विनायक पाटील यांचे लिपी संशोधन-डॉ. सतीश बडवे
काही माणसे अचानक भेटतात. कल्पनाही नसते की ही मुलुखावेगळी माणसे आहेत. विनायक त्र्यंबक पाटलांशी अशीच गाठ पडली.डाॅ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठात असताना पाटील साहेब अचानक आले. मराठी भाषा व वाङ्मय विभागातील पोथीशाळेचे काम मी नुकतेच हाती घेतले होते. त्यांना श्री दत्तराज मराठे यांच्या 'लक्षणबंदा'चे हस्तलिखित हवे होते. आमच्याकडे ते उपलब्ध आहे की नाही हे सांगता येणे अशक्य होते. म्हणून त्यांना औरंगाबादच्या श्रीकृष्ण मंदिरात जाऊन शोध घ्यायला सांगितले.तिथे सर्व सहकार्य निश्र्चितच मिळेल याची खात्री दिली. त्यांनी नेटाने प्रयत्न केले. तेथील आश्रमाच्या प्रमुख महंत सुभद्राआत्याबाई व संतोषमुनीशास्त्री कपाटे यांच्याकडून दत्तराज मराठे यांचा 'राजभद्र' हा ग्रंथ अप्रकाशित असल्याचे त्यांना समजले. कनाशी (भडगाव )ला त्यांचा मुक्काम असायचा हेही सांगितले. मग हस्तलिखिताचा शोध घेण्यासाठी पाटलांची धडपड सुरु झाली. दत्तराज मराठे यांच्या पोथीसाठी अमरावती, नागपूर, सातारा, फलटण, बदनापूर, औरंगाबाद अशी भटकंती चालू होती. पाटील लिप्यांविषयी अनभिज्ञ होते, महानुभावीय नव्हते, उपलब्ध हस्तलिखित आश्रमाबाहेर नेण्यास परवानगी नव्हती.हस्तलिखित न मिळाल्याने हताश होऊन सारे काम थांबविण्याचा निर्णय झाला असतानाच महंत लासूरकर शास्त्रींकडून पोथी मिळण्याच खात्रीलायक माहिती त्यांना कळाली. उभारी मिळाली आणि 'राजभद्र' प्रकाशात आला. पण पाटील तिथेच थांबले नाहीत. लिपी न येणे हा मोठा अडथळा त्यांच्या लक्षात आला होता. मग लिपीचा अभ्यास करण्याचा ध्यासच त्यांनी घेतला. त्यातूनच " महानुभाव सांकेतिक तळेगावकर लिपी" ( पोथीसह लिप्यंतर) आणि "महानुभाव सांकेतिक सुन्दरा लिपीचा अभ्यास" या दोन छोटेखानी ग्रंथांची निर्मिती झाली. लिपी हा तसा रुक्ष प्रकार. श्रीकृष्ण मंदिरात आयोजित चर्चासत्रात अवघ्या चार पाच जणांच्या उपस्थितीत त्यांनी सुंदरा लिपीवर आधारित दीर्घ निबंध वाचला. सुंदरा लिपीची वर्णमाला व त्यावरची चर्चा या निबंधात होती. मला प्रथमच पाटलांची उंची लक्षात आली. राऊळ प्रकाशनाने त्यांना इथेही मदतीचा हात दिल्याने ही पुस्तके प्रकाशित झाली. खरे तर विनायकत्र्यंबक पाटील मूळातले संवेदनशील कवी. 'निरीच्छ नभ' हा त्यांचा काव्यसंग्रह 'शब्दालय'कडून ना. धों. महानोर दादा, सुमती लांडे व पुरुषोत्तम पाटील यांच्या पाठबळामुळे प्रकाशित झालेला. मनोहर मासिकातून त्यांच्या कविताही प्रकाशित झाल्या होत्या.ऐन उमेदित खामगावला सेवेत कार्यरत असताना, याच काव्यलेखनाच्या ओढीतून त्यांची गाठ ज्येष्ठ अभ्यासक वा. ना. देशपांडे यांच्याशी पडली होती. खान्देशच्या परिसरातील महानुभाव साहित्याविषयी काही माहिती त्यांनी पाटलांना सांगितली. ती त्यांच्या मनात राहिली होतीच. वस्तुत: पाटील हे स्थापत्य विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले. ( M.E.Civil )पण सेवानिवृत्तीनंतर या प्रचंड उद्योगात त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले. खरे तर महानुभावीय सांकेतिक लिप्यांच्या संदर्भात फारशी माहिती अभ्यासकांना मिळत नाही.सर्वज्ञ विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी हंसराज खामनीकर बाबांनी सकळा लिपीचे काढलेले पुस्तक, अॕन फेल्डहाऊस यांची पुस्तिका, वि. भि. कोलते यांनी 'सह्याद्रीवर्णना'च्या संपादनात केलेली लिप्यांची चर्चा, यू. म. पठाण यांनी लिप्यांच्या निर्मिती मीमांसेचा घेतलेला शोध, महंत सोनपेठकर बाबांचे लेखन असे तुरळक पण मोलाचे प्रयत्न तर आहेतच. ही यादी कदाचित थोडी वाढवताही येईल, पण फार नाही.( महानुभाव साहित्य व शैक्षणिक प्रतिष्ठानने लाॕकडाऊनच्या काळात घेतलेली पहिली सकळ लिपीची कार्यशाळा हा एक सुखद धक्काच होता.) पण विनायक पाटील संशोधक, अभ्यासक म्हणून यात कुठेच बसत नाहीत.एकांड्या शिलेदारासारखे ते काम करत राहिले. परवा श्रीकांत देशमुख यांच्याशी चर्चा करताना सहजच पाटील साहेबांची आठवण निघाली आणि या साऱ्या गोष्टींची उजळणी झाली. लिप्यांचा शोध घेणे, एखाद्या पोथीचे लिप्यंतर करणे, सांकेतिक लिप्या शिकण्यासाठी त्या लिप्या उलगडून दाखविणे व तेही महानुभावेतर असताना करणे हे कशासाठी केले असावे? हा प्रश्र्न पडतो. खरे तर हे जिज्ञासू संशोधकाचे लक्षण आहे. कोणत्याही लाभाचा विचार नाही. या पुस्तकांची विक्री आणि खरेदी हा विचारच केलेला नव्हता. पदरमोड करून हे सारे अभ्यासकांसमोर देण्याची जबाबदारी तर त्यांनी पार पाडली. इथे एक महत्त्वाची गोष्ट आठवते. संशोधनात "पोटार्थी" संशोधन ( व्यावहारिक फायदा देणारे ) व " पाठार्थी " संशोधन असे दोन प्रकार असतात. विनायक पाटील यांचे काम हे पगडी, राजवाडे, ढेरे यांच्या निरपेक्ष संशोधनाशी व त्यांच्या निर्मोही संशोधन परंपरेशी नातं जोडणाऱ्या पाठार्थी संशोधनाचा उत्तम नमुना म्हणूनच विचारात घ्यावे लागते. अशी माणसे व अशी कामे दुर्मीळच....अवघड वाटतात पण अशक्य नसतात, एवढे तरी यातून निश्र्चितच शिकता येते.....
डॉ. सतीश बडवे
(मराठी विभागप्रमुख, डॉ. बा.आं.म.वि.औरंगाबाद)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा