कृष्णदेवराय : यशोगाथा चक्रवर्ती राजाची :

 कृष्णदेवराय : यशोगाथा चक्रवर्ती राजाची :

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

कादंबरी समिक्षा/ प्रा.बी.एन.चौधरी / ९४२३४९२५९३ :


                 विजयनगर साम्राज्याचा अस्त खर्या  अर्थाने इ.स. १६४६ साली झाला आणि त्याच सुमारास  ज्यांचे नांव स्मरताच आम्हा मराठी माणसाच्या अंगावर मूठभर मांस चढते असा शूर शिवाजी नांवाचा एक तेजस्वी युवक हिंदवी स्वराज्याची विजयपताका फडकवत ठेवण्यासाठी महाराष्ट्रांत उदयास येत होता. तो निव्वळ योगायोग होता असे म्हणता येणार नाही. हिंदवी स्वराज्याची पताका निरंतर फडकत राहावी अशी बहुधा नियतीचीच इच्छा असावी. 

                   शिवाजी महाराज इ.स. १६४०-४२ दरम्यान कर्नाटकात बेंगलूरू येथे राहिले होते. विजयनगर साम्राज्याने मुस्लिम शासकांचा निकराने प्रतिकार करीत जवळपास तीनशे वर्षे एक हिंदू राष्ट्र टिकवून ठेवले होते. संवेदनशील अशा शिवाजी राजांनी तिथला इतिहास समजून घेतला नसेल असे म्हणता येणार नाही. साहिती-समरांगण-सार्वभौम कृष्णराय समरांगणात अजिंक्य योद्धे तर होतेच शिवाय एक साहित्यिक व प्रजाहितदक्ष शासक म्हणून त्याच्या कार्य कर्तृत्वाच्या कहाण्या ऐकून शिवाजी राजे नक्कीच प्रभावित झाले असतील. किंबहुना एका शतकांपूर्वी अस्त पावलेले हिंदवी स्वराज्याचे वैभव परत आणण्याचे सोनेरी स्वप्न शिवरायांनी कर्नाटक मुक्कामी असतानाच पाहिले असावे.

                          हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे नुकतीच वाचनात आलेली, कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रकाशित केलेली "राजाधिराज श्रीकृष्णदेवराय" ही प्रदीर्घ कादंबरी. या कादंबरीच्या माध्यमातून श्रीकृष्णदेवरायांचे समग्र चरित्र उभे करीत असताना त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि एका राज्यकर्त्याच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे मनभावन नाट्य उभे केले आहे. कृष्णदेवरायांमधील एक प्रजाहितदक्ष राजा, युद्धशास्त्र निपुण, विवेकी सेनानायक, मुत्सद्दी राजकारणी, प्रतिभावंत साहित्यिक, साहित्य, कलांचं मोल जाणणारा आणि त्यांना राजाश्रय देणारा गुणग्राहक राजा, असे विविध पैलू समर्थपणे उलगडून दाखविले आहेत. ही कादंबरी, एका हिंदू चक्रवर्ती राजाला, प्रांत-भाषेच्या बेडीतून मुक्त करणारी आहे. 

                        ऐतिहासिक तथ्यांना दंतकथांचा जोड देत लेखक कल्पनाशक्तीचे पंख लावून एका साहित्यकृतीला किती सुंदरपणे खुलवू शकतो, रंजक करु शकतो हे ह्या कादंबरीतून सतत जाणवत राहते. कथानक जिवंत झाल्याने वाचकाला इतिहासात डोकावण्याची एक नवी दृष्टी प्राप्त होते. आपण प्रत्यक्ष इतिहासात वावरत आहोत, साक्षात इतिहासाचं चलचित्रपट बघत आहोत असा भास होतो, हे लेखकाचे खरे यश आहे. बहुतेक वेळा चरित्र, कादंबरी लिहिताना लेखक चरित्र नायकाच्या प्रेमातच पडलेला असतो. आपुलकी, स्नेह आणि प्रेम ह्यामुळे चरित्रनायकाचा अनुचित गौरव करण्याचा मोह पडू शकतो. परंतु इथे श्रीकृष्णदेवरायांचे व्यक्तिमत्व उभे करताना, त्यांच्यातील गुणविशेष नोंदविताना, एक मर्त्य मानव म्हणून असलेल्या त्यांच्या मर्यादा, दोषांनाही तेवढ्याच समर्थपणे मांडल्या आहेत. यातून एक साक्षेपी आणि सव्यसाची लेखकाचा प्रत्यय येतो. 

या अगोदर ह्याच लेखकाने कृष्णदेवराय रचित आमुक्तमाल्यदा ह्या तेलुगु काव्यप्रबंधाचा मराठी आणि हिंदी भाषेत गद्यानुवाद केला आहे. साहिती-समरांगण-सार्वभौम श्रीकृष्णदेवराय हा अभ्यासपूर्ण चरित्रग्रंथ लिहिला आहे. कृष्णदेवराय हा त्यांचा आवडीचा, अभ्यासाचा विषय आहे. किंबहुना त्या अभ्यासामुळेच ऐतिहासिक तथ्ये पक्की झाल्याने ‘असे घडले असेल’ अशी कल्पना करीत कृष्णरायांच्या जीवनाचे चित्रण तटस्थपणे कथन करता येणे लेखकाला सोपे गेले असावे. संपूर्ण कादंबरीभर सात्त्विकता, पावित्र्य आणि भक्तिभाव ओसंडून वाहताना जाणवतात. भाषेत एक अनामिक गोडवा आणि सौंदर्य अवतरले आहे. लेखक कुठेही वस्तुनिष्ठतेची लक्ष्मण रेषा ओलांडत नाहीत, हेच या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. 

                     कादंबरीचा प्रवेशच अतिशय उत्कंठावर्धक आणि वाचकाला गुंतवून टाकणारा झाला आहे. त्यामुळे वाचक कथेत गुंतत जातो. कादंबरीतले हे प्रसंग वाचकाला सजग करतात. ते प्रत्यक्षच वाचायला हवेत. मोठी माणसं जशी मनाने मोठी असतात परंतु त्यांचे पायही मातीचेच असतात, हे तथ्य लेखकाने अतिशय संवेदनशीलतेने, प्रभावीपणे मांडले आहे. तेनाली रामन यांच्या बुद्धीमत्तेची ओळख पटवून देण्यासाठी लेखकाने कुठेही कृष्णरायांना कमीपणा येईल असे दाखविले नाही. यामुळे दोघांबद्दलचा आदर भाव अधिक दृढ होतो. 

                       कादंबरीतील प्रत्येक प्रसंग, घटना अशा काही शब्दबद्ध केलेल्या आहेत की वाचक त्या काळाचा, कथानकाचा, प्रसंगांचाच एक भाग, घटक होवून समरसून जातो. लेखकाचे प्रसंग खुलवण्याचं कसब आणि लालित्य कौतुकास्पद असून, जणू परकाया प्रवेश करुनच, ते आपणास हा सर्व वृत्तांत कथन करत आहेत असा भास होतो. कृष्णराय यांचे राजे असणे जितके डोळ्यांत भरते तितकेच किंवा त्याहून अधिक त्यांच्यातला हळवा साहित्यिक आणि रसिक, जाणकार अधिक उठून दिसतो.    

आपल्या कन्येच्या विवाह प्रसंगी रायांनी सांगितलेलं कन्यादानाचं महत्व (२५४), देवस्थानांना दान देतांना सांगितलेला "इदं न मम" चा अर्थ (२६५), कवीच्या पालखीला स्वतः खांदा देवून रायांनी वाढवलेली कवीची प्रतिष्ठा आणि राजाचं मोठेपण (२७६), समीक्षेचे रचनात्मक आणि उपरोधात्मक प्रकार (४४०), कैदेत टाकलेल्या आप्पाजींची स्वामीनिष्ठता-धन्यावरचा विश्वास, प्रेम आणि रायांचं प्रायश्चित्त ((५१०), रायांनी आपला उत्तराधिकारी म्हणून आपले सावत्रबंधूंची केलेली दूरदर्शी निवड (५२१), साहित्यकार आणि शिल्पकार यांच्या कलेतील नेमका भेद स्पष्ट करणारं चिंतन (५२७) हे सारं कथन करायला, मांडायला माझं शब्द सामर्थ्य अपूर्ण आहे याची मला जाण आहे. वाचकांनी स्वतः वाचूनच त्याचा आस्वाद घ्यावा. तृप्तीच्या आनंदात डुबकी घ्यावी, इतकं ते थोर झालेलं आहे. ही या कादंबरीची आणि लेखकाचीही जमेची बाजू आहे.

                    मराठीत ऐतिहासिक कादंबऱ्यांची परंपरा खूप जुनी आणि समृद्ध आहे. ह्या कादंबऱ्यांनी मराठी वाचकांमध्येच नाही तर जगभरातील वाचकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. मराठी साहित्यातील मैलाचे दगड ठरले आहेत. त्याच परंपरेत व्यंकटेश देवनपल्ली ह्या लेखकाने सक्षम पदार्पण केले आहे. आपल्या शैलीने आणि लेखन सामर्थ्याने ते आपली स्वतःची ओळख निर्माण करुन, आपलं स्वतःच अढळ स्थान निर्माण करतील. या बाबत कोणतीही शंका नाही. 

                         एक ऐतिहासिक कादंबरी म्हणून "राजाधिराज श्रीकृष्णदेवराय" ह्या ऐतिहासिक कादंबरीला अनुरूप अशी भारदस्त बांधणी, आकर्षक मुखपृष्ठ आणि सुबक मांडणी हवी होती, ती कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने, आपल्या लौकिकाला साजेल अशीच केली आहे. प्रथमदर्शनीच वाचकाचे लक्ष वेधून घेणारे रायन गौड यांचे अप्रतिम मुखपृष्ठ आहे. उच्चदर्जाचे निर्मितीमूल्य सांभाळल्याने आणि तितकाच समृध्द, लेखन ऐवज असल्याने, कादंबरी रसिकमान्य होईलच. कादंबरीत दिलेली काही रंगीत चित्र कथानकाशी वाचकाचा अनुबंध जुळवून घ्यायला पूरक अशीच आहेत. एक वैभवसंपन्न हिंदुराष्ट्र राज्य घडवण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी ज्या राजाने आपले संपूर्ण आयुष्यच,  समिधा म्हणून अर्पण केल्या आहेत. त्यांचे चरित्र मराठी भाषिक वाचकांपर्यत पोहचविण्याचं काम ही कादंबरी भविष्यात करणार आहे. लेखकाने या कादंबरीच्या निमित्ताने एक शिवधनुष्यच लीलया उचलले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. 


कादंबरी : राजाधिराज श्रीकृष्णदेवराय. 

लेखक : व्यंकटेश देवनपल्ली 

प्रकाशन : कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे. 

पृष्ठ : ५५१. मूल्य : ५०० रु

समिक्षा : प्रा.बी.एन.चौधरी, धरणगाव.


♦️धन्यवाद डॉ. प्रभू आणि टिम आधुनिक केसरी♦️

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट