तनधैलेया वावराचा दृष्टांत आणि आपण लेखक :- संदीप तडस शिरजगावकर

 तनधैलेया वावराचा दृष्टांत आणि आपण

           लेखक :- संदीप तडस शिरजगावकर

सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा मुक्काम जालन्याला पडला होता.त्यांच्यासोबत पट्टशिष्य भटोबास,बाईसासह इतरही काही शिष्य मंडळी होती. भटोबासांचे मावसभाऊ लखुदेवोबा सर्वज्ञांना भेटायच्या ओढीने जालन्याला आले. तेव्हा लखुदेवोबांना निरूपण करताना तनधैलेया वावराचा दृष्टांत अर्थात कथनात्मक व्यवहारीक उदाहरण स्वामींनी सांगितले.

एकें राजसें: रजो वासना दाटलें: तें परमेश्वरधर्मा योग्य नव्हेति: परि केलेया होति: जैसा तनधैलेया वावराचा:|| 

तनधैलें वावर असे: ते आंतु बाहीरि तनें दाटलें असे: तथा धालें असे: मग नांगरीजे: दुनीजे : कांसीया फेडीजति: मग पेरीजे: कुंभचासी तथा भार अतौनि पिके: ना तैसेचि पेरीजे तरि न पीके || तैसा राजस पुरुषु आंतु बाहीरी अवघी रजाची क्रिया करी: ते फेडौनि दिजे तरी प्रभवे : ना तयाचि वरि दिजे तरि न प्रभवे ||

अर्थात तणाने माजलेले शेत असते. ते आतून बाहेरून तणाने दाटून गेले असते. शेतात जिकडेतिकडे तणांचे साम्राज्य पसरलेले. परंतु या शेताची नांगरणी करून पुन्हा दुनीजे म्हणजे परत नांगरणी केली असता तण मुळापासून उपडून येते. अश्या तणाच्या काशीया उचलून शेत साफसुप करून पेरले तर कुंभचासी अर्थात कुंभा एवढे मोठे कणीस येऊन भरदार पीक येते. परंतु शेतातील तण नष्ट करण्याची प्रक्रिया न करता पीक घेतले तर शेत पिकत नाही. कारण शेतात वाढलेले तण पिकाला वाढू देत नाही.


हा दृष्टांत मानवी मनाच्या वृत्तीचे दर्शन घडवितो. दृष्टांताची सुरुवात मनुष्याच्या राजस लक्षणापासून केली आहे. यर्थाथतेने राजस हा गुण नसुन अवगुण आहे. राजस मनुष्य वेगवेगळ्या वासनेच्या इच्छेच्या अधीन असतो. तो बाहय दृष्टपर सुख समृद्धी आणि भौतिक सुखात रममाण झालेला असतो.अदृष्टपराशी त्याचे नाते तुटलेले असते. या रज गुणामुळे पुढे तम म्हणजे तामस वृत्ती वाढते आणि अहंकार दुणावतो. तर दुसरीकडे या तमाने रज्याची वृद्धी होते.

अशा रीतीने राजस आणि तामस गुण एकमेकांना पूरक असून रज-तमाने दाटलेला भरलेला मनुष्य परमेश्वर धर्माकरिता योग्य नसून त्याला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही असे दृष्टांताच्या नंतरच्या चरणात सांगितले आहे. परंतु मनुष्याने राजस वृत्ती टाळली तर तो परमेश्वर धर्माला योग्य होतो. ही योग्य होण्याची क्रिया स्वामींनी " तनधैलेया वावराचा" दृष्टांत देऊन स्पष्ट केली आहे.

      दृष्टांताचे शेवटचे चरण दार्ष्टांतिकाचे असुन अर्थात सारांश रुपाने दृष्टांताचा अर्थ अधिक स्पष्ट करणारे आहे. ज्याप्रमाणे राजस मनुष्य त्याच्या मनाच्या शेतात राजस वृत्तीचा अंर्तभाव करतो आणि परमेश्वरी मार्गापासून दूर जातो. परंतु त्याने राजस वृत्ती त्यागुन परमेश्वराचे सतत नामस्मरण केल्यास त्याचे मानसिक स्थित्यंतर घडून येते आणि परमेश्वर त्याच्या हृदयामध्ये वसतो. अशी हृदयगाम्य स्थिती मनुष्याला श्रेष्ठ पातळीवर घेऊन जाते.सर्वज्ञांनी हा दृष्टांत लखुदेवोबाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगितला.    


मानवी मनाच्या अवस्थेचे सकारात्मक अथवा नकारात्मक या दोन्ही दृष्टीने घडत जाणारे स्थित्यंतर दृष्टांतामध्ये प्रतिकं आणि प्रतिमांच्या माध्यमातुन स्पष्ट होत जाते. मनुष्याच्या मन पटलाची आणि शेतजमिनीची तुलना करून मन आणि शेत यातील समान पदर अविचार आणि तण याव्दारे व्यवहारिक दृष्टीने स्वामींनी आपल्याला समजावून सांगितला आहे.

शेतीची मशागत कष्टाने नियोजनपूर्वक व व्यवस्थित केली तर भरघोस पीक घेता येते; त्याचप्रमाणे मनाची मशागत सातत्याने प्रयत्नपुर्वक करण्याची गरज असते. मनामध्ये अविचाराचे तण वाढु दिले तर सुविचाराचे पीक येणे बंद होते. कारण अविचाराचे तण सुविचाराच्या पिकाला वाढु देत नाही. अविचाराचे तण म्हणजे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या बाहय प्रदूषित क्रियेची, घटनांची तसेच अंर्तमनाच्या पटलावर घडणाऱ्या विकार विकल्पादी दोषाची अवगुणात्मक प्रतिक्रिया असते. म्हणुन मनाच्या पातळीवर घडणारा अविचाराचा प्रार्दुभाव आपण कष्टाने नियोजनपुर्वक टाळला पाहीजे.


अविचाराने प्रदुषित मनुष्य कधीच परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही हे स्वामींनी "राजसा तामसा धर्मी अधिकारु नाही" या सूत्राव्दारे स्वयंस्पष्टपणे सांगितले आहे. धर्माचे पालन खऱ्या अर्थाने तोच करू शकेल ज्याने राजस व तामस वृत्तीचा त्याग केलेला आहे किंवा त्यादृष्टीने तो प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. हा शक्य- शक्यतेचा सिद्धांत (लॉ ऑफ प्रोबॅबीलीटी ) नसुन " पुरुष प्रयत्नें दैवाचे साहय " या स्वामींच्या सुत्रानुसार आलेल्या अनुभुतीने त्याचे आचरण दिवसागणिक श्रेष्ठतम होत जाते. हा खरा धर्मधरु आहे ज्याने सद्सदविवेकबुद्धीने आणि श्रद्धा निष्ठेने धर्माला पकडुन ठेवले आहे. म्हणुनच धर्म देखिल त्याला पाठबळ पुरविते. असा हा अधिकारी पुरुष त्या अर्थाने धर्मवीर ठरतो. धर्म तत्वाला धरून उक्ती आणि कृती ही त्याची विशेषता असल्यामुळे त्याचे धर्माचरण घडत जाते, किंबहुना तो आत्मोन्नती करीता शेतीतल्या कष्टाप्रमाणे प्रामाणिक प्रयत्न करीत असल्यामुळे त्याच्या हृदयामध्ये सात्विकतेचे भरघोस बहारदार पिक येते. या सत्व संचयामुळे त्याला उजळलेपण येऊन ही वाटचाल त्याला आत्मिक उन्नती कडे घेऊन जाते. म्हणूनच सर्वज्ञ एके ठिकाणी म्हणाले, "रजस्तमें निरसौनि सत्वस्थितां धर्मी अधिकारु " स्वभावाला मात्रा देऊन(मर्यादेत ठेवुन) राजस तामस वृत्ती सोडल्याशिवाय सत्त्वगुणाची निर्मिती होत नाही. जितके जितके सत्व वाढेल तितकी तितकी रज- तमाची वृत्ती कमी होत जाते तसेच याउलट जेवढी रज तमाची वाढ होईल तेवढाच सत्वगुण नष्ट होत जातो. म्हणुन

मन हृदयामध्ये सत्वस्थिती निर्माण होण्याकरिता स्वामींनी " रजस्तमें निरसौनि" ही पूर्वअट घातली. कारण रज आणि तम हे मनाच्या शेतीतील विकार विकल्पादी तण असुन त्याचे उच्चाटण करण्याकरीता मनुष्याला सातत्याने नियोजनपूर्वक सात्विक गुणाने राजस तामस अवगुणांची नांगरणी करावी लागते .यामुळे मनातील या तणांचा केरकचरा गळून पडतो. तो परत वरचेवर सत्व प्रयासाने उचलून मनाच्या शेतीतून काशिया प्रमाणे बाहेर फेकून दिला तरचं सात्विक मनाची शेती फुलते फळते. ही सातत्याने करण्याची कृती आहे. अशारीतीने परीपुर्ण सत्वगुण स्थापित झालेला मनुष्य त्रिगुणात्मक द्वदांत विजयी झालेला असतो. त्याने सात्विक गुणाने रज तमाचे द्वदं मिटविले असते.असा मनुष्य धर्माचा खरा अधिकारी असतो. त्यालाच परमेश्वरी ज्ञान सात्विक स्थानाच्या व परमेश्वरी नामाच्या वेधाने प्रभवते, मिळते. जे त्यास श्रेष्ठत्वाकडे घेऊन जाते;असे "तनधैलेया वावराच्या" दृष्टांता व्दारे स्वामींनी स्पष्ट केले आहे. आपल्या ऐहीक जीवनातील "तण व्यवस्थापणाचे" व्यवहारीक, मानसिक पातळीवरील महत्व आणि नियोजन कसे सात्विक, पारलौकीक जीवनाकडे घेऊन जाते ते फार सुंदरपणे या दृष्टांतात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी अधोरेखित केले आहे.


लेखक :- संदीप तडस शिरजगावकर

                अमरावती

     मो. क्र:- ९७६३७९६४२४

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट