वासनिक
*धर्माच्या प्रचार प्रसारात*
*वासनिक व त्यागी भिक्षुक सर्वात पुढे*
-----------------------
सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींनी *आप्ताचे वाक्य लागे* असे सांगितले आहे. तसेच *साजात्या साजात्या वेध* असे निरोपण केले आहे व *जीव जीवाचे म्हणितले करिती* असेही निरोपण केले आहे.
देवता भक्ती व सप्त व्यसनामध्ये रत असलेल्यांना भेटून त्यांच्याशी संग करून त्यांना ईश्वर धर्माचा लळा लावून त्यांना ईश्वर धर्माकडे लावण्याचे कार्य हे मोठ्या प्रमाणात वासनिक लोकांनी व त्यागी भिक्षुकांनी समाजात फिरून केले आहे. त्यामुळे धर्माचा खरा प्रसार हा वासनिकांकडून व साधारण भिक्षुकांकडूनच सर्वाधिक होत आला आहे. मार्गमंडळी सांभाळणारे ज्ञानीये किंवा महंत आचार्य हे वासनिकांनी व त्यागी भिक्षुंनी धर्मात पाठवलेल्या नुतन वासनिकांना व भिक्षुंना धर्मात दृढ करण्याचे कार्य करीत आहेत.
आज मोठ्या मार्गात जर सहज फिरून आपण पाहिले तर असे दिसून येते की तेथील सन्निधानातील मंडळींना ईश्वर धर्माकडे आणणारे... उपदेश देऊन मार्गात पाठविणारे... हे कुणीतरी वासनिक निमित्त आहेत... किंवा कुणीतरी त्यागी भिक्षुक त्यांचे निमित्त आहेत हे दिसून येईल. स्वत: अधिकरणांनी त्यांचे सन्निधानातील भिक्षुंना त्या भिक्षुंचे अविद्यकात जाऊन ईश्वर धर्माचे महत्व सांगून त्यांना ईश्वर धर्मात आणल्याचे उदाहरण आजच्या काळात फार दुर्मिळ आहे...
थोडक्यात काय तर वासनिक व त्यागी भीक्षुंनी समाजात फिरून घडवून मढवून ईश्वर धर्माचा लळा लावून ज्यांना ईश्वर धर्मात आणले अशा मनुष्यांना धर्मावर दृढ करण्याचे काम आज मार्गात होत असल्याचे दिसते आहे... नव भीक्षुंना व नव निर्मित वासनिकांना शास्त्र सांगून धर्मावर दृढ करणे हे ही फार मोठे कार्य आहेच. परंतु सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी म्हणतात *अवर धर्मापासून काढून ईश्वर धर्माकडे लावणे हे श्रेष्ठ कार्य आहे. हा ईश्वरीय प्रेमाचा उपाय आहे.* खर्या अर्थाने देवता भक्ती पासून काढून ईश्वर भक्ती कडे आणणाऱ्या आजच्या वासनिक व त्यागी भीक्षुंना ईश्वरीय प्रेमाचा उपाय घडत आहे. याकडे लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न करीत आहे. आज सर्वत्र साजरा होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या स्टेजवर बसलेले ज्ञानी, अधिकरण, महंत, आचार्य जसे थोर योग्यतेचे पुरूष आहेत. तसेच सभेत स्टेज खाली बसलेले वासनिक, त्यागी भिक्षुक यातही ईश्वरीय प्रेमाचा विधी घडलेले थोर योग्यतेचे रत्न आहेत. हेही समजून घ्यावे. त्यांची योग्यता ईश्वरच जाणतो. *लीळाचरित्रातील सेनपुंजीला जसा प्रेमाचा उपाय घडला होता*. जगाच्या दृष्टीने ती जशी शेनपुंजी होती. परंतु आमच्या स्वामींच्या दृष्टीने तो जीव रत्न होता.. तसे आजच्या *वासनिक व त्यागी भीक्षुकांतही थोर योग्यतेचे पुरूष आहेत. प्रेमाचा उपाय घडलेले रत्न आहेत* हे ज्ञान दृष्टी असणार्यांना दिसून येईल...
*धर्मप्रसार म्हणजे*
*नवीन परिवार धर्मात येणे*
*प्रचार म्हणजे धर्माला दृढ करणे*
-----------------
ज्या परिवारात देवीदेवतांची पूर्वीपासून उपासना आहे. घट स्थापना करणे, लक्ष्म्या बसविणे, गणपती बसविणे, इ. केले जाते. खंडोबा, जेजूरीची, पंढरीची वारी केली जाते. पितळीच्या प्रतिमा, शेंदरी देवताची पूजा पिढ्यान् पिढ्या पासून केली जाते. अशा परिवाराला व्यवहारिक मार्गदर्शन करून. (ब्रह्मविद्या शास्त्र कथन न करता ) गीता भागवत आदी निरोपण करून. त्यांना ईश्वरभक्ती चे महत्व पटवून देणे. त्यांचे घरातील देवता प्रतिमा सुपात भरून जलात सोडायला त्यांना प्रवृत्त करून त्यांचे देव्हार्यावर परमेश्वर अवतार चरणांकित विशेषांची स्थापना करण्याची मानसिकता घडविणे. त्यांना मांसाहार, चोरी, हिंसा, मद्यपान आदी सप्त व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ घ्यायला लावणे व असे करून जो परमेश्वराला शरण येईल. त्या परिवारात अन्यव्यावृत्ती व पंचनाम कानात फुंकून उपदेश देऊन तो परिवार महानुभाव पंथाशी जोडणे. याला धर्म प्रसार (विस्तार) म्हणावे. मग हाच परिवार पुढे पिढ्यान् पिढ्या महानुभाव पंथात ईश्वरीय धर्माचे पालन करतो .असे हजारो परीवार पूर्वज ज्ञानी साधू संतांनी वासनिकांनी महानुभाव पंथात जोडले आहेत. हेच महानुभाव पंथाचे आज खरे अनुयायी आहेत. हीच महानुभाव पंथाची खरी सामाजिक शक्ती व सामर्थ्य आहे.
*उपदेशी घरातील मुला मुलींचे*
*किंवा सुनांचे निमित्त गुरू कोण ?*
-------------------
आज महानुभाव पंथाचे उपदेशी घरात पिढ्यान् पिढ्या पासून ईश्वर भक्ती चालत आहे. या उपदेशी घरात जन्माला आलेल्या मुला मुलींना बालपणापासूनच धर्माचे संस्कार मिळतात. देवपूजा करणे, दंडवत घालणे, साधू संतांचे पूजन करणे, तीर्थयात्रा करणे, मार्गात जाणे यातून त्यांना धर्माचे संस्कार मिळतात. हे संस्कार त्यांना माता पित्याकडून मिळतात. पुढे त्यांना कोणातरी ज्ञानी अधिकरणाच्या समोर बसवून उपदेश देण्याचा 10 मिनिटाचा विधी करून गुरूपदेश दिल्या जातो. परंतु त्यांचे गळी खरा धर्म बालपणापासूनच मातापित्यांनी उतरवलेला आहे. फक्त 10 मिनीटात एखादा साधू कान फुकल्या बरोबर धर्म कसा समजावून सांगू शकेल ? खरा धर्म ज्यांनी रूजवला ते परिवारातील माता पिताही निमित्त गुरू आहेत. त्यांनाही पविते अर्पण करावे. असे शास्त्रच सांगते. श्री चक्रधर स्वामी सांगतात *निमित्त मानिजे..*
उपदेशी घरातील मुले मोठी झाल्यावर त्यांचे लग्न करण्यासाठी मुली शोधण्याचे काम सुरू होते. अन्य घरातील देवता भक्ती तील मुलगी सून म्हणून घरी आणली जाते. कोणतीही सून सासरी आल्याबरोबर लगेच उपदेश घ्यायला कुणाही ओळख नसलेल्या ज्ञानी अधिकरणा समोर किंवा साधारण भीक्षुका समोर बसून उपदेश घ्यायला लगेच तयार होत नाही. तिला तर साधू कोण ईश्वर कोण याचेच ज्ञान नसते. मग ती स्वता होऊन उपदेश घ्यायला तयारच कशी होईल ? तर सासू सासरे किंवा परिवारातील लोक तिला धर्माचे ज्ञान सांगून तिला पहिले ईश्वर धर्माचा वेध लावतात. तिच्या मनात ईश्वर धर्माचे बीज रोवतात व मगच ती उपदेश घ्यायला प्रवृत्त होते. नंतर कुणाही लहान मोठ्या साधू समोर ती पानसुपारीचा विडा देऊन 10 मिनिटांत उपदेश घेते. जर तिला तिच्या सासरच्या ने सून म्हणून घरी आणले नसते. तर तिला ईश्वर धर्म मिळाला असता काय ? कदाचित ती दुसर्या देवता भक्ती करणार्या परिवारात सून म्हणून गेली असती. व तिचा जन्म वाया पण गेला असता. परंतु सासू सासर्याने तिला सून म्हणून पसंत केल्यामुळे तिला परमेश्वर धर्माचा लाभ झाला. आता सांगा त्या सूनेला खरा धर्म कोणी दाखविला ? सून म्हणून उपदेशी परिवारात आणणाऱ्या सासू सासर्यांना... की 10 मिनिटाचा उपदेश विधी करून कान फुकणार्या श्रीगुरूंना ? ..तर सासू सासरे हेच त्या सूचनेचे निमित्त गुरू आहेत. म्हणूनच वासनिकांनी व त्यागी भीक्षूंनी हा धर्म वाढवला आहे असे मी ठामपणे म्हणेन....
असे हजारो वासनिकांनी व त्यागी भिक्षूंनी धर्म वाढवलेला मी डोळ्याने पाहिला आहे. लातूर जिल्ह्यात राठोडा येथील, भीमराव बुवा शेळके, तात्या सुतार , तोंडोळीचे भाऊसाहेब पाटील तोंडोळीकर , नाशिक जिल्ह्यातील चकोर अण्णा, नागपूर जिल्ह्यातील रा.बो.मेश्राम, ठाकरे, खोब्रागडे, जालना जिल्ह्यातील हिरामण बुवा, तान्हूबाई फलटणकर अशा शेकडो भिक्षू -वासनिकांनी हा धर्म वाढविल्याचे मी डोळ्याने पाहिले आहे. ज्यांना पंथात मान होता असे महाराष्ट्र अधिकरण कै.आचार्य श्री शेवलीकर मोठे बाबा कल्लूरकर यांना कै त. वच्छलाबाई आत्या शेवलीकर यांनी धर्माला लावले हे मी डोळ्याने बघितले आहे... असे कितीतरी उदाहरणे तुमच्या माझ्याभोवती पाहावयास मिळतात..
*ईश्वर धर्म वाढविण्यात खर्या अर्थाने*
*गरिब वासनिक पुढे आहेत*
------------------
तुम्ही कितीही प्रयत्न करा धनवान वासनिक धन देऊन धर्माची सेवा करेल. परंतु लाखातून एखादाच आपले बालक धर्माला देईल. परंतु गरीब वासनिक मात्र - 1) स्वत:चा देह परमार्गाला अर्पण करेल, 2) स्वत:चे बालके परमार्गाला अर्पण करतील 3) व घडेल तशी अन्न धान्याची भिक्षा परमार्गाला अर्पण करतील. अशाप्रकारे गरीब वासनिकांनी पिढ्यान् पिढ्या पासून धर्माची सेवा केली आहे...जोपासला आहे.या गरिब वासनिकांनी अर्पण केलेले बालके आज ज्ञान भक्ती वैराग्याने परिपूर्ण होऊन मोठं मोठ्या आचार्य पदाची धूरा सांभाळून मठ मंदिर मार्गातून शास्त्र सांगून धर्माला दृढ करीत असल्याचे आपण पाहातो आहे...मोठमोठ्या आचार्य पदावर आज जेवढेही महानुभाव पंथात ज्ञानी अधिकरण आहेत ते गरिब घराण्यातील वासनिकांनी एकेकाळी दान दिलेले बालके आहेत. हे मी पाहत आहे. तुम्हीही तपास करून बघा. माझे म्हणणे तुम्हाला पटेल ...
आम्ही आज पंथातील विद्यमान ज्ञानीये, अधिकरण,आचार्य म्हणून ज्यांना वंदन करतो, त्यांचे अविद्यकातील आई, वडील, घराणे ढोरे राखणारे, मजूरी करणारे, शेतात काबाड कष्ट करणारे, गरीब परिस्थितील होते. त्यांनी त्यांचे बालके पंथाला दान दिले. तेच गरीब वासनिकांनी परमार्थाला दान दिलेली बालके आज ज्ञान भक्ती वैराग्याने परिपूर्ण होऊन धर्माचा विस्तार व प्रचार प्रसार करित आहेत. पंथाचे महान कार्य करित आहेत. मोठ मोठे धनवान लोके राज्यकर्ते त्यांचे समोर नतमस्तक होत आहेत. हीच महानुभाव पंथाचे सामाजिक सामर्थ्य व शक्ती आहे..
अन्य देवता भक्तीतील परिवाराला धर्माला लावणे फार कठिण आहे. जे शारिर, मानसिक व वाचिक कष्ट सहन करू शकतात. निंदा अपमान सहन करू शकतात. ज्यांना व्यवहारी ची बुद्धी आहे. पुराणातील ग्रंथाचा अभ्यास आहे. ईश्वर धर्माचा चतुर्विध साधनांचा प्रचंड अभिमान आहे. असेच वासनिक भिक्षु हे धर्माचे कार्य करू शकतात. "जिये चुलीची खीर खादली तियेची काई राख खाल" असे सांगणारी त्यागी भिक्षु व तात्काळ ईश्वर धर्मात अनुसरणारे वासनिक दामोदर पंडीत. हे प्रसिद्ध उदाहरण आहे. सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी म्हणतात "आप्ताचे वाक्य लागे"... "जीव जीवाचे म्हणितले करिती" , "साजात्या साजात्या वेध" या सूत्रानुसार महानुभाव पंथाला कितीही उतार चढाव आले तरी *वासनिक वर्ग हा खंबीरपणे - स्वताचा जन्म देवाला देऊन - स्वताचे बालके परमार्गाला अर्पण करून व - घडेल तशी अन्न धान्याची भीक्षा परमार्गाला देऊन- परमार्गाची सेवा करितच राहणार. ही ईश्वराचीच प्रवृत्ती आहे...
*महंत श्री प्रज्ञासागरबाबा महानुभाव*
*संकल्प कर्ता- 108 कोटी नामस्मरण मंदिर*
*श्रीक्षेत्र खणेपुरी, या.जि.जालना*
*संपर्क - 9850448501*


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा