जळमांडविऐचा दृष्टांत लेखक :- संदीप तडस
जळमांडविऐचा दृष्टांत लेखक :- संदीप तडस
सर्वज्ञांनी जळमांडवी वनस्पतीचा दृष्टांत
सांगितला." कव्हणी एकु जळमांडविएचें रोप पांणियां आंतु घाली: वारेयाचेनि योगेंकरूनि
तेयाचां मुळीं रज( मातीचे कण) बैसे: तेथ आणिक बेंचाड( मुळांचा समुह, डुफ) उठी:
तेयाचां मुळीं : आणिक रज बैसे: तेथ आणिक बेंचाड उठी: ऐसी आवघी विहीरि जळमांडवीया
भरे: तेथ उदक( पाणि) असे ऐसी बुधिही(भाव) नाहीं: मग एकु दीस भीतरि रिगौनि (उतरून):
उपसौनि कवळीवरि बाहीरि घाली: हातासि कांडर( गोळे) एति: बाहीया भरति: रगत( रक्त) ए:
परि उपसवेना: तैसें धर्ममीखें संचरली अवीद्या असेखा धर्माचा अभावो करी" अर्थात
कुणीतरी एक जळमांडवी या जलपर्णी वनस्पतीचे रोप विहीरीच्या स्वच्छ पाण्यात घालतो.
नंतर वार्यामुळे जळमांडवीच्या मुळाशी रज म्हणजे मातीचे कण बसतात. त्यामुळे तेथे
जळमांडवीचे बेंचाड अर्थात मुळांचा समुह तथा डुफ वाढते. काही काळाने मुळाभोवती अधिक
माती गोळा होते. तेथे अधिक जळमांडवी वाढते. ती निरंतर वाढतच जाते. नंतर ज्याने
जळमांडवीचे रोप पाण्यात घातले तो विहीरीत डोकावतो तर पुर्वी स्वच्छ पाण्याने भरलेली
विहीर जळमांडवी वनस्पतीने संपूर्णतः व्यापून गेलेली आहे. विहिरीमध्ये पाणी आहे याचा
लवलेश सुद्धा दिसत नाही. पाण्याचा संपूर्ण पृष्ठभाग जळमांडवीने झाकळुन गेल्यामुळे
पाण्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. मग विहीर जळमांडवी पासून मुक्त
करण्यासाठी तो बाह्या वर करून विहीरीमध्ये उतरतो. थोडीफार उपटून आलेली जळमांडवी
हाताच्या कवट्याने बाहेर टाकतो. यामुळे बाह्या भरतात. हाताला गोळे येतात. हात
रक्ताळतात. शारीरीक, मानसिक कष्ट पडतात. असा पुष्कळ प्रयत्न करून देखील जळमांडवी
उपसल्या जात नाही. या जळ वनस्पतीचा नायनाट होत नाही. त्यामुळे विहीरीतील पाणि
स्वच्छ होत नाही.याच न्यायाने धर्माच्या निमित्याने मनुष्यामध्ये संचारलेली
अविद्या, अज्ञान त्याच्या जीवनामध्ये धर्माचा अभाव निर्माण करते. या अविद्या
,अज्ञानादी धर्मा व्यतिरीक्त असणाऱ्या वाईट प्रवृत्तीमुळे मनुष्याचा धर्म दूषित
होऊन तो विद्या अर्थात ज्ञानापासून वंचित होतो. हा दृष्टांत सर्वज्ञांनी रामदेव
दादोस नावाच्या शिष्याच्या निमित्त्याने निरोपिला. घडले असे की, सर्वज्ञांना रामदेव
दादोस म्हणतात, "स्वामींकडून मला जे ज्ञान प्राप्त झाले होते, ते पातळ झाले अर्थात
विसरलो". यावर सर्वज्ञ दादोसांना उंदीराने कुरतडलेली जाडी (सतरंजी) बाईसा या
पट्टशिष्ये व्दारे देतात;आणि त्यांना सांगतात, "महात्मे हो! ही जाडी महिनाभर सतत
भ्रमण करून वृक्षाखाली तीन प्रहर बसून परत तुणावी (विणावी). नंतर भिक्षा करावी.
नदीकाठी भोजन करावे. देऊळी निद्रा करावी, असा नित्यनेम सुचविला. या नित्य आचरणासह
जसजशी जाडी सांदल्या( विणल्या) जाईल तसतशी तुमची विद्या पूर्ववत येईल". सर्वज्ञांनी
सुचविलेल्या या आचरणाला दादोसांनी होकार दिला; आणि दंडवत करून सावखेडचे नातेवाईक
ऐल्हमभट्टांच्या घरी आले. येथे दादोस ऐल्हमभट्टाच्या पाळण्यावर सुखाने झुलत जाडी
विणीत. ते वृक्षाच्या तळी जाडी विणने विसरले. महात्मे म्हणून दादोसांना तेथे उटणे
लावून अंघोळ करीत. मानसन्मानाने ताटापाटावर मऊसुत तुपाभाताचे जेवण घेत. गावोगावी
भ्रमण भिक्षा करून नदीकाठी भोजन करण्याचे त्यांनी टाळले. बाज-पलंगावर आरामात
ऐल्हमभट्टांकडे निद्रा घेत. मंदिरात निद्रेचा नेम टाळला. स्वामींशी कबुल
झाल्याप्रमाणे आचरण न करता थाटामाटात पाळण्यावर झुलत दादोसांनी महिनाभर सतरंजी
विणली. सर्वज्ञांकडे महीन्या नंतर परत आले. त्यांना दंडवत केला आणि पुन्हा उत्तम
विणलेली सतरंजी बाईसांना सर्वज्ञां समक्ष परत दिली. तेव्हा बाईसा सतरंजीकडे पाहुन
सर्वज्ञांना आश्चर्याने म्हणाल्या, "बाबा बाबा, जाडी कैसी सांदीली जैसे जाणवे ना!"
यावर सर्वज्ञ म्हणाले, "बाई जाडी सांदीली: परी विद्या न संदेचि" यावर बाईसा प्रश्न
करतात, ते का बाबा? उत्तरादाखल सर्वज्ञ म्हणाले, "दादोसाने आम्ही सांगितलेला
नित्यनेम न पाळता थाटामाटात सुखाभोगात ही जाडी विणली. सांगितल्याप्रमाणे वृक्षाखाली
जाडी विणली असती. भिक्षा भोजन केले असते. देऊळी निद्रा केली असती तर, पातळ झालेली(
विसरलेली) विद्या परत प्राप्त झाली असती. त्यांनी जाडी तर उत्तम विणली परंतु विद्या
वीणु शकले नाहीत. दादोस असे का करतील? असा प्रश्न उपस्थित करून स्वामी म्हणतात,
"यांना तर आपेयाच्या परीवरी पाय पसरून मरावें वाटते" अर्थात आप्त नातेवाईकांच्या
पायरीवर पाय पसरून मरावे वाटते. यांना नातेवाईकांचा स्नेह मोह सुटत नाही. पुढे
स्वामी म्हणतात,"पसयाचे पाइलीए का येईल?" अर्थात यांच्या हाताच्या ओजंळीतच (पसयात)
काही नाही तर पायलीत कुठून येईल असा प्रश्न सर्वज्ञ दादोसांच्या निमित्याने करून
धर्मातल्या अर्धमाची गोष्ट जळमांडवीच्या दृष्टांताने निरोपन करतात. हा या
दृष्टांताचा प्रकरणवश होय. अर्थात सूत्र किंवा दृष्टांत ज्या घटना किंवा प्रकरणाशी
संबंधित आहे तो प्रकरणवश. दृष्टांतामध्ये कुणीतरी एक पुरुष, जळमांडवीचे रोप, पाणी,
रज, बेंचड, विहिर या अनुक्रमे व्यक्ती,वनस्पती, पदार्थ व प्रतिकाद्वारे दृष्टांताचे
कथन स्वामींनी केले आहे. दृष्टांताचे कथाबीज जळमांडवी( अविद्या,अज्ञान)असुन
त्याभोवती सर्वज्ञांनी कथा आशयाची गुंफण केली आहे. तर बाह्या वर करणे, हाताने
जळमांडवी उपटणे, कवट्याने बाहेर फेकणे इत्यादी कृतीमुळे कांडर( गोळे) येणे,हात
रक्ताळने या मानसिक, शारीरिक दुःखास कारणीभूत घटना दृष्टांतात घडून येतात.
मनुष्याच्या जीवनात जळमांडवी अर्थात अविद्या,अज्ञानादि वाईट गोष्टी शिरल्या की त्या
वाढत जाऊन जीवनाला अस्वच्छ करतात असे दृष्टांत सांगतो. ज्याप्रमाणे जळमांडवीचे एक
मुळ विहिरीतील संपूर्ण पाण्याला आपल्या अस्तित्वाने व्यापून टाकते. पाण्याचे
अस्तित्व आच्छादून गेल्याने मूळ पाण्याचा गुणधर्म बाधित होतो. हे पाणी पिण्या
वापरण्या योग्य राहत नाही. पाण्याचे अस्तित्वच धोक्यात येते; त्याचप्रमाणे
मनुष्याचे जीवन धर्माच्या निमित्त्याने घुसलेल्या अधर्मादी क्रीयेने प्रदूषित
झाल्यास त्याची दुःखद प्रतिक्रिया मनुष्याच्या जीवनात उमटते. सर्वज्ञांनी येथे
क्रियेची प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे. जी मानसिक,शारीरीक स्वरूपाव्दारे व्यक्त
होते. दृष्टांतामधील पूर्वीचे जळमांडवी मुक्त स्वच्छ पाणी हे आचरत्या चर्यावंत
सत्पुरुषाचे लक्षण आहे. तर नंतरचे जळमांडवी युक्त प्रदुषित पाणी न आचरत्या चर्या
बाधित पुरुषाचे लक्षण दर्शविते. तसेच पाण्याचा साठा असणारी विहीर हे मनुष्याच्या
अंतकरण जागी असुन त्यातील जळमांडवी मुक्त पाणी धर्म, विद्या आणि ज्ञानाचे
प्रतिनिधीत्व करते तर जळमांडवी युक्त पाणी अधर्म, अविद्या,अज्ञानाचे प्रतिनिधीत्व
करते. हे प्रतिनिधीत्व व्यक्तीसापेक्ष स्थितीने प्रभावित आहे. म्हणजेच मनुष्याचे
अंतकरण स्वच्छ असेल तर ज्ञान वाढेल धर्मवृद्धी होईल अर्थात पाणि स्वच्छ असेल
,प्रदुषीत नसेल तर जळमांडवीसारखे अविद्या अज्ञान वाढणार नाही. पाण्यात जळमांडवीचा
शिरकाव होऊ न दिल्यास ती वाढण्याचा प्रश्नच येणार नाही. सर्वज्ञांनी दृष्टांतामध्ये
जळमांडवीचे अतिक्रमण आणि त्याचे दुष्परिणाम दाखवून मनुष्याने आपले जीवन प्रदूषित,
दुःखी करू नये असे सूचन केले आहे. अविद्या,अज्ञानाने व्यापलेल्या जीवनाची वाटचाल
मनुष्याला दुःखाकडे घेऊन जाते. धर्माचा अभाव हे अश्या संबंधित मनुष्याच्या जीवनाचे
मुख्य अवलक्षण ठरते. अश्या धर्म अभाव ग्रस्ततेने मनुष्याचे जीवन आणि चारित्र्य
प्रदूषित होऊन शारीरिक,मानसिक दुःख त्यास भोगावे लागते असा घटनाक्रम दृष्टांतामध्ये
आलेला आहे. ही दुःख भोगण्याची क्रिया सर्वज्ञांनी येथे "कांडर( गोळे) येति, बाहिया
भरती, रगत ये" या शब्दांनी स्पष्ट केली आहे. स्वामींचा हा दृष्टांत आणि त्यातील
अन्वयार्थ आपल्या व्यक्तिगत जीवनाला तथा आजच्या समाज जीवनाला तंतोतंत लावता येतो.
लेखक:- संदीप तडस शिरजगावकर अमरावती मो. क्र.९७६३७९६४२४


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा