गोविंदप्रभूंचे पुरोगामित्व
गोविंदप्रभूंचे पुरोगामित्व
- डॉ . वासुदेव डहाके ,नागपूर.
श्रीगोविंदप्रभुंचा जन्म शके ११० ९ इ.स. ११८७ रोज भाद्रपद शुद्ध अष्टमी , गुरुवारला झाला . त्यांचे जन्मगाव खेड गव्हाण ( काटसरे ) .- २ ते रिद्धपूर जवळ होते . त्यांचे वडील अनंत नायक व आई नेमाइसा हे कण्व शाखीय ( शास्त्रीय ) होते . या दांपत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला . त्यांना अनेक अपत्ये झाली पण ती वाचली नाहीत . शेवटचा एक मुलगा वाचला . त्याचे नाव गुंडो ठेवले . पण त्यानंतर लवकरच त्यांचे आईवडील वारले . छोट्या गुंडोचे संगोपन मामा , मावशीने केले . त्यांनी मौंजीचे व्रतबंध संस्कार करून रिद्धपूरच्या संस्कृत वेदपाठशाळेत टाकले . तिथे त्यांना बोपद उपाध्ये शिकवीत . शिकत असताना गुंडोच्या विलक्षण बुद्धिमत्तेचा प्रत्यय सर्वांना येऊ लागला . ' गोसावियासी दीसे ये ते आणिका मासे नैये गोसावियासी मासे ये ते आणिका वरीखा नैये : ' अशी त्यांची विलक्षण बुद्धिमत्ता . चूकभूल झाली तर ते आपल्या सहाध्यियांना तर सांगतच ; पण आपल्या उपाध्यायांना सुद्धा सांगत . त्यामुळे " गुंडो सामान्य नव्हे : इस्वरू होइल : का देवता अवतारू होइल : " अशी प्रतिक्रिया ते व्यक्त करीत . हा गुंडो एक पाठी . तो ' पढता नायको : नीगदीता नायको : ' लहानपणीच ' गुंडो सामान्य नव्हे ' अशी प्रतीती येऊ लागल्याने व काही असामान्य चमत्कार दाखविल्याने त्यांच्यातील ईश्वरी गुणांबद्दल तत्कालीन भोळ्याभाबड्या नि श्रद्धाळू जनमानसात त्यांच्याविषयी आदरपूर्वक भक्तिभाव निर्माण झाला . नि गुंडोचा गुंडम , नि गुंडमचा गुंडम राऊळ झाला . गोविंदप्रभू झाला .*
गोविंदप्रभूची गुरू परंपरा
श्रीदत्त , कृष्ण , चांगदेव राऊळ , गुंडम राऊळ व चक्रधर हे महानुभाव पंथाचे पंचकृष्ण . हीच गुरुपरंपरा दत्तप्रभूनी चांगदेवास वाघाच्या रूपाने दर्शन देऊन त्यांच्या डोक्यावर पंजा ठेवला . त्यातून त्यांना ज्ञानप्राप्ती झाली . चांगदेवांनी गोविंदप्रभूच्या डोक्यावर टोपले ठेवून खराटा मारला व शक्ती प्रदान केली . तर रिद्धपुरास गुरूंच्या शोधात आलेल्या श्रीचक्रधरांकडे ते खात असलेला भुट्टा फेकला . तो त्यांनी खाल्ला व त्यातून त्यांना गुरुप्रसादरूपी ज्ञानप्राप्ती झाली . हरिपाळाचे चक्रधर हे नामकरणही गोविंदप्रभूनीच केले . अशी ही थोर गुरुपरंपरा . पंचकृष्णाच्या रूपाने सर्ववंद्य ठरली . श्रीचांगदेव राऊळ दिवसभर गावातील रस्ते झाडत . रस्त्यावरची घाण , विष्ठा साफ ( गोळा ) करून सुपड्यात भरीत व गावाबाहेर गोमती नदीत नेऊन टाकत . हा त्यांचा दिवसभराचा उपक्रम होता . ते करीत असतानाच सूपे पुजे भरिती : खराटाने विद्या हे ज्ञानदानाचं कार्यही करीत . हेच ज्ञान श्रीगोविंदप्रभूनी अंगीकारलं . श्रीचांगदेवांनी सुरू केलेलं स्वच्छतेतून समाजसेवेचं व्रत , श्रीगोविंदप्रभूनी आणखी पुढे नेऊन लोकाभिमुख केलं . तत्कालीन समाजात ठाण मांडून बसलेल्या अस्पृश्यतेला त्यांनी जोराचा धक्का दिला . चातुर्वर्ण्याने ग्रासलेल्या विषमताग्रस्त समाजात जातिभेद तोडण्याचा धडा त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला . ते स्वतः ब्राह्मण . सगळीकडे व सर्व क्षेत्रात ब्राह्मण वर्णाचं श्रेष्ठत्व सर्वमान्य होतं . तेही कुणब्यांसारख्या सवर्ण जातींकडीलही अन्नग्रहण ब्राह्मणांना त्याज्य होतं . मग मांग , महारादिकांच्या अन्नग्रहणाची कल्पनाही असंभव होती . अशा स्थितीत गोविंदप्रभूनी अस्पृश्य व सवर्णाकडे खानपान व स्वैर संचार स्वीकारला . आणि आपल्या गुरूंच्या श्रीचांगदेव राऊळांच्या स्वच्छतामूलक समाजकार्याला नवा आयाम दिला . तर महात्मा चक्रधरांनी वेदप्रामाण्य नाकारून वर्णव्यवस्थेलाच धक्का दिला . जातीजातीच्या उतरंडीला नामशेष करण्याचा उपक्रम धाडसाने राबविला . त्यापायी अनन्वित अत्याचार सोसले . अस्पृश्यांसह सर्व वर्णांना पोटाशी धरले . त्यासाठी ' अटल विजन केले नि आपले जीव उद्धरण्याचे व्यसन सिद्धीस नेले . म्हणून श्री चांगदेव राऊळांनी केलेल्या सामाजिकतेच्या पायाभरणीवर श्रीगोविंदप्रभूनी समतेचे मंदिर उभे केले . तर महात्मा चक्रधरांनी त्यावर कळस चढविला नि आपली थोर गुरुपरंपरा आपल्या प्रत्यक्ष कृतीतून अमर केली .*
श्रीगोविंदप्रभूकालीन राजकीय व सामाजिक परिस्थिती
श्रीगोविंदप्रभू बाराव्या शतकातले . देवगिरीच्या यादवांचं प्रबळ साम्राज्य होतं . रिद्धपूर टकीच्या म्हणजे आजच्या बार्शी टाकळीच्या कुण्यातरी मांडलिक राज्याच्या अधिपत्याखाली होतं . पण यादव सत्तेचाच प्रभाव होता . अळजपूर ( अचलपूर ) रिद्धपूर ही मोठी व बाजारपेठेची गावे अस्तित्वात होती . पंचक्रोशीतील लोक तिथे बाजारहाटाला येत . त्यामुळे गोविंदप्रभूची माहिती सर्वांना व्हायची नि ईश्वराचा एक वेडापिसा अवतार म्हणून सर्वजन त्यांच्याप्रती भक्तिभाव व्यक्त करायचे . ते प्रत्यक्षात कोणत्याही धर्मपंथाचे नव्हते . त्यांची वागणूक जातिभेदापलीकडची . ते सर्वांना पोटाशी धरत व लोकही " राऊळ माय : राऊळ बाप : ' म्हणून त्यांचा आदर करायचे . तत्कालीन समाजात ब्राह्मण वर्गाव्यतिरिक्त इतर वर्णीयांसाठी शिक्षणाची दारे बंद होती . शास्त्री व विद्वान ब्राह्मण ब्राह्मणांच्या मुलांना संस्कृत व वेदाध्ययन करीत . मुलाचे पाचव्या वर्षी मौंजीबंधन व्हायचे . तेली , माळी , कुणबी आदी सवर्णांकडील अन्न ग्रहण करणे ब्राह्मणांना निषिद्ध होते . अस्पृश्य समजले जाणाऱ्या महार - मांगादी लोकांचा सहवास त्याज्य होता . पण त्यांची घरे वेशीच्या आतच होती . त्यांच्यासाठी स्वतंत्र विहिरी होत्या . स्पृश्यांच्या विहिरीवरून पाणी भरण्यास त्यांना सक्त मनाई होती . त्यामुळे अनेकदा त्यांच्यावर ' पाणियेवीण ' मरण्याची पाळी येई . मोठ्या शहरात देहविक्रय करून जगणाऱ्या स्त्रिया असत . रामटेकच्या यात्रेचे प्रस्त होते . ( ४४ , ७७ , २०३ ) टोकाच्या विषमतेने हा काळ ग्रासला होता . जातिभेदासह अफाट दारिद्र्य होतं . व्रतवैकल्य , देवता , यज्ञयाग व हेमाडपंथी नीतिनियम यांनीच सारा समाज मेटाकुटीला आला होता . शिक्षणाचे व ज्ञानाचे दरवाजे इतरांसाठी कायमचे बंद असल्यामुळे स्वधर्म भयावह अशी बहुजनांची अवस्था झाली होती . राजसत्तेवरही कुलाचार्य हेमाद्रीचाच वचक व प्रभाव असल्यामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रांत विटाळ , विषमता , अंधश्रद्धा , मोक्ष , वर्ण , पारलौकिकता यांचाच सुकाळ होता . तरी " हा कालखंड म्हणजे महाराष्ट्रातील ऐश्वर्याचा व समृद्धीचा समजला जातो . यादवांच्या अधिपत्याखाली नांदणारा महाराष्ट्र स्वराज्याचे सुख अनुभवीत होता . असे विचारवंत कोणत्या आधारावर व का म्हणतात असा प्रश्न उभा राहतो .
श्रीगोविंदप्रभूची समता व अहिंसा
अशी सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या काळात श्रीगोविंदप्रभुंचा जन्म होतो . पंथीय लोक ' अवतार स्वीकारला ' असे म्हणतात . जन्मापासूनच ते वेडसर वृत्तीचे होते . उठण्यातील शीघ्रता , उकड बसणे , दुडुदुडू धावणे , वेंभळ बोलणे , मेली आली , मेली गेली , आवो मेली जाय , एकच शब्द पुन्हा पुन्हा म्हणणे , सोळा हात वस्त्र नेसणे , त्यातलेच अर्धे पांघरणे . केसांचा भांग , त्यात मळवट कुंकू , वेणी घालणे . नाभी चुंबीत दाढी , कानात सुकडी , पायात वाकी , गळ्यात साखळ , चालताना गिरक्या घेणे , कुणाच्या हातातील वस्तू अथवा खाद्यपदार्थ हिसकून ती स्वतः खाणे व “ आवो मेली जाय : गोड आहे म्हणे : ऐया माझा : आता होए म्हणे " असे आनंदोद्गार काढणे . अशा वागण्याने ' राउळ वेडे : राउळ पीसे ' असे म्हणत . श्रीगोविंदप्रभूचे असे वेड्यापिशासारखे वागणे असले तरी ; त्यांचे अंतःचक्षू सदासर्वकाळ उघडे होते . आंतरिक सद्गुणी होते . ते बालब्रह्मचारी व वैरागी होते . अनासक्त वृत्तीचे व सर्वांभूती समानत्व पाहणारे , माती आणि सोने सारखेच मानणारे खरेखुरे योगिराज होते . अहिंसेवर त्यांची निष्ठा होती . आपल्या सहकाऱ्याकडून किडा , मुंगी , विंचू जरी मारल्या गेला , तरी त्यांचा संताप अनावर होई . पुढे हेच तत्त्व अंगीकारून " तुमचेनि मुंगी रांड न होआवी " असा उपदेश श्रीचक्रधरांनी केला . आउसेने आपल्या घरातील विंचू मारताच ते तिच्यावर रागावले . ' आवो मेली जाय : काह्या मारिले ... तुवां याते खादले म्हणे : हे तुते खाइल म्हणे : ( १ ९ १ श्रीगो.च . ) अशी त्यांची अहिंसावृत्ती . ती प्राणिमात्रांना जीवे मारण्याएवढीच मर्यादित नाही , तर सजीवांना त्रास न देणेही सर्वांना बंधनकारक होते . गावागावांत होणारे झगडे , त्यासाठी निघणारे भाले , तलवारी , त्यात जाणारे बळी , होणारी हिंसा हेदेखील गोविंदप्रभूना मान्य नव्हती . अशा संघर्षाच्या प्रसंगी हातात शस्त्र घेतलेल्या दोन्ही पक्षांच्या मध्ये उभे राहात . तसा दोघांचाही राग मावळला जाई व आता राऊळ आले , आता कसले भांडण ? असे म्हणून परस्परांत मैत्री करीत . तत्कालीन समाजात चातुर्वर्ण्याचा मोठा प्रभाव होता . जातीजातीतील उच्चनीचता टोकला पोहचली होती . सारा बहुजन समाज शूद्रच समजला जात असल्याने तेल्या - कुणब्यांच्या हातचेही ब्राह्मणांना चालायचे नाही . मांग , महारादी जाती तर कायम निषिद्ध होत्या ; पण गोविंदप्रभू त्याला अपवाद होते . समाजात ठाण मांडून बसलेली ही जातीय विषमता व घनघोर अस्पृश्यता त्यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून नाकारली . तेली , कुणब्यांच्याच नव्हे तर महारामांगादिक अस्पृश्यांकडे त्यांचा संचार असायचा . ते कुणब्या घरची भाकरी खायचे . त्याचा प्रसाद आपल्या शिष्यांना द्यायचे . तेही तो आनंदाने भक्षण करायचे . परंतु उच्चनीचतेच्या चिखलात रुतलेली , संचिताच्या वेढ्यात अडकलेली मने बेचैन व्हायची . त्या सवर्ण स्त्रिया आश्चर्याने म्हणायच्या ' काय झाले ओ या ब्राह्मणांच्या रांडांशी : आमुचे कुणब्याचे अन्न खातु असे ' , ' राउळो ती भाकरी तेलियाची ' त्यावर श्रीप्रभूची प्रतिक्रिया म्हणजे ते भाकरी तेलियाची नव्हे : ते भाकरी लाकाची " तर शिष्यगण म्हणत आम्ही आमच्या गुरूंचा प्रसाद खातो . तर अस्पृश्यांकडे जाऊन उतरंडी हुडकत नि ' आवो मेली जाय गोड आहे ' म्हणत चवीने खात नि जातिभेद मोडीत काढत . त्यामुळे दीक्षितांना विटाळ होई . त्यामुळे गावच्या महाजनांनी अस्पृश्यांची घरेच गावाबाहेर हाकलली . पण श्रीप्रभू तिथेही जात . त्यांच्या घरचे अन्न भक्षण करीत नि तसेच ब्राह्मणा घरीही जात . श्रीप्रभूनी जातीयतेचा आपल्या आचरणातून असा विध्वंस केला ; पण उच्च वर्णीयांकडून त्यांचा छळ झाला नाही . हे घडले त्यांच्यावरील अतीव श्रद्धेमुळे . त्यांच्या वेड्यापिशा ईश्वरी अवताराचा तत्कालीन भाविक मनांनी स्वीकार केल्यामुळे नि महत्त्वाचे म्हणजे स्त्री , शूद्रांसह अनाथांचे दुःख निवारून त्यांना पोटाशी धरल्यामुळे . त्यांच्या हातून हे असे जातिभेद नाकारणारे कृत्य घडूनही त्याच्याकडे सर्वांनी दुर्लक्षच केले . छळ केला नाही . त्यामुळे श्रीगोविंदप्रभू व श्रीचक्रधर बाराव्या शतकातील फुले - आंबेडकर झाले असे म्हणणे योग्य ठरेल .
राउळ माय राउळ बाप
श्रीगोविंदप्रभू सर्वांवर प्रेम करायचे . अडल्यानडल्यांना मदत करायचे . एखाद्या गरीब बाईचे बाळंतपण करायचे ( ७२ ) , एखादीची मायेने पाठ घासायचे , कुणाचे लेकरू वागवायचे , कुणाचे आणायचे , सासुरवाशी सुनांना दूध देणे ( ३८ ) , मातंगांनाही ज्ञान देणे ( ७३ ) , अस्पृश्यांना आधार देणे , अनाथ व सासूरवाशी स्त्रीचे माहेर होऊन तिला पोटाशी धरणे , तिची चोळीबांगडी करणे ( १५६ ) , मातंगांच्या पाण्याची व्यवस्था करणे ( ४८ ) , चुकीबद्दल शिक्षा करणे ( १९३ , १९४ , १९५ ) पण संबंधिताला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होताच , त्याला क्षमा करून पोटाशी धरणे ही गोविंदप्रभूची प्रवृत्ती . त्यामुळे सर्वजन त्यांना मायबाप म्हणत . गोविंदप्रभूच्या व्यक्तिमत्त्वात हे गुण प्रामुख्याने आढळतात व खरोखर मायबाप होतात .
उपसंहार
श्रीगोविंदप्रभुंनी दिलेली ही समतेची , जातिभेद निवारण्याची शिकवण त्यांच्या शिष्यगणांनी शिरोधार्य मानून समतेचा पुरस्कार केला . चक्रधरांनी तर महानुभाव पंथाची स्थापना करून ( शके ११७८ ) आपल्या गुरूंची समता सर्वदूर नेऊन सर्वव्यापक केली . ' जिवांचा उद्धार ' करण्याचे आपले ' व्यसन ' आयुष्याच्या अंतापर्यंत सांभाळले . त्यांच्यानंतर नागदेवादिक शिष्यांनीही तो वसा चालविला . चक्रधरांनी चातुर्वर्णव्यवस्था प्राण असलेले वेदप्रामाण्य नाकारले . जातिभेद , विटाळ , शिवाशीव नाकारून आपल्या पंथाची द्वारे सर्वांसाठी खुली केली . त्यापायी त्यांचा अनन्वित छळ झाला . यादव सम्राटाचे म्हणजे स्वकीयांचे , स्वधर्मीयांचेच राज्य असून हेमाद्री सारख्या कर्मठ ब्राह्मणाच्या मानसिकतेची गुलाम झालेली राजसत्ता आणि त्याला ग्रासणारी विषमतामूलक शिकवण . त्यामुळे श्रीचक्रधर व महानुभाव पंथाची समतेची शिकवण त्याज्य मानून त्यांना जगणे कठीण केले . या जाचाला कंटाळून श्रीचक्रधर उत्तरापंथे निघून गेले . काही विचारवंत त्यांची हत्या झाली असे मानतात ; पण समाजाच्या सर्व स्तरांतील स्त्रीपुरुषांच्या उद्धारासाठी प्राणांत झटणाऱ्या महापुरुषाने छळाला कंटाळून देश सोडून निघून जाणे काय ! आणि त्याची हत्या होणे काय !! दोन्हीही सारखेच . कधीही भरून न निघणारी ही सामाजिक हानी . त्याचा परिणाम असा झाला की , श्रीचक्रधरांनी दाखविलेला हा प्रकाशमार्ग पुढे पुढे अंधूक होत धर्मांध व विषमतेने ग्रासू लागला . महानुभावांतही चातुर्वर्ण्य शिरले . जातींचे व तत्ज्यन्य विषमतेचे वाटरटाईट कंपार्टमेंट अधिकाधिक ' टाईट ' होऊ लागले . श्रीचक्रधरांनंतर काही वर्षांनी ज्ञानदेवांचा उदय होतो . ते नाथ पंथीय . हा समतेवर आधारलेला . श्रीशंकर हे त्याचे ' आदिनाथ गुरू ' . ज्ञानदेवांनी शैव व वैष्णव पंथांचा मिलाफ करून भागवत धर्माची उभारणी केली . त्यातूनच पुढे वारकरी संप्रदाय नावारूपास आला . अठरापगड जातींचे लोक त्यात सहभागी झाले ; पण जात संपली काय ? नाही . वारकरी संप्रदायात येणारा प्रत्येक संत आपापली जात घेऊनच भक्तिमार्गाला लागला . आजपर्यंत स्त्री शूद्रांसाठी बंद असलेली भक्तीची कवाडे सर्वांसाठी उघडली गेली . अशी आध्यात्मिक लोकशाही संतांनी निर्माण केली . पण सामाजिक समतेपासून ते दूरच राहिले . चोखोबा , तुकाराम त्याच विषमतामूलक छळाचे बळी . ही विषमता आली , ज्ञानदेवांनी पुरस्कारलेल्या वैदिकतेतून नि त्याच्या चातुर्वर्ण्याधिष्ठित तत्त्वज्ञानातून . परिणामी ज्ञानेश्वरांचा रेडाही वेदच बोलतो . त्याऐवजी तो जर नाथ संप्रदायाची समता बोलला असता तर वारकऱ्यांचे पुरोगामित्व कळसाला पोहचले असते नि आध्यात्मिक लोकशाहीसोबतच सामाजिक लोकशाहीच्या प्रस्थापनेचाही मार्ग मोकळा झाला असता ; पण तसे झाले नाही . प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीतही जातीय उच्चनीचतेचं समर्थन करणाऱ्या अनेक ओव्या दिसून येतात . उदा . सांघे शुद्रगृही आघवी । जन्हे पक्वान्न आधि बरवी । तिये द्विजे काय सेवावी दुबळा ज - हे ।। ( ज्ञा . ३/२१६ ) वगैरे . कर्नाटकात म . बसवेश्वरांनी अशाच पुरोगामित्वाची पेरणी केली व सामाजिक लोकशाहीची प्रतिष्ठापना केली . प्रतिगामी व्यवस्थेने त्यांना हत्तीच्या पायी चिरडून ठार केले . काही लोक त्यांनी आत्महत्या केली असे म्हणतात ; पण पुरोगामित्व असं निर्दयपणे मिटविण्याचा प्रयत्न झाला . कसेही होवो पण प्रतिगामी समाजव्यवस्थेतही पुरोगामित्व अभूतपूर्व सामर्थ्याने , छळांना सामोरे जात अंकुरलं नाथ संप्रदाय , गोविंदप्रभू , महात्मा चक्रधर , महात्मा बसवेश्वर , ज्ञानेश्वरादी संत या सर्वांनी तत्कालीन समाजात पुरोगामित्वाचे बीजारोपण केले ; पण त्याला भक्तीची , मोक्षमुक्तीची मर्यादा होती . परिणामी या आध्यात्मिक लोकशाहीची कोंडी फोडून ह्या चळवळी सामाजिक लोकशाहीत परिवर्तित झाल्या नाही . त्यासाठी इंग्रजी विचारांचीच गरज होती . २६ जानेवारी १ ९ ५० च्या गणराज्याने सर्वांना समता , स्वातंत्र्य , बंधुतेसह अभिव्यक्ती स्वातंत्र्यही प्रदान केले . आता तुम्ही नवनवी संशोधने करून ज्ञानेश्वर - चक्रधरादिक पुरोगाम्यांना न्याय देण्यासाठी इतिहासातील प्रखर सत्य जगापुढे मांडू शकता . उणे - अधिकाची चिकित्सा करू शकता . फक्त आपले ज्ञानचक्षू सदैव उघडे ठेवून आपण डोळसपणे विचार करण्याची गरज आहे . तसे झाले तरच श्रीगोविंदप्रभूसारख्या पूर्वसूरींचं पुरोगामित्व सार्थकी लागल्याची कृतकृत्यता त्यांना व आपल्यालाही लाभेल . एवढेच . दंडवत !
पूर्वप्रकाशित
१) महानुभावांची अक्षरलेणी
२)केशर गौरवग्रंथ



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा