।। भावेश्वर, चक्रधर आणि निळभट ।। -प्रा.इंद्रजित भालेराव
।। भावेश्वर, चक्रधर आणि निळभट ।।
बरबडा साहित्य संमेलनाला जाताना प्रा. नारायण शिंदे सर म्हणाले की तुम्ही भावेश्वरला कधी गेलात का ? खूप पूर्वी जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी मी भावेश्वरला गेलो होतो. तेव्हा तिथलं जुनं मंदिर पाहिलं होतं. शिंदे सर म्हणाले थोडा वेळ आपल्या हातात आहे आणि मंदिर बरबड्याच्या रस्त्यावरच आहे तर आपण जाऊयात का ? मलाही आनंदच वाटला आणि आम्ही मंदिरात गेलो. मी मागे आलो तेव्हा हा सगळा परिसर मोकळा होता. इथं एकही घर नव्हतं. पण आता इथं सगळी घरं झालेली दिसली. वस्ती गरीब लोकांचीच दिसत होती. दाटीवाटीनं वाकडीतिकडी अशी घरं होती. त्यातून मार्ग काढत आम्हाला इथपर्यंत पोहोचावं लागलं. सगळा भाग अतिक्रमणांनी भरून गेलेला आहे. हा भाग नांदेडमधील गोदावरीच्या जुन्या पुलाजवळ येतो.
मंदिराचं रूप एकदम पालटून गेलेलं दिसलं. मूळचं हे हेमाडपंथी शिवालय होतं. त्या शिवालयाच्या ओवरीत चक्रधरांचा रहिवास होता. हे मंदिर खाली खूप खोलात, जमिनीत दोन मजले आत होतं. आता त्याच जागी चक्रधराची संबंधित जागेवर एक अद्ययावत असं संगमरवरी मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तेही तितकंच खोल आहे. मंदिराच्या गाभाऱ्याचा एक लहानसा व्हिडिओ मी परवा माझ्या फेसबुक पेजवर टाकलेला होता. तो आपण सर्वांनी पाहिलेला आहेच. आजूबाजूला जिथं जिथं चक्रधरांच्या स्पर्शाच्या नोंदी लीळाचरित्रात सापडल्या तिथंही विशेशांची स्थापना करण्यात आलेली आहे.
नवीन बांधकाम अद्ययावत तंत्रज्ञानानं केलेलं आहे. मंदिर खूप छान आहे. मुंबईचे महानुभाव उद्योजक श्री. सीताराम कृष्णा कुडव यांनी या मंदिराचं नवं बांधकाम केलेलं आहे. त्यांच्या नावाची शिलाही आतमध्ये लावलेली आहे. मी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. बाहेरूनही सगळं मंदिर पाहिलं. तिथल्या आईंना भेटलो. त्यांना दंडवत प्रणाम केला. त्यांनी आम्हाला केळाचा प्रसाद दिला. आम्ही देत असतानाही त्यांनी दक्षिणा घेतली नाही. मी त्यांना मंदिराविषयी आणि त्यांच्याविषयी माहिती विचारली. त्यांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या. आमच्या रिधोरा या गावचे नांदेडमध्ये निवासी असलेले लोकही या मंदिरात नियमित येतात असं त्यांनी सांगितलं..
हे स्थान खूप महत्त्वाचं आहे. नांदेडकरांसाठी तर आणखीच महत्त्वाचं आहे. या ठिकाणी चक्रधर स्वामी अनेक दिवस मुक्कामाला होते. त्यांच्यासोबत त्यांचे पहिले शिष्य निळभट भांडारेकार हेही इथं होते. निळभट भांडारेकार यांचं निधनही याच परिसरात झालं. त्यामुळे वाङ्मयीन दृष्ट्या हे ठिकाण अतिशय महत्त्वाचं आहे. पण ही गोष्ट नांदेडच्या वाङ्मयविश्वात फारशी परिचित नसावी, असं मला वाटतं. कारण कधी कुणी त्याचा फारसा उल्लेख करताना दिसत नाही.
चक्रधर स्वामी गुजरातमधलं राज्यपद सोडून महाराष्ट्रात आले. सालबर्डीच्या डोंगरात बारा वर्षे त्यांनी तपश्चर्या केली. नंतर ऋद्धपुरला गोविंद प्रभुंची भेट घेऊन ईश्वरी शक्तीचा स्वीकार केला. तिथून पुढं झाडीपट्टीतल्या आदिवासी भागात आणि मग तेलंगणात गेले. परतीच्या प्रवासात भंडाऱ्याला निळभट भांडारेकार यांची भेट झाली. निळभट भांडारेकर आपल्या घराच्या बैठकीत आंघोळीपूर्वी उघड्या अंगान पोथित काहीतरी संदर्भ पाहत होते. चक्रधर स्वामी भिक्षा मागायला म्हणून त्यांच्या दारात उभे होते. निळभट भांडारेकार यांना संदर्भ सापडत नसावा. ते अस्वस्थ वाटत होते. तोंडातून संदर्भाचा उच्चार करत होते. चक्रधरांच्या ते लगेच लक्षात आलं. आणि त्यांनी मागील पाणी पहा, असं सांगितलं. चक्रधर स्वामींचा आवाज ऐकून त्यांनी वर पाहिलं आणि लगोलग त्यांना चक्रधर स्वामींचा वेध झाला.
त्यांनी पोथी तिथंच ठेवली आणि तशाच अवस्थेत ते उठून चक्रधरांच्या मागं निघाले. त्यांच्या पत्नी, अहो आंघोळीसाठी पाणी काढलय, आपण कुठे चाललात ? असं विचारत होत्या. तर ते म्हणाले, मी आता यांच्यासोबत चाललोय, परत येणार नाही, तुम्ही मात्र घरीच रहा. त्या आज्ञाधारक असल्यामुळे त्यांनी हात जोडले आणि त्या थांबल्या. निळवट भांडारेकार चक्रधर स्वामींच्या सोबत निघाले. सोळा वर्ष ते चक्रधर स्वामींच्या सोबत राहिले. या सोळा वर्षात अन्य कुणीही शिष्य चक्रधर स्वामींच्या सोबत नव्हता. शिष्यानं गुरुशी कसं वागाव याचा आदर्श म्हणून पुढं आयुष्यभर चक्रधर आपल्या शिष्यांना भांडारेकार यांचं उदाहरण देत असत आणि त्यांच्या वागण्या बोलण्याचं कौतुक करीत असत.
निळभट भांडारेकर हे चक्रधर स्वामींचे पहिले शिष्य. त्याआधी चक्रधर स्वामी एकांतात होते. आता ते लोकांतात आले. लोकांतामधले त्यांचे पहिले शिष्य निळभट भांडारेकार हे सोळा वर्षे त्यांच्या सहवासात राहिले. त्यांच्या निधनामुळे चक्रधर स्वामींच्या पुढच्या परिवाराशी त्यांची भेट झाली नाही. म्हणूनच त्यांच्या फारशा आठवणी लीळाचरित्रात आलेल्या नाहीत. क्वचित कधीतरी बोलताना चक्रधर स्वामींनी ज्या आठवणी सांगितल्या त्याच चार-पाच आठवणी लीळांच्या रूपात निळाचरित्राच्या एकांकात आलेल्या आहेत.
चक्रधर स्वामी आणि निळभट भांडारेकार हे नांदेडच्या मुक्कामात भावेश्वराच्या मंदिरात थांबले होते. अनेक दिवस ते इथं राहिले. भांडारेकार हे गावात जाऊन भिक्षा मागून आणत असत आणि चक्रधर स्वामींना खाऊ घालत असत. हे ठिकाण गोदावरी नदीच्या काठावर आहे. संपूर्ण मराठवाड्यातील गोदावरीचे दोनही काठ चक्रधर स्वामींना नंतर अतिप्रिय झाले. आपला बराच काळ चक्रधरांनी या गोदावरीच्या काठावर घालवला. त्याला त्यांनी उभयगंगातीर असं म्हटलेलं आहे. पुढं सगळा महानुभाव पंथ उभयगंगातीरालाच आपलं माहेर समजू लागला. त्या उभय गंगातीराची सुरुवात नांदेडपासून, भावेश्वराच्या मंदिरापासून झालेली आहे.
एक दिवस भांडारेकार गावात भिक्षा मागायला गेले असताना एका वेदपाठशाळेत अध्ययन सुरू होतं. मुलं शिकत होती. तेवढ्यात भांडारेकरांना जाणवलं की ती पाठशाळा हलते आहे. त्यांनी लगेच सगळ्या मुलांना बाहेर बोलावलं. मुलं बाहेर येईपर्यंत आतमध्ये ती सगळी पाठशाळा कोसळली होती. मुलांना या गोष्टीचा खूप आनंद वाटला. आश्चर्यही वाटलं. या माणसानं आपणाला कल्पना दिली नसती तर आपण सगळेच मेलो असतो, असं त्या सर्व मुलांना वाटून गेलं. म्हणून प्रत्येक मुलानं आपल्या घरी नेऊन आई-वडिलांना सांगितलं की यांनी आम्हाला वाचवलं. प्रत्येक घरी निळभटांची पूजा, सत्कार होऊ लागला. त्यांच्या भिक्षेत पंचपक्वान्न वाढली जाऊ लागली.
ते सगळं घेऊन भांडारेकार चक्रधर स्वामीजवळ आले. चक्रधर स्वामींनी डोळ्याच्या खुणेनच, हे आज काय ? असं विचारलं. त्यावर निळघटांनी सगळी कहाणी सांगितली. चक्रधर स्वामी म्हणाले, की त्या लोकांवर कोपलेली ती देवता आता तुमच्यावर कोपेल. पुढं तसंच झालं. निळभटांची तब्येत बिघडली. त्यांना सारखे जुलाब होऊ लागले. ते थांबेचनात. चक्रधर स्वामी स्वतः त्यांचे कपडे धुऊन स्वच्छ करीत असत. कारण भांडारेकार खूप अशक्त झाले होते. चक्रधरांनी आपल्या शिष्याची संपूर्ण सेवासुश्रूषा केली.
शेवटी शेवटी त्यांच्या त्या मलमूत्राचा वास येतोय म्हणून मंदिराच्या बडव्यांनी त्यांना तिथून हलवायला सांगितलं. चक्रधरांनी त्यांना उचलून पाठीवर घेतलं आणि पलीकडच्या दुसऱ्या जागेत ते नेलं. तिथं तीन दिवस भंडारेकार जिवंत होते. शेवटी त्यांचा जाण्याचा क्षण आला तेव्हा चक्रधरांनी त्यांचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. त्यांना विचारलं तुमची काही तुम्हाला काय हवंय ? आणखी जगायचं आहे काय ? तेव्हा निळभट म्हणाले, हा असा योग पुन्हा कधी येईल ? माझं डोकं तुमच्या मांडीवर, मी तुमचं श्रीमुख न्याहाळतोय, अशाच स्थितीत देवा मला मरण येऊ द्या. निळवट भंडारेकार यांचं निधन झालं. चक्रधर स्वामींनी याच्यात्याच्याकडून साधनं गोळा करून निळभटांचे अंत्यसंस्कार केले. मग चक्रधर स्वामी उदास झाले. तेही तिथून निघाले.
पुढं ते लिमगावला आले. लिमगावहून ते मेहकरला गेले. लिमगावाहून मेहकरला जाताना त्यांचा रस्ता कोणता होता माहित नाही. पण ते नक्कीच परभणी जिल्ह्यातून गेले असणार. पण त्याचा उल्लेख लीळाचरित्रात कुठं दिसत नाही. त्यामुळे परभणी जिल्ह्यात चक्रधर स्वामी येऊन गेल्याचा कुठंही उल्लेख नाही. चक्रधर स्वामींशी संबंधित महानुभावांचं मूळ तीर्थस्थान परभणी जिल्ह्यात कुठंही नाही. उलट त्याऐवजी चक्रधरांच्या उत्तरापंथे गमनानंतर सगळा शिष्य परिवार पुन्हा गोदावरीच्या काठी उभयगंगातीरी लिंबा या परभणी जिल्ह्यातील गावी आला. इथं राहून त्यांनी धर्माची आणि नव्या धर्मशास्त्राची बांधणी केली. पंथाचा आचारधर्म आणि विचारधर्म ठरवला. एक भटमार्ग, परमार्ग, महानुभाव पंथ सुरू झाला.
नांदेड यासाठी भाग्यवान आहे की या जिल्ह्यात अनेक गावात चक्रधर स्वामी येऊन गेलेले आहेत. त्यांच्या निश्चित खुणा उपलब्ध आहेत. त्यामुळे चक्रधरांशी संबंधित अनेक तीर्थस्थळं नांदेड जिल्ह्यात आहेत. आणि परभणी जिल्हा यासाठी भाग्यवान आहे की या जिल्ह्यात लिंबा या गावी पंथाची बांधणी झाली. असे हे एकमेकाला लागून असलेले दोनही जिल्हे ऐतिहासिक दृष्ट्या फार फार महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासाची जडणघडण इथूनच सुरू झालेली आहे.
💐
छायाचित्रे - संतोष पेडगावकर
💐



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा