वारकरी संप्रदायातील बुद्धिवाद व समतावादाच्या मर्यादा - प्रा.डॉ. अनंत दा. राऊत
वारकरी संप्रदायातील बुद्धिवाद व समतावादाच्या मर्यादा
प्रा.डॉ. अनंत दा. राऊत
वारकरी संप्रदाय आणि त्यातील संत हे महाराष्ट्राचे समृद्ध असे सांस्कृतिक संचित आहे. वैदिक ब्राह्मणी धर्माने अध्यात्माच्या क्षेत्रात निर्माण केलेली विषमता संपवून या क्षेत्रात समता प्रस्थापित करण्याच्या प्रेरणेतून वारकरी संप्रदायाची निर्मिती झालेली आहे.
'नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी'
ही वारकरी संप्रदायातील संत नामदेवांची वैचारिक भूमिका आहे. वारकरी संप्रदाय मराठी भाषेचा अभिमान मिरवतो.
माझा मऱ्हाठाची बोलू कौतुके
अमृतातेही पैजा जिंके
हे संत ज्ञानेश्वरांचे वचन त्यातूनच आलेले आहे. भूदेवभाषा मानल्या गेलेल्या संस्कृतमध्ये बंदिस्त असलेले अध्यात्माचे ज्ञान संस्कृतची बंदी असलेल्या शूद्रादिअतिशूद्र ठरवलेल्या पुरुषांमध्ये व स्त्रियांमध्ये पोचले पाहिजे ही भावार्थदीपिका लिहिण्याची संत ज्ञानेश्वरांची प्रेरणा होती. भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा मराठीतला तत्त्वज्ञान व काव्याची एकजीव गुंफण करणारा श्रेष्ठतम ग्रंथ आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. सदरील काव्यग्रंथ महाराष्ट्रात संपूर्णपणे समता प्रस्थापित करण्याचा संदेश देतो का? याची अनेक अंगानी चिकित्सा होऊ शकते. 'जाती वर्ण अवघेची आकारण आहेत.' ही भूमिका त्यात दिसेल आणि काही ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे वर्णव्यवस्थेचे समर्थनही दिसेल. ज्यांचे नाणे खणखणीत असते त्यांनी चिकित्सेला कधीच घाबरायचे नसते. त्यामुळे वारकरी संप्रदायातील वर्तमान मंडळींनी चिकित्सेला घाबरण्याचे काही कारणच नाही. चिकित्सेसाठी बुद्धिवाद, विज्ञानवादाचे स्वागत व स्वीकारही करावा लागतो. वर्तमानातील वारकरी संप्रदायातल्या मंडळींना बुद्धिवाद आणि विज्ञानवाद किती प्रमाणात स्वीकारता आलेला आहे हा तसा प्रश्नच आहे. परंतु वारकरी संप्रदायातील जुने संत मात्र किमान एका मर्यादेत बुद्धिवादाच्या पातळीवर नक्कीच गेलेले होते. तशा प्रकारची भूमिका ते मांडत होते. परंतु ते संपूर्णपणे बुद्धीवादी व विज्ञानवादी होते असे म्हणणे धाडसाचे होईल. वारकरी संप्रदायाच्या विशिष्ट मर्यादेत का होईना असलेल्या बुद्धिवादाने तत्कालीन अंधश्रद्धांना आणि भोंदूगिरीला सुस्पष्टपणे विरोध केलेला आहे. देवी देवतांना पशुंचा बळी देण्याच्या प्रथेला स्पष्टपणे विरोध केलेला आहे. बळी देण्याच्या प्रथेला विरोध करण्याची भारतीय संस्कृतीतील प्राचीन भूमिका तथागत भगवान बुद्धांची आहे. भगवान बुद्धांनी वैदिक ब्राह्मणी धर्मात असलेल्या यज्ञामध्ये पशुंचा बळी देण्याच्या प्रथेला स्पष्टपणे विरोध करून अहिंसा तत्त्वाचा पुरस्कार केला. वारकरी संप्रदायाचे भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाशी आणि आदर्श आचारसंहितेशी फार मोठे नाते आहे.
मी स्वतः आयुष्याच्या प्रारंभीची अनेक वर्षे वारकरी संप्रदायाचा सक्रिय सदस्य राहिलेलो आहे. वारकरी संप्रदायाच्या भजनाला जाणे, प्रवचने, कीर्तने ऐकणे, ऐकलेली कीर्तने गल्लीतील आयाबयांसमोर करून दाखवणे ही कामे मी केलेली आहेत. लहानपणी मी वारकऱ्यांच्या कीर्तनात हे अनेकदा ऐकलेले आहे की संत पदाला पोचणे ही फार महत्त्वाची गोष्ट असते. त्यासाठी मानवाला काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर या विकारांतून मुक्त व्हावे लागते. जो माणूस अशा विकारांमधून मुक्त होतो तोच संत पदाला जाऊन पोचतो. विकारातून मुक्त होणे ही काही सहज साधी गोष्ट नसते. त्यासाठी मानवाला आपल्या तृष्णेवर विजय मिळवावा लागतो. भारतीय संस्कृतीतील तथागत बुद्धांचे तत्वज्ञान व आर्य अष्टांगिक मार्गातील आचारसंहिता नेमके हेच सांगते. स्वतःच्या मनावर काबू ठेवून त्यावर विजय मिळवू शकतो तोच सर्व गोष्टींवरती विजय मिळवून स्वतः मुक्ती प्राप्त करू शकतो ही भगवान बुद्धाची शिकवणच वारकरी संप्रदाय देतो. परंतु वर्तमान वारकरी ही गोष्ट मोकळेपणाने मान्य करून ती वारंवार सांगत नाहीत. कारण वारकरी संप्रदायामध्ये वैदिक ब्राह्मणी परंपरेची बरीच मिश्रणे झालेली आहेत.
वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला काय दिले? तर त्यांनी अध्यात्माच्या क्षेत्रातील विषमतावाद अर्थातच केवळ ब्राह्मणांची मक्तेदारी संपवण्यासाठी समतेचा पुरस्कार केला. 'यारे यारे लहानथोर याती भलती नारी नर'अशी भूमिका घेऊन अध्यात्माच्या क्षेत्रात एक प्रकारे लोकशाही निर्माण केली. त्यामुळेच मध्ययुगीन कालखंडात महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व प्रमुख जात समूहातून अनेक संत उदयाला आले. वारकऱ्यांनी अहिंसा, सदाचार,सहिष्णुता भूतदया या मूल्यांचा उच्चरवाने पुरस्कार केला. भक्तीतूनच मुक्ती होते यासाठी नामस्मरणाच्याद्वारे लोकांना सदाचाराकडे वळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे महाराष्ट्रातील जनमानस संपूर्णपणे समतावादी बनले, असे मात्र म्हणता येणार नाही कारण वारकरी संप्रदायाच्या समता वादाला बऱ्याच मर्यादा आहेत. परंतु वारकऱ्यांनी घडवून आणलेल्या प्रबोधन प्रक्रियेमुळे महाराष्ट्रीय माणूस बऱ्याच प्रमाणात सहिष्णु बनला असे मात्र म्हणता येईल.
आता वारकरी संप्रदायातील बुद्धिवाद व समतावादाच्या मर्यादांचा विचार करू. वारकरी संप्रदायाची भूमिका संपूर्णपणे बुद्धीवादी आहे का? याचे उत्तर मी माझ्या मर्यादित आकलनानुसार असे देतो की ती संपूर्णपणे बुद्धीवादी नाही तर बुद्धिवादाच्या थोडीशी जवळ जाणारी आहे. उदाहरणार्थ मागे सांगितल्याप्रमाणे बळी देण्याच्या प्रथेला विरोध करणे. रामायण, महाभारत ही भारतीय संस्कृतीमधील महत्त्वाची महाकाव्ये आहेत. हे इतिहास ग्रंथ नसून महाकाव्ये असल्यामुळे त्यात अद्भुतरम्यता आणि चमत्कारिकता मोठ्या प्रमाणात आहे. ज्या गोष्टी प्रत्यक्ष पुराव्याच्या, प्रयोगाच्या आधारावर टिकत नाहीत त्या गोष्टी अद्भुत्व व चमत्कारिक असतात.
बुद्धिवादी मंडळी अद्भूत व चमत्कारिक गोष्टी भाबडेपणाने सत्य मानत नसते. रामायण महाभारतातील महाकाव्यात अनेक गोष्टींची प्रतीकात्मक मांडणी केलेली आहे. त्यातील प्रतिकात्मकतेचा बुद्धिवादी पद्धतीनेच उलगडा करणे आवश्यक असते. वारकरी संप्रदायावर रामायण महाभारत या महाकाव्यांचा प्रभावही आहेच. परंतु या संप्रदायाने या महाकाव्यातील अद्भुतरम्यतेची कठोर अशी बुद्धीवादी चिकित्सा केली असे म्हणता येणार नाही. या महाकाव्यामधील काही कथानकांवरून त्या काळात जन्माधारीत विषमता पाळणारी व हक्कांची विषम वाटणी करणारी वर्ण व्यवस्था होती हे सहजपणे दिसते. शंबुक, कर्ण, एकलव्य ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. वारकरी संप्रदायाने या मिथकांची किती बुद्धिवादी चिकित्सा केली हा प्रश्नच आहे.
आता समतेच्या संदर्भात वारकरी संप्रदायाचा विचार करू. वारकरी संप्रदाय तत्त्वज्ञानाच्या पातळीवर समतावादी राहिलेला आहे. ज्ञानेश्वरांचे पसायदान सकल जनकल्याणकारितेचा उदात्त भाव प्रकट करते. 'भवतु सब्ब मंगलम' या बुद्धभूमिकेत जो भाव आहे, तसाच भाव पसायदानामध्ये दिसतो. संत तुकोबांनी 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ, कोणाही जीवाचा न घडो मत्सर,वर्म सर्वेश्वर पूजनाचे','जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा', 'महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तया प्रायश्चित्त काई देह दंडाविण नाही' 'अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड काय त्याशी रांड प्रसवली, वैष्णव चांभार धन्य त्याची माता, शुद्ध उभयता कुळ याती' अशा प्रकारच्या कितीतरी अभंगांमध्ये खूप मोठी समतावादी भूमिका घेतलेली आहे. वारकरी संप्रदायातील संतांनी लिहिलेल्या साहित्यामध्ये समतेचे इतरही अनेक संदर्भ आढळतील. संत चोखोबा मात्र त्यांच्या हयातीत समतावादी वागणूक मिळावी यासाठी जीवनभर तगमगत राहिलेले दिसतात.
वारकरी संप्रदायाची समतावादी तात्त्विक भूमिका प्रत्यक्ष जीवन व्यवहारात किती प्रमाणात उतरली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या संप्रदायाची कृतीच्या पातळीवरील समता अध्यात्म व भक्ती या केंद्राच्या मर्यादेतली आहे. अध्यात्म व भक्ती हे केंद्र कोलांडून प्रत्यक्ष जीवनव्यवहारांमध्ये असलेल्या विषमतेच्याविरुद्ध वारकरी संप्रदायातील किती संतांनी प्रत्यक्ष कृती केली हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
भक्तीच्या संदर्भात वैचारिक पातळीवरील समतेची भूमिका आहे म्हणून व्यवहारात कनिष्ठ मानलेल्या जात स्तरातील संत उदयाला आले हे सिद्धच आहे. तिचे जीवन व्यवहारात त्यांना इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने किती सन्मानाची वागणूक दिली हा तसा प्रश्नच आहे. उदाहरणार्थ संत चोखोबांचा विठ्ठल या प्रतीकाने सन्मान केला. विठ्ठल त्याच्या कामात मदतीला धावून आला. संत जनाबाईच्या कामात देखील मदतीला धावून आला अशा कथा असतील. अशा कथांची प्रत्यक्ष व्यवहारातील बौद्धिक चिकित्सा करू लागलो तर समोर हे येईल की विठ्ठलाचे असे मदतीला धावून येणे ही त्या त्या संतांची व्यक्तिगत पातळीवरील उत्कट अशी भावतंद्री होती. अत्युच्च अशा उत्कट भावतंद्रीच्या पातळीवर ज्या कल्पित अथवा सजीव विभूतीचा ध्यास घेतला जातो ती विभूती आपल्या सानिध्यात आल्याच्या अनुभवाची मनोमय स्थिती प्राप्त होऊ शकते. त्यातलाच तो भाग आहे. मग वारकरी संप्रदायातील संतांनी उच्चनीचतावादी जातिव्यवस्थेच्याला संपवून समता प्रस्थापित करण्यासाठी कोणत्या कृती केल्या? वारकरी संप्रदायाचा मागील सातशे वर्षांचा इतिहास डोळ्यासमोर आणला तर ठळकपणे एक कृती समोर येते ती म्हणजे संत एकनाथांनी पैठण येथील गोदावरीच्या वाळवंटावर उन्हामध्ये रडत असलेल्या महाराच्या पोराला कडेवर घेतले आणि त्याला त्याच्या घरी आणून सोडले. आता ही संत एकनाथांची समतावादी कृती आहे की भूतदयावादी कृती आहे? हा प्रश्न पडू शकतो. या प्रश्नाचे उत्तर संत एकनाथांची ही कृती भूतदयावादी आहे असेच द्यावे लागते. कारण अशाच भूतदयावादी मानसिकतेतून त्यांनी तहानलेल्या गाढवाला देखील पाणी पाजले होते. आशा कारच्या भूतदयावादी कृती का होईना, वारकरी संप्रदायाच्या इतिहासात मोठ्या प्रमाणात आढळाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. परंतु माझ्या अल्पशा अभ्यासात मला त्या फारशा दिसलेल्या नाहीत. कुणाला दिसलेल्या असतील तर त्याची सविस्तर नोंद व्हावी. त्याचे मी स्वागत करेन. त्या नोंदी वाचून मला आनंच होईल. तात्त्विक, प्रतिकात्मक, सूचक समतेची उदाहरणे अनेक जण देऊ शकतील. मला हवी आहे ती ठोस स्कृतीच्या पातळीवरील उदाहरणे.
तत्कालीन समाजात अस्तित्वात असलेली अस्पृश्यता हे वर्ण जातिव्यवस्थेच्या विषमतावादी विकृतीचे सर्वात किळसवाणे भयंकर असे टोक होते. वारकरी संप्रदाय समतावादी होता तर किमान आपल्या संप्रदायातील भक्तांच्या,संतांच्या संदर्भात तरी अस्पृश्यतेची चाल वारकऱ्यांनी संपवली काय? अगदी पटकन कुणी उत्तर देईल की हो संपवली ना. "अहो वारकरी जातपात न पाहता एकमेकांच्या पाया पडतात. इथे कुठे आली अस्पृश्यता?" 'खेळ मांडीयेला, वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे वर्ण अभिमान विसरली याती एकमेका लागतील पायी रे' हे उदाहरण दिले जाऊ शकते. माझा प्रश्न हा आहे की वारकरी संप्रदायाच्या भक्तीचे जे केंद्र होते त्या केंद्रातील पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरात अस्पृश्य जातसमूहातील भक्तांना, संतांना प्रवेश होता काय? सारे पुरावे हे सांगतात की मुळीच प्रवेश नव्हता. अगदी संत चोखोबांना देखील मंदिरात प्रवेश मिळाला नाही. माझा हा साधा प्रश्न आहे की वारकरी संप्रदायातील संत जर समतावादी होते तर तथाकथित उच्च जातसमूहातील एकाही संताला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्य समूहातील भक्तांना असलेली बंदी उठवली पाहिजे असे सातशे वर्षाच्या इतिहासात का वाटले नाही? आणि अस्पृश्यांना विठ्ठल मंदिरात प्रवेश देण्यात यावा यासाठीचे आंदोलन एकाही संतांने का केले नाही? सातशे वर्षात हे कुठल्याही संतांनी केले नाही हे वास्तव आहे. भारतात इंग्रजांची राजवट आल्यानंतर अस्पृश्य ठरवलेल्या जातसमूहातील लोकांना विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश मिळावा यासाठीचे आंदोलन साने गुरुजींनी केले हे तर सर्वांना माहीतच आहे.
'संत ज्ञानेश्वरांनी रेड्या मुखी वेद बोलवले.' या मांडणीमध्ये एक प्रतीकात्मक अर्थ आहे. वैदिक ब्राह्मणी परंपरेने शूद्र आणि अतिशूद्रांना जी वेदबंदी, ज्ञानबंदी केलेली होती, त्या विरुद्ध संत ज्ञानेश्वरांनी बंडखोरी केली हा त्यातला प्रतिकात्मक अर्थ आहे. ज्यांना तुम्ही रेड्याप्रमाणे मठ्ठ आहात असे समजले जात होते अशा मठ्ठ लोकांनादेखील वेद बोलण्याचा अधिकार देण्याची भूमिका त्यांनी घेतली आणि ही भूमिका स्वागतार्ह आहे. त्याचे प्रत्यक्ष जीवन व्यवहारात शूद्र,अतिशूद्र आणि स्त्रियांमध्ये ज्ञानप्रसार, शिक्षण प्रसार होण्याच्या संदर्भात किती परिणाम झाले हा प्रश्न निराळा. या संदर्भात फारसे परिणाम झाले नाहीत हेच त्याचे उत्तर आहे. कारण महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना एकोणिसाव्या शतकात अस्पृश्य मुलींच्यासाठी पहिली शाळा काढण्याची पाळी आली नसती. सावित्रीबाई फुले मुलींना शिकवण्यासाठी जातात म्हणून त्यांच्या अंगावर कुणी शेण आणि दगडधोंडे फेकले नसते.
संत नामदेवांचे कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावणे यातून संत नामदेवांची भूतदयावादी मनोवृत्ती समोर येते. भूतदयावादी मनोवृत्तीचे देखील आपण स्वागतच केले पाहिजे. पण संत नामदेवांनी प्रत्यक्ष अस्पृश्य समूहातील व्यक्तीला जवळ घेऊन त्याला जेऊ घातले अशी एखादी घटना त्यांच्या जीवनचरित्रात आहे का? जो कुत्र्याची एवढी काळजी घेतो त्याने माणसासारख्या माणसाची काळजी घ्यायला काय हरकत आहे? त्याच्या जीवन चरित्रात अस्पृश्य माणसाला जवळ घेऊन जेऊ घातल्याचे उदाहरण दिसायला काय हरकत आहे? पण ते दिसत नाही, असे का? हा प्रश्न विचारणे हा गुन्हा असतो काय?
आता वारकरी संप्रदायातील वर्तमान कीर्तनकारांच्या संदर्भात थोडासा विचार करू.
मी माझ्या लहानपणी जी कीर्तनं ऐकायचो त्यात भक्ती हे केंद्र असायचे आणि प्रामुख्याने रामायण महाभारतातील काही कथा सांगितल्या जायच्या.
अधून मधून थोडीशी हसवणूक तेही करायचे. त्या तुलनेत वर्तमानातील कीर्तनकार बऱ्याच प्रमाणात बदललेले आहेत असे दिसते. त्यातील अत्यंत स्वागतार्ह बदल म्हणजे आता महिला कीर्तनकार दिसू लागलेल्या आहेत. मी जुन्या काळात एकही महिला कीर्तनकार पाहिलेली नाही. आणखी एक लक्षणीय गोष्ट जाणवते ती आजचे कीर्तनकार केवळ भक्तीच्या केंद्राभोवतीच न फिरता किंवा पुराण काळाबद्दलच न बोलता वर्तमान जीवन व्यवहारातील काही गोष्टींबद्दल भाष्य करू लागलेले आहेत. संत गाडगेबाबा आधीच्या काळात असे भाष्य करत होतेच. कीर्तन हे केवळ करमणुकीचे, हसवणुकीचे साधन नाही याचे भान मात्र वर्तमानातील कीर्तनकार पूर्णपणे विसरलेले आहेत. वर्तमानातील बहुतांश कीर्तनकार कीर्तनकार आहेत की पांचट विनोद करून लोकांना फक्त हसवत राहणारे सोंगाडे आहेत असा प्रश्न पडतो. वारकरी संप्रदायाने जुन्या काळात अध्यात्माच्या क्षेत्रातील समतेची भूमिका घेतली हे मान्यच. त्या काळातल्या कडेकोट व्यवस्थेमध्ये त्यांना प्रत्यक्ष जीवन व्यवहारात समता प्रस्थापित करण्यासाठीच्या ठोस कृती करता आल्या नसतील असे आपण समजून घेऊ. पण वर्तमानातील वारकऱ्यांनी जीवन व्यवहारातील विषमता संपवण्यासाठीच्या ठोस कृती का करू नयेत? आपण समतावादी आहात ना? मग आता तरी करा ना काही समतावादी कृती. वर्तमान वारकरी कीर्तनकार कोणकोणत्या समतावादी कृती करतात हे जाणून घेण्यासाठी मी स्वतः उत्सुक आहे. वर्तमान कीर्तनकारांच्या कीर्तनात बोलण्याच्या पातळीवर देखील जीवन व्यवहारातील विषमता संपवण्याची ठोस भूमिका मला दिसत नाही. वारकऱ्यांना आपल्या समतावादी भूमिकेचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर त्यांनी ठोसपणे जातिअंताची भूमिका घ्यायला हवी. कारण जात हा विषमता टिकवणारा इथला एकमेव अनैसर्गिक घटक आहे. जाति व्यवस्थेच्या अंताची भूमिका हे कीर्तनकार घेतात का? कुठे काही कीर्तनकार अशी भूमिका घेत असतील तर मी त्याचे स्वागतच करेन. माझ्या मर्यादित आकलनाच्या कक्षेत जातिअंताची भूमिका ठोसपणाने मांडणारे कीर्तनकार मला दिसलेले नाहीत. अगदी समता प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी संपूर्ण जीवन झिजवले त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देखील वर्तमान कीर्तनकारांना आपल्या कीर्तनात मोकळेपणाने घेववत नाही. असे का? यावर कुणी म्हणेल की "अहो त्यांचा धर्म वेगळा आमचा धर्म वेगळा. ते हिंदू धर्माच्या फार विरोधात बोलले. हिंदू धर्म सोडून गेले. मग त्यांचं नाव आम्ही कशाला घ्यावं?" हा धर्म आमचा आणि तो धर्म तुमचा अशी भाषा करणाऱ्यांना खरा धर्मच कळलेला नसतो. वैश्विक नियमधर्मात हे यांचं आणि ते त्यांचं असं काहीही नसतं. सर्वांचं अगदी सारखं असतं. एकच असतं. वरवरच्या सांप्रदायिक रंगाच्या गोष्टी निरनिराळ्या दिसत असतील परंतु त्या निराळेपणात मूलभूतता नसते. माणसाला माणसापासून तोडणारी ती फक्त सांप्रदायिक असते.
माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर स्वतःला समतावादी म्हणवून घेत असाल. संपूर्ण जीवन व्यवहारात समता प्रस्थापित झाली पाहिजे असं जर तुम्हाला अंतःकरणापासून वाटत असेल तर तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतावादी संदेश आपल्या कीर्तनांमधून लोकांना द्यावाच लागेल. तो तुम्ही देत नसाल तर तुम्ही खरे समतावादी असूच शकत नाही. अहो बाबासाहेब हिंदू धर्माच्या विरोधात कुठे होते? ते या धर्मातील अंधश्रद्धांच्या विरोधात होते. अस्पृश्यतेसारख्या अमानुष व्यवस्थेच्या विरोधात होते. माणसाचे माणूसपण नाकारणाऱ्या, त्याच्यावर ज्ञानबंदी, शस्त्रबंदी लादणाऱ्या विषमतावादी प्रथांच्या विरुद्ध होते. माणसाकडूनच होणाऱ्या माणसाच्या शोषणाच्या विरुद्ध होते. त्यांना इथे मानवता प्रस्थापित करायची होती. आणि इथला वर्णांध, जात्यांध हिंदू धर्म जीवन व्यवहाराच्या पातळीवर मानवतावादी पद्धतीने वागतच नव्हता. मग या धर्माच्या अमानुष रूढी परंपरांच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला यात त्यांचं काय चुकलं? आणि जातिव्यवस्थेला कवटाळत विषमतेचे कायम रक्षण करत असलेल्या हिंदू धर्माला सोडून ते गेले तरी कुठे? तर आंतर्बाह्य स्फटिकशुद्ध असलेल्या बुद्धाच्या दिशेने. अडीच हजार वर्षांपूर्वी जे तथागत बुद्धांनी सांगितलं त्याचाच तर बराचसा प्रभाव वारकरी संप्रदायाच्या तात्त्विक भूमिकेवर आहे. मग बुद्धांचे अनुसरण करणाऱ्या बाबासाहेबांचे समतावादी संदेश हा तुमच्या कीर्तनाचा विषय होण्यात गैर काय आहे? तो विषय तुम्ही तुमच्या कीर्तनात समाविष्ट केलात तर तुमच्या समतावादाचा विकास झाला असे म्हणता येईल. अन्यथा आपण समतावादाच्या नावाने नुसत्या थापा मारता असे होईल.
पत्ता
मराठी विभाग प्रमुख
पीपल्स कॉलेज, नांदेड.
भ्रमणध्वनी क्र. ९८६०५२५५८८
ईमेल- anantraut65@gmail.com



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा