स्त्री मुक्ती चळवळीचे आद्य प्रणेते:श्रीचक्रधर स्वामी
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0MciWLXjEK3kYogPucWAfJNs9PCd2CAnEdSB7ofZDQqnoekuBJAzkS1ZbgcHxnA6bl&id=100002465623806
*स्त्री मुक्ती चळवळीचे आद्य प्रणेते:श्रीचक्रधर स्वामी*
भाग-१
*लेख:- संदीप तडस शिरजगावकर,* अमरावती
*मासिक:- मिळून साऱ्याजणी*
*सुमारे आठशे वर्षांपूर्वी श्रीचक्रधर स्वामींचं 'अध्यात्मात सामाजिकता आणि सामाजिकतेत अध्यात्म 'हे मार्गदर्शक सूत्र होतं. धर्मात असणाऱ्या अधर्माला स्वामींनी वेचून बाहेर काढलं आणि धर्माला मानवतेचा चेहरा दिला. नंतर अनेक समाज सुधारकांनी धर्म आणि अध्यात्म बाजूला सारत जीवाचं रान करत समाज मानसात स्वातंत्र्य, समता, मैत्रभाव आणि सामाजिक न्याय रुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र आज समाजात धर्म आणि अध्यात्माचा बाजार एकीकडे आणि समाजसुधारणांसाठी झोकून देऊन, तळमळीनं काम करणारे कार्यकर्ते दुसरीकडे असा दुभंग दिसतो आहे. हे वास्तव बदलण्यासाठी श्रीचक्रधर स्वामींचं मार्गदर्शक सूत्र सखोलपणे समजून घेण्यासाठी ही लेखमाला जरूर वाचा.**
*भाग-१*
*पंडीत म्हाईमभट्टांनी लिहिलेला आद्य मराठी ग्रंथ 'लीळाचरीत्र 'हा मध्ययुगीन यादव काळातील स्त्री मुक्तीचा दस्ताऐवज आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी हे या ग्रंथाचे*
*चरित्रनायक असून तत्कालीन यादव काळाचे विविधांगी दर्शन लीळाचरित्र या ग्रंथामध्ये घडते.श्रीचक्रधर स्वामींचे प्रबोधनपर तात्विक भाष्य आणि त्या अनुषंगाने त्यांचे कृतिपुर्ण चरीत्र हे या चरित्रग्रंथाचे वैशिष्ठ्य. एकुणच तत्कालीन समाज जीवनाचे चरित्र या ग्रंथात अभिव्यक्त झाले आहे. या काळातील स्त्रियांचा क्षीण झालेला आवाज श्रीचक्रधर स्वामींनी आपल्या आचार विचारादि तत्वज्ञानाने बुलंद केला. बाईसा, महदाईसा, आबाईसा, साधाईसा, आऊसा , लखुबाईसा, राणाईसा,शांताबाईसा, लाम्हाईसा, प्रल्हादबाईसा या स्त्रियांसह इतरही गावोगावच्या अनेक स्त्रिया त्यांच्या शिष्या होत्या. लोक प्रबोधना करीता सातत्याने त्यांचे पदभम्रण सुरु असायचे. श्रीचक्रधर स्वामींच्या प्रेमळ, लोभस आणि तेवढ्याच वैचारीक कार्यप्रवण व्यक्तीमत्वाने तत्कालीन महाराष्ट्र भारावुन गेला होता. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळावा म्हणुन अनेक स्त्री पुरुष त्यांना उत्कंठतेने भेटत असत. या भेटणाऱ्यामध्ये अगदी सर्व वर्णातील आणि विविध जाती व पंथातील लोकांचा समावेश असे. त्यावेळी देवगिरीच्या यादवांची राजवट महाराष्ट्रात होती. एकूणच यादव काळातल्या जुलमी राजवटीने आणि अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा, कर्मकांडे आणि व्रतवैकल्याचे स्तोम माजलेल्या समाज जीवनात स्थिरता असण्याचा प्रश्नचं नव्हता. हे कमी म्हणुन की काय राज्यसत्तेच्या लोभाने चालेली युद्धे, यादवांच्या भाऊ-बंदकीच्या हेव्यादाव्यांनी आणि अज्ञानाने माजलेल्या अनागोंदीने तत्कालीन समाजजीवन अंधकारमय झालेले. त्यातल्या त्यात पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांचे जगणे तर फारच दुष्कर झालेले. यादवांचा प्रधान हेमाद्री पंडिताने ' चातुवर्ण चिंतामणी ' नावाचा ग्रंथ लिहून त्यात शोषण- पिडण करणाऱ्या अंधश्रद्ध व्रतवैकल्ये आणि कर्मकांडादी प्रथांचा जाणीवपुर्वक भरणा या ग्रंथात करून ती समाजाची आचारसंहीता म्हणुन या ग्रंथाव्दारे घोषित केली. स्त्रियांचे विविध मानवी हक्क नाकारणारी व तीचे दमन करणारी अनेक धार्मिक,असामाजिक कलमे या ग्रंथात होती. शेकडोवर्ष पिढ्यानुपिढ्या दुय्यम आणि दुर्लक्षित असणाऱ्या स्त्रियांच्या दुःखाला तर पारावारचं उरला नव्हता. पुरुषसत्ताक अहंकाराने निर्माण झालेली पितृसत्ताक समाज व्यवस्था आणि यामुळे निर्माण झालेल्या वर्णव्यवस्थेने तर जातीचा वणवा अधिकच भडकावुन दिला होता. पितृसत्ताक वृत्तीने शेकडो वर्ष स्त्रियांचा आवाज दाबून टाकल्यामुळे मातृव्यवस्थेचा परीघ आकुंचल्याने स्त्रियांच्या आत्मभानाचा कोष विस्कटून गेलेला. स्त्रियांना दुय्यम वागणूकच नव्हे तर तीच्या नैसर्गिक हक्कांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर पायमल्ली होत होती. एकूणच तिच्या जगण्याचे सातत्याने पुरुषी अहंकाराने मानवी, नैसर्गिक व सामाजिक हक्कांचे हनन केल्यामुळे स्त्रियांची विविध पातळीवर कुचंबना होऊन 'तीचा' आत्मसन्मान दुखावल्याचा हा विपरीत काळ होता.*
*अशा पार्श्वभूमीवर आठशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात श्रीचक्रधर स्वामींचे आगमन झाले. स्त्रियांच्या क्षीण झालेल्या आवाजाला स्वामींनी प्रथमतः साद घालुन 'तीचा' स्वर उंचावण्यास सुरवात केली.*
*त्यांच्या स्त्री-पुरुष समानतावादी भुमिकेमुळे स्त्रियांना बळ मिळाले. कुठल्याही वर्ण अथवा जाती, धर्म पंथातील स्त्री ही पुरुषांच्या तुलनेत दुय्यमच होती.लादलेल्या पुरुषसत्ताक मानसिकतेमुळे तीचे जगणे बंदीस्त होऊन अज्ञानाने काळवंडून गेले होते. श्रीचक्रधर स्वामींनी मात्र आठशे वर्षांपूर्वी धर्माच्या अंतर्गत सामाजिक जाणिवेने केलेले स्त्रीमुक्तीचे कार्य अपूर्व आणि अतुलनीय आहे. त्यांच्या महान कार्याचा तत्कालीन आणि समकालीन तुलनेत अभ्यास करता या दोन्ही काळाचा परिवर्तनवादी सामाजिक सेतु त्यांनी उभारला आहे. मध्ययुगीन बुरसटलेल्या सामाजिक अव्यवस्थेच्या विरोधात स्वामींनी घेतलेली क्रांतीकारी भुमिका आद्य समाज सुधारकाची ठरते. स्त्रियांचा अवकाश अधिक व्यापक विस्तृत करण्यात श्रीचक्रधर स्वामींनी केलेले महान कार्य म्हणुनच स्त्रियांच्या उत्थानाचा सार्वकालीन दिपस्तंभ ठरतो. यावरूनचं स्वामींच्या कृतिपुर्ण विचारांची आजही कीती गरज आहे हे आपल्याला दिसुन येते. त्यांची धर्माची संकल्पना समतेची होती. ती तत्कालीन ब्राम्हण, वैश्य, क्षत्रिय आणि शुद्र या चारही वर्णाकरीता समानतेने खुली होती. याकरीता त्यांनी आपल्या सर्व स्त्री पुरुष शिष्यांना सांगितले "चार्तुवर्ण्यम चरैद्भिक्ष्यम" अर्थात चारही वर्णात भिक्षा मागायची. "शोच्च्याचारम् न शोधयेत् " उच्च नीच वर्ण- जात शोधुन भिक्षा मागु नये. " घर न निवडीत भिक्षा कीजे "हे त्यांचे समतेचे सुत्र होते. तर " एकीकडौनि रीगिजे एकीकडौनि निगिजे " अर्थात गावात एकीकडुन जायचे आणि दुसरी कडुन निघायचे असा समानतेचा आदर्श असायचा. स्वामींच्या आध्यात्मिक प्रबोधनात सामाजिकता असे आणि सामाजिकतेत आध्यात्म. समता त्यांनी ममतेनी सांगुन तत्कालीन समाजाला डोळस दृष्टीकोन दीला. त्यांनी ज्ञानाची यर्थाथ आणि स्वंयस्पष्ट व्याख्या करतांना सांगितले, "जे जैसे असे, ते तैसे जाणिजे ते ज्ञान" या ज्ञानाच्या कक्षेत त्यांनी स्त्रियांना आणले. स्त्रियांना देखिल धर्माचा , मुक्तीचा, मोक्षाचा अधिकार आहे असे स्पष्टपणे सांगितले. जिथे स्त्रियांना धर्माचा अधिकार नाही असा लिंगभेद सांगुन पुरुषी व्यवस्थेने स्त्रियांना जाणिवपुर्वक शेकडो वर्ष वंचित ठेवले. त्याला श्रीचक्रधर स्वामींनी दिलेले हे विवेकाचे आवाहन होते. त्याकाळी मानवी जगण्याचे सर्व विषय हे धर्म संकल्पनेत समाविष्ट होत असे. धर्मात असणाऱ्या अधर्माला स्वामींनी वेचुन वेचुन बाहेर काढले आणि धर्माला मानवतेचा चेहरा प्राप्त करून दिला. "जीव सर्वाधिकार्या " या सुत्राद्वारे त्यांनी तत्कालीन समाजातील स्त्रियांना देखील धर्माचा अधिकार आहे असे सांगुन सर्वाधिकार्या या संकल्पनेत त्यांनी पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना आणले.अधिकाराच्या दृष्टीने सर्वांना समान संधीची उपलब्धता देऊन धर्माच्या व इतरही अनुषंगाने स्त्री-पुरुष असा भेद विषमतामुलक ठरतो असे त्यांनी प्रतिपादन केले. यादृष्टीने त्यांची जीव ही संकल्पना फारच व्यापक आहे. स्त्री- पुरुष भेदाभेद, उच्चनिच्चता ही परमेश्वरी तत्व तथा सृष्टीनिर्मिती कर्त्या विरोधी असुन स्त्रियांचे दमन करणारी आहे हे त्यांनी तत्कालीन समाजाला पटवून देण्याचा कसोशीने प्रयत्न केला*.
*एकदा स्वामी स्त्रियांना डोळस धर्माचे मार्गदर्शन करीत होते. तेव्हा सारंगपंडित नावाचे एक पुराणिक श्रीचक्रधर स्वामींचे दर्शनाला आले. ते नेहमीच स्वामींच्या दर्शनाला येत असत. त्यांनी पाहिले की, स्त्रियां स्वामींच्या समोर बसून एकाग्रतेने त्यांचे धर्म निरूपण ऐकत आहेत. ते पाहून सारंगपंडीतांना स्त्रियांचा राग आला आणि त्यांनी कुत्सिततेने म्हटले, "या स्त्रियांना कशाला हवे धर्म निरुपण? त्यांना धर्म चर्चा करून काय साध्य करायचे आहे? विनाकारण स्वामींचा वेळ घेत आहेत. एकुणच सारंगपंडीताच्या हावभावावरून स्वामींनी ताडले की, सारंग पंडितांना स्त्रियांनी ऐकलेले धर्म श्रवण आवडलेले नाही. परंतु ते स्वामींना याविषयी म्हणु शकत नव्हते. यावरून श्रीचकधर स्वामीच सारंग पंडिताला त्याच्या स्त्रीविरोधी कृतिबद्दल म्हणतात," तुमचा काय जीव आणि यांच्या काई जीवलीया "अर्थात तुमचा जीव श्रेष्ठतम! पुरुष जीवानां सर्व अधिकार आणि या स्त्रियां काही जीव नाहीत का? त्या जीवलीया ठरतात अर्थात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कनिष्ठ दुय्यम स्थान असेच ना? असा उपरोधिक सवाल स्वामींनी सारंगपंडीताला केला. या रोकड्या प्रश्नाने सारंगपंडित निरुत्तर झाले . श्रीचक्रधर स्वामींनी सारंग पंडिताला या अविचाराचे प्रायचित्त म्हणून काही वेळ त्यास पाण्यात उभे राहण्याची शिक्षा देखील केली. आणि त्यास स्त्रीयांना पुरुषां समान अधिकार असले पाहीजेत असे सांगून त्याचे उद्बोधन केले.*
*यादृष्टीनेच श्रीचक्रधर स्वामींच्या बाईसा नावाच्या वयस्कर शिष्या होत्या. त्या स्वामींच्या मठाच्या व्यवस्थापक होत्या.*
*श्रीचक्रधरांनी त्यांना मठ व्यवस्थापनाचे सर्व अधिकार देऊन आवश्यक प्रसंगीच फक्त गरजेनुसार बाईसांना ते काही सांगत असत.*
*बाजारहाट, पैसा अडका, व्यवहार, मठाचे दैनिक व्यवस्थापन, इतर भक्तांचे कार्य नियोजनासह कुणाला काय हवे नको ते सर्व बाईसा पाहत. स्वामींना भटोबासासह इतरही पुरुष शिष्य परिवार होता. परंतु स्वामींनी प्रमुख व्यवस्थापनाची जबाबदारी मात्र जाणिवपुर्वक बाईसा या कर्तबगार स्त्रीला सोपविली. तीनेही मठाचे व्यवस्थापन कार्य अखेरपर्यंत कुशलतेने सांभाळले.*
*"नाथोबा करवि सुएर करविणे "ही एक मातृहृदयी अशी स्वामींची लीळा आहे. श्रीचक्रधर स्वामींचा मुक्काम शिष्यगणासह डोमेग्रामला असतो.एक दिवस मठात स्वामींना भेटायला एक अबला,निराधार स्त्री येते. ती आपली केविलवाणी परिस्थिती स्वामीं जवळ कथन करतांना म्हणते,"जी जी: मज कुणी नसे जी. आई-वडील नाही. बहिण भाऊ नाही.माझ्या पुरुषाने मला टाकून दिलेले आहे जी. जी जी: मी गर्भवती असून माझ्या पोटात एक मुल वाढते आहे, जी." अश्या आपदेने चिंताग्रस्त झालेली ही स्त्री स्वामींना आशाळभूतपणे विनवणी करते .जी.जी: मजा येथे राहु देयावे जी. स्वामी तिच्या आर्ततेकडे आत्यंतिक करूणेने पाहतात आणि आपल्या पट्टशिष्य बाईसांना लगेच सूचना करतात, " बाई , यासी असू देया" स्त्रीला मठात घ्या अशी सुचना करून तीची काळजी घ्यायला सांगतात. यानुसार बाईसा तीला मठाच्या आत मध्ये घेते. तीला दररोज जेऊ खाऊ घालते. ती सुद्धा नित्यनेमाने मठाची झाडपुस करून बाईसांना थोडी कामात मदत करते. तीचे दिवस जसे भरत येतात तेव्हा स्वामी बाईसांना मातेच्या ममतेने सांगतात, "बाई,यांसि आता झाडों नको देओ " असे म्हणुन तीला विश्रांती द्यायला सांगतात. अशारीतीने ही दोन जीवांची निराश्रीत निराधार स्त्री मठात स्वामींच्या करुणेने ओथंबुन गेली. एके दिवशी स्वामी विहरणाला बाहेर जातात आणि परत येऊन पाहतात तर काय ? तर या स्त्रीची प्रसूती झालेली. तीने एका गोंडस बाळाला जन्म दिलेला आहे. स्वामीकडे व बाळाकडे पाहून ती स्त्री परत म्हणते, "जी.जी, मज कुणी नाही. माझे कसे होईल जी" असे दुःख करीते. तेव्हा स्वामी तीच्या जवळ जाऊन तिला धीर देऊन सांगतात, "बाई, दुःख न करा, काळजी करू नका. हे आम्ही आहोत ना!" लगेच स्वामी त्यांच्यासोबत असणाऱ्या नाथोबा या पुरुष शिष्यांना सांगतात, " तुम्ही यांचे सुयेर (बाळंतपण) करा. लागैल तें बाईसांतें मागा:"अशी सूचना करतात. मग नाथोबा तीची बाज टाकतात. पाणि तापवितात तर बाईसा तीला न्हाऊ घालतात, बाळाचे नाळ नाथोबा खांडतात( काढतात) त्यास तेल चीकसा लावून नाथोबा बाळाची दरदिवशी आंघोळ करतात. त्यास शेकतात. तर बाईसा तीचे नेमाने पथ्यपाणी बघतात. नाथोबा पथ्यपाणी बाळंतीणीला नेऊन देतात . काही लागले सवरले ते नाथोबा तीला विचारतात. स्वामी विहरणा वरून परत आल्यावर तीची आस्थेने विचारपुस करण्याकरीता नित्यनेमाने तीच्या जवळ जात आणि म्हणत," बाळंतीण बाई, काई करताए? कसे आहात?" ती खाटेवरूनच हात जोडून म्हणे," जी जी : आपल्या कृपेने मी सुखें असे जी: असा निराश्रीत, निराधार स्त्रीला स्वामींनी आधार देऊन नाथोबा कडुन तीचे बाळंतपण करून घेतले. पुरुषा कडुन सुद्धा स्त्रीयांची कामे श्रीचक्रधर स्वामीं करून घेत असत. तसेच स्त्रिंयाकडुन पुरुषांची कामे सुद्धा. बाळंतीण बाईच्या निमित्याने स्वामींचे हे महाराष्ट्रातले आद्य सार्वजनिक 'मॅर्टनिटी होम' असावे जे मातृत्व भावाने ओथंबुन गेले होते.*
*श्रीचक्रधर स्वामींनी आध्यात्मातील सामाजिकता अग्रक्रमाने कृतिपुर्ण कार्यातुन आपल्या तत्त्वज्ञानात मांडली.आध्यात्मात सामाजिकता आणि सामाजिकतेत आध्यात्म हे त्यांचे मार्गदर्शनाचे सुत्र होते.*
*( क्रमश:)*
*मो. क्र.९७६३७९६४२४*


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा