लीळाचरित्रचं ओझं - प्रा.इंद्रजित भालेराव
।। लीळाचरित्रचं ओझं ।।
प्रभू औरंगाबादला देवगिरी महाविद्यालयात शिकायला गेल्यावर अधून मधून मलाही औरंगाबादला जावं लागायचं.तेव्हा आताच्या सारखे मोबाईल तर सोडाच पण साधे फोन देखील खूपच विशेष लोकांकडेच असत.त्यामुळे समाचार घेण्यासाठी पत्रा शिवाय पर्याय नव्हता.पत्र मिळायला दहा-दहा दिवस लागायचे.त्यामुळे बाबांना सतत प्रभूची काळजी वाटायची.सुरुवातीपासुनच तो अशक्त प्रकृतीचा होता.नेहमी आजारी पडायचा.म्हणून बाबांचा त्याच्यावर जरा जास्तच जीव होता.इथं वसमतला ते सतत यायचे.प्रभू शाळेत असेल आणि त्याचा वर्ग सुरू असेल तर निदान त्याला खिडकीतून पाहून तरी जायचे.मग त्यांना समाधान वाटायचं.अशी असते बापाची माया.
तर प्रभू औरंगाबादला गेल्यावर बाबा मला महिना दोन महिन्याला औरंगाबादला पाठवायचे.कधी पैसे नेऊन देण्यासाठी,कधी काही खाऊ नेवून देण्यासाठी मी औरंगाबादला त्याच्याकडं जायचो.देवगिरी महाविद्यालयाच्या वसतिगृहात मुक्काम करायचो.आणि दुसर्या दिवशी परत यायचो.आताच्या सारख्या तेव्हा सतत आणि जलद रेल्वे नव्हत्या.त्यामुळे औरंगाबादला जाऊन यायचं म्हणजे तीन दिवस मोडत असत.मग मी कधी एखाद्या कॅसेटसाठी कधी एखाद्या पुस्तकासाठी गावात औरंगाबादेत जायचो.जैत रे जैत चित्रपट तेव्हा नुकताच आलेला होता.त्याची गाणी मला फार आवडत.पण त्याची कॅसेट अजून आलेली नव्हती.रेकॉर्डवरुन कॅसेट मध्ये गाणे भरून घ्यावी लागत.तशी मी ती गाणी घेतलेली होती.
त्याच दरम्यान महाराष्ट्र शासनाने साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने वि.भि.कोलते यांनी संपादित केलेलं लीळाचरित्र प्रकाशित केलं होतं.ते केवळ शासकीय ग्रंथभांडारातच उपलब्ध होत असे.तेव्हा आणि आताही मराठवाड्यात केवळ एकच शासकीय ग्रंथभांडार आहे.असाच औरंगाबादला गेल्यावर मी,प्रभु,त्याचा वर्गमित्र आणि खोली वरचा सोबती रोहिदास ठोंबरे असे आम्ही तिघं त्या दुकानाच्या शोधात निघालो.तर विचारत विचारत आम्हाला ते शहागंज मध्ये गांधी पुतळ्याजवळ सापडलं.तिथं शासनाने प्रकाशित केलेली पुष्कळ पुस्तकं होती.पण दुकानदार इतका उदासीन होता की तो एखादं पुस्तक दाखवायला देखील कंटाळा करीत होता.पण गरज आपली होती.मी लीळाचरित्र तर घेतलच पण सोबत संत एकनाथांचे भावार्थरामायणही घेतलं.मला हे सगळे पुस्तकं पाहून घबाड सापडल्याचा आनंद झाला.माझे कितीतरी दिवस या ग्रंथांच्या वाचनामुळं अतिशय आनंदात गेले.
वसमतच्या मठात मी लीळाचरित्र घेऊन गेलो.ते वाचताना मला तिथं अनेकांनी पाहिलं.तिथल्या सगळ्याच महानुभाव पंथीय कारले मंडळीला आणि दामोदर बुवानाही वाटलं की हा ग्रंथ आपल्याकडेही असावा.मी जेव्हा पुन्हा औरंगाबादला निघालो तेव्हा पाच जणांनी माझ्याजवळ ग्रंथ आणावा म्हणून पैसे दिले.मलाही आनंद वाटला.तेव्हा या भव्य ग्रंथाची किंमत केवळ 60 रुपये होती.
प्रत्यक्ष ग्रंथ आणताना मात्र माझी खूपच फजिती झाली.कारण शासनाने काढलेला हा ग्रंथ अत्यंत उच्च दर्जाची निर्मिती असलेला होता.त्याचा मोठा आकार,नॅचरल शेडचा जाड कागद,पुठ्ठा बांधणी यामुळे त्याचं वजन जवळजवळ पाच किलो तरी असावं.पाच प्रतींचं 25 किलो वजन मी तेव्हा विद्यार्थी दशेत आटापिटा करत डोक्यावर वाहून नेलं.आणि ग्रंथ प्रत्येकाला दिला तेव्हा अनुभवलेला आनंद अवर्णनीय होता.माझा सगळा भार त्या आनंदामुळे हलका झाला.800 वर्ष 40 पिढ्यांनी वाहिलेल्या ग्रंथाचा मीही ओझेकरी झालो याचा तो आनंद होता.
पण पाठोपाठ या ग्रंथातविरुद्ध महानुभाव पंथाने गदारोळ उठवला.त्याचे प्रमुख सूत्रधार अमरावतीचे दर्यापूरकर हे महंत होते.त्यांचाही दौरा वसमतच्या मी रहात असलेल्या मठातच आला आणि या ग्रंथावर बंदी घालावी अशा शासनाला देण्याच्या पत्रावर त्यांनी सर्वांच्या सह्या घेतल्या.हा सर्व प्रकार पाहून निरागस विद्यार्थी वयातला मी भांबावून गेलो होतो.पंथ आणि चक्रधर स्वामीवरच्या निष्ठेपायीच मी हे सगळं केलेलं होतं.
डॉक्टर वि.भि. कोलते यांनी आयुष्यभर अथक मेहनत घेऊन हा ग्रंथ तयार केला होता.याआधी या ग्रंथाचे तीन भागात प्रकाशन होत असे.पूर्वार्ध,उत्तरार्ध आणि एकांक.डॉक्टर कोलते यांनी अतिशय मेहनतीने हे सगळे भाग एकत्रित संपादित करून त्यात सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ यातली सूत्र आणि दृष्टांतही त्या त्या लिळेत समाविष्ट केलेले होते.पण पंथीयांच्या दृष्टीने काही आक्षेपार्ह लीळा त्यात घेतल्यामुळे पुढं या ग्रंथावर न्यायालयातून कायमची बंदी आली आणि कोलते यांची मेहनत लोकांपर्यंत पोहोचू शकली नाही.
संत एकनाथांचे भावार्थरामायण मी गावाकडे घेऊन गेलो होतो.एकदा बैठकीत मी तो ग्रंथ चाळत बसलो होतो.तेव्हा गावातले पीठ मागणारे चैतन्य गिरी महाराज गोसावी तिथं आले. भीक्षा मागताना माझं ग्रंथवाचन पाहून उत्सुकतेने ते आत आले आणि त्यांनी तो ग्रंथ चाळून पाहिला.त्याची निर्मिती आणि किंमत पाहिली.ग्रंथ शासनाचा असल्यामुळे तोही उत्तम प्रतीचा आणि खूप कमी किमतीचा होता.त्यांनी गावभर ही बातमी सांगितली.गावातल्या लोकांना वाटलं आपणही हा ग्रंथ घ्यावा.ते माझ्याकडे आले आणि पुन्हा जाताना सांगा,आमचे ही पैसे घेऊन जा म्हणाले.तो ग्रंथ लीळाचरित्रापेक्षाही मोठा आणि जास्त वजनाचा होता आणि दोन भागात होता.तरीही पुन्हा गेलो तेव्हा माळकरी माणिकरावांना तो मी आनंदाने आणून दिला.
आता औरंगाबादला प्रभूकडे गेलो की शहागंजला शासकीय ग्रंथागाराकडे चक्कर टाकू लागलो.प्रत्येक वेळी काहीतरी घेऊ लागलो.शासनाने तेव्हा अनेक ग्रंथ काढले होते.स्वस्तात मिळत होते.मानवेंद्रनाथ रॉय यांच्या मानव आणि क्रांती या ग्रंथाचे दोन अनुवादित खंड,राजवाड्यांची ज्ञानेश्वरीची प्रस्तावना,समग्र गडकरींचे दोन खंड,वि.भि. कोलते यांनी संपादित केलेलं पंचोख्यान,नामदेवांची गाथा,तुकोबांची गाथा,शेक्सपियर गौरव ग्रंथ,भा.रा.तांबे यांच्या वरचा गौरव ग्रंथ असे कितीतरी ग्रंथ अत्यंत माफक किमतीत मी तेव्हा विकत घेतल्याचं आठवतं.
तेव्हाच्या या ग्रंथखरेदीनं माझा गावाकडचा वैयक्तिक ग्रंथ संग्रह बराच वाढला.महत्त्वाचे मूलभूत ग्रंथ माझ्या संग्रही त्या विद्यार्थीदशेतच गोळा होत गेले.त्यामुळे मला बाबा औरंगाबादला प्रभूकडे जा म्हटलं की मी आनंदानं जाऊ लागलो.त्यामागं हे शासकीय ग्रंथागाराचं आकर्षण होतं.लोकांना या ग्रंथागाराचा पत्ता सांगताना मी सांगायचो शहागंज मधल्या महात्मा गांधीच्या पुतळ्याकडे पहा.तो पुतळा शासकीय ग्रंथागाराकडे बोट दाखवतो.त्याच दिशेला पुतळ्यापासून शंभर पावलावर हे ग्रंथागार आहे.पण आता हे ग्रंथागार स्टेशन जवळ उड्डाण पुलाच्या बाजूला आलेलं आहे.तेव्हा हे शहराच्या दुसऱ्या टोकाला लांबवर होतं.तिथून मी स्टेशन पर्यंत हे ओझं वहायचो.
💐



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा