गीतातत्व

 


गीतातत्व

गीता हा शब्द आपल्या कानी पडल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर चित्र उभा राहते ते युद्धभूमीवरील कृष्ण आणि अर्जुनाचे. शास्त्र सांगणारी गीता शेवटी शस्त्र हाती घेण्यास प्रवृत्त करते ते कशासाठी? असा प्रश्न साहजिकच सर्वांना पडतो याचे कारण आहे, की कर्तव्यापासून दूर गेलेल्या व्यक्तीला ठीकाणावर आणण्याचे महत्वाचे काम गीता करते. असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. समाजात आपल्याला कुणी डॉक्टर, कुणी शिक्षक, कुणी इंजिनियर, कुणी सैनिक अशा विविध प्रकारची कर्तव्य पार पाडणारी माणसं भेटत असतात. डॉक्टरने योग्य उपचार केले नाहीतर रोगी मरण पावतो, शिक्षकाने चांगले विद्यार्थीं घडवले नाही तर कित्येक पिढ्या बरबाद होतात, कारागिराने योग्य रीतीने घर बांधले नाही तर इमारत  ढासळतेे, सैनिकाने युद्धाच्या वेळेला शस्त्र हातात घेतले नाही तर स्वातंत्र्य गमावून पारतंत्र्यात जावे लागते. थोडक्यात समाजाच्या हिताकरिता आपण आपले जे जे काही कर्तव्य पार पाडत असतो ते कर्तव्य जर आपण योग्य पद्धतीने हाताळली नाही तर समजायचे आपण फार भयंकर महापाप करत आहोत. आज समाजात प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असेलच असे नाही, म्हणून तर भ्रष्टाचार, अत्याचार, अन्याय जन्माला येतात.आणि देश विनाशाच्या मार्गावर जातो.
            अगदी हीच परिस्थिती द्वापारयुगात हस्तिनपूरच्या राजाची झाली आहे. स्वतःच्या मुलांना संस्कार दिले नाही त्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली नाही म्हणून दुर्योधनासारखी अघोरी वृत्ती वाढत गेली आणि युधिष्टीरासारखी सहज प्रवृत्ती मागे पडायला लागली. यातूनच खऱ्या अर्थाने महायुद्धाला सुरुवात झाली.. जीवनात योग्य कर्तव्य, योग्य निर्णय खूप महत्त्वाचे असतात. जर ते देण्या घेण्यात थोडी जरी चूक झाली तर लाखो भूकंप आपल्या आयुष्यात येतात.
               कधी कधी आपलीही परिस्थिती अशीच होते. कधी आपण बाप असून बापाची कर्तव्य विसरतो, कधी आपण कुणाचा मुलगा असून मुलाची कर्तव्य विसरतो, कधी कुटूंबात पती/पत्नीची काय कर्तव्ये असतात हेही विसरतो आणि मग घराघरात महाभारत सुरू होते. इतकंच नव्हे तर कधी-कधी आपण समाजाप्रती आणि देशाप्रती असलेले कर्तव्य विसरतो. जेव्हा जेव्हा आपण आपल्या कर्तव्यापासून दूर जातो तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थाने आपण महापापाचे भागीदार होतो.
अगदी हीच परिस्थिती अर्जुनाची झाली आहे. युद्धाच्या वेळी समोर नातलग, गुरुवर्य, मित्र यांना पाहून अर्जुनाला स्वतःच्या नातलागविषयी कळवळा सुटतो आणि तो  मोहग्रस्त होऊन युद्धाला नकार देतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याचा खरा धर्म समजावून सांगतात.आपण क्षत्रिय कुळात जन्माला येऊन जर आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असेल आणि आपण फक्त बघ्याची भूमिका घेतली तर धर्माचे पालन कसे होणार? एक चांगले सुसंकृत राज्य,देश,संस्कृती यांचे आपण कसे संरक्षण करणार? याची त्याला जाणीव करून देतात आणि त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देतात.
माणूस कर्तव्यापासून दूर गेला की तो सैरावैरा पळू लागतो, तो पळकुटे धोरण स्वीकारू लागतो. त्याचे मन, बुद्धी, चित्त कुठेही लागत नाही. म्हणून कर्तव्याची इतक्या सहजासहजी धरसोड करणे म्हणजे पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखे आहे. गीतातत्व कर्तव्यापासून दूर गेलेल्या व्यक्तीला ठिकाणावर आणते. म्हणून गीता वाचण्याआधी, गीता पठण करण्याआधी आपण आपल्या कोणत्या कर्तव्याला विसरत तर नाही ना याची नियमित काळजी घ्यायला हवी. तरच गीतेच अमृततत्व आपल्या अंतःकरणात सदोदित निवास करेल.आजच्या दिनी आपणास गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

     - प्रा.भारतभूषणशास्त्री भानुकवी जामोदेेकर ९४०५२६९८२२




                        

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट