मराठी साहित्य संशोधनाची परंपरा

 मराठी साहित्य संशोधनाची परंपरा


(अ.भा.मराठी साहित्य संमेलन स्मरणिकेतील माझा लेख) 


डॉ.अशोक राणा

९३२५५१४२७७

-----------------------------------------------------------------------------------


साहित्यनिर्मिती ही सहज तसेच उत्स्फूर्तपणे होत असली तरी साहित्यसंशोधन तसे होत नाही. साहित्याच्या निर्मितीनंतर त्याच्या प्रेरणा व स्वरूप शोधणे हा त्यामागील प्रमुख हेतू असतो. त्यामुळे जस-जसे साहित्य निर्माण होते,तस-तसे त्यावर चिंतन-मनन व संशोधनही होत असते. त्यामुळे साहित्याच्या संशोधनाची प्रेरणा सतत कायम राहते.   साहित्य संशोधन ही इतिहास संशोधनाच्या सारखी निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे.   इतिहास संशोधनास लागणारी साधन सामुग्री अर्थात ऐतिहासिक पुरावे या प्रक्रियेतही महत्त्वाचे ठरतात. या पुराव्यांच्या अर्थात लिखित व मौखिक साहित्याच्या आधारे साहित्य संशोधन केले जाते. लिखित साहित्य हे अधिकृत समजले जाते,तसे मौखिक साहित्याच्या बाबतीत घडत नाही. परंतु जेथे लिखित साहित्य उपलब्ध नसेल तेथे मौखिक साहित्यच संशोधनाची सामुग्री म्हणून सहाय्याला येते.


साहित्यसंशोधनाप्रमाणेच साहित्यकृतीचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न समीक्षेमध्येही केला जातो. साहित्यकृतीचे आकलन,मूल्यमापन आणि आस्वाद हा समीक्षेचा प्रमुख हेतू असतो. परंतु हे करीत असताना समीक्षेमधून साहित्यसंशोधनही कळत-नकळत होत असते. म्हणूनच साहित्य संशोधनाचा एक प्रकार म्हणून समीक्षेकडे पाहिले जाते. असे असले तरी, या दोहोंमध्ये परस्पर संबंध आहे, तशीच भिन्नताही आहे ; ती कशी ते आपण समजून घेतले पाहिजे.


 साहित्य संशोधन हे साहित्याच्या मूळ स्वरूपाचा शोध घेण्याच्या उद्देशाने केले जाते,तर समीक्षा ही मूल्यमापनाचा मापदंड हातात घेऊन उभी असते. हा या दोन प्रक्रियांमधील मूलभूत फरक आहे . विशेषतः प्राचीन साहित्याचे संशोधन तर समीक्षेपेक्षा पाठचिकित्सेकडे अधिक वळलेले असते. पाठ्शुद्धी हा त्याचा प्रमुख हेतू असतो. पाठचिकित्सा या शब्दासाठी पाठसंशोधन हा शब्दही वापरण्यात येतो  .


प्राचीन मराठी साहित्याच्या निर्मितीचे श्रेय जसे महानुभाव संप्रदायातील साहित्यिकांना जाते, तसेच साहित्यसंशोधन आणि पाठचिकित्सेचा प्रारंभही त्यांनीच केलेला आहे, हे एक वास्तव आहे. मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ रचणारे माहिमभट हे मराठी साहित्य संशोधनाची परंपरा सुरू करणारे पहिले संशोधक ठरतात. त्यानंतर अनेक साहित्यिकांनी या दिशेने वाटचाल सुरू केली. तिचा थोडक्यात परामर्श याठिकाणी घेऊ या.


प्राचीन मराठीतील साहित्य संशोधन


महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या आठवणी अर्थात लीळा संकलित करण्याचे तेराव्या शतकातील माहिमभटाचे कार्य म्हणजे मराठीतील साहित्य संशोधनाचा प्रारंभ होय. त्यानंतर केशवराज सूरी यांनी महानुभावांचे तत्त्वज्ञान व आचारधर्म सांगणाऱ्या सूत्रांचे संकलन केले. प्राचीन मराठी साहित्याच्या संशोधनात या दोन साहित्यिकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानंतर वारकरी संत एकनाथ यांनी सोळाव्या शतकात ज्ञानेश्वरीची पाठशुद्ध प्रत सिद्ध केली. प्राचीन मराठीतील या साहित्यसंशोधनानंतर खऱ्या अर्थाने या कार्याला सुरुवात झाली , ती एकोणिसाव्या शतकात.  आधुनिक पद्धतीने साहित्य संशोधन याच काळात सुरू झाले. त्यामुळे साहित्यसंशोधनाचा प्रारंभ एकोणिसाव्या शतकात झाला असे मानण्यात येते.


एकोणिसाव्या शतकातील साहित्य संशोधन


मुद्रण कलेचा विकास झाल्यानंतर जुन्या हस्तलिखितांचा शोध घेण्याचे कार्य सुरू झाले, ते त्यांना मुद्रित करण्याच्या हेतूने. पशुरामपंततात्या गोडबोले यांनी इ.स.१८५४ मध्ये प्रकाशित केलेल्या     ‘ नवनीत ’ मधून प्राचीन संत आणि पंडित कवींच्या निवडक वेच्यांचा संग्रह आधुनिक काळातील वाचक व अभ्यासकांसाठी उपलब्ध झाला. त्यामुळे आपल्या प्राचीन वारशाची ओळख सर्वांना झाली. त्यानंतर माधव चंद्रोबा डुकले यांनी इ.स.१८६० मध्ये ‘सर्वसंग्रह’ या मासिकातून विविध कवींच्या ग्रंथांचा संग्रह प्रसिद्ध केला.  इ.स. १८७४ मध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आपल्या ‘निबंधमाले’तून इतिहास व वाङ्मय या विषयांच्या संशोधनास चालना दिली.  ‘इतिहास’ या शीर्षकाच्या त्यांच्या निबंधाने वि.का.राजवाडे यांना इतिहास संशोधनाची प्रेरणा मिळाली . याशिवाय इतर संशोधकही या निबंधाच्या वाचनातून संशोधनाकडे वळले.

  

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या या कार्याच्या प्रेरणेतून इ.स.१८७८ मध्ये जनार्दन बाळाजी मोडक व काशिनाथ नारायण साने यांनी ‘काव्येतिहाससंग्रह’ या नियतकालिकाचे संपादन केले. त्यातून अनेक प्राचीन अप्रसिद्ध संस्कृत आणि मराठी काव्यरचना तसेच महत्त्वाची ऐतिहासिक कागदपत्रे अभ्यासकांपुढे आलीत. या नियतकालिकाच्या संपादनात सुरुवातीला विष्णुशास्त्री सहभागी होते. चित्रगुप्तविरचित शिवाजी महाराजांची बखर,भाऊसाहेबांची बखर,पानिपतची बखर,पेशव्यांची बखर या व इतर बखरी इतिहाससंशोधक का.ना.साने यांनी संपादित केल्यात. निरनिराळी हस्तलिखिते जमवून त्यांचे संपादन करताना त्यामधील विविध प्रकारचे पाठ तपासून त्यातून योग्य ती प्रत म्हणजेच पाठ्शुद्ध प्रत तयार करण्याचे कार्य करून निरनिराळ्या पाठ्भेदांची चिकित्सा त्यांनी केली. त्यातून त्या-त्या बखरींचा कालनिर्णय करणेही शक्य झाले. मराठी साहित्य संशोधनाला एक प्रकारची शिस्त त्यामुळे लागली व त्याचे श्रेय का.ना.साने यांना जाते.


प्राचीन मराठी साहित्याप्रमाणेच मध्ययुगीन कालखंडातील शाहिरी वाङ्मय प्रकाशात आणण्याचे कार्यही एकोणिसाव्या शतकातच झाले. ‘ विविधज्ञानविस्तार ‘ या नियतकालिकात इ.स.१८७२ साली पहिला ‘नारायणरावाच्या वधाचा पोवाडा‘ प्रकाशित झाला. त्यानंतर ‘निबंधमाला’ आणि ‘काव्येतिहाससंग्रह’ या नियतकालिकांमधूनही अनेक पोवाडे प्रसिद्ध झालेत. त्यांच्या वाचनातून शाहीर वाङ्मयाच्या संशोधनाची प्रेरणा शं.तु.शाळीग्राम यांना मिळाली. त्यांनी गावोगावच्या गोंधळी कलावंतांकडून पोवाडे जमवून त्यांतील काही पुस्तकरुपाने इ.स.१८७९ मध्ये प्रकाशित केलेत.  ‘थोर पुरुषांचे पोवाडे-पूर्वार्ध ‘ या शीर्षकाखाली ते उपलब्ध आहेत. त्यानंतर ऑक्वर्थ या इंग्रज विद्वानाने या कार्यात मोलाची भर टाकली.  शाळीग्राम आणि ऑक्वर्थ यांनी पोवाड्यांच्या संशोधनाचे कार्य पुढे नेले. त्यातून इ.स. १८९१ मध्ये त्यांचा ‘ इतिहासप्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे ‘ हा ग्रंथ आकाराला आला. त्यानंतर गोविंद बल्लाळ शितूत यांनीही  इतिहासाच्या संशोधनास सहायक ठरणाऱ्या पोवाड्यांचा संग्रह सुरू केला. शाहिरी वाङ्मयाच्या संशोधनास पूरक असे रामजोशी,अनंत फंदी,होनाजी बाळा,परशराम इ.शाहिरांच्या लावण्या आणि पोवाडे शाळीग्राम यांनी प्रकाशित केलेत. त्यांच्या या प्रयत्नात काही तृटी होत्या. या त्रुटी प्रामुख्याने संपादन,मोडी लिपीतील वाचन,गोंधळी कलावंतांच्या तोंडून पोवाडा ऐकताना तो उतरून घेताना झालेले लेखन यामुळे निर्माण झाल्या होत्या. परंतु त्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम मात्र मोठेच होते,त्यामुळे मराठी साहित्य संशोधनात त्यांनी घातलेली भर तितकीच मोलाची आहे.


इ.स.१८९०मध्ये जनार्दन बाळाजी मोडक यांनी ‘ काव्यसंग्रह ‘ या मासिकाचे प्रकाशन सुरू केले. या मासिकाचे संपादन नंतर वामन दाजी ओक यांच्याकडे आले. या मासिकातून प्राचीन काळातील असंख्य कवींच्या कविता प्रसिद्ध झाल्यात. त्यातूनच वामनपंडितांची ‘यथार्थदीपिका’. मुक्तेश्वराच्या ‘ महाभारताची काही पर्वे ’,मोरोपंतांची कविता,विविध कवींची स्फुट पद्यरूप कविता,विठ्ठ्लकवीची कविता इ. प्राचीन साहित्य प्रकाशित झाले. यापैकी काही कवितासंग्रहांना विवेचक प्रस्तावना,तळटिपांमध्ये निरनिराळे पाठ,तसेच प्राचीन काव्याच्या पाठ्शुद्ध प्रती तयार करून त्यातील अर्थ सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला . त्यात संशोधनापेक्षा संकलनच अधिक होते. असे असले तरीही मराठी साहित्याच्या संशोधनात यामुळे खूपच मदत झाली आहे,यात शंका नाही. संशोधनासाठी आवश्यक अशा प्राचीन मराठी काव्याची हस्तलिखिते मिळविणे,त्यावर चरित्रविषयक व अर्थ निर्णायक टीपा लिहिणे,आवश्यक तेथे पाठभेद देणे आणि ते प्रकाशित करणे या कार्याला या काळात अधिक महत्त्व दिले गेले. त्यावरच पुढे विसाव्या शतकातील मराठी साहित्य संशोधनाची इमारत उभी राहिली.


विसाव्या शतकातील साहित्य संशोधन


विसाव्या शतकात मराठी साहित्य आणि इतिहास संशोधनाला शिस्तबद्ध करण्याचे ऐतिहासिक कार्य वि.का.राजवाडे यांनी केल्रे. त्यामुळेच त्यांना ‘ इतिहासाचार्य ’ या बिरुदाने संबोधले जाते. ‘ मराठ्यांच्या इतिहासाची साधने ’ या शीर्षकाखाली त्यांनी २२ खंड प्रकाशित केलेत. त्यातील काहींना त्यांनी विवेचक प्रस्तावना लिहिल्यात.  इतिहास संशोधनास पूरक म्हणून बखरींकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यामुळे निर्माण झाला. त्याचप्रमाणे बखरींमधील कालविसंगत बाबींकडेही त्यांनी अभ्यासकांचे लक्ष वेधले. स्थल,काल,व्यक्ती,प्रसंग आणि कारणविपर्यास या पाच प्रकारच्या विपर्यासाचा त्यांनी विस्तृत उहापोह केला. 


इतिहासाप्रमाणेच मराठी साहित्याच्या संशोधनालाही शिस्त लावण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांनी एकनाथपूर्व ज्ञानेश्वरीची प्रत शोधून तिचे संशोधन व संपादन केले. १९०९मधील त्यांच्या या कार्याने विसाव्या शतकातील मराठी साहित्य संशोधनाचा प्रारंभ झाला. या ग्रंथाला त्यांनी लिहिलेली विवेचक प्रस्तावना ही प्रस्तावनेचा वस्तुपाठ बनलेली आहे. अशीच ऐतिहासिक प्रस्तावना त्यांनी स्वराज्यसंकल्पक शहाजी राजांच्या चरित्रावर आधारित जयराम पिंड्ये लिखित ‘ राधामाधवविलास चम्पू ’ या ग्रंथाला लिहिलेली आहे. १९२२ मध्ये त्यांनी या ग्रंथाचे प्रकाशन केले.  त्यानंतर १९२४ मध्ये ‘ महिकावतीची बखर ‘ चिकित्सक प्रस्तावनेसह प्रसिद्ध केली. १९१० मधील महानुभाव सांकेतिक लिपीची त्यांनी केलेली उकल महानुभाव साहित्य संशोधनास चालना देणारी ठरली. त्यामुळे महानुभाव पंथ व त्याचे वाङ्मय अभ्यासकांपुढे आले.


 वि.ल.भावे यांनी ‘ महाराष्ट्र सारस्वत’ या आपल्या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीत महानुभाव पंथ व त्याच्या साहित्याचा परिचय करवून दिला. महानुभावांच्या सकळा,सुंदरा व पारमांडिल्य या लिपींचा उलगडाही याच आवृत्तीत त्यांनी केला. त्यांनी १९२४ मध्ये ‘ महानुभाव-महाराष्ट्र-ग्रंथावली,’ ‘ कविकाव्य सूची ‘ व ‘ वच्छहरण ‘ या प्रकरणांचे संपादन केले. भास्करभट्ट बोरीकरांचे ‘ शिशुपालवध ‘,१९२६ मध्ये वि.ल.भावे यांनी संपादित करून प्रकाशित केले.  दत्तराज महंत आणि हरिराज बाबा महंत या महानुभाव महंतांनी त्यांना या कार्यात मदत केली.


विदर्भात याच काळात य.खु.देशपांडे महानुभाव साहित्याच्या संशोधनाकडे वळले होते. त्यांनी इ.स.१९२५ मध्ये ‘ महानुभावीय मराठी वाङ्मय ‘ हा महानुभाव साहित्याचा इतिहास सांगणारा संशोधनपर ग्रंथ प्रकाशित केला. यवतमाळ येथे त्यांनी ‘ शारदाश्रम’ या नावाची स्वतंत्र संशोधन संस्था इ.स.१९२६मध्ये स्थापन केली. या संस्थेच्या वतीने त्यांनी इ.स. १९२९ मध्ये पंडित नारायण व्यास बहाळीयेकृत ‘ श्री रुद्धिपूरवर्णन ‘ हा महानुभावांचा काव्यग्रंथ आणि इ.स. १९३६ मध्ये ‘ श्रीचक्रपाणिचरित्र ‘ हा गद्यग्रंथ शारदाश्रममालेत प्रकाशित केला. याशिवाय त्यांनी महानुभाव वाङ्मयावर अनेक स्फुट लेख लिहिलेत. त्यांचे हे कार्य नंतर वामन नारायण देशपांडे यांनी पुढे नेले. त्यांनी इ.स. १९३५ मध्ये ‘ आद्य मराठी कवयित्री ‘ हे महदंबेवरील पुस्तक आणि इ.स. १९३९ मध्ये ‘ स्मृतीस्थळ ‘ हा महानुभाव चरित्रग्रंथही संपादित केला. शारदाश्रमाचे एक संशोधक द.बा.महाजन यांनी ‘ सिंद्खेडकर राजे जाधवरावांची बखर ‘ प्रकाशात आणली. त्यामुळे जिजाउंचा इतिहास अभ्यासकांना कळला. एड.प्र.रा,देशमुख यांनी मराठीच्या भाषाशास्त्रात मौलिक संशोधन केले, त्याचप्रमाणे सिंधुलिपीचे वाचन केले. त्यांचा ‘ सिंधू संस्कृती,ऋग्वेद व हिंदू संस्कृती ‘ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.. डॉ.देशपांडे यांचा वारसा चालविणारी एक पिढीच त्यानंतर विदर्भात पुढे आली. त्यात महत्वाचे नाव आहे,डॉ.वि.भि.कोलते यांचे; तसेच डॉ.भाऊ मांडवकर यांनीही तो वारसा पुढे नेला. नागपूर येथील संशोधक हरी नारायण नेने यांनी नीलकंठ बलवंत भवाळकर यांच्या साहाय्याने ‘ श्रीचक्रधर- सिद्धांतसूत्रे-भाग पहिला-लक्ष्मणान्वय सूत्रपाठ ‘(१९३१),’ दृष्टांतपाठ ‘(१९३७) या ग्रंथांचे प्रकाशन केले. ह.ना.नेने यांनी लीळाचरित्राचे संपादन आणि महानुभाव वाङ्मय संशोधनपर लेखनही केले. महानुभाव संशोधन म्हटले स्वाभाविकपणे आपणासमोर नाव येते,ते डॉ.वि.भि.कोलते यांचे.


डॉ.वि.भि.कोलते यांचे संशोधन


महानुभाव साहित्याचे संशोधन व प्रकाशन या कार्यात आपले आयुष्य झोकून देणाऱ्या डॉ.वि.भि.कोलते यांचे कार्य ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. त्यांनी या कार्यात सर्वाधिक योगदान दिले.

त्यांनी संपादित केलेल्या ‘ भास्करभट्ट बोरीकर चरित्र व काव्यविवेचन’(१९३५), ‘ महानुभाव तत्त्वज्ञान ‘(१९४५), ’ महानुभावांचा आचारधर्म ‘(१९४८), ‘श्रीचक्रधरचरित्र ‘(१९५२) व ‘महानुभाव संशोधन ‘(१९६२) या ग्रंथांमधून त्यांच्या व्यासंगाचा तसेच चिकित्सक संशोधनाचा परिचय आपणास होतो. याशिवाय त्यांनी भास्करभट्ट बोरीकरकृत ‘उद्धवगीता’(१९३५) आणि ‘ शिशुपालवध ’ (१९६०), मुनिव्यासकृत ’ स्थानपोथी ’ (१९५०),म्हाहिंभटकृत ‘गोविंद्प्रभू चरित्र’ (१९४४) आणि रवळो व्यासाचे ‘ सह्याद्रीवर्णन ’ (१९६४) हे महानुभाव ग्रंथही संपादित केलेत. या ग्रंथांना त्यांनी ज्या प्रस्तावना लिहिल्यात,त्यातून त्या ग्रंथांच्या रचयित्याचा काळ,चरित्र,भाषाशैली तसेच त्यातील काही वादग्रस्त प्रश्नांचा त्यांनी केलेला विद्वत्तापूर्ण अभ्यास दिसून येतो. त्यांच्या आयुष्याचा अंत करणारे त्यांच्या संशोधनावरील न्यायालयीन प्रकरण मात्र वेदनादायी आहे. १९८२ मध्ये त्यांनी महानुभावांच्या पोथ्या आणि अनेक ग्रंथांच्या आधारे संपादित केलेला ‘ लीळाचरित्र ‘ हा ग्रंथ वादग्रस्त ठरला,तो त्यातील चक्रधरांच्या शेवटासंबंधी त्यांनी काढलेल्या निष्कर्षामुळे. त्यामुळे त्यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती,तसेच या ग्रंथाच्या प्रती जप्त करण्याचे आदेश दिले होते. वास्तविक पाठशुद्ध संशोधनाचा तो आदर्श नमुना होता. त्यांच्या संशोधनाचा कळस शोभावा असा हा ग्रंथ सांप्रदायिक अभिनिवेशामुळे अडगळीत पडला.


  महानुभाव साहित्याच्या संशोधनात ज्यांनी मोलाचे योगदान दिले,त्यात डॉ.सुरेश डोळ्के यांचे नाव महत्त्वाचे आहे, त्यांनी नरेन्द्राच्या ‘ रुक्मिणी-स्वयंवराची’ संपूर्ण प्रत शोधून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. १९७१ मधील या ग्रंथाने महानुभाव साहित्याच्या संशोधनात मोलाची भर घातली. त्यांच्या प्रमाणेच डॉ.शं.गो.तुळपुळे यांनीही महानुभाव संशोधन पुढे नेण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. ‘लीळाचरित्राचे’ संपादन करून त्यांनी ‘ महानुभाव पंथ आणि त्याचे वाङ्मय ‘ हा ग्रंथ १९७६ मध्ये लिहिला. या महानुभावेतर संशोधकांशिवाय महानुभाव महंतांनीही महानुभाव साहित्याचे संशोधन व संपादन केले,त्यात दत्तराज महंत,गोपिराज महंत,यक्षदेव महंत इ.चा समावेश होतो.


संशोधन संस्थांचे कार्य


महाराष्ट्रातील काही संशोधन संस्थांमध्ये अभ्यासकांनी प्राचीन मराठी तसेच संस्कृत ग्रंथांचे संशोधन कार्य व त्यांच्या पाठशुद्ध आवृत्त्या सिद्ध केल्यात. अशा काही संस्थांमध्ये पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्यासंशोधनमंदिर व डेक्कन कॉलेज यांचा समावेश होतो. मराठी साहित्याच्या संशोधन कार्यात पुण्याच्या  भारत इतिहास संशोधक मंडळाप्रमाणेच धुळ्याचे समर्थ वाग्देवता मंदिर व राजवाडे संशोधन मंदिर,यवतमाळचे शारदाश्रम,नागपूरचे विदर्भ संशोधन मंडळ,मुंबईचे मराठी संशोधन मंडळ इ.संस्थांनी मोलाचे कार्य केले आहे. प्राचीन हस्तलिखिते मिळवून त्यांची वर्गवारी लावणे,त्यांचे जतन करणे,त्यांच्या आधारे पाठ्चिकित्सा करणे आणि त्यांचे प्रकाशन करणे या कार्यात या संस्थांनी पुढाकार घेतला आहे. या संस्थांशिवाय महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरच्या साहित्य संस्थांनी आणि विद्यापीठांनीही या कार्यात मोलाचा वाटा उचलला. तसेच व्यक्तिगत पातळीवर काही अभ्यासकांनीही या दृष्टीने प्रयत्न केलेत. त्यांचा थोडक्यात परामर्श याठिकाणी घ्यायला हरकत नाही.


व्यक्तिगत प्रयत्नांचे स्वरूप


यापूर्वी महानुभाव साहित्याचे संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या व्यक्तिगत कामगिरीचा परामर्श आपण या ठिकाणी घेतला. महानुभाव साहित्य हे सांकेतिक लिपीत असल्यामुळे या संशोधनाला अधिक महत्व होते. परंतु त्यासाठी या संशोधकांना फारशी शोधाशोध करावी लागली नाही. कारण की,हे सारे साहित्य महानुभावांच्या मठांमध्ये मूळ रुपात उपलब्ध होते, तसे संत साहित्याच्या बाबतीत नव्हते. अनेक लोकांनी त्याच्या केलेल्या प्रती त्यामधील पाठ्भेदास कारणीभूत ठरल्यात. त्यांचा शोध घेण्यासाठी अभ्यासकांना बरीच वणवण करावी लागली. तसेच पाठ्शुद्धीसाठी अनेक प्रतींचा तुलनात्मक अभ्यासही करावा लागला. म्हणून या प्रयत्नाचे महत्त्व आगळेच आहे. त्याचा परामर्श थोडक्यात घेऊया.


मराठीतील पहिले कवी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो,त्या मुकुंदराजाच्या विवेकसिंधू या काव्य ग्रंथाचे संपादन पहिल्यांदा डॉ.कृ.पा.कुलकर्णी यांनी इ.स.१९५७ मध्ये केले. त्याचबरोबर मुकुंदराजाच्या जन्म स्थळ व काळाबद्दलही अभ्यासपूर्ण विवेचन केले. तसाच प्रयत्न ज्ञानेश्वरीची पाठशुद्ध आवृत्ती तयार करण्याच्या बाबतीत बंकटस्वामी,साखरेबुवा, बा.अ.भिडे, शं.वा.दांडेकर , कृ.ना.आठल्ये इ.अभ्यासकांनी केला. या साऱ्यांनी सांप्रदायिक श्रद्धेपोटी हे प्रयत्न केलेत,परंतु त्याला शास्त्रशुद्ध संशोधनाची पार्श्वभूमी नव्हती. तसा प्रयत्न पहिल्यांदा इतिहासाचार्य राजवाडे यांनीच केला होता. त्यांची ज्ञानेश्वरीची प्रस्तावना त्यामुळेच गाजली. १९४७ मध्ये रा.ग.हर्षे यांनी ज्ञानेश्वरीचे संपादन करून तिचा चिकित्सक व भाषाशास्त्रीय दृष्टीने अभ्यास मांडणारा पहिला अध्याय प्रसिद्ध केला. त्यानंतर श्री.ना.बनहट्टी यांनी ज्ञानेश्वरीची अनेक हस्तलिखिते गोळा करून तिची पाठशुद्ध आवृत्ती तयार केली. त्यांनी संपादित केलेला बारावा अध्याय प्रदीर्घ प्रस्तावनेसह १९६७ मध्ये प्रकाशित झाला. आणखी काही अध्याय त्यांनी सिद्ध केलेत,परंतु त्यांच्या मृत्यूनंतर हे कार्य अर्धवट राहिले. १९५६ मध्ये वि.मो.केळकर यांनी ‘ ज्ञानेश्वरीची ओवीसंख्या ‘ या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरीच्या ओवीसंख्येवर संदर्भ,अर्थ,रचना व भाषा या निकषांवर चर्चा करून विवाद्य ओव्या निश्चित केल्यात. नंतर त्यांनी अरविंद मंगरुळकर यांच्या साहाय्याने ज्ञानेश्वरीचे संपादन केले,त्यात  पाठ्संशोधनाची शास्त्रशुद्ध दृष्टी दिसून येते. असाच प्रयत्न द.सी.पंगू यांनीही केला.


ज्ञानेश्वरीप्रमाणेच इतर संतांच्या काव्याचेही संपादन काही अभ्यासकांनी केले. त्यात साखरे महाराज,वि.न.जोग,प्र.न.जोशी इ. अभ्यासकांचा समावेश होतो. अशा काही संपादकांच्या प्रयत्नामागेही  चिकित्सक अभ्यासापेक्षा सांप्रदायिक दृष्टीच अधिक दिसून येते. मराठी साहित्याचे इतिहासकार वि.ल.भावे यांनी तुकारामांचे शिष्य जगनाडे महाराज यांच्या हस्तलिखितावर आधारित ‘ तुकाराम महाराजांची अस्सल गाथा ‘ या शीर्षकाखाली काही अभंग प्रकाशित केलेत.परंतु त्यालाही चिकित्सेचा आधार नसल्यामुळे विद्वानांनी त्यांना मान्यता दिली नाही. अशा प्रयत्नाचा एक भाग म्हणून पु.म.लाड यांच्या ‘ तुकारामांची गाथा’ या ग्रंथाकडे पहिले जाते. महाराष्ट्र शासनाने १९५० मध्ये या ग्रंथाचे प्रकाशन केले. यालाच आज सर्वांची मान्यता आहे. इतिहाससंशोधक वा.सी.बेंद्रे यांनी १९५० साली ‘तुकाराम महाराज कृत ’मंत्रगीता’ या ग्रंथाचे प्रकाशन केले. त्यामुळे संत तुकारामांचा गीतेविषयीचा असलेला अभ्यास प्रकाशात आला. 


संत साहित्याप्रमाणेच पंडित कवींच्या काव्याचे संशोधनही काही संशोधकांनी केले,त्यात अनंत काकबा प्रियोळकर यांचे नाव महत्वाचे आहे.   त्यांनी रघुनाथ पंडिताचे दमयंतीस्वयंवर (१९३५) व मुक्तेश्वरकृत ‘महाभारताचे आदिपर्व’ (खंड १ते ४; १९५१,१९५३,१९५६ आणि १९५९). त्याचप्रमाणे ल.रा.पांगारकर यांनी ‘मोरोपंती वेचे’(१९०५) प्रसिद्ध करून ‘समर्थ ग्रंथ भांडार (१९२७)आणि रामदासांचा ‘दासबोध’(१९३१) या ग्रंथांचे संपादन केले. परंतु,रामदासांच्या साहित्याचे संपादन मोठ्या प्रमाणात केले ते,शंकरराव देव यांनी. धुळे येथे त्यांनी श्रीसमर्थ वाग्देवता मंदिराची स्थापना करून त्यांनी रामदास तसेच रामदासी संप्रदायातील कवींचे साहित्य जतन केले आणि त्यांचे संपादनही केले. त्यांच्या ‘ रामदास आणि रामदासी ‘ या मासिकात त्यांनी रामदासांबद्दलची अनेक ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित केलीत.


संत,पंत व तंत अशी मराठी साहित्याची वर्गवारी करणाऱ्या य.न.केळकर यांनी शाहिरी साहित्यासाठी ‘ तंत ’ हा शब्दप्रयोग केला आहे. त्यांनी ऐतिहासिक पोवाड्यांचे संकलन करून त्याचे खंड १९२८,१९४४ व १९६९ मध्ये प्रकाशित केलेत. त्यांच्या पूर्वी हे कार्य शाहीर शाळीग्राम व इतर अभ्यासकांनी केले होते. परंतु,त्यांच्या संकलनात तसेच मोडी लिपीच्या वाचनात काही तृटी राहिल्या होत्या, त्या केळकरांनी दुरुस्त केल्यात. त्याचबरोबर काही उपलब्ध न झालेल्या   लावण्या ‘अंधारातील लावण्या’ (१९५६) या शीर्षकाखाली प्रकाशित केल्यात.


ख्रिस्ती साहित्याचे संशोधन हा मराठीच्या संशोधन कार्यातील एक महत्वाचा टप्पा आहे. या क्षेत्रात अ.का.प्रियोळकर,स.ग.मालशे व वि.बा. प्रभुदेसाई यांचे कार्य मोलाचे आहे. प्रियोळकरांनी १९५४मध्ये ‘ सांतु आंतोनीची जीवित्वकथा ‘ आणि १९६५ मध्ये ‘ दौत्रिन क्रिस्तां ‘हे ग्रंथ प्रकाशित केलेत. स.ग.मालशे यांनी क्रिस्तपुराणावरील प्रबंध लिहिला आणि वि.बा. प्रभुदेसाई यांनी १९६३ मध्ये ‘सतराव्या शतकातील गोमंतकी बोली’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला. या सर्व व्यक्तिगत पातळीवर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांमध्ये एक नाव उठून दिसते,ते डॉ.रा.चिं.ढेरे यांचे.


डॉ. रा.चिं.ढेरे यांचे ऐतिहासिक कार्य


महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास व लोकसाहित्य-लोकसंस्कृतीचा अभ्यास म्हणजे डॉ. रा.चिं.ढेरे यांचे साहित्य असे समीकरण आज झाले आहे.  त्यांनी अनेक प्राचीन हस्तलिखिते आणि पोथ्या शोधून त्यांचे संपादन केले. त्याचप्रमाणे  या संपादनातून नवे निष्कर्षही काढलेत. त्यांच्या   सर्वच निष्कर्षांशी आपण सहमत नसलो,तरी त्यांनी केलेल्या भव्य स्वरूपातील कार्यामुळे आपण त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. त्यांच्या या ऐतिहासिक कार्यात ज्या साहित्याचा समावेश होतो,त्यापैकी -’नरेन्द्राचे रुक्मिणीस्वयंवर’(१९६५), ’सुभद्रास्वयंवर’(१९६७), ‘श्रीकृष्णचरित्र’(१९७३), ’महिकावतीची बखर’(१९७३),’शिवदिग्विजय’(१९७५), ‘मुरारीमल्लाची बालक्रीडा’(१९७७)हे प्रमुख होय.या सर्व संपादित साहित्याला त्यांनी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना व टिपा या पुढील अभ्यासकांसाठी दिशादर्शक ठरतील अशाच आहेत.


‘विविधा’(१९६७),’गंगाजली’(१९७२),’शोधशिल्प’(१९७७) या ग्रंथांमधून त्यांचे संस्कृतीविषयक शोधनिबंध संकलित करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रातील काही धार्मिक संप्रदायांचा इतिहास त्यांच्या ‘नाथ संप्रदायाचा इतिहास’(१९५९),’दत्त संप्रदायाचा इतिहास’(१९६४),’प्राचीन मराठीच्या नवधारा’(१९७२),’चक्रपाणि’(१९७७),’श्रीविठ्ठल :एक महासमन्वय’(१९८४) या शोधग्रंथांमधून प्रकाशात आला आहे. दैवतकथा हे डॉ.ढेरे यांचे विशेष अभ्यासक्षेत्र. ‘खंडोबा’(१९६१),’रामराज्याची स्फूर्तिकेंद्रे’ (१९६६),’महाराष्ट्राचा देव्हारा’(१९७८),’लज्जागौरी’(१९७८),’तुळजा भवानी’( ),’शिखरशिंगणापूरचा शंभू महादेव’,’श्री व्यंकटेश्वर व श्री कालहस्तीश्वर’, ’ करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी’ इ.ग्रंथांमधून व्यक्त झाला आहे. लोकसंस्कृतीचा पट उलगडवून टाकणारी त्यांची ‘मराठी लोकसंस्कृतीचे उपासक’ (१९७१),’संतसाहित्य व लोकसाहित्य: काही अनुबंध’(१९७८) इ.पुस्तके या विषयावरील संदर्भमूल्य असणारी अशी ठरली आहेत.  संतशिरोमणी नामदेव महाराजांच्या चरित्राचा वेध घेणारे ’ नामदेव : एक विजययात्रा’, शिवरायांच्या प्रशासनाचा आदर्श ठरलेला ‘ आज्ञापत्र ‘(१९६०) असे त्यांचे अनेक ग्रंथ मराठी साहित्याच्या संशोधनास चालना देणारे आहेत.


आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी काही संशोधन प्रकल्प हाती घेतले होते. त्यातील त्यांच्या वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी प्रकाशित झालेल्या ‘श्रीपर्वताच्या छायेत’ या ग्रंथात शिवोपासनेविषयीचे लेखन एकत्र गठित केले आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर शिवोपासना प्राचीन काळापासून गाजत राहिली आहे आणि तिचा मूलस्रोत आंध्राप्रदेशातील श्रीपर्वत आहे. नागार्जुनाची जन्मभूमी विदर्भ होती, पण कर्मभूमी श्रीशैल पर्वत मानली जाते. महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधरस्वामी यांनी श्रीपर्वतावर एकांतात एक तप काढले. श्रीचक्रधर, श्रीज्ञानदेव आणि श्रीमुकुंदराज या तिघांच्याही कार्य आणि विचारविश्वाशी असलेला श्रीपर्वताचा थेट संबंध महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीशी संबंधित आहे,या वास्तवाचा शोध त्यांनी घेतला. लोप पावलेल्या अनेक लोककलांचा शोध घेऊन त्यावर त्यांनी लेखन केले आहे. कोणत्याही विद्यापीठाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला नसतानाही त्यांच्या कार्यावर मान्यतेची मुद्रा उमटविणारी डी.लिट. ही पदवी त्यांना देण्यात आली. आज अनेक विद्यापिठांमध्ये त्यांच्या कार्यावर शोधप्रबंध सिद्ध होत आहेत. डॉ.ढेरे यांच्यासारखे अनेक संशोधक व्यक्तिगत पातळीवर आजही कार्य करीत आहेत. 


लोकसाहित्य संशोधन


सरोजिनी बाबर यांनी लोकसाहित्याचे केलेले संकलन व संपादन हे व्यक्तिगत स्वरूपातील संशोधनाचे एक आदर्श उदाहरण आहे. त्याचप्रमाणे दुर्गा भागवत यांनी लोकसाहित्याच्या अभ्यासाला दिलेली शिस्त वाखाणण्यासारखी आहे.   त्यांचा ‘लोकसाहित्याची रूपरेखा’(१९५६) हा ग्रंथ लोकसाहित्याच्या अभ्यासकांना दिशा देणारा दीपस्तंभ ठरला आहे. त्यांच्याप्रमाणेच कमलाबाई देशपांडे,मालतीबाई दांडेकर,ना.गो.नांदापूरकर,प्रभाकर मांडे,गंगाधर मोरजे,म.वा.धोंड, वा.कृ.चोरघडे, मधुकर वाकोडे,विठ्ठल वाघ,तारा भवाळकर,विश्वनाथ शिंदे,साहेब खंदारे इ.अभ्यासकांनीही लोकसाहित्याच्या संशोधनाला नवी दिशा दिली आहे. याशिवाय अनेक विद्यापिठांमध्येही मराठी भाषा व साहित्यविषयक संशोधन होत आहे. त्यांचा थोडक्यात परामर्श या ठिकाणी घ्यायला हरकत नाही.


विद्यापीठीय मराठी संशोधन


महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर,पुणे, औरंगाबाद,कोल्हापूर, अमरावती, जळगाव,नांदेड, सोलापूर,गडचिरोली येथील विद्यापीठांबरोबरच महाराष्ट्राबाहेरील दिल्ली, गोवा,बडोदा,हैद्राबाद, इंदूर, सागर,उज्जैन,जबलपूर,गुलबर्गा या ठिकाणी असलेल्या विद्यापीठांमध्येही मराठी मधील संशोधने आजवर मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. स्थळाअभावी त्यांचा परामर्श येथे घेणे शक्य नाही. विद्यापीठीय पद्व्यांमुळे मिळणाऱ्या आर्थिक व इतर लाभासाठी  संशोधन करणारे अनेक असतात. परंतु काही अभ्यासक पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्यावरही आपले संशोधन चालूच ठेतात. त्यामुळे भाषा व साहित्याच्या अभ्यासात मोलाची भर पडते. अशा संशोधकांच्या संशोधनाला शिस्त लागावी याकरिता काही अभ्यासकांनी संशोधनाची प्रक्रिया उलगडवून दाखविणारे लेखन केले,त्यात डॉ.दु.का.संत व डॉ.स.ग.मालशे यांची नावे महत्त्वाची आहेत. डॉ.संत यांचा ‘ संशोधन : पद्धती,प्रक्रिया व अंतरंग’(१९६६) व शोधविज्ञान कोश आणि डॉ.मालशे यांचे ‘शोधनिबंधाची लेखनपद्धती’(१९७५)हे पुस्तक यादृष्टीने मार्गदर्शक ठरले आहे. ही पुस्तके उपलब्ध नव्हती,तेव्हाही काही अभ्यासकांनी संशोधनाची शिस्त पाळून आपापल्या आवडीच्या विषयात संशोधनकार्य केले आहे. त्यातून मराठी भाषेच्या विविध पैलूंना उजाळा मिळाला. त्यात वाङ्मयेतिहासाचे बृहद प्रकल्प उभे राहिलेत.


वाङ्मयेतिहासाचे प्रकल्प


महाराष्ट्र सारस्वतकर वि.ल.भावे यांनी मराठी वाङ्मयाचा इतिहास सर्वप्रथम लिहिला. आरंभापासून तो इ.स.१८१८ पर्यंतचा मराठी साहित्याचा इतिहास त्यांनी पुरेशी साधने उपलब्ध नसतानाही लिहिला,हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यानंतर ल.रा.पांगारकर यांनी मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे तीन खंड सिद्ध केलेत. बा.अ.भिडे यांनी लिहिलेला मराठी वाङ्मयाचा इतिहास अपूर्ण अवस्थेत तसाच राहिला. डॉ.अ.ना.देशपांडे यांनी प्राचीन व अर्वाचीन अशा दोन्ही कालखंडातील मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. शाहिरी वाङ्मयाचा इतिहास श्री.म.वर्दे यांनी ‘ मराठी कवितेचा उषःकाल किंवा मराठी शाहीर ’ या शीर्षकाखाली लिहिला. त्यानंतर य.न.केळकर व म.ना.सहस्रबुद्धे यांनी १९६१ मध्ये ‘ मराठी शाहिरी वाङ्मय ‘ तसेच वि.कृ.जोशी यांनी १९६१ मध्ये ‘ लोकनाट्याची परंपरा ‘ हा ग्रंथ लिहिला. या सर्व लेखनात संशोधनापेक्षा संकलनालाच प्राधान्य असल्याचे दिसून येते. संत चरित्राचे संशोधन करणारे ल.रा.पांगारकर,ज.र.आजगावकर,न.र.फाटक,शं.दा.पेंडसे हे याला अपवाद होत. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमधून संत कविंचा काल आणि त्यांचे कर्तृत्व या विषयीचे वाद निर्माण झालेत. साहित्यात विविध प्रकारच्या प्रवृत्ती असतात,त्यांचा शोधही काही अभ्यास?

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट