श्री दत्तात्रेयप्रभूच्या विशेषता
श्री दत्तात्रेयप्रभूच्या विशेषता
ई.श्री . नितीनदादा बांधकर, नागपूर.
अ ) आरंभिक
परमेश्वराच्या अवतार धारणामध्ये विविध प्रकारचे भेद आहेत . “ परमेश्वर युगानुरूप क्रीडती : परी किंचिद्विलक्षण " असे आमचे स्वामी म्हणतात . परमेश्वर युगव्यवस्थेने विहरण करतात . अवतरलेल्या प्रत्येक अवताराचा इतर अवतारांपेक्षा काहींना काही विशेष असतो . शास्त्रामध्ये सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूच्या सात विशेषता सांगितलेल्या आहेत . ' कव्हणा कव्हणीं व्यसन : कव्हणा कव्हणी व्यसन : एथ जीव उद्धरीजती हेचि व्यसन ' या सूत्रावरील भाष्य करीत असताना भाष्यकार म्हणतात , ' एका आत्मरमणाचे व्यसन : एकासी पारधीचे व्यसन : एकासी बाण वेन्ही फोडावयाचे व्यसन : प्रत्येक अवताराचा वेगवेगळा स्वीकार आहे . त्यानुसार त्या अवताराची वेगववगळी वैशिष्ट्ये दिसून येतात . यालाच विशेषता असे म्हणावे . श्रीदत्तात्रेयप्रभूच्या अशाच काही वैशिष्ट्यांचे चिंतन करणे हाच या शब्दप्रपंचाचा हेतू आहे .
ब ) श्रीदत्तात्रेयप्रभूच्या ११ विशेषता
छंद - त्रोटक
श्रीदत्तात्रेयाचे अमोघ दर्शन । युगीं अवतार सतत अटन ।
कार्याचिही सिद्धी एकविधजन । वेषानेक धरी मार्गादिकारण ।।
वेळेसीची उभा जगमान्यत्व । अमृतवाणी ती शिघ्र चरितत्व ।
श्रीदत्ताचे ऐसे अकरा विशेष । करीतसे जीवां विशेष दातृत्व ।।
श्रीदत्तात्रेयप्रभूच्या एकूण ११ विशेषता वरील श्लोकामध्ये उद्धृत केल्या गेल्या आहेत . त्या पुढीलप्रमाणे :
१. अमोघदर्शन , २.अमृतवाणी , ३.सतत अटन , ४.युगी अवतार , ५.एकविधजन , ६.कार्यसिद्धी , ७.वेषानेक , ८.आदिकरण , ९.वक्तशीरपणा , १०.जगमान्य , ११.शीघ्र चरितत्व . अशा ११ विशेषता वरील श्लोकात सांगितलेल्या आहेत . या थोड्या विस्ताराने जाणून घेऊयात .
१ ) अमोघ दर्शन
श्रीदत्तात्रेयप्रभूची विशेषता सांगत असताना श्रीचक्रधरप्रभू सांगतात , ' तें अमोघदर्शन किंगा : ( वि .२८४ ) श्रीदत्तात्रेयप्रभूची ही पहिली विशेषता . अमोघ या शब्दाचा अर्थ निर्फळ न होणारे दर्शन . दर्शन या शब्दाची व्याख्या करताना भाष्यकार म्हणतात दर्शन म्हणजे बोध म्हणजेच श्रीदत्तात्रेयप्रभूचे ज्ञानरूपी दर्शन ज्याला प्राप्त झाले , ते वाया जाणारे नाही म्हणजेच श्रीदत्तात्रेयप्रभूपासून बोध झाला तो जीव लगेच तत्काळ अनुसरतो . ते अनुसरण प्रमाद न घडता सिद्धीस जाते . ते अनुसरण निष्फळ जात नाही . एर अवताराचे मात्र असे नाही . त्यांच्यापासून बोध झाल्यानंतर अनुसरेलच असे नाही . ही श्रीदत्तात्रेयप्रभूची विशेषता आहे.
२ ) अमृतवाणी
" अरळकाचे तिन्ही ताप शंबोली शंबोली म्हणौनि फेडिते झाले : का ते वाणी अमृतवर्षनी की : " या सूत्रामध्ये श्रीदत्तात्रेयप्रभूची दुसरी विशेषता सांगितली आहे . ' अमृतवर्षनी वाणी ' म्हणजे सुखदायक , निवविती , जीवविती . वाणी म्हणजे बोलणे . एकूणच काय ? तर श्रीदत्तात्रेयप्रभूच्या ठायी परवाचेचे प्रधानत्व आहे आणि त्यामुळे सुख देणे , जीवविणे इत्यादी कार्य वर्ततात . इतर अवताराच्या ठायी वैखरीद्वारे परेचा व्यापार , परंतु इथेच प्रधानत्वे परा वर्तते .
३ ) सतत अटन
बहता पाणी निर्मळा । पडा गंदीला होय ।
साधू तो भ्रमता भला । दाग न लागे कोय ।
अटन म्हणजे एका ठिकाणी न राहता सतत परिभ्रमण करणे होय . हे निरालंबित्वाचेच एक लक्षण होय . श्रीदत्तात्रेयप्रभूच्या दिनचर्येची सूची पाहता आपल्याला त्यांचे सतत अटन लक्षात येईल . इतरही अवतारांच्या ठिकाणी अटन दिसते ; परंतु श्रीदत्तात्रेयप्रभूचे अदृश्य रूपातील अटन व अंतराचे परिमाण हेच वैशिष्ट्य विशेषतेला जाणून घ्यावयास पुरेसे आहे .
४ ) चतुर्युगीं अवतार
जिथे जिथे युग तिथे तिथे अवतार एवमच् ‘ श्रीदत्तात्रेयप्रभूचा चतुर्युगीं अवतार ' ( वि . २८२ ) बाइ : ते चहुयुगी राज्य करीताती : ( शो.वि .३ ) कृत , त्रेत , द्वापार व कली या चारही युगात अवतार , श्रीदत्तात्रेयप्रभुंनी कृतयुग संपता व त्रेत लागता म्हणजेच दोन युगाच्या संधिकाळात अवतार धारण केला . दुसरे असे की , ' श्रीदत्तात्रेयप्रभूचा अवतार तो त्रेती ' ( शो.वि .१) असाही पाठभेद आहे . परंतु ' कवणे त्रेती हे नेणिजे ' म्हणून त्या त्रेतानंतर येणाऱ्या प्रत्येक युगात अवतार आहे . का तर अशी प्रवृत्तीच धारण केलेली आहे . ही श्रीदत्तात्रेयप्रभूची विशेषता आहे .
५ ) एकविधजन
' एथ आणि श्रीकृष्णी त्रिविध जन : श्रीप्रभुंचा ठाइ द्विध जन ' ( वि .२२० ) प्रस्तुत वचनाप्रमाणे श्रीचक्रधरस्वामींच्या व श्रीकृष्णचक्रवर्तीच्या ठिकाणी त्रिविध जनाचा म्हणजेच अनुकूळ , प्रतिकूळ आणि उदास जनाचा स्वीकार आहे , तर श्रीदत्तात्रेयप्रभूच्या ठायी फक्त एकविध जन म्हणजेच अनुकूळ जनाचा स्वीकार आहे . श्रीदत्तात्रेयप्रभूचे दर्शनच उपलब्ध होणे , मग प्रतिकूळता ती कशी काय बरे निर्माण होईल ? म्हणून सर्वच जनलोक श्रीदत्तात्रेयप्रभूच्या ठायी अनुकूळत्व भावून आहेत . अवतार धारणेतच अशी प्रवृत्ती धारण केलेली आहे , ही विशेषता आहे.
६ ) कार्यसिद्धी
कर्मराहाटीतील किंवा देवराहाटीतील दुःख क्लेष नाशार्थ किंवा काही कार्याची सिद्धी प्राप्त होण्याविषयी नवस , जाप्य , खेटा , स्मरण , सेवना इत्यादी विधी केले जातात , त्याने त्यांना लाभ प्राप्त होतो . परंतु इतर अवतारांपेक्षा श्रीदत्तात्रेयप्रभूच्या स्थानाच्या , विशेषाच्या ठायी वरील प्रकार केले असता लवकर कार्यसिद्धी प्राप्त होते व जी इतरांपेक्षा लवकर व अधिक परिणामकारक असते . हा अनुभव जनसमाजामध्ये आलेला आढळून येतो .
७ ) अनेक वेष
अनेक वेषांचा स्वीकार हे श्रीदत्तात्रेयप्रभूचे वैशिष्ट्य आहे . तसे तर श्रीचक्रधरप्रभुंनीही क्वचित प्रसंगी इतर वेष स्वीकारलेला आढळतो . उदा . जोगीवेखे मनभुली क्रीडा , अवधूतवेष , बाळकवेष , यतीवेष इत्यादी . परंतु याचा अधिकावो श्रीदत्तात्रेयप्रभूच्या ठिकाणी विशेषत्वाने जाणवतो . श्रीदत्तात्रेयप्रभूचे एकूण ११ वेष परमार्गी सांगितले जातात . त्या वेषामध्ये वेगवेगळ्या भक्तांना भेटी दिलेल्या आहेत .
१. बालवेष -अनसूया , पार्वती , लक्ष्मी , सावित्री
२. मातंगवेष -अर्ळक
३. ऋषिवेष - सहस्रार्जुन
४. ब्राह्मणवेष -परशुराम ( रेणुकेच्या निक्षेप वेळी )
५. व्याघ्रवेष - श्रीचक्रपाणि महाराज
६. अवधूतवेष -यदुराजा , मदळसा राणी
७. पारधीवेष - परशुरामा भेट
८. दिगंबरवेष - शंकराचार्य
९ . कुष्टीवेष - सप्तर्षी
१०. गोंधळीवेष -डखले ,चांगदेवभट( भेट होणार होती , पण झाली नाही . )
११. फकीरवेष -नागराज कपाटे
अशा प्रकारचे एकुण ११ वेष आहेत . या विरहित पंडित श्रीविश्वनाथव्यासांना खांडीच्या ठायी स्मरण केल्यानंतर तिथेही वेगवेगळ्या वेषांमध्ये भेट दिल्याचा संदर्भ एका ठिकाणी पाहण्यात आला , तो असा :
१. पोपटवेष - जवळा खांड
२. साधुवेष - गगनमाळ खांड
३. नागवेष- लाख खांड
४. कामधेनुवेष - कृष्णापूर खांड
५. पक्षिवेष - दिग्रस खांड
६. पक्षिवेष पारडी खांड
७. मानववेष -पुसद खांड
८. मुनिवेष - चुरमुरा खांड
९ . पारधीवेष - खर्शी खांड
१०. सिंहवेष - मन्याळी खांड
११. हरीणवेष- शिळोणा खांड
१२. व्याघ्रवेष -देहली खांड
सदर विवेचन बाराखाडीच्या संदर्भाने आहे . परंतु काही ठिकाणी ते सदोष वाटते . जसे कि शिळोणा ही उपखांड असून तिचा मुख्य खांड म्हणून स्वीकार केलेला आढळतो . कृष्णापूर खांड येथे कामधेनु वेषात भेट दिल्याचा उल्लेख प्रत्यक्ष श्रीमुखीच्या सूत्राला बाधा आणतो . वानरेया ! यासी स्त्रीवेष अवतार धरणे नाही ( शो.वि. ३ ९ ) म्हणजे देव मनुष्य तिर्यंचत्वी अवतार धारण करताना कुठेही स्त्रीवेष स्वीकारणे नाही , म्हणून वरील वेष जरी नवीन संदर्भ म्हणून स्वीकारले तरी ते सदोष वाटतात . यद्यपि , यामुळे श्रीदत्तात्रेयप्रभूची वेषानेक ही विशेषता मात्र प्रकर्षाने लक्षात घेण्याजोगी आहे .
८ ) आदिकरण
या मार्गासी श्रीदत्तात्रेयप्रभू आदिकारण : ( वि .२८५ ) ही श्रीदत्तात्रेयप्रभूची विशेषता स्वामींनी निरूपण केलेली आहे . या मार्गासी म्हणजे ज्ञानमार्गासी . ज्ञानमार्गाला आदिकारण . परमेश्वर स्वयं ज्ञानशक्ती स्वीकरती का मायापुरातें आदिकरुनी स्वीकरती : ( वि .११० ) या सूत्राप्रमाणे श्रीदत्तात्रेयप्रभुंनी स्वयमेव स्वरूपाहुनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला , त्यांपासून श्रीचक्रपाणिप्रभूनी , त्यांपासून श्रीप्रभूबाबांनी , त्यांपासून आमच्या स्वामींनी . ही ज्ञानपरंपरा श्रीदत्तात्रेयप्रभूपासून , म्हणून श्रीदत्तात्रेयप्रभू हे आदिकारण ठरतात . दुसरे असे की ' स्वरुपासी आदि ' एका अवतारी उल्लेख व तेथूनच अवतार या भेदाने श्रीदत्तात्रेयप्रभूपासून स्वरूप विभागून द्वारावतीकार श्रीचांगदेव राऊळांचा अवतार झाला . ' गोसावीयांसी जीव उद्धरावयाची प्रवृत्ती फलेठाणी कन्हाडेया ब्राह्मणाच्या घरी अवतारु स्वीकरीला : ' म ( ली.पू. २ ) आणि ' द्वारावतीकार तेचि आमचे गोसावी ' या अर्थानेही या स्वरूपालाही आदि श्रीदत्तात्रेयप्रभूच आहेत . इतकेच नव्हे तर महानुभावपंथा व्यतिरिक्त अनेक संप्रदायांना श्रीदत्तप्रभूचा अवतार आदिकारण आहे . ही श्रीदत्तात्रेयप्रभूची विशेषता आहे .
९ ) वेळेसीचि उभा
वक्तशीरपणा हा महत्वाचा गुण आहे . ज्या त्या वेळेवर जे ते काम करणे व त्यात शिस्तबद्धता ठेवणे हे या गुणाचे वैशिष्ट्य आहे . श्रीदत्तात्रेयप्रभूच्या व्यस्त दिनचर्येचा सामान्य अर्थाने जरी विचार केला , तरी आपल्याला त्यातील ईश्वरीत्व जाणवेल . परंतु याचा कार्यभार मात्र वक्तशीरपणे सुरू आहे . सकाळी वाराणसीचे / मेरुवाळाचे स्नान , कोल्हापूरची भिक्षा , दुपारी पांचाळेश्वर भोजन व रात्री माहूर येथे निद्रा अशी दिनचर्या श्रीदत्तात्रेयप्रभूची आहे , माहूर ते वाराणसी ते कोल्हापूर या अंतराचा विचार आम्ही मनुष्यव्यवस्थेने केला , तर आपल्या लक्षात येईल की सर्वात जलद विमान प्रवासानेदेखील हे शक्य होणार नाही ; परंतु इतक्या युगांपासून आजही ही दिनचर्या अगदी वेळेवर सुरू आहे . ' अद्यापि श्रीदत्तात्रेयप्रभू जळक्रीडा करिताती ' ( शो.वि. ५ ) असे श्रीचक्रधरप्रभू म्हणतात . या दिनचर्येला कधीही खंड पडलेला नाही , एवढेच नव्हे तर अगदी वेळेवर श्रीदत्त उभाच असतो . म्हणूनच ' दत्त म्हणून उभा ठाकला ' असा वाक्प्रचार प्रसिद्ध आहे . ही श्रीदत्तात्रेयप्रभूची विशेषता आहे .
१० ) जगद्मान्य
श्रीदत्तात्रेय जगद्गुरु या उक्तीप्रमाणे जगाचे गुरुत्व आणि मान्यत्व श्रीदत्तप्रभूच्या ठिकाणी आहे . कुठलाही वैदिक अथवा अवैदिक संप्रदाय असो त्यांना श्रीदत्तात्रेयप्रभू मान्य आहेत . ही मान्यता प्रधानत्वे आहे , हे विशेष . कृष्णम् वंदे जगद्गुरुम् ' या संदर्भाने जरी श्रीकृष्ण अवतार जगमान्य असले तरी अनुषंगिकत्वे त्याचा स्वीकार इतर संप्रदायांनी केलेला दिसतो . परंतु मागे पाहिल्यानुसार बऱ्याच दत्तोपासक शाखांचे मूळ श्रीदत्तात्रेयप्रभूच आहेत . या माध्यमाने श्रीदत्तात्रेयप्रभूचा अवतार जगमान्य ठरतो . दुसरे असे की श्रीदत्तात्रेयप्रभू इतर अवतारांना देखील ' मान्य ' स्थानी आहेत . विशेषज्ञानीयाची अयोग्यता नासण्याअर्थी साधनदाते अगाधचक्रवर्तीपण धारण करतात . त्यामुळे विशेषज्ञानियाला कृपास्पदाचे दुःख होते . त्यावेळी ' जे तया मान्य ' म्हणजे त्या अवतारांना जे ' मान्यस्थान ' आहेत , त्यांच्याकडे जाऊन तो विशेषज्ञानिया विनंती करतो व त्याची अयोग्यता नासली की मग श्रीदत्तात्रेयप्रभू उपलक्षणे मान्य अवतार साधनदात्याला विनंती करतात . याही अर्थाने श्रीदत्तात्रेयप्रभूचे जगद् मान्यत्व सिद्ध होते.*
११ ) शीघ्र चरितत्व
श्रीदत्तात्रेयप्रभूपासून बोध झालेला जीव लगेच अनुसरतो . हे मागे आपण पाहिलेच . अनुसरण घेतल्यानंतर त्याचे साधनचरितत्व म्हणजे पूर्णत्व होत असते . इतर अवताराच्या साधनवंतापेक्षा श्रीदत्तात्रेयप्रभूच्या साधनवंतांचे काही विशेष विचारबंदामध्ये आढळून येतात , ते पुढीलप्रमाणे
क - हा अधिकार्या ' तात्काळ मळवत त्याग करी ' म्हणजेच लगेच ' अनुसरे '
ग-दर्शनासरिसाची अदृश्य होये ( हा उत्तमातील उत्तम )
घ - यदुचक्रवर्ती न्याये प्रगट तर लीळावशांत घालुनी भट न्याये सकळ दोष धरिती : ( हा उत्तम )
च - अपूर्व म्हणजे प्रेमाधिकार घडविती ( ओलेया गुणांचे असतील तर ) षडविध प्रमाद घडो नेदिती ( कोरडे असतील तर )
ज- अवघे आपणचि करिती म्हणजे कर्मनाश , योग्यता प्रेमियावत बैसलेयाची चरितीर्थ ( उत्तम आभाराचे )
हे अवतारीचे किंचित विलक्षण . ( वि.बंद - सूत्र क्र .२८४ ) वरीलप्रमाणे त्या अधिकार्याचे इतर अवतारापेक्षा शीघ्र गतीने व कमी काळात चरितार्थ होऊन तो लवकरच ईश्वरप्राप्ती करून घेतो . ही श्रीदत्तात्रेयप्रभूची विशेषता आहे .
क ) इतर विशेषता
श्रीदत्तात्रेयप्रभूच्या मुख्य विशेषताव्यतिरिक्त इतर परंपरेच्या शाखेमध्ये काही वेगळीही वैशिष्ट्ये आढळून येतात . महानुभाव पंथाच्या वाइंदेशकर शाखेच्या ' सिह्याद्रीस्थित चतुर्युग मूर्तीची पूर्वी या प्रकरणामध्ये काही वेगळ्या विशेषता अभ्यासण्यासारख्या आहेत .
१ ) सृष्टीपर्यंत नित्य श्रीदत्तात्रेयप्रभूचा अवतार हा एक दीर्घ सृष्टीपर्यंत नित्यच आहे . चार युगे बरोबर एक चौकडी होते म्हणजेच एक महायुग . अशा १०० चौकड्यांचे १ कल्प , १००० चौकड्यांचे १ महाकल्प , १०,००० चौकड्यांची एक सृष्टी . ही एका सृष्टीची कालमर्यादा वाइंदेशकर शाखेप्रमाणे सांगितल्या गेली आहे . श्रीदत्तात्रेयप्रभूचा अवतार हा एक सृष्टी , म्हणजेच १०,००० चौकड्यांपर्यंत नित्य आहे . एवढा प्रदीर्घ इतर कुठलाही अवतार नाही , ही विशेषता .
२ ) आणिका पुराचा , पुरांतराचा अंगीकार नाही
जी मूर्ती , जे पूर सृष्टिकाळी धारण केलेले होते , त्या पुराचा कधीही त्याग करणे नाही . पुरांतर करून दुसरे पूर स्वीकारणे नाही . इतर अवतार ठायी पूरत्याग व स्वीकार दिसतो . पर्यायानेच हननाचा स्वीकार दिसतो . तो श्रीदत्तात्रेयप्रभूच्या ठायी नाही . म्हणून श्रीदत्तात्रेयप्रभू कुणाच्याही हननाला निमित्त होत नाही . नित्याला कारण होत नाहीत , हीसुद्धा एक विशेषताच आहे .
३ ) प्रतियुगी परमार्ग वर्ते तयाचा अभिमान
प्रत्येक युगात वेगवेगळे अवतार वेगवेगळा मार्ग , पंथ निर्माण करतात . त्या अवताराचे कार्य संपले की , मग श्रीदत्तात्रेयप्रभू उपलक्षणे नित्य अवताराच्या ठायी त्यांना निरोविले जाते . जसे श्रीप्रभूनी श्रीदत्तात्रेयप्रभूना निरोविले . ( स्मृती .२४ ) असे प्रतियुगातील अवतारांनी तयार केलेले परमार्ग , त्यांचा अभिमान घेऊन जर ते अवतार विद्यमान नसतील तर त्यांच्या साधनवंताचे कर्मनाश योग्यतादी चरितार्थ श्रीदत्तात्रेयप्रभू अभिमान घेऊन करतात . श्रीदत्तात्रेयप्रभू आपला आधिकार्या कुणालाही निरोवित नाही . सोबतच अभिमान असल्यामुळे ' कव्हणाची ताती हो नेदिती : केली तरी प्रतिबंधीती : ' इतर कार्यसुद्धा करतात .
४ ) चतुर्विध श्रद्धेच्या जीवांचे उद्धरण
' चतुर्विध श्रद्धा जीवाचा स्वभाव : जयासी जे श्रद्धा प्रधान तया तेचि नाम : म्हणौनि हा जीव श्रद्धामय होऊनि असे : ' ( महावाक्य महानिरुक्त ) मूळ सृष्टीमध्ये जीवाला ज्ञान दिले तेव्हा जीवाच्या ठिकाणी मुळताच असलेल्या चार श्रद्धा कार्याला आल्या :
१ ) राजस श्रद्धा २ ) तामस श्रद्धा ३ ) सात्त्विक श्रद्धा ४ ) निर्गुण श्रद्धा .
अशा प्रकारची ज्या जीवाने जी श्रद्धा धारण केली होती , त्याच श्रद्धेने त्यांचे उद्धरण शेवटास जाते , त्यांच्यासाठी तसेच अवतार होतात . राजस श्रद्धेच्या जीवांचे उद्धरण श्रीकृष्णचक्रवर्ती , तामस श्रद्धेच्या जीवांचे उद्धरण श्रीचक्रधरस्वामी , सात्त्विक श्रद्धेच्या जीवांचे उद्धरण श्रीचक्रपाणिप्रभू आणि निर्गुण श्रद्धेच्या जीवांचे उद्धरण श्रीगोविंदप्रभू उपलक्षणे अवतार करतात . राजस श्रद्धेच्या जीवांचे उद्धार करणारे अवतार तामस श्रद्धेच्या जीवांचे उद्धरण करीत नाहीत , तसेच इतरही एक दुसऱ्याचे उद्धरण करीत नाही . परंतु श्रीदत्तात्रेयप्रभू मात्र चतुर्विध श्रद्धेच्या जीवांचे उद्धरण करतात , ही श्रीदत्तात्रेयप्रभूची विशेषता आहे .
ड ) समारोप
श्रीदत्तात्रेयप्रभूचा अवतार व अवतारकार्य इतर अवतारांपेक्षा विलक्षणच आहे . त्यांच्या संबंधित स्थान , काळ , विशेष , त्यांचे साधनवंत हेही विलक्षणच आहे . अमोघ जीवांनाच अमोघ दर्शन देणे हेही एक वैशिष्ट्यच ठरते . एकूणच ' दिव्यत्वाची जेथे प्रचिती । तेथे माझे कर जुळती । ' या उक्तीप्रमाणे त्यांचे दिव्यत्व , अलौकिकत्व , असाधारणत्व ईश्वरीचा ऐश्वर्याला प्रगट करते , ते ऐश्वर्य पाहण्याची आस निर्माण होते व नकळत मनोभावे त्यांच्या श्रीचरणी कर जुळतात .



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा