सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींचे समाजसंवेदन डॉ . कन्हैया कुंदप, क-हाड.

 सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींचे समाजसंवेदन

                                        डॉ . कन्हैया कुंदप, क-हाड.


        महानुभाव संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा भक्तिसंप्रदाय आहे . कर्मपठणाविरुद्ध बंडाचा झेंडा उभारणारा , मोक्षमार्गात स्त्रीपुरुषांना समानता आहे हे मानणारा , धर्ममंदिरात शूद्रादिकांनाही प्रवेश देणारा , मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा अभिमानी असणारा हा पंथ केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरदेखील आपल्या समता दर्शनाने आणि वाङ्मय वैविध्याने ' महानुभाव ' म्हणून सातासमुद्राच्या पलीकडेदेखील मान्यता पावलेला आहे . सर्वसामान्यांपासून ते विद्वानांपर्यंत श्रीचक्रधरांच्या विद्वत्तेने , त्यांच्या अवतारित्वाने जसे आकृष्ट केले , त्यात त्यांच्या रूपसौंदर्याचा वाटा फार मोठा आहे . रूपसौंदर्याचे वर्णन वेधवंती म्हणून केलेले आढळते . स्त्री - पुरुष सारेजण त्यांच्या रूपसौंदर्याने भारून जात असत . त्यांच्या लोभस व्यक्तिमत्त्वामुळे त्यांचा सहवास सर्वांना हवाहवासा वाटे . समाजाचे मन जाणून घेऊन सामान्यांच्या दुःखावर कुंकर घालणारा व त्यावेळी आपले अवतारी रूप विसरून सामान्यातील एक होऊन रमणारा , इतर पंथीयांबद्दल व त्यांच्या महापुरुषांबद्दल आदर बाळगणारा , आपल्या शिष्यांच्या सुप्त गुणांना मोहरविणारा , आपल्याबद्दल भीती वाटू नये म्हणून प्रेममय रूपाने मोकळेपणाने शिष्यांसमवेत हास्यविनोदात रमणारा , क्रीडाप्रेमी असा थोर महात्मा म्हणून श्रीचक्रधरांचे व्यक्तिमत्त्व प्रथमदर्शनीच नजरेसमोर येते . द्यूत प्रसंगातून त्यांच्या विरक्त जीवनाला प्रारंभ झालेला असल्याने त्यानंतरच्या जीवनात जरी विवाहप्रसंग घडले तरी तितक्याचे निर्लेपपणे सर्व बंधनांचा त्याग करणारा , लौकिकात निर्भयपणे वावरणारा , त्यातून लोकजीवनाच्या सुखासाठी साधी , सरळ वृत्ती अंगी बाणवून नम्रतेने सत्यव्रत होणारा महात्मा म्हणजे श्रीचक्रधर ! व्यक्तिमाहात्म्य वाढू नये म्हणून राजसत्काराचाही स्वीकार न करणारा , असंग्रही आणि निरीच्छ , निर्मोही वृत्तीचा खास पैलू ज्यांच्या विमलधवल चारित्र्यात आढळतो असा प्रिय वक्ता म्हणजे श्रीचक्रधर होय ! सर्व जीवपदार्थावर समतेने प्रेम करणाऱ्या श्रीचक्रधरांच्या ठिकाणी स्त्री - पुरुष , उच्च - नीच , स्पृश्यास्पृश्य भेदाच्या भिंती नव्हत्या . सर्वजन कल्याणाची आस असणाऱ्या मानवाविषयी अपरंपार करुणा जागवणारी मूर्तिमंत मूर्ती श्रीचक्रधरांच्या रूपाने सर्वांना दिलेली आहे . स्वामी एकांतातून लोकांत आल्यावर त्यांना पुष्कळ शिष्यपरिवार मिळाला . त्यापैकीच बाईसा , नागदेवाचार्य , उमाईसा , आबाईसा , राधाईसा हे होय . त्यांचे खास शिष्य नागदेवाचार्य होते . स्वामींनी आपले ज्ञानदानाचे कार्य ८ वर्षे , १ महिना आणि ४ दिवस केले . या कार्याचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे भाग पडतात . बाईसाला प्रेम दिल्यापासून ते नागदेवाचार्यांना संन्यास देईपर्यंत पूर्वार्ध व नागदेवाचार्यांना संन्यास ग्रहणापासून उत्तरापंथी गमनापर्यंत असे भाग आहेत . या काळात स्वामींनी महाराष्ट्राच्या आम जनतेला साध्या मराठी भाषेतून व्यावहारिक , सामाजिक , धार्मिक तत्त्वनिरूपण केले . स्वतः त्यांनी जे आचरणात आणले तेच मग लोकांना सांगितले . अहिंसा , सत्य , ब्रह्मचर्य , अस्पृश्यता निवारण , स्वातंत्र्य , स्वार्थत्याग , व्रतत्याग , निर्भयता इत्यादी व्यवहारांनी महाराष्ट्राविषयी प्रेम निर्माण केले . त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानात जीव , देवता , प्रपंच व परमेश्वर या चार गोष्टी नित्य व अनादीच्या असल्याचे सांगितले . समाजाच्या उद्धारासाठी समतेचे तत्त्व अत्यंत आवश्यक आहे म्हणून समता तत्त्वाचा पाया श्रीचक्रधरांनी घातला .


स्त्री - पुरुष समता

         प्राण्यांच्या दुःखाशी समरस झालेले चक्रधरस्वामी दीनदुबळ्यांची , दबलेल्या दडपलेल्यांचीही काळजी घेतात . दर्शनाला आलेल्यांना भेटण्यासाठी स्वामी गडबडीने पुढे जाऊ लागतात . त्यावेळी पन्हाळ्याचा धक्का त्यांच्या डोक्याला लागतो . त्यावर बाईसा भक्तजनांना रागावू लागतात . पण स्वामी म्हणतात , “ प्राणिये येथ आलेयां जळतां जावे तरी निवावे ते कोठे ? " ( ली.च. उ . ९ १ ) सर्व जाती , धर्माचे , विविध वर्णांचे स्त्री - पुरुष त्यांच्या दृष्टीने सारखेच होते . राजा आणि रंक यांना सारखेच मानणारी समत्वबुद्धी त्यांच्याजवळ होती . केवळ माणूस आणि माणुसकी यांचाच धर्म त्यांच्या लेखी खरा होता . तो त्यांच्या वागण्या बोलण्यातून सहजगत्या व्यक्त होई . दुःखितांविषयीचा कळवळा , प्राणिमात्रांविषयीचा जिव्हाळा आणि सर्वांविषयीचे अथांग प्रेम त्यांच्या वागण्यातून सतत प्रत्ययास येत असे . सर्वप्रथम दाकोसारख्या चांभाराला आपल्यासोबत मंदिरात प्रवेश देऊन त्याच्यासोबत भोजन करून अस्पृश्यतेची रूढी नष्ट करण्याची मुहूर्तमेढ श्रीचक्रधरांनी रोवली . जोगेश्वरी येथे तिघा मातंगांना त्यांनी दर्शनाचा लाभ दिला होता . मातंगाच्या हातचा लाडू खाऊन त्याचा प्रसाद वाटला होता . तत्कालीन परिस्थितीतील श्रीचक्रधरांचे हे वागणे किती क्रांतदर्शी होते हे सहज प्रकट होते . देहगावच्या ब्राह्मणाला पाच मुली होत्या . त्या पाचीही विधवा होत्या . लोक त्यांना ' पाच रांडा ' म्हणत . पण श्रीचक्रधर त्यांना ' पंचगंगा ' म्हणतात ( ली.उ .८ ९ ) . तेवढ्याने त्यांना आपला पोळलेला जीव निवाल्यासारखा वाटतो . छिन्नस्थळीवर स्त्रियांच्या कोंडाळ्यात बसून धर्मवार्ता करणाऱ्या श्रीचक्रधरांना पाहून सारंगपंडिताच्या मनात किल्मिष येते . ते जाणून स्वामी त्याला बजावतात , “ हां तुमचा काइ जीऊ : आणि यांचिया काइ जीऊलीया " ( ली . उत्तरार्ध १०२ ) म्हणजे पुरुषाचा जीव आणि स्त्रियांचा काही जीव नव्हे काय ? तुम्हाला राखणारा देव आणि यांना राखणारा देव काय वेगवेगळा आहे ? मग धर्माच्या इच्छेने स्त्रियांनी का येऊ नये ? श्रीचक्रधरांच्या उद्गारात स्त्री - पुरुष समतेची जाणीव तीव्रतेने प्रकटली आहे . स्त्रियांशी स्वामी ज्या पद्धतीने वागतात त्यात एक कनवाळूपणा आणि निकोप मोकळेपणा आहे . एका गर्भवतीला कोणी नसते . तिच्या विनवणीवरून स्वामी तिला मठात आश्रय देतात . ती मठ झाडण्याचे काम करी . तिचे दिवस भरत येतात तसे श्रीचक्रधर तिला झाडू देत नाहीत . नाथोबाकडून ते तिचे बाळंतपण करवितात . आपल्याला आई नाही , बहीण नाही , आपल्या लेकराला कोणी नाही असं म्हणत ती दुःख करू लागते तेव्हा , " बाई : दुःख न करा : हे असे नव्हे " ( ली.उ. १३५ ) असे बोलून श्रीचक्रधर तिचे सांत्वन करतात . ' प्रयत्न करीतच राहावे , पडे तव धावावे , मरे तव करावे ' असे स्वामी म्हणतात . ते अहिंसेचे पुजारी होते . आपल्या कृतीने , वाणीने अथवा मानाने ते कुणालाही दुखवत नसत . सर्वांना सुखानंद देण्याची त्यांची ताकद होती . अधर्माला सन्मार्गाचा अवलंब करण्यास लावण्याची शक्ती होती . अनर्थ माणसाला समर्थ करण्याची अपरंपार दया होती . जीवनातील कोलाहल शांत करण्याचे सामर्थ्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते . ती महान करुणा त्यांच्या स्वरूपाची होती . त्यांच्या दृष्टीने कोणीही शूद्र नव्हता . महाराष्ट्रात बाराव्या - तेराव्या शतकात जे समाजप्रबोधन झाले त्यात श्रीचक्रधरस्वामींचा फार मोठा वाटा आहे . श्रीचक्रधरस्वामी गुजरातेतून महाराष्ट्रात आले , पण महाराष्ट्र हीच त्यांनी आपल्या कार्याची कर्मभूमी मानली . महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात , वस्तीवस्तीत ते गेले . गोंडाच्या वस्त्यापासून चांभार - महार - गुरव - तेली यांच्या झोपड्यापासून यादव राजांच्या अधिकाऱ्यापर्यंत नव्हे तर खुद्द रामदेवराय यादवांच्या प्रासादापर्यंत त्यांचा वावर होता . बाजारहाटापासून ' सामान्य स्त्रियांच्या म्हणजे वेश्यांच्या वस्त्यात जाऊन त्यांनी आपले समाजोद्धाराचे कार्य केले . हे सारेजण त्यांना मानत होते . स्वामींची ही पदयात्रा मोठी अपूर्व होती . समाजातच्या साऱ्या घटकांना आपल्या उद्धाराचा अधिकार आहे , भक्तीचा अधिकार आहे , ही समतेची जाणीव त्यांनी आपल्या पदयात्रेतून समाजातील सर्व स्तरांत निर्माण केली . ते कुठे कुठे गेले आणि त्यांनी आपल्या समतावादी विचारसरणींचा प्रसार कोणकोणत्या जातीजमातीच्या लोकात , व्यावसायिकांत केला याचा नुसता तपशील पाहिला तरी श्रीचक्रधरस्वामींची लोकसंग्राहक वृत्ती किती व्यापक होती याचे दर्शन घडते . केवळ ' लीळाचरित्रा'च्या एकांकाचा विचार केला तरी त्यात असे कितीतरी उल्लेख येतात . गुरे राखणारे , गोवारी , तीळतेली , कापड विक्रेते , हलवाई , मजूर , हेडाऊ ( घोड्याचे व्यापारी ) , मांत्रिक , सावकार , बैरागी , चांभार , मातंग , जुगारी , पारधी , चोर , धर्मपंडित , राजाचे अधिकारी , प्रधान इत्यादी समाजाच्या विविध क्षेत्रांतील लोकांचे उल्लेख येतात . लीळाचरित्राच्या पूर्वार्धात ' विणकर , वाणी , परीट , बडवे , माळी , पुराणिक , मजूर ( मोलकीये ) , राजांना द्रव्य पुरविणारे भांडारी , सावकार इत्यादींचे उल्लेख येतात . तर उत्तरार्धात निरोप्याचे काम करणारे , व्यापारी , तांबोळी , शिंपी , चाटे , रांधवणी ( स्वयंपाकीण ) , पालखी वाहणारे भोई , शंख फुकणारे संकोये , हिशेब ठेवणारे कारकून , मद्य करणारे कलाल , ढोरे , महार , इत्यादींचे उल्लेख येतात . यावरून स्वामींची भ्रमंती किती सर्वस्पर्शी आणि समतावादी होती हे सहज लक्षात येते . या सर्व जाती - जमातींच्या उद्धरणाची नैतिक जबाबदारी स्वामींनी आपण होऊन पत्करली होती . या सर्वांचे धर्मप्रबोधन त्यांना करावयाचे होते . हे धर्मप्रबोधनच खऱ्या अर्थाने समाजप्रबोधन होते . सामान्य माणसाचे प्रबोधन हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून श्रीचक्रधरस्वामींनी आपल्या नवीन मार्गाची आखणी केली . ' ज्ञानापासि प्रेम उत्तम ' असे म्हणून भक्तीचे अधिष्ठान साधनेत किती व कसे महत्त्वाचे असते ते समाजाला पटवून दिले . त्यामुळे कर्मकांड , व्रतवैकल्ये , तीर्थयात्रा इत्यादींना त्यांच्या विचारसरणीत थारा मिळाला नाही . त्यांनी आपल्या काळात परिभ्रमणातून लोकजीवनाला आणि मराठी संस्कृतीला आपल्या पद्धतीने एक विशिष्ट आकार दिला . त्यांचे विचार काळाच्या पुढे जाणारे आधुनिक असे होते . स्त्रियांना संन्यास , दीक्षा , स्त्री - पुरुष समानता , स्त्रियांना आपली मनोगते स्पष्ट करण्याचा अधिकार , स्त्रियांच्या योगक्षेमाची तरतूद , चिंतनाची , मननाची सोय , विटाळ - चांडाळातील वैयर्थ , जाती - जमातीमधील सामंजस्य , मानव धर्मावरील विलक्षण विश्वास , कर्मकांडापेक्षा प्रत्यक्ष उपयोजनेला आलेले महत्त्व , शहरी जीवनापेक्षा हजारो खेड्यापाड्यातील दीनदुबळ्या , अशिक्षित जाती - जमातीतील खितपत पडलेल्या , मानवाविषयीची अपार करुणा आणि भौतिक आणि पारमार्थिक जीवनात लोकशाही मूल्यांसाठी केलेला प्रयत्न हे श्रीचक्रधरस्वामींचे कार्य एक तर काळाच्या पुढे जाणारे आणि अलौकिक वाटावे असेच आहे . ते जसे तत्त्वज्ञ , विचारवंत होते तसेच मानवावर अपार श्रद्धा असलेले सहृदयी होते . या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिणाम महानुभाव साहित्यनिर्मितीवर फार खोलवर झालेला आहे . लोकशिक्षणाच्या बाबतीत परिभ्रमणातून स्वामींना कर्मकांडातील अतिरेकाने पोखरला गेलेला समाज , जातिसंस्थांमुळे बांधला गेलेला गावगाडा , धार्मिक , भोळसर समजुती , अंधश्रद्धा , दैववादातील पोकळपणा , धार्मिक - आध्यात्मिक - पारमार्थिक आणि भौतिक गुलामगिरीत विकल झालेला समाज व समाजातून स्तरीकरणातून आलेला उग्र संघर्ष यावर उपाय शोधण्यासाठी समतावृत्तीने कार्य करण्याचा त्यांचा सर्व स्तरांतील प्रयत्न हा प्रशंसनीय आणि आकर्षणीय ठरला . विशेषतः पंडितवर्गसुद्धा त्यांच्यामागे अनुसरला . धर्माधिष्ठित समाजरचनेत भक्तिपंथांना महत्त्व असते हे श्रीचक्रधरांनी ओळखले आणि आपल्या नवविचारांच्या संप्रदायाची त्यांनी उभारणी केली . महानुभाव पंथाची स्थापना केली . श्रीचक्रधरांनंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सर्वच साधुसंतांनी ही प्रेरणा घेतली . त्यांच्या स्वाभिमानाची पायाभरणी श्रीचक्रधरस्वामींच्या समतादर्शी उपदेशामृत वाणीतूनच झाली होती हे विसरून चालणार नाही . महाराष्ट्राने त्यासाठी श्रीचक्रधरांचे कायम ऋणी राहिले पाहिजे .

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट