मराठी साहित्याची "जन्मभूमी'… रिद्धपूर ---- - प्रमोद चुंचूवार

 दै. दिव्य मराठीच्या दिवाळी अंक २०१४मध्ये मी लिहिलेला लीळाचरितगाथा लेख प्रसिद्ध झाला आहे.महानुभाव संतपरंपरा व मराठी साहित्याची जन्मभूमी रिद्धपूर यांचे अनोखे नाते या लेखात मी विषद केले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या जन्मापूर्वी जात-पात नाकारणाऱ्या आणि अस्पृश्यता नाकारणाऱ्या तसेच स्त्री-पुरुष समतेवर भर देणाऱ्या महात्मा चक्रधरांची रिद्धपूर ही कर्मभूमी. येथेच मराठीतील पहिले गद्य आणि पद्य साहित्य लिहिले गेले. मात्र या मोठ्या सांस्कृतिक परंपरेची मराठी जनता व महाराष्ट्र सरकारला काडीचीही किंमत वाटत नसून त्यामुळे रिद्धपूर येथील महानुभाव परंपरा व त्यांच्या वास्तूंवर दुर्लक्षतेची धुळ साचली आहे. या लेखाचा तपशीलातील मजकूर व दिवाळी अंकातील त्या लेखाच्या पानांची जेपीजी फाइल्स सोबत जोडल्या आहेत.

-------

मराठी साहित्याची "जन्मभूमी'… रिद्धपूर 

----

- प्रमोद चुंचूवार

pchunchuwar@gmail.com

------

"कावळ्याचे घर शेणाचे, चिमणीचे घर मेणाचे, ' ही कथा ऐकली नसेल असा कुणी मराठी बालक असेल का? ही कथा कुणाची? सर्वप्रथम ही कथा कुणी, कुणाला सांगितली? ही मूळ कथा कुठे लिहिली असेल? याचा विचार आपण कधी केलाय.

महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर यांनीच आपल्या शिष्यांना दृष्टांत म्हणून सांगितलेली ही कथा. 

चक्रधरांनी सांगितलेल्या ‘काउळे याचे घर सेणाचे : साळेचे घर मेणाचे’ या बालकथेपासून ते प्रौढांच्या अनेक कथा  असलेल्या "लीळाचरित्र'या ग्रंथात आहेत आणि त्या सुंदर रीतीने सांगितलेल्या आहेत. हा ग्रंथ मराठीतील आद्य ग्रंथ असून तो लिहिला गेलाय अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील रिद्धपूरमध्ये. 

रिद्धपूर.. प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असे हे गाव. कारण हेच गाव मराठी साहित्याची जन्मभूमी आहे. याच गावात मराठीतील पहिली साहित्यकृती लिहिली गेली. या साहित्यकृतीचे नाव होते-लीळाचरित्र. खरेतर कोणत्याही समाजात आपले पहिले साहित्य लिहिले गेलेल्या स्थळाबद्दल किती आदरभाव असायला हवा. या स्थळाची आणि या साहित्यकृतीची कसे उत्तम पद्धतीने जतन व संवर्धन व्हायला हवे?  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून केंद्र सरकारकडे विनंती  करणारे राज्यातील सरकार आणि मराठीवर अन्याय होत असल्याची मुंबई-पुण्यात बसून सतत ओरड करणारे राजकारणी वा विचारवंत यापैकी कुणालाही या स्थळाच्या आणि त्या साहित्यकृतीची स्मृती चिरंतन रहावी म्हणून अलिकडच्या काळात काही करावेसे वाटले नाही. 

 रिद्धपूर हे धार्मिक क्षेत्रात जगप्रसिद्ध असे नाव. कारण महानुभाव पंथाची ही काशी. एकेकाळी भारतभर पसरलेल्या महानुभाव पंथाचे अनुयायी आजही देशभरातून येथे नियमित येतात. हा पंथ समजून घेतल्याशिवाय आपल्याला िरद्धपूरचे महत्व कळणार नाही. संत ज्ञानेश्वरांनी जात-पात नाकारून, धर्मज्ञानावरील संस्कृत भाषेची मक्तेदारी मोडीत काढून सामान्यांच्या भाषेत आध्यात्मिक ज्ञान दिले. हे महाराष्ट्रात सर्वांनाच माहित आहे आणि त्याबद्दल सर्वच मराठी भाषक त्यांचा प्रचंड आदर करतात. मात्र ज्ञानेश्वरांच्याही जन्माआधी धर्मज्ञान मराठी भाषेत राज्यातील जनतेला देणारे आणि वेदप्रामाण्यवाद नाकारणारे संत होते भगवान चक्रधर स्वामी. मात्र आज मराठी भाषकांपैकी बहुसंख्यकांना हे माहितच नाही. ज्ञानेश्वरांना जे आदराचे स्थान िमळाले, त्यांचे भगवद् गीतेवरील भाष्य असलेली अभिजात कलाकृती ज्ञानेश्वरीच्या प्रसारासाठी जसे सरकारी पाठबळ मिळाले तसे चक्रधरांना िमळाले नाही. त्यांचे विचार आणि जीवन सागंणाऱ्या लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या साहित्यकृतीच्या पदरीही उपेक्षा आली. 

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर हे गोविंद प्रभूंचे गाव.  गोविंद प्रभू हेच चक्रधरांचे गुरू. महानुभाव पंथात ५ ईश्वरांची पूजा केली जाते.  भगवान श्रीकृष्ण, श्री दत्तात्रेय प्रभू, श्री चक्रपाणी, श्री गोविंद प्रभू आणि महात्मा चक्रधर, हे पाचही देव म्हणून पुजले जातात. भागवत आणि महानुभाव या दोन्ही पंथात श्रीकृष्णाची पूजा केली जात असली तरी महानुभाव धर्मात श्रीकृष्णाचे स्थान वेगळे आहे. महानुभाव पंथात श्रीकृष्ण हे विष्णु वा अन्य कुणाचा अवतार नसून ते स्वत:च ईश्वर आहेत, असे मानले जाते. त्यामुळे महानुभाव पंथाचे पाईक हे भगवान  विष्णू वा त्यांचे अवतार असलेले भगवान राम वा अन्य कोणत्याही हिंदू देवतांचे पूजन करीत नाहीत. त्यांची देशभरातील मंदीरे वा मठ हे श्रीकृष्ण मंदिर याच नावाने ओळखली जात असल्याने केवळ जाणकारांनाच ते महानुभाव मंदिरे आहेत, हे माहित असते.सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या महानुभाव पंथाने जातिनिरपेक्षतेचा आणि अहिंसा तत्त्वाचा पुरस्कार केला. ‘महानुभाव’ या नावाने हा पंथ जरी आज ओळखला जात असला, तरी त्याची ‘महात्मा’, ‘अच्युत’, ‘जयकृष्णी’, ‘भटमार्ग’, ‘परमार्ग’ अशी अन्य नावेही आहेत. गुजराततेत ‘अच्युत पंथ’ व पंजाबात ‘जयकृष्णी पंथ’ ही नावे लोकप्रिय आहेत.  दत्तात्रेयांचे शिष्य हे चक्रपाणी आणि चक्रपाणींचे शिष्य होते गोविंद प्रभू आणि गोविंद प्रभूंचे शिष्य होते महात्मा चक्रधर. 

गोविंद प्रभू हे रिद्धपुरातील ब्राह्मण कुटुंबात जन्मले आणि १२५ वर्षांचे आयुर्मान त्यांना लाभले. मात्र वयात आल्यापासून त्यांची बंडखोर वृत्ती स्पष्ट होऊ लागली. जाती-पातीचे भेद नाकारणाऱ्या गोविंद प्रभूंनी अस्पृश्यताही नाकारली. १२ व्या शतकाचा अखेरचा हा कालखंड होता. त्यांना द्वारावतीत चक्रपाणी यांच्याकडून ईश्वरी शक्ती आणि विद्या प्राप्त झाल्याचे मानले जाते. गोविंद प्रभू हे अस्पृश्य मानले जाणाऱ्या मातंगाच्या घरी जेवत आणि मातंगांचा विटाळ करणाऱ्या ब्राह्मणांच्या घरी जाऊन त्यांच्या घरातील पाण्यात हात बुडवून आपले हात  धुवत. महार-मातंग समाजासाठी पाण्याची विहिर त्यांनी केशव नायक नावाच्या ब्राह्मणाच्या शेतात खोदायला लावली. ही विहिर आजही मातंग विहिर म्हणून ओळखली जाते. या विहिरीपासूनच प्रेरणा घेऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी   महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केल्याचे मानले जाते. 

महात्मा चक्रधर स्वामींचे मूळ नाव हरिपाळदेव. गुजरातमधील भडोचचे राजे सोळंकी हे क्षत्रिय कुळातील  राजे होते. विशालदेव आणि माल्हनदेवी या भडोचच्या राजाच्या पोटी हरिपाळदेवांचा जन्म झाला. ऐन तारूण्यात त्यांचा मृत्यू झाला. त्याचवेळेस व्दारकेत चक्रपाणींनी योगिनी कामाख्यापासून पिच्छा सोडविण्यासाठी आपला देह सोडला होता आणि त्यांचा ईश्वरात्मा प्रवेशासाठी देहाच्या शोधात होता. चक्रपाणींच्या आत्म्याला  तेव्हा चितेवर ठेवलेला हरिपाळदेवांचा देह दिसला आणि त्यांच्या आत्म्याने या देहात प्रवेश करताच हरिपाळदेव पुन्हा जिवंत झाले. त्यामुळे हरिपाळदेव हे चक्रपाणींचेच पुनरावतार होते. राजकुमारासारखे पुन्हा  जीवन जगणे सुरू केलेल्या हरिपाळदेवांना जुगाराचे व्यसन होते. यातून घडलेल्या एका घटनेनेच त्यांच्यात संसाराचे वैराग्य निर्माण झाले.  माता-पिता आणि पत्नी कमळा यांचा त्याग करून व रामयात्रेचे निमित्त करून ते महाराष्ट्रात निघाले. तेव्हा महाराष्ट्रात सिंघण यादवांचे राज्य सुरू होते आणि तेव्हा राजा रामदेव राय हे गादीवर होते. या घराण्यातील कान्हरदेव, महादेव, आमणदेव रामदेव आणि हरिपाळदेव यांनी महाराष्ट्रावर राज्य केलेय. मजल-दरमजल करीत हरिपाळदेव रिद्धपुरात पोहोचले तेव्हा रिद्धपुरच्या हलवायाच्या बाजारात "सेंगुळ बुड्डे' (गोड शेवया)  खात उभे असलेल्या गोविंद प्रभूंनी त्यांना पाहिले. "" तू चक्रधरू, चक्रधरूच होय,''असे म्हणत त्यांना वंदन करणाऱ्या हरिपाळदेवांचे नाव चक्रधर ठेवले. गोविंदप्रभूंकडून शक्तीचा स्वीकार करून चक्रधरांनी जवळच्याच आदिवासी बहुल सालबर्डी पर्वतावर १२ वर्षे तपश्चर्या केली. या काळात आदिवासींसारखेच जीवन ते जगले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पदभ्रमण केले. या भ्रमण काळातच त्यांनी आपले तत्वज्ञान आणि कार्याला निश्चित स्वरूप दिले. त्यांनीच महानुभाव धर्माची स्थापना केली. ईश्वरप्राप्तीसाठी वेदांची आवश्यकता नाही, असे स्पष्ट प्रतिपादन करीत चक्रधरांनी वेदप्रामाण्य आणि अव्दैत सिद्धांत नाकारला. एवढेच नव्हे तर चातुर्वर्ण्य नाकारून पुरूषांसह स्त्रियांनाही ईश्वरज्ञान प्राप्ती आणि मोक्ष साधनेचा अधिकार असल्याचे तत्वज्ञान त्यांनी मांडले. स्पृश्या-स्पृश्यता, जातीभेद, कर्मकांड, देवांसमोर पशुबळी अशा बाबी  नाकारणाऱ्या चक्रधरांमुळे महाराष्ट्रात सामाजिक क्रांती घडू लागली होती. केवळ दलित-बहुजनच नव्हे तर एकेकाळी वैदिक संस्कृतीचे पाईक असलेले अनेक ब्राह्मण पंडित व विचारवंतांनीही महानुभाव धर्माचा स्वीकार करून या प्रबोधनाच्या चळवळीत मोलाची भूमिका वठवण्यास प्रारंभ केला होता. यामुळे वैदिक मार्गाचे अनुसरण करणारे आणि देवभोळ्या जनतेच्या कर्मकांडावर पोट भरणारा तत्कालिन ब्राह्मण पुरोहित वर्ग चिंतित झाला. तत्कालिन राजे रामदेव राय यांचा प्रधान हेमाद्री पंडित यांच्याकडे यादवांच्या दरबारातील महदाश्रम आणि ब्रह्मसान पुरोहितांनी याबद्दल तक्रार केली. स्वत: हेमाद्री पंडित हा कट्टर वैदिक ब्राह्मण होता आणि चतुर्वर्ग चिंतामणी हा संस्कृत ग्रंथही त्यांने लिहिला होता. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी तत्कालिन समाज आणि हेमाद्रीचा ग्रंथ यांचे वर्णन एका लेखात केले असून लीळाचरित्राच्या महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या संपादित आवृत्तीत याची माहिती देण्यात आली आहे.  "" हेमाद्रीच्या या ग्रंथात प्रत्येक दिवसाला आणि प्रत्येक तिथीला दहा-दहा-पाच-पाच व्रतांचा निर्देश असून प्रत्येक व्रतासाठी कोणत्या देवतेसाठी कोणते पक्वान्न तर करायला पाहिजे आणि किती पुरोहितांना  भोजन देऊन त्यांची कृपा प्राप्त केली पाहिजे, याचा श्रृती-स्मृती आणि पाराणातील वचने उद्धृत करून अत्यंत गांभीर्याने निर्णय दिला आहे. हेमाद्रीच्या व्रतखंडानुसार  वर्षाच्या ३६५ दिवसात जवळपास दोन हजार व्रते सांगितली आहेत. हेमाद्रीने प्रत्येक ठिकाणी व्रताचा आणि पक्वान्नांचा संबंध जोडला,'' असे राजवाडे यांनी म्हटले आहे.  यावरून हेमाद्रीच्या वैदिक व कट्टर चातुर्वर्ण्य प्रेमाची कल्पना  कल्पना यावी.  हेमाद्रीनेच राजा रामदेवरायाच्या मनात चक्रधरांबद्दल विष कालवले.    माघ वद्य चतुर्थी शके ११९७ अर्थात १४ फेब्रुवारी १२७६ रोजी चक्रधरांचा शिरच्छेद हेमाद्रीच्या आदेशावरून करण्यात आला.  चक्रधरांच्या हत्येमुळे सामाजिक क्रांतीचा त्यांनी दिलेला महानुभवी विचार संपला नाही. उलट त्यांच्यानंतर त्यांचे तत्वज्ञान व शिष्यवर्ग वाढतच गेला.केसोबास लक्ष्मींद्रभट, दामोदर पंडित, भास्करभट बोरीकर, केशवाचार्य, नरेंद्र पंडित, म्हाईंभट यासारखे अनेक विव्दान ब्राह्मणही या  महानुभाव संप्रदायात आले.

मराठी भाषा आणि महानुभाव 

संत ज्ञानेश्वरांनी धर्मज्ञान सामान्यांच्या  मराठी भाषेत सांगितले, हे त्यांचे क्रांतिकारी कार्य मानले जाते. मात्र ज्ञानेश्वरांच्या जन्मापूर्वीच हे ऐतिहासिक  व क्रांतिकारी कार्य  महात्मा चक्रधरांनी केले.  १२ व्या शतकात धर्माचे तत्वज्ञान त्यांनी लोकभाषेतून अर्थात मराठी भाषेतून सांगितले आणि धर्मज्ञानावरील संस्कृत भाषेची मक्तेदारी मोडून काढली. स्वत: गुजराती असलेल्या चक्रधरांनी धर्मज्ञानासाठी मराठी भाषेचा  निवड करण्याचा निर्णय घेतला असेल तो क्षण नक्कीच ऐतिहासिक व क्रांतिकारी होता. त्यामुळे सामान्यांमध्ये सामाजिक समतेचा संदेश पोहोचविण्यात ते यशस्वी झाले.  विधानसभा निवडणुकीच्या काळात  राज्यात गुजराती विरूद्ध मराठी  असे वातावरण तापवून राजकारण करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर एका गुजराती माणसामुळे मराठी भाषेला पहिली साहित्यकृती लाभली, हे सूज्ञांनी लक्षात घ्यायला हवे. त्यांच्या हत्येनंतर  त्यांच्या आठवणीत व्याकुळ होऊन त्यांचे पट्टशिष्य आणि महानुभाव धर्माचे पहिले आचार्य नागदेवाचार्य हे रिद्धपुरात परतले आणि गोविंद प्रभूंसोबत राहू लागले. रिद्धपुरातील वाजेश्वरी या ठिकाणावर ते जाऊन बसत.  त्यांच्यासोबत म्हाईंभट ही तेथे अनेकदा येत आणि नागदेवाचार्यांच्या तोंडून निघणाऱ्या चक्रधरांच्या अनेक आठवणी, चक्रधरांनी दिलेले दृष्टांत वा सांगितलेल्या कथा अर्थात चक्रधरांच्या लीळा ते ऐकत बसत. अचानक एक दिवस म्हाईंभटाच्या मनात विचार आला आणि त्याने तो नागदेवाचार्यांना बोलून दाखवला. "" आचार्य, तुमच्याजवळ चक्रधर स्वामींच्या इतक्या लीळा आहेत. त्या लिहून जतन करायला हव्यात. नाहीतर येणाऱ्या पिढीला त्या कशा कळतील,''असा प्रश्न म्हाईंभटांनी विचारला तो मराठी भाषेचा सूवर्ण क्षणच म्हणायला हवा.  संस्कृत भाषेचे त्या काळातील सर्वश्रेष्ठ पंडित असल्याने संस्कृतातच या लीळा लिहून काढाव्यात असा म्हाईंभटाचा मनोदय होता. मात्र चक्रधरांनी आपले धर्मज्ञान मराठीतच दिले , त्यामुळे त्यांच्या लीळा मराठीतच लिहून काढा, अशी सूचना नागदेवाचार्यांनी केली आणि मराठी भाषेतील पहिल्या साहित्यकृतीच्या जन्माची ऐतिहासिक प्रक्रिया सुरू झाली. वाजेश्वरीत बसून नागदेवाचार्यांनी चक्रधरांच्या आठवणी,दृष्टांत, स्वामींची प्रवासवर्णने सांगायची आणि म्हाईंभटाने ते अत्यंत ओघवत्या भाषेत लिहून काढायची. म्हाईंभट केवळ लेखनिक नव्हते तर नागदेवाचार्यांनी तसेच तेव्हा रिद्धपुरात असलेल्या आणि चक्रधरांचे सान्निध्य लाभलेल्या लोकांनी  सांगितलेल्या लीळांचे संकलन करून अत्यंत प्रभावी शब्दात लिहून काढल्या. खरा संशोधक वा पत्रकाराप्रमाणे ज्या विषयावर आपण लिहितोय त्याबद्दल अधिक माहिती मिळवातो आणि मिळालेल्या प्रत्येक माहितीची खातरजमा करण्याचा प्रयत्न करतो, तशीच  शास्त्रशुद्ध पद्धत त्यांनी अवलंबिली. म्हाईंभटांनी लीळांच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी घेतलेल्या कष्टाचे वर्णन स्वत: वि. भि. उपाख्य भाऊसाहेब कोलते यांनी आपल्या "लीळाचरित्र' या संपादित आवृत्तीत केले. चक्रधरांनी महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या तीरावर दोन्ही काठांवरील गावांमध्ये प्रामुख्याने प्रवास केला. उत्तर महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर, कोकणात संगमेश्वर एवढेच नव्हे तर चक्रधर हे मुंबईसही येऊन गेल्याचे उल्लेख आहेत. या सर्व ठिकाणी म्हाईंभट प्रत्यक्ष जाऊन आले आणि चक्रधर ( महानुभाव पंथात चक्रधरांना सर्वज्ञ ही म्हटले जाते.) जेथे राहिले, ज्यांना-ज्यांना भेटले त्या सर्वांशी बोलून त्यांनी आपल्या माहितीची खातरजमा केली. कोलते यांनी आपल्या प्रस्तावनेत म्हाईंभटाच्या लीळासंशोधनाचा गौरव केलाय.

 ‘" या कामी म्हाइंभटांनी किती कष्ट घेतले याची कल्पना येण्यासाठी डखले नावाच्या सर्वज्ञांच्या भक्ताच्या भेटीच्या वेळची हकीकत सांगण्यासारखी आहे. ‘ऐसें महीभट डखलेयाचीया गावासि आले: तेथ सर्वज्ञांचिया लीळा पुसेति: डखले सेतासि आउत वाहावया जाति: हे आऊत वाहात: आउत वाहतां तयासरीसे महीभट सर्वज्ञांचिया लीळा त्याते पूसेति: डखले आऊत वाहाता सर्वज्ञांचीया लीळा सांघेति: त्या महीभट नमस्करोनि घेति: मग भीक्षाअवसरा जाति: भीक्षा करूनि गंगातीरी जेबीति: परि तयाचे काही नेधति:’ लीळासंशोधनाची केवढी ही आस्था आणि किती कष्ट! इतकेही करीत असताना ज्यांच्याकडे लीळा विचारण्यासाठी जायचे त्यांचे अन्नपाणी-काहीच स्वीकारायचे नाही, तर भिक्षा मागून जेवायचे! खरोखर, हे आद्य संशोधक म्हाइंभट संशोधकांचे आदर्श आचार्य होत यात शंका नाही.अशा रीतीने म्हाइंभट अनेक गावी गेले. पैठणला जाऊन सारंगपंडिताजवळ त्यांनी सर्वज्ञांच्या लीळा शोधल्या. बळहेग्रामला स्वामींचे

 अनेक भक्त होते, त्यांनाही लीळा विचारल्या. रावसगावला रामदेव दादोस होते, त्यांच्याकडे जाऊन लीळा गोळा गेल्या. बीडला जाऊन पद्मनाभीदेवाजवळून लीळा घेतल्या. यात कदाचित काही नवीन आठवणीही म्हाइंभटांना मिळाल्या असतील. पण बहुतेक आठवणी नागदेवाचार्यांच्या संग्रही होत्याच. त्यांच्याजवळून त्यांनी ता लिहूनही घेतल्या होत्या. आता जे कार्य सुरू होते ते आचार्यांनी निवेदन केलेल्या आठवणी संबंधितांकडून पडताळून पाहाण्याचे लीळा-शोधनाचे. ‘ऐसे भटां अवीद्यमान: आन बाइसांय अवीद्यमान-जीया लीळा तीया महीभटीं जेथजेथ सर्वज्ञें बीजे केले होते तेथ तेथ जावौनि पुसौनि लीहीलीया: मन भट गुरुकूळात ऋद्विपुरा आले', '' अशा शब्दात कोलते यांनी महाराष्ट्र सरकारच्या साहित्य-संस्कृती मंडळाने १९७८ साली प्रकाशित केलेल्या लीळाचरित्राच्या संपादित आवृत्तीच्या  प्रस्तावनेत म्हटले आहे. शके १२०० म्हणजे इसवीसन १२७८ च्या अखेरीस अर्थात चक्रधरांच्या हत्येनंतर अवघ्या दीड-दोन वर्षात हा ग्रंथ  लेखन आणि संशोधन या प्रक्रियेतून पूर्ण झाला. 

लीळाचरित्र हा केवळ मराठीतील आद्यग्रंथ, आद्य चरित्र ग्रंथ म्हणूनच नव्हे तर हिंदीसह सर्वच प्रमुख प्रादेशिक भाषेतील आद्यग्रंथ असल्याचा निर्वाळाही संशोधकांनी दिला आहे. महानुभाव पंथामुळे मराठी साहित्यातील केवळ आद्यग्रंथच नव्हे तर आद्य पद्य संग्रहही प्राप्त झाला. महदंबेचे धवळे हा पद्यग्रंथही महदंबा वा महदाईसा या नावाने ओळखली जाणाऱ्या चक्रधरांची शिष्या असलेल्या महानुभाव स्त्रीने लिहून काढला. धव म्हणजे पती आणि धवळे म्हणजे विवाह गीते. या पद्यग्रंथाचा उत्तरार्धही म्हाईंभटानेच लिहिल्याचे मानले जाते. यामुळे मराठीतील आद्य कवयित्रीचा मानही महदंबेकडे जातो. हे दोन्ही आद्य ग्रंथ रिद्धपुरातच लिहिण्यात आले. लीळाचरित्र हा केवळ सािहत्यिकदृष्ट्याच नव्हेतर १२ वा १३ व्या शतकातील महाराष्ट्र समजून घेण्यासाठी ऐतिहासिक दस्तावेज मानला जातो. “ भौगोलिकदृष्टय़ाही या ग्रंथाचे आगळे महत्त्व आहे. चक्रधरांचे परिभ्रमण सर्व महाराष्ट्रभर होते. त्यामुळे त्या वेळच्या अनेक गावांची नावे, तेथील नद्या, देवळे, देवळांतील देवता यांची भरपूर माहिती ‘लीळाचरित्रा’तून मिळते. तत्कालीन महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व धार्मिक परिस्थितीचे प्रतिबिंब या ग्रंथात उमटलेले आहे. दुसरा सिंधण, कन्हरदेव, महादेव, आमणदेव व रामदेव या यादव नृपतींची कारकीर्द चक्रधरांनी पाहिली होती. त्यांच्या अनेक अधिकाऱ्यांशी त्यांचा संबंध आला होता. त्यांची प्रत्यक्षाप्रत्यक्ष वर्णने या ग्रंथात पुष्कळ आहेत. तत्कालीन महाराष्ट्रातील निरनिराळे धर्मपंथ व त्यांची मतमतांतरे यांवरून त्या वेळच्या महाराष्ट्रातील धार्मिक परिस्थितीचे ज्ञान होते. शिवाय, त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीचे, इतकेच नव्हे तर लौकिक जीवनाचे दर्शन घडविणारा ‘लीळाचरित्रा’सारखा दुसरा ग्रंथ नाही. निरनिराळे खेळ, व्यवसाय, शेती, शेतीची औजारे, फळे, भाज्या, घरे, त्यांची मांडणी, स्वयंपाकघरात तयार होणारी पक्वान्ने इत्यादी विविध प्रकारची माहिती या ग्रंथातून मिळते. अशा अनेक दृष्टीनी ‘लीळाचरित्र’ हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. अशा या सर्वांगसुंदर ग्रंथाचे संकलन व लेखन रिद्धपूर येथे, म्हणजे खास  व-हाडात झाले, हाही त्याचा एक महत्त्वाचा विशेष होय,''अशा शब्दात  कोलते यांनी या ग्रंथाचे महत्व विषद केले आहे.

संवर्धन आणि जतनाचा आदर्श- गोपीराजबाबा संग्रहालय

संशोधन,माहितीची पडताळणी आणि त्यानंतर लेखन करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत अंगिकारणाऱ्या महानुभाव पंथाने  आपल्या इतिहासाचे जतन व संवर्धन कसे करावे,याचाही एक आदर्श घालून दिला आहे. चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू जेथे-जेथे जाऊन आले त्या सर्व ठिकाणांची ओळख सांगणारे, त्या ठिकाणी या आठवणी जागवणाऱी मंदिरे वा ओटे-गोटे उभारणे हे काम त्यांनी केलेय. या स्थानांची माहिती देणारा स्थानपोथी नावाचा ग्रंथच १४ व्या शतकात मुनीराज कोठी यांनी लिहिलाय. “येथचिया संबंधा गेले, तेतुले ओटेगोटे आदिकरोन नमस्करणीय की गा / '' अशा शब्दात या स्थानांचे महात्म्य वर्णन करण्यात आले. दत्तात्रेय प्रभूंचा स्पर्श झालेले माहूर येथील दगडे असतील किंवा चक्रधर वा गोविंद प्रभू नियमित जाऊन बसायचे असे स्थान असतील, त्यांनी वापरलेले भांडी कुंडी एवढेच नव्हे तर त्यांनी वेळोवेळी घातलेली वस्त्रे असतील ती सुद्धा जतन करून ठेवण्यात आली आहेत. एका मठात तर चक्रधर स्वामींची वस्त्रांचे तुकडे अत्यंत नाजूकपणे जतन करून ठेवण्यात आली आहेत. ८०० वर्षानंतरही हे वस्त्र उत्तम िस्थतीत आहेत, यावरून महानुभावियांच्या िनयोजनाची महत्ता कळते. जेथे लीळाचरित्र लिहिले गेले त्या वाजेश्वरी येथेही असेच ओटे बांधण्यात आलेय. दरवर्षी आषाढी पौर्णिमेला येथे सुमारे ५० हजार लोक जमतात तेव्हा येथे असलेल्या सर्व मठांमध्ये जतन करून ठेवलेल्या वस्तूंना वंदन करायला   एकच गर्दी उसळते.

 िरद्धपूर येथील आचार्य गोपीराजबाबा महानुभाव ग्रंथसंग्रहालयात तब्बल एक हजार हस्तलिखित पोथ्या उपलब्ध आहेत. गोपीराज बाबांच्या या मठाला काही शतकांची परंपरा आहे. या ग्रंथसंग्रहालयालाही एक इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रसिद्ध कीर्तनकार विष्णुबुवा जोग यांनी महानुभाव पंथाबद्दल अत्यंत चुकीची माहिती दिली. त्या माहितीला महानुभाव पंथियांनी आक्षेप घेतल्यावर लोकमान टिळकांनी जोग यांची बाजू घेत त्यासंदर्भात  ब्रिटिश इम्पेरियल गॅझेटचा हवाला दिला. त्यावेळेस पहिल्यांदा महानुभाव पंथियांना आपले सर्व साहित्य एके ठिकाणी नसल्याची उणीव जाणवली. आजच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतातही तेव्हा महानुभाव पंथाचा प्रभाव होता. या प्रांतातील करसाल या गावातून आलेले आणि त्यावेळेस गोपीराज मठाचे प्रमुख महंत आलेले गोपीराजबाबा करसालकर यांनी महानुभाव साहित्य गोळा करून एक संग्रहालय उभारण्याचा निर्धार केला. यासाठी ते देशभर फिरले. महानुभाव पंथातील हजारावर ग्रंथसंपदा, दुर्मिळ पोथ्या, हस्तलिखिते  गोळा केल्या आणि १९३० मध्ये या मठात ग्रंथसंग्रहालयाची स्थापना करण्यात आली. 

प्रामुख्याने मराठी, हिंदी, संस्कृत आदी भाषांमध्ये हस्तलिखित ग्रंथ उपलब्ध असून, मराठीतील पहिला गद्यग्रंथ ‘लीळाचरित्रा’च्या १५ हस्तलिखित पोथ्या येथे उपलब्ध आहेत. सुमारे पाचशे वर्षांपूर्वीची अर्थात्् शके १४४४ साली िलहिलेली सर्वांत प्राचीन हस्तलिखित पोथी या ठिकाणी उपलब्ध आहे. 

ग्रंथसंग्रहालयात चरित्र तसेच स्मृतिग्रंथ (गोिवंदप्रभू, श्रीचक्रधरस्वामी, नागदेवाचार्य), काव्यग्रंथ (साती चरित्र, नरेंद्राचे रुक्मिणीस्वयंवर, भास्करभट्ट बोरीकरंचे शिशुपालवध आणि उद्धवगीता, दामोदरपंतांचे वच्छहरण, खळोव्यास यांचे सह्याद्रिवर्णन, नारायणराव बहाळीचे यांचे रिद्धपूरवर्णन, पंिडत विश्वनाथ बास यांचे ज्ञानप्रबोध, केशिराजबास यांचे मूर्तिप्रकाश, दृष्टांतपाठ) काव्यग्रंथावरील टीकाग्रंथ, तत्वज्ञानपर भाष्यग्रंथ, व्याकरणग्रंथ, स्थलवर्णनपर काव्य (रिद्धपूरमहात्म्य, डोमेग्राममाहात्म्य, पांचाळेश्वरमाहात्म्य, तीर्थमािलका) आदी ग्रंथ उपलब्ध आहेत. या हस्तलिखित ग्रंथांचा मराठी सािहत्य संशोधकांनी अभ्यास करून आपले ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. यामध्ये वा. ना. देशपांडे संपादित ‘स्मृितस्थळ’, ह. ना. नेणे संपादित सूत्रपाठ, डॉ. वि. भि. कोलते संपादित‘लीळाचरित्र’, ‘गोविंदप्रभू चरित्र’, साती ग्रंथ तसेच भाष्यग्रंथ (आचारबंद, विचारबंद, लक्षणबंद) आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच कापडाच्या चिंध्याचा लगदा तयार करून बनविलेली कापडी भांडीही या मठात आपणाला पाहण्यास मिळतील. वजनाने अत्यंत हलकी व  हस्तकलेचा एक संुदर प्रकार पाहून अापण आश्चर्यचकित होतो. महानुभावांचे साहित्य जतन करण्यासाठीही पद्धती त्यांनी शोधून काढल्या आहेत. ४०० ते ५०० वर्ष जुन्या पोथ्याही त्यांच्या संग्रहात असून त्यांना कीड लागू नये म्हणून विशिष्ट पद्धत अवलंबिली जाते.  "" हस्त नक्षत्राच्या उन्हात या पोथ्या वाळवल्या जातात. दोन पानांच्या मध्ये ज्वारीचे दाणे टाकून प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश मिळेल, याची काळजी घेतली जाते.  त्यामुळे पोथ्यांना कुरतडणाऱ्या चाळी नावाच्या किड्यापासून या पोथ्यांचे संरक्षण केले जाते. या पोथ्यांमध्ये नंतर सापाची कात ठेवली जाते आणि स्वच्छ कापडात गुंडाळून या पोथ्या ठेवल्या जातात,''  अशा शब्दात महंत गोपीराज शास्त्री यांनी  त्यांचे शास्त्र उलगडून दाखवले. 

विदेशातही महानुभाव साहित्याची भूरळ पडली आहे. अमेरिकेच्या पेनसिल्व्हिया विद्यापीठातील विदुषी अॅन फिल्डहाऊस या महिला संशोधिकेने  १९७२ च्या सुमारास खास पुण्यात येऊन मराठी भाषा शिकून घेतली. त्यानंतर त्या रिद्धपुरात येऊन राहिल्या. श्रीचक्रधर स्वामी निरुपित सूत्रपाठाचा इंग्रजीमध्ये “द िरलिजस सिस्टीम आॅफ  महानुभाव सेक्ट” या शीर्षकाने १९८३ मध्ये अनुवाद प्रकाशित केला आहे. तसेच श्री गोविंदप्रभंूचे चरित्र ‘द डीडस् ऑफ गॉड इन िरद्धपूर’ या नावाचे त्यांचे  पुस्तक ऑक्स्फर्ड विद्यापीठाने १९८४ मध्ये प्रकाशित केले.  विद्यापीठांमध्ये अभ्यासली जातात. फिल्डहाऊस यांनी मराठीत लिहून पाठविलेली पत्रेही येथे सांभाळून ठेवण्यात आली आहेत. रशियाचे प्रा. कुझनोत्स यांनाही महानुभाव पंथाचा अभ्यास करण्यासाठी यायचे होते, मात्र त्यांच्याकडे पैशाचा तुटवडा होता. त्यावेळेस प्रसिद्ध कथाकार आणि महानुभाव पंथाचे गाढे अभ्यासक के. ज. पुरोहित उर्फ शांताराम यांनी त्यांना सर्वतोपरी मदत केली. िहंदू धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारण्यापूर्वी महानुभाव धर्म स्वीकारण्याचा विचारही डॉ. आंबेडकरांच्या मनात घोळत होता. त्यावेळेस त्यांनी पुरोहित यांच्याशी नागपूर येथे चर्चा केली होती, अशी आठवण एकदा रविंद्र पिंगे यांनी सांगितली होती. लंडन विद्यापीठाचे डाॅ. रिसाईड यांनीही महानुभाव पंथ आणि महानुभवांची सकळ लिपीवर पुस्तके लिहिली आहेत. ही सर्व पुस्तके या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. 

सांकेतिक लिपी आणि सुडोकू

महानुभाव पंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपले साहित्य गुप्त ठेवण्यासाठी सांकेतिक लिपीचा शोध लावला. रवळोबास यांनी सकळ लिपीचा शोध लावला. या लिपित "क' साठी य तर फ साठी छ एवढेच नव्हे तर जोडाक्षरांसाठी सांकेतिक शब्दही तयार करण्यात आले. सध्या उपलब्ध असलेले ९० टक्क्यांहून अधिक हस्तलिखित साहित्य वा पोथ्या याच लिपीत आहेत. अशा २१ लिप्या महानुभाव पंथातील विविध महंतंानी तयार केल्या आहेत. सुंदर लिपी, वज्र लिपी, कविश्वरी लिपी, शिर लिपी, सुभद्रा लिपी, लक्ष्मी लिपी, अंकलिपी अशा लिपित हे साहित्य लिहिण्यात आले आहे.  आपले साहित्य गुपित राखण्यासाठी लढवलेली ही शक्कल अफलातून होती.  अशीच एक उल्लेखनीय बाब म्हणजे आज आपण सारे सुडोकू खेळतो. असेच एक सुडोकू गोपीराजबाबा ग्रंथ संग्रहालयाच्या दारावर आहे. अहिल्याबाई होळकरांची सवत हरकूबाई होळकर या महानुभाव पंथाच्या अनुयायी होत्या. त्या नियमित रिद्धपुरात येत आणि हत्तीत बसून गोविंद प्रभूंच्या मंदिरात दर्शनाला येत. तेथे मोठा दानधर्म करून  राजेशाहीला साजेशी पुजाअर्चा करीत.  एकदा तत्कालिन महंत गोपीराज ( या मठाच्या प्रमुखाचे नाव नेहमीच महंत गोपीराज हेच असते) यांनाही आपण अशीच हत्तीत बसून गोविंद प्रभूंच्या मंदिरात जावे आणि राजेशाही पद्धतीने पूजा करावी, असे वाटले. त्यांनी ती इच्छा हरकूबाईंसमोर बोलून दाखवली. यावर बाईंनी महंतांना कशाला हवे या राजेशाही पद्धतीचे आकर्षण म्हणून त्यांची खरडपट्टी काढली. त्यामुळे नाराज झालेले हे महंत हैद्राबादेत राज दरबारात असलेल्या आपल्या एका नातेवाईकाला भेटायला गेले. त्यांनी महंतांना हत्ती देऊन, भरपूर द्रव्य देऊन परत पाठवले. या द्रव्यातून गोपीराजबाबा ग्रंथालयात एक चंदेरी रंगाचे भव्य व्दार बसविण्यात आले आहे. त्यावर एका कोपऱ्यात हे सुडोकू कोरण्यात आले आहे. हे सुडोकू कुठून आले? कसे आले? हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे.

अक्षम्य अनास्था व दुर्दशा

मराठी भाषेचे नाव घेऊन हे राज्य चालते. मराठीचा उदो-उदो करण्यात एकही पक्ष मागे नसतो. अशावेळेस मराठी साहित्याची जन्मभूमी असलेल्या या स्थळाची आणि या भाषेतील दूर्मिळ साहित्याची खरेतर उत्तम काळजी घेतली गेली असेल, असे कुणालाही वाटत असेल. मात्र िरद्धपूरचा फेरफटका मारल्यावर केवळ सर्व राजकीय पक्ष व त्यांचे नेते, मराठीचे मीठ खाणारे शासकीय अधिकारी आणि सामान्य जनताही किती कर्मदरिद्री आहे, याचा संतापजनक प्रत्यय येतो.  रिद्धपुर गावाच्या वेशीवर जेथे मराठीतील पहिली साहित्यकृती लिहिली गेली तेथे याची माहिती देणारे कोणतेही सरकारी फलक नाही.  “ हेच ते स्थळ जेथे मराठी साहित्याचा जन्म झाला,” किंवा "' लीळाचरित्र लेखन स्थळ'' असा फलक या स्थळाजवळ असायला हवा होता. मात्र हे स्थळ शोधत बसावे लागते. या परिसरातील लोकांनाही हे वाजेश्वरी हे नाव आपण घेतले नाही तर हे स्थळ सांगता येत नाही. या ठिकाणी जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. वाजेश्वरी या ठिकाणी असलेली मंदिरे आणि लीळाचरित्र लिहिले गेले ते स्थान "भट्टाची मात्रा' येथेही थोेडेबहुत सुशोभिकरण करण्यात आलेय, मात्र हे खासगी व्यक्तींनी केलेय.  या परिसरातील फरशांना वा भिंतींना तडे गेले आहेत. खरेतर या परिसरात मराठी साहित्यातील पहिल्या साहित्यकृतीला साजेसे एक उत्तुंग स्मारक असायला हवे होते. देहू येथे जसे संत तुकारामांचे अभंग कोेरून एक संुदर स्मारक उभारण्यात आलेय तसे येथेही संपूर्ण लीळाचरित्र कलात्मक पद्धतीने कोरून मांडायला हवे. महात्मा चक्रधर, नागदेवाचार्य आणि मराठीतील आद्य साहित्यिक व चरित्रकार म्हाईंभट यांचे पुतळे येथे उभारायला हवे होते. मराठी साहित्याचा लीळाचरित्र ते आजवरच्या प्रवासाची सचित्र कहाणी सांगून आपल्या भाषेची थोरवी सांगणारे एक चांगले कायमस्वरूपी प्रदर्शन येथे उभारायला हवे होते. आधुनिक काळात गैर महानुभावपंथियांना महानुभाव पंथाचे साहित्य आणि त्यांचे कर्तुत्व ज्यांच्या भगीरथ प्रयत्नांमुळे कळले ते प्रकांड पंडित भाऊसाहेब कोलते यांची ओळख करून देणारे एक स्मारकही येथे उभारायला हवे. येथे एक ग्रंथालय आहे, मात्र त्याची माहितीही अनेकांना नसते.

रिद्धपूर या गावाची आणि जेथे गोविंदप्रभू व त्यांचे अनुयायी वावरले त्या परिसराची तर याहूनही दुर्दशा आहे. येथे दरवर्षी पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून हजारो लोक येतात. १९९० साली येथे राज्य सरकारने यात्री निवास बांधलेय, मात्र त्याची अवस्था दयनीय आहे.  या गावात आल्यावर खराब रस्ते, उघड्यावर घाणीसह वाहणारी गटारे, स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले हे दृश्य पाहून मराठीची जन्मभूमी म्हणून साहित्यिकदृष्ट्या तर महानुभावांची काशी म्हणून धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या या स्थळाची दुरावस्था मान शरमेने खाली गालायला लावणारी आहे. साहेबराव तट्टे हे आमदार असताना त्यांनी आंदोलन करून या स्थळाला क दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळवून दिली. सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री असताना त्यांनी येथे मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन केले जाईल, लीळाचरित्राचे स्मारक उभारले जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र संतपीठाची शाखा उघडण्यापलिकडे काही घडले नाही. वाजेश्वरीतील आश्रमशाळेत ग्रंथसंग्रहालय उघडण्यात आलेय.    “ विधानमंडळाच्या विनंती अर्ज समितीच्या शिपारशीवरून राज्य सरकारने रिद्धपूर तीर्थक्षेत्राचा साडे चार कोटींचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला. मात्र आजवर त्यातील केवळ १ कोटीच मिळाले. या पैशातून भक्त निवास, पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटारे यांचे बांधकाम होणार होते. मात्र यातील काहीही घडले नाही,'' अशा शब्दात येथील एक प्रमुख मठ असलेल्या वायंदेशकर बाबा मठाचे महंत यांनी सांगितले. हे महंत अमरावती जिल्हा परिषदेचे एकदा सदस्यही होते.  रिद्धपूरपासून ३ किलोमीटर अंतरावर नरखे़ड-अमरावती या रेल्वेमार्गावर एक रेल्वेस्टेशनही उभारण्यात आले आहे. मात्र या स्टेशनला रिद्धपूर हे नाव देण्याऐवजी या स्टेशनपासून ८ किमी अंतरावर असलेल्या कोळवीर या गावाचे नाव देण्यात आले आहे. हे नाव बदलून जगप्रसिद्ध असलेल्या रिद्धपूरचे नाव दिले जावे, असा महानुभाव पंथियांचा आग्रह आहे. 

अमरावती जिल्ह्यातील तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी गोपीराजबाबा ग्रंथसंग्रहालयातील हजारावर पोथ्यांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच आणि तत्कालिन सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांनी यात रस घेतल्याने हे काम अलिकडेच पूर्ण झाले आहे. मराठी भाषेचे विद्यापीठ रिद्धपूरऐवजी अन्यत्र होणार असल्याची चर्चा मध्यंतरी होती. ""मराठीतील पहिल्या गद्य व पद्य साहित्याची निर्मिती रिद्धपुरात झाली. एवढेच नव्हेतर मराठीतील पहिल्या शब्दकोशाची निर्मितीही येथेच झाली. "पाठाची पोथी'मध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून सांगण्यात आला आहे. दत्तराज मराठे, हरिप्रसाद पुसदकर यांना मराठीतील पहिल्या टीपग्रंथ निर्मितीचा बहुमान जातो. मराठीतील साहित्योपकारक साधन साहित्याची निर्मिती सर्वप्रथम महानुभावीयांनीच केली आहे. मराठीतील व्याकरण, छंद शास्त्र आदी ग्रंथ सर्वप्रथम महानुभावीयांनीच दिले आहे. रिद्धपुरात जवळपास मराठीतील साडेसहा हजारांहून जास्त ग्रंथ आहेत. मराठी भाषेतील हा अमूल्य ठेवा आहे. मी हे साधार सिद्ध केलेले आहे. त्यामुळे रिद्धपुरातच मराठी विद्यापीठ व्हावे, हे क्रमप्राप्तच आहे. ते इतरत्र पळविले जाऊ नये,'' अशी भूमिका महानुभाव साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. पुरूषोेत्तम नागपुरे उपाख्य पुरूषोत्तमदादा कारंजेकर यांनी  मांडली.

लीळाचरित्राच्या शेकडो पोथ्या, हस्तलिखिते वाचून डॉ. भाऊसाहेब कोलते यांनी संपादित केलेले लीळाचरित्र राज्याच्या साहित्य व संस्कृती मंडळाने १९७८ मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित केली. त्यानंतर दुसरी आवृत्तीही लगेच प्रकाशित करण्यात आली. कोलते यांनी हा ग्रंथ सिद्ध करण्यासाठी घेतलेले कष्ट अतुलनीय आहेत. जवळपास ३० वर्ष त्यांनी या विषयावर संशोधन केले. महानुभाव साहित्याचा त्यांचा व्यासंग पाहता ते आधुनिक नागदेवाचार्यच होते, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.  या संपादित आवृत्तीत संपादक मंडळावर आपलेही नाव प्रसिद्ध व्हावे म्हणून दुराग्रही भूमिका घेणाऱ्यांची मागणी फेटाळण्यात आली. अशा स्वार्थी लोकांनी तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनानंतर या आवृत्तीचा एका तळटीपेतील प्रक्षिप्त ओवीचा बादरायणी संबंध जोडून देवी सीता आणि संत ज्ञानेश्वर, भगवान विठ्ठल यांचा अपमान करणारे शब्द असल्याचा जावईशोध लावण्यात आला. अमरावतीच्या न्यायालयात धाव घेऊन या पुस्तकावर बंदी लादण्यात आली. हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयात आहे. खरेतर लीळाचरित्र लिहिण्यात आले तेव्हा संत ज्ञानेश्वरांचे वय अवघे एक वर्ष होते, त्यामुळे त्यांच्याबद्दल यात काही उल्लेख असण्याचे कारण नाही. या चरित्रात अनेक व्यक्तींची नावे आहेत तसे ज्ञानेश्वर, विठ्ठल, सीता ही त्याकाळात प्रचलित असलेली व्यक्तींची नावे आहेत. त्यामुळे ही बंदी उठवली जावी, अशी महानुभाव पंथाची विनंती वा मागणी आहे. राज्य सरकारने या प्रकरणी उच्च न्यायालयात हस्तक्षेप करून ही बंदी दूर करवून घ्यावी आणि स्वत:च प्रकाशित केलेले हे पुस्तक पुन्हा प्रसिद्ध करून सामान्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी भावना महानुभाव पंथात व्यक्त केली जाते. मराठी साहित्याच्या जन्मभूमीला साजेसे स्मारक उभे रहायचे तेव्हा होईल, मात्र तोवर  किमान मराठी भाषेचे हे अभिजात व आद्य साहित्य लेणे तरी किमान मराठी जनांच्या हाती सोपविण्याची संवेदनशीलता आणि मराठी भाषेप्रति आपले इमान राज्यकर्ते व्यक्त करतील का? 

------

चौकट क्र. १

--

महिला आणि महानुभाव

महानुभाव पंथाने महिलांना शिक्षणाची व धार्मिक ज्ञान प्राप्त करण्याची मूभा दिली. त्यामुळे महिला मोठ्या प्रमाणावर यात सामील झाल्या. सध्या औरंगाबादला असलेल्या महानुभाव आश्रमाच्या प्रमूख महंत सुभद्राबाई कपाटे, अहमदनगरच्या  आश्रमाच्या प्रमूख महंत प्रेमाबाई पंजाबी तर अकोला जिल्ह्यातील आलेगावच्या  आश्रमाच्या प्रमूख महंत रूक्मिणीबाई पंजाबी आहेत. त्या महानुभाव साहित्याच्या तज्ञ्ज म्हणूनही ओळखल्या जातात.

---

चौकट क्र. २

--

नाशिकचे कवीश्वर घराणे व महानुभाव

 गेली अनेक शतके नाशिक येथील कवीश्वर घराणे आपल्या कुटुंबातील एक पूत्र महानुभाव पंथाला दान करतो. कवीश्वर घराण्यातील प्रसन्न हे असेच वयाच्या पाचव्या वर्षी गोपीराज मठात आलेत. आता ते चाळीशीच्या घरात आहेत. अलिकडेच त्यांचा पुतण्याही येथे आला. आता पूर्ण आयुष्य ते या मठातच काढतील. वायंदेशकरबाबा मठाचे सध्याचे महंतही असेच त्यांच्या बालपणी येथे आले आणि तत्कालिन महंतांनी त्यांचे पालन करीत महानुभाव साहित्याचे ज्ञान दिले. येथे प्रमुख ८ मठ असून एकूण २० मठ आहेत. यात बहुसंख्य महंत असेच बालपणीच आलेले असतात. या परिसरातील अनेक कुटुंबांची मुले येथे राहूनच शालेय शिक्षण पूर्ण करतात आणि सोबतच महानुभाव पंथाचे ज्ञान महंतांकडून प्राप्त करतात. एका अर्थाने गुरूकूल पद्धतीनेच येथे अध्ययन चालते.

----

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट