक बंधने समाजावर लादलेली होती . व्यक्तिव्यक्तीत भेद पाळला जात होता ... अशी भेदक परिस्थिती पाहूनच स्वामी श्रीचक्रधरांनी त्या नाडवणूक होत असलेल्या समाजावर भाष्य केले . स्वामी म्हणतात :
अवघा जणु ठकला ठेला असे :
पण तयाचे थक फेडिता कोण्ही नसे :
तु का थकला ऐसे कव्हणी न पुसे
ही अशी आठशे - नऊशे वर्षांपूर्वीची भेदाभेदाची आणि विषमतेची समाजव्यवस्था होती . अगतिक अवस्थेत जीवन जगत असलेल्या माणसांना समता , स्वातंत्र्य , प्रेम , शांती , दया , करुणा आणि मैत्री या तत्त्वांचं दर्शनही कधी झालेलं नव्हतं . अशा सर्वहारा समाजाचं दुःख समजावून घेऊन त्यांच्या असहाय स्थितीचं अवलोकन करून श्रीचक्रधरस्वामींनी आपल्या ' अमृतमय वाणीने ' बंडाचं निशाण फडकवलं . स्वामी म्हणतात :
उत्तम म्हणिजे ब्राह्मण :
आणि अधम म्हणिजे मातंग : ऐसे म्हणे...
परी तोही मनुष्य देहची:
आणि निष्पत्तीकारकची असे :
परी वृथा कल्पना करी :
श्रीचक्रधरस्वामींनी आपल्या आचार - विचारातून चातुर्वर्णाच्या जुलमी आणि विषारी अशा रूढी आणि परंपरांना हादरा दिला . स्वामी सर्वसामान्य आणि बहुजन लोकांमध्ये मिसळत . तसेच विद्वान म्हणविणाऱ्या पंडित - पुरोहितांना आपले क्रांतीचे विचार त्यांच्यात मिसळून पटवून देत असत . तो श्रेष्ठ , हा कनिष्ठ , तो ब्राह्मण हा अंत्यज , तो पुण्यवान आणि हा पापी अशा परंपरेनी चालत आलेल्या समजुतींना श्रीचक्रधरस्वामींनी नाकारले . सर्व मनुष्यमात्रांना दोन हात , पाय , डोळे इत्यादी सर्व अवयव सारखेच ' युक्त ' आहेत , तसेच त्यांना विचार व्यक्त करण्यासाठी समान बुद्धीही आहे ... मग भेद करायचा कशासाठी ? असा स्वामींचा प्रश्न असायचा . संत तुकाराम महाराजांनीही त्यांच्या काळात होत असलेल्या भेदावर कोरडे ओढले आहेत . ते म्हणतात , ' भेदाभेद अमंगल ' आहे . त्या काळात संपत्तीचा अधिकार ब्राह्मणांनाच होता . जर एखाद्या ब्राह्मण किंवा तत्सम उच्चभ्रू समजणाऱ्या पुरुषाचा मृत्यू झाल्यास , त्याच्या विधवा स्त्रीला संपत्तीपासून , त्या हक्कापासून ‘ बेदखल ' केलं जायचं . ही स्थिती वरच्या वर्गाची तर अत्यज म्हणून समजण्यात आलेल्या वर्गाची किती दयनीय अवस्था असेल ? या अंधारयुगात , सामाजिक आणि आध्यात्मिक समतेचा तेजस्वी प्रकाश स्वामी चक्रधरांच्या नवधर्मप्रवर्तनाच्या निमित्तानं नवीन क्रांती , नवीन विचारप्रवाहाचा , सामाजिकतेचा ओलावा घेऊन आला आणि त्या विचारांनी आसमंतात नवचैतन्य भरलं . महाराष्ट्र कसा होता , विषमता कशी होती याचं उदाहरण द्यायचं तर संत चोखामेळा आपले दुःख व्यक्त करताना म्हणतात :
" विठ्ठलाचा हार तुझे गळा कैसा आला
मज मारिती बडवे....
देवा जन्म गेला उष्टे खाता
लाज न ये तुमच्या चित्ता "
वारकरी संप्रदायानं आध्यात्मिक समता , प्रेम यांचा महाराष्ट्रात प्रसार केलाही असेल ; पण त्याची प्रत्यक्ष फलश्रुती त्या काळात तरी यशस्वी झाली नाही ... कारण वैष्णव आणि शैव विचारधारांमध्ये नाथपंथीयांनी वैदिक कर्मकांडाची सरमिसळ केली होती . संत चोखामेळा यांनी भोगलेली व्यथा , पंजाबातील घुमान प्रांतात आपल्या सामाजिक भक्ती समतेचे स्वराज्य निर्मिणाऱ्या संत नामदेवांनाही भोगावी लागली . संत नामदेव म्हणतात :
" हिन दीन जाती मोरी पंढरी के राया ।
ऐसा नामा दरजी काहेकू बनाया ।।
टाळ बिणा लेकर नामा राऊळ मे गया ।
तो पुजा करते बम्मन ने मारकर धकाया ।। "
शतकोटी अभंग रचणाऱ्या आणि शीख संप्रदायाच्या ' गुरु ग्रंथ साहिब ' या पवित्र ग्रंथात स्थान मिळविलेल्या या संत नामदेवांची अंतरीची व्यथा आहे . विषमतेच्या अमानवीय मूल्यांमुळे आणि त्या मूल्यांच्या उदात्तीकरणामुळे संत नामदेव महाराजांना महाराष्ट्रातून परागंदा व्हावे लागले , हे त्या काळातील भीषण असं वास्तव आहे . संत सोयराबाईंनी तर विटाळावरच प्रहार केला . ' देहासी विटाळ म्हणती सकळ ' असं सांगून परंपराभिमानी लोकांना झिडकारलं . या विषम परिस्थितीमुळेच , माणुसकीचे , समता आणि स्वातंत्र्याचे क्रांतिकारी विचार श्रीचक्रधरस्वामींनी महाराष्ट्रात प्रवाहित केले आणि त्याबरहुकूम कृतिपर आचार केला आणि करविला . याच विचारांची कास धरत महात्मा गांधी म्हणतात , “ विकास हा अंत्यजापासून सुरू झाला पाहिजे . त्यांच्या घराघरांत विकास पोहचला पाहिजे . " तर डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणतात , " शिका , संघटित व्हा , प्रज्ञाशील बना . ' प्राचीन , मध्ययुगीन काळात आजच्यासारख्या लोकशाही मूल्यांच्या म्हणजे सामाजिक समता , स्वातंत्र्य , प्रेम आणि शांतीच्या संकल्पना विकसित झाल्या नव्हत्या . परंतु या सर्वांचा आधार त्या काळात तरी आध्यात्मिक नैतिक मूल्यांनाच समजण्यात येत असे . म्हणूनच श्रीचक्रधरस्वामींनी हा ' आध्यात्मिक समतेचा ' झेंडा रोवला . श्रीचक्रधरस्वामींचा जातीनिरपेक्ष समता , ऐम आणि स्वातंत्र्याचा हा क्रांतिकारी विचार त्या काळातील सुधारणावादी , पुरोगामी आणि विकसनवादी म्हणविणाऱ्या पंडितांना रुचला , पटला ... त्या काळात अशा पाचशे ( ५०० ) विद्वान पंडितांनी श्रीचक्रधरस्वामींना अनुसरले . त्यांचे शिष्यत्व त्यांनी स्वीकारले आणि या ' मनुष्यमाजाच्या विचारप्रवाहात ते सामील झाले . स्वामी डोमेग्राम येथील जोगेझरीच्या मंदिरात असताना काही मातंग त्यांना भेटावयास आले . त्या कालात धर्मसूत्रांचं उच्चारण करणे , श्रेष्ठ व्यक्तीशी बोलणं , भेटणं , हे धर्मबाह्य कार्य समजण्यात येई . मंदिरप्रवेश तर दूरचीच गोष्ट होती . तरीही ते पायरीजवळ थांबले . मंदिरातील काही कामानिमित्त बाईसा या स्वामींच्या शिष्या बाहेर आल्या . त्या वेळी त्यांनी बाईसांना विनंती केली की ' आई , आम्हाला स्वामींना भेटावयाचे आहे . ' स्वामींना निरोप मिळाला . स्वामी व्यस्त असल्याने त्यांनी बाईसाच्या हातातून लाडवांचा प्रसाद त्या मातंगांना पाठवून दिला . परंतु बाईसांनी दिलेल्या लाडवानं त्यांचे समाधान झाले नाही . उलट त्यांनी स्वामींनाच निरोप पाठविला . आपल्याला भेटल्याशिवाय आम्ही जाणार नाही . मंदिरातील पूजा अवसर संपवून स्वामीजी बाहेर आले . तिथे भेटीसाठी आलेल्या अंत्यजांना जोगेधरीच्या मंदिरात घेऊन गेले . हा क्षण म्हणजे भारतीय इतिहासातील अंत्यजांच्या मंदिरप्रवेशाचा , समतेचा , क्रांतीचा उगम होता . त्या अंत्यजांनी आपल्या हातातील लाडू स्वामींना भेट म्हणून अर्पण केले . स्वामीनी तिथे उपस्थित असलेल्या सर्व ब्राह्मण , पंडित विद्वानांना विचारले , " हा अंत्यजांनी दिलेला लाडू आहे . त्याचा प्रसाद म्हणून मी तुम्हा सर्वांना देऊ इच्छितो . कुणा कुणाला प्रसाद म्हणून हवा आहे . " आणि तिथे उपस्थित सर्वांनी त्या अंत्यजांच्या हातातील लाडवांचा प्रसाद ग्रहण केला . आणि हाही प्रसंग इतिहासात प्रथमच घडत होता , स्वामींच्या अनुयायांमध्ये ही मानवमात्राची शिकवण अंगात भिनली होती . सामाजिक समतेच्या विचारांचे ते काटेकोरपणे आणि स्वयंस्फूर्तपणे पालनही करीत . अशाच एका प्रसंगात एका चर्मकाराला स्वामींनी आध्यात्मिक अनुभूती प्रदान केली . तो पुढे स्वतःच धार्मिक प्रवचन आणि लोकसमुदायात मिसळून , मान्यता मिळवून कार्य करीत राहिला . जातिभेद मोडून , समतेच्या मार्गाचा अवलंब करा असे सांगतानाच स्वामी श्रीचक्रधरांनी आपल्या अनुयायांना स्पष्ट आदेश दिला . " घर न निवडीत भिक्षा किजे " आणि अनुयायांनी मागून आणलेल्या भिक्षेचं अवलोकन करूनच स्वामी त्यांना अन्न ग्रहण करण्यास सांगत असत . याउलट बहुजन समाजातील काही लोक , काही स्त्रिया , स्वामींच्या स्त्री अनुयायांची हेटाळणी करीत . साधाईसा , महदाईसा , आऊसा यासारख्या आचारवंत विदुषींना उपहासाने हटकत :
' काय जाले वो या ब्राह्मणांच्या रांडासी :
आमुचेया कुणबियाचे अन्न खातू असे : '
कारण त्या बहुजन समाजालाही त्यांचे वर्तन प्रचलित धर्मनियमांच्या विरुद्ध म्हणजे भ्रष्ट - भ्रष्टाचाराचं वाटत होतं , अधर्माचं आचरण वाटत होतं . इतकी रूढिप्रिय आणि कठोर धार्मिक बंधनं त्या काळी होती . महानुभावांचे अवतारी पुरुष श्रीगोविंदप्रभू हे सतत सर्व समाजात अनाहूतपणे वावरत . त्यांच्या घरातील भाजी - भाकरी ते स्वतःच्या हाताने घेऊन खात . ते कुणाला परवानगी मागत नसत . याउलट श्रीप्रभू आपल्या घरी कधी येतात त्याची ते वाटच पाहत असत . श्रीगोविंदप्रभूच्या या वर्तनावर तेथील स्त्रिया विचारीत :
" ही तेलीयाची भाकरी कैसे खाल '
अशा वेळी ते हासून म्हणत :
" आवो मेली जाय : हे तेलियाची भाकरी नव्हे , हे लाखाची भाकरी '
इतक्या उच्च सामाजिक समतेच्या आणि विषमतेच्या मुळावर घाव घालणारा प्रत्यक्ष कृतिपर आचार , या सर्व महानुभावीय अवतारी पुरुषांचा होता . श्रीगोविंदप्रभू म्हणजे विदर्भाचे अनभिषिक्त ' राजसंत ' होते आणि त्या काळातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्यावर प्रेम करीत असे . गोविंदप्रभू हे ईश्वरी अवतार असले तरी त्यांची कार्ये ही अगदी सामान्य अशी होती . कुणाची लहान मुलं सांभाळायची , कुणाला पाणी भरू लागायचे , कुणा अडल्यानडल्या स्त्रियांची बाळंतपणे करायची . अशी कामे ते करीत . ' कुणाच्या हातचे पाणी भीक मागून पिऊ नका तर स्वतंत्र विहीर बांधून तेथील पाण्याचा उपभोग घ्या ' अशी प्रेरणा दिली . आजही ८०० वर्षांपूर्वी श्रीगोविंदप्रभूनी बांधवून दिलेली ' समतेची विहीर ' ( मातंग विहीर ) म्हणून अस्तित्वात आहे . यावरून श्रीचक्रधरस्वामींचा समतेचा विचार , समताधिष्ठित प्रेममूलक विचार समाजात किती खोलवर रुजलेला होता याची प्रचिती येते . स्वामींच्या दया , प्रेम , करुणा आणि मैत्री यांच्या एकजिनसीपणा यामुळे सर्वांभूती एकतानता निर्माण झाली . त्या सर्वांना आपण एकाच सर्वशक्तिमान ईश्वराची लेकरे आहोत , एकाच समपातळीवरील भावंडे आहोत , कुणी श्रेष्ठ नाही , कुणी कनिष्ठ नाही , याची अनुभूती , त्याची प्रचिती जनसमूहाला आली आणि हाच श्रीचक्रधरस्वामींचा ' मानवधर्म ' होता . स्वामी श्रीचक्रधर सांगतात :
" अहंतेचे मूळ सकंदी उपडावे : एरवी अंकुर निघती : मग शांतीचे रोप लावावे "
माणसाने अहंकार , लोभ , असूया , मत्सर , काम , क्रोध आणि संशय यावर नियंत्रण ठेवले पाहिजे . आपल्या मनातील हे सारे विकार घालविले तर तुमच्यात एकमेकांविषयी प्रेम वाडेल आणि जोपर्यंत हे विकार , ही अहंता मानवात राहील तोपर्यंत आपण सारे ' मानव ' या संज्ञेस पात्र होऊ शकणार नाहीत असे स्वामींचे विचारशास्त्र होते . ' प्रेम द्यावे , प्रेम घ्यावे ' हा जगाचा व्यवहार आहे . त्यासाठी आपणास प्रत्येकाच्या सुखदुःखाचा विचार करावा लागतो . मला जर भूक लागली तर त्या भुकेमुळे मला असंख्य वेदना होतात . मला सुख मिळालं तर ते कसे असते , हीच अनुभूती प्रत्येक जीवमात्राला सारखीच येत असते ... आणि जोपर्यंत या सुखदुःखाचे अनुभव आपण अनुभवू शकत नाहीत तोपर्यंत तरी आपण सारे मनुष्यमात्राच्या कुठल्याच विशेषणाला पात्र होऊ शकणार नाही ... हे श्रीचक्रधरस्वामी आणि त्यांच्या अवतारी परंपरेने सांगितलेले आहे . मानवधर्मात मनुष्यमात्राला बांधण्यासाठी स्वामींनी ' भूतभजन ' या सिद्धांताला महत्त्व दिलेले आहे . कुठलीही आशा , अपेक्षा न बाळगता , अन्नदान करा असे त्यांनी सांगितले . तो श्रेष्ठ . हा कनिष्ठ , या वृत्तीचा त्याग करून उपाशी आणि भुकेल्या मनुष्याला अन्नदान करून त्याला संतुष्ट करा . त्यामुळे अन्नदान करणारी व्यक्ती आणि अन्नग्रहण करणारी व्यक्ती यांच्यात ' भूतदया ' या मानवधर्माचे नाते निर्माण होईल आणि बंधुभाव वाढीस लागेल . बुरसटलेले विचार नष्ट करून उच्चकोटीच्या नैतिक आचारशीलतेची आणि बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टीची गरज त्या काळाला होती , ती भागवली . महाराष्ट्रात सामाजिक आणि आध्यात्मिक चळवळीच्या चैतन्य क्रांतीची मुहूतमेढ रोवली गेली .
" तुम्ही अच्यूत गोत्रीय किंगा : तुम्हा परस्परे परमप्रिती होवावी : "
" स्वातंत्र्यू हा मोक्ष आणि पारतंत्र्य हा बंध "
हे स्वातंत्र्याचे , प्रेमाचे मूल्य सांगताना स्वामी म्हणतात . तुम्ही सर्व मनुष्यमात्र आहात ! तुम्ही एकमेकांशी प्रेम आणि मित्रत्वाच्या नात्याने बांधलेले आहात , तसे वागावे , कुणाला आपल्या गुलामीत ठेवू नका . स्वातंत्र्य हाच मनुष्याचा मोक्षाचा मार्ग आहे , त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका . स्त्रियांना मोक्ष आणि संन्यासाची , वेद अध्ययनाची किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाच्या कर्मबंधनापासून मुक्तता नव्हती . श्रीचक्रधरस्वामींनी लिंगभेदाची ही अविचारी चौकट मोडून काढली . तत्कालीन पंडितांना त्यांनी खडसावून विचारले -
' हा गा तुमचे जीव : मग यांचिए काइ जीवलिया ' तुमते आणिक देव राखता : आणि याते काई आणिक देव राखीता : "
यासाठीच त्यांनी स्त्रियांना
" पुरुष होऊनी असावे "
असे सांगितले आहे . तसेच
“ पुरुषापासि स्त्रिया स्नेहाळूवा " , " बाई तुम्ही माये की '
या गुणविशेषांनी त्यांचा गौरव केलेला आहे . त्यांनी स्त्रियांच्या ' विटाळ ' कल्पनेलाही तिलांजली दिली . या ठिकाणी श्रीदत्तात्रेयप्रभूच्या अवतार वैशिष्ट्यांचा विचार केल्याशिवाय ही मानवमात्राची संकल्पना समजून येणार नाही ; कारण श्रीदत्तात्रेयप्रभू हेच ' मानवमात्र होऊनी असावे ' या संकल्पनेचे आदिकारण आहेत . श्रीदत्तात्रेयप्रभू हे रानावनात वावरणारे ! ते कधी पारधी होतात , तर कधी मातंग वेषात राहतात . कधी गोंधळी होऊन राहतात . तर ते कुणाला ब्राह्मणाच्या रूपात दर्शन देतात . तर कधी भयंकर अशा कुष्ठरोगाच्या वेषातही वावरताना दिसतात . म्हणजे श्रीदत्तात्रेय हे मानवी जीवन प्रवृत्तीच्या सर्व सुखदुःख प्रवृत्तीशी जवळीक साधतात . त्या त्या वेषात वावरून त्या त्या जातिसमूह आणि दुःखी , कष्टी , रोगराईने ग्रस्त अशा समाजाचे ते प्रतिनिधित्व करतात . त्यांना आपले मानून त्यांचे दुःखही हरण करतात . बाबा आमटेंनी ' कुष्ठीयांच्या व्यथा ' जाणल्या आणि सेवाश्रम उघडले . त्या काळातही श्रीदत्तात्रेयप्रभुंनी अशा दलित , कुष्ठी आणि वन्य भागात जीवन जगणाऱ्या मनुष्यांची उपेक्षा करू नका , अशी शिकवण दिली . श्रीदत्तात्रेयप्रभुंनी सर्व मानवमात्रांच्या सुखदुःखाशी समरस होण्यासाठी सर्व समाजातील मानवसमूहाचे प्रातिनिधिक रूपे घेतलेली आहेत आणि त्यांचीच परपंरा श्रीचक्रपाणी महाराज , श्रीगोविंदप्रभू आणि श्रीचक्रधरस्वामींनी एकत्वाने सांभाळली आहे . सरतेशेवटी श्रीचक्रधरस्वामींच्या चळवळीत , त्यांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक विचारधारेत विदुषींचा महत्त्वाचा वाटा आहे . त्यांचा उल्लेख करणेही आवश्यक आहे . संप्रदायाची वैचारिक आणि प्रशासकीय बाजू त्यांनी समर्थपणे उचलून धरली आहे . स्वामींच्या परिवारात त्या काळी आऊसा , आबाईसा , ऊमाईसा , एकाईसा , एल्हाईसा , गंगाईसा , गौराईसा , देमाईसा , धानाईसा , बोणेबाई , महदाईसा , नागांबिका , लळताईसा , साधाईसा , शांतबाईसा या विदुषी आणि तत्त्वजिज्ञासू महिलांचा समावेश होता . त्यानंतरच्या काळात या संप्रदायाची धुरा सांभाळणाऱ्या महिला आचार्यांची फळीच निर्माण झाली . या संप्रदायाची वाङ्मयीन नवनिर्मिती करून पंथात त्यांनी आपले नाव अजरामर केलेले आहे . हिराईसा , मदालसा , कुमराईसा , म्हाळसाईसा , नातीनागाईसा , पांडिताची हिराईसा तसेच उपाध्ये कमळाईसा , कुमरे रेमाईसा , बोचरी धनाईसा , घायाळे लुरबाईसे , कानडी लुरबाईसे , नेमाईसा , नामाईसा , लारबाईसे , लळताईसे , धानाईसे या विदुषींनी आपापल्या परीने लीळाचरित्रांचे पाठ तयार केले होते . श्रीचक्रधरस्वामींच्या या ११ व्या / १२ व्या शतकातील क्रांतिकारी समाज प्रबोधनाने महाराष्ट्रात समतेचा प्रवाह असा सर्व जाती - जमातीत एका वेगळ्या आत्मतत्त्वाने बहरून गेला होता . पुरुष आणि स्त्रिया यात भेद न राहता त्यांनी ही क्रांतिकारी परंपरा चिरंजिवी केली आणि नवीन ' समताधिष्ठित मानवमात्र समाजाची धुरा सतत सांभाळत ठेवली . ' मनुष्यमात्र ' होऊन राहण्यासाठी या तत्त्वांची किती आवश्यकता आहे , हे आजच्या काळात समजून येते .
प्रकाशित
केशर गौरवग्रंथ


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा